|| गणेश द. राऊत

‘युद्धस्य कथा रम्य:’ असे म्हणतात. त्यातून पराभवाची किंवा शोकांतिकेची कथा असेल, तर हरणारा समाज ती कथा विसरत नाही. त्या पराभवातून प्रेरणा घेऊन त्याने पुढे विजय मिळवले तरीसुद्धा पराभवाची ती गाथा अमर असते. हळदीघाटचे युद्ध हे त्यापैकीच एक. हळदीघाटचे युद्ध प्रत्येक भारतीय माणसाला इतिहासाच्या पाठय़पुस्तकातