|| डॉ. आशुतोष जावडेकर

तेजसच्या ऑफिसमध्ये मागच्या आठवडय़ात ते ‘हेल्दी लाइफ’वरचं ट्रेनिंग झालं तसा तो पेटला होताच. रोज सकाळी टेकडीवर पळायला जाणं काय किंवा रात्रीबेरात्री मुलगा आणि बायको यांची करमणूक करत हॉलमध्ये सूर्यनमस्कार घालणं काय! अरिनमुळे त्याने जिम लावलं खरं; पण परीक्षा जवळ आली तसं अरिनने जिमला जाणं थांबवलं.. आणि मग तेजसनेही. तो व्यायाम करायचा ते नांदेडला! तेजस आणि त्याचे दोस्त जोरबठका मारून थेट नदीत पोहायला उतरायचे. केवढा वेळ प्रवाहाच्या उलटसुलट तो पोहत असे! त्याचे त्या पौरुष जागं होण्याच्या वयात खांदे आणि बाहू दणकट झाले ते पोहण्यामुळेच. तेजसला जाणवलं होतं की आता मात्र आपल्या मुलाला आपण पोहायला टँकवर घेऊन जातो तेव्हाही आपण काय करतो, तर व्हॉट्सअ‍ॅपवर नाहीतर फेसबुकवर माश्या मारतो.

त्याने शनिवारी रात्री कडक भाषेत त्याच्या ‘विशी तिशी चाळिशी’ ग्रूपवर तातडीचा मेसेज सोडला : ‘उद्या पहाटे पावणेसहा वाजता मी तुम्हाला तुमच्या घरामधून पिकअप करेन. आपण टेकडीवर जायचं आहे आणि तीन कि. मी. पळायचं आहे!’

पुढे अरिनसाठी विशेष सांगावा होता : ‘अऱ्या, तू सध्या नुसता व्हिडीओ गेम्स खेळतोस हे अस्मितकडून मला कळलंय. सो.. नो ऑग्र्युमेण्ट. पळायला जायचं.’

माही मत्रिणीसोबत वीकेंड म्हणून अमॅझॉनवरची ‘फोर मोअर शॉट्स’ ही सीरियल बघत होती आणि योगायोगाने समोर लिझा रे जबरदस्त शिव्या हाणत वेट ट्रेनिंग करते आहे असा सीन सुरू होता. तिनेही अंगठा उंचावला चॅटवर.

अरिनने त्याच्या रूममेट असलेल्या अस्मितला एक धपाटा घालत ‘चुगल्या कुणी करायला सांगितल्या आहेत?’ इथपासून ‘तेजसदा माझा मित्र आहे..’ इथपर्यंत सगळं सांगून घेतलं. पण मनोमन तो अस्मितच्या आस्थेने सुखावलाही. आणि त्यानेही चॅटवर अंगठा उंचावला.

तोवर माहीचा अरिनला मेसेज आला : ‘किती दादागिरी करतो आहे हा तेजस!’

अरिन हसला. झोपला वेळेत. आणि दुसऱ्या दिवशी तेजसच्या धाकाने लवकर उठून तयारही झाला. पहिलं त्याने मॅचिंग शॉर्ट्स आणि टी-शर्ट शोधला, मग हातात फिटनेस बँड लावला. समोर स्केचरचे नवे, मस्त लालसर बूट होते ते त्याने घातले. तेजस माहीला घेऊन आलाच तोवर. मग पहाटे तुलनेने मोकळ्या रस्त्यावरून भरधाव वेगाने तेजसने गाडी टेकडीच्या पठारावर नेली. फार गर्दी नव्हती. चक्क थोडा गार वारा होता. तिघे खाली उतरले. तेजस वॉर्मअप करताना माही आणि अरिनने त्याच्याकडे मागून बघत हसायला सुरुवात केली.

मग तेजस उचकला आणि त्याने डाएट, व्यायाम वगरेवर प्रबोधन घेतलं. एवढंच काय, त्याने तितक्यात गाडीतून किंडल काढलं आणि म्हणाला, ‘‘मुराकामी नावाच्या जपानी लेखकाचं हे पुस्तक वाचतोय. मला काही कादंबऱ्या आवडत नाहीत, पण हे पळण्यावर आहे म्हणून वाचतोय.’’ मग त्याने तो कोण मुराकामी कसा मोठा लेखक असूनही रोज एक तास पळतो, मॅरेथॉन स्पध्रेत अनेक वष्रे भाग घेतो वगरे सांगितलं.

माही त्याला तोडत म्हणाली, ‘‘तेजस, आधी पळू या?’’ आणि मग अरिन फिदीफिदी हसला. तसं रागावून तेजसने थेट पळायला सुरुवात केली. पळतानाच म्हणाला, ‘‘आता थेट तीन कि.मी. पळून मगच थांबायचं.’’ मागून हसत अरिन आणि माही पळू लागले. झाडं निष्पर्ण होती. आणि आकाश पहाटेही उबदार. अरिन तरुण तर होताच; पण मुळात फुटबॉल खेळणारा होता. त्यामुळे त्याने स्प्रिंट मारत तेजसला गाठलं आणि मुद्दाम मागे वळत टुकटुक करत तो पुढे गेला. माही शांतपणे धावत होती. तेजस मागून ओरडत म्हणाला, ‘‘किती मागे पडली आहेस. तुम्ही मुली ना..!’’ तरी शांतपणे माही तिच्या गतीने पळत राहिली. तिचे लांब केस तिने क्लिपने एकदा बांधले. आणि मग फिलाडेल्फियाच्या मॉरिस आबरेरेटममध्ये जशी ती नेहमी पळायची तशी पळू लागली. तेव्हा तिच्यासोबत कधी कधी रिकी यायचा. ती सोबत तिला आश्वासक वाटायची. पण तो तिच्या गतीने कधी चालला नाही, पळाला नाही. तो पुढेच गेला.. जात राहिला. आणि ती मग एकटीच मागे राहिली.

अरिनला एकदम आठवलं, की महालक्ष्मीजवळच्या फिनिक्स मॉलशेजारी एका जुन्या मिलसारख्या बिल्डिंगमध्ये एका गच्चीवर नेटबिट लावलेलं फुटबॉलचं मदान होतं. त्या मदानात वाऱ्यासारखा तो बॉलला पायाशी खेळवत पळवत नेत असे. आणि मग थेट गोल! बस्स! मागून शिट्टी, चीत्कार. त्याला एकदम जाणवलं- ही टेकडी म्हातारी आहे. आणि झाडाबिडांचा दोन मिनिटांनी त्याला कंटाळा आला.

मग अरिनला गाठण्यासाठी तेजस वेगात पळाला, पण त्यामुळे थकला आणि उलट त्याचा वेग मंदावला. मुराकामीएवढं डेडिकेशन आपलं नाही हे त्याला नीट कळतच होतं. आणि तसंही चाळीस आता पूर्ण झालंच होतं. मुलगा मोठा होईपर्यंत जबाबदारी म्हणून फिट राहायला हवं. ऑफिसमधल्या कदमला जसा ताणाने हार्टअटॅक आला आत्ताच.. तसं व्हायला नको. बस्स, मुलगा पंचविशीचा होईपर्यंत तरी फिट राहणं भाग आहे. नंतरचं नंतर. तसाही कंटाळा येतो कधी कधी सगळ्याचा. दीड किलोमीटर झाले तसा तो थांबला, त्याची पळायची सवय उरली नव्हतीच.  तोवर माही मागून तिच्या गतीने आली आणि तेजसला ओलांडून पुढे गेली. तेजसला वाटलं, की आता हीही आपल्याला टुकटुक करणार. पण ती हसून गेली पुढे. आणि तेजसच काय, त्याच्या मागून येणारा एक मुलांचा कंपूदेखील माहीच्या पळतानाच्या ग्रेसकडे भारून बघत राहिला.

अरिन पुढे पळत होताच. त्यांना टेकडीवरच्या खाणीपर्यंत जायचं होतं. पण मधेच ब्रेक लागल्यासारखा तो थांबला. कारण समोर सुंदर मोर होते दोन! असे समोर होते. आणि मग अरिनची चाहूल लागली तशी पायवाटेवरून पळून गेले. अरिनने बोरीवली नॅशनल पार्कमध्ये जेवढे वन्यजीव शालेय वयात पाहिले असतील तेवढेच. बाकी तो पक्का मुंबईकर शहरी बाबू होता. असे मोर पाहून तो हरखला आणि पळायला लागला, तोवर माहीने त्याला गाठलं. खाण आलीच. माही धापा टाकत दगडावर बसली. अरिन सेल्फी घेत उभा राहिला. तेजस मागून आला तशी माही त्याला पाहून म्हणाली, ‘‘तेजस, तर आम्ही मुली! मी रेस लावली नव्हती तुम्हा दोघांशी.. पण मीच पहिली आले!’’

तेजसने हसत खांद्यापासून हात जोडण्याचा अभिनय केला आणि मग निवांत चालत ते परत निघाले. कुणी काही फार बोललं नाही. अरिनला वाटलं, की अस्मित त्याच्या नगरजवळच्या शेतात राहायला बोलावतो तिथे जायला पाहिजे. हू नोज? आज इथे आवडलं तसं तेही आवडायचं. तेजस आधी काही बोलला नाही, पण मग म्हणाला, ‘‘सॉरी यार. मी जरा दादागिरीच केली आज. पण अरिन, माही.. मी अस्वस्थ आहे यार. मला भीती वाटते आहे, की कामाच्या ताणाने मी त्या कदमसारखा जाईन. मला माहितीय, हे असं होणार नाहीये. आणि मला मस्त जगायचं आहे आणि मी जगणार आहे. पण मला मध्येच भीतीही वाटते आहे यार! म्हणून सध्या पेटलोय जरा.’’

माहीने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, ‘‘तेजस, काही होणार नाही. पण बाई म्हणून एक सांगते- तुम्ही पुरुष जरा जास्तच वेगात जाता. थकता. गरज असते का रे याची? मागे पडलेल्या बाईसोबत चालत जावं ना रे तुम्ही पुरुषांनी कधी कधी! लक्षात ठेव.. बाई थकेल, पण थांबणार नाही. तुझी आई बघ. बायको बघ. तुला ना एक मुलगीही व्हायला हवी होती हे नीट कळायला.’’

तोवर अरिनने गुगलवर कोण हा मुराकामी आहे आणि त्याचं काय म्हणणं आहे, ते शोधून काढलेलं. टेकडीवरच्या देवळासमोरच्या पारावर तिघे विसावले तसं अरिनने वाचायला सुरुवात केली : ‘तर माझी पळण्याची मेहनत.. बारीक छिद्र असलेल्या भांडय़ात पाणी ओतत राहण्यासारखंच असेल हे कदाचित सगळं. पण जे प्रयत्न ओतले आहेत ते तर राहतातच. अंती तुमच्या हृदयाला हे यश जाणवणं हेच मोलाचं असतं..’ तेजसने पुढचं पाठ असल्यासारखं म्हटलं, ‘कधी माझ्या कबरीशेजारी शिलालेख बांधला तर लिहा- हारुकी मुराकामी.. लेखक आणि रनर.. निदान तो कधी नुसता चालत बसला नाही..

समोर मारुतीचं मंदिर होतं छोटंसं. तेजसला वाटलं, की तो जणू लहान झाला आहे आणि त्याच्या आईने शिकवलेलं ‘भीमरूपी महारुद्रा..’ म्हणतो आहे. ते शब्द कधी मोठय़ाने तोंडाबाहेर पडले ते त्याचं त्यालाच कळलं नाही. अरिन आणि माहीने डोळे मिटून हात जोडले आणि ‘अणूपासोनि ब्रह्मांडापर्यंत’ धावणारा सगळा पसारा जणू त्या क्षणापुरता आनंदाने स्तब्ध झाला!

ashudentist@gmail.com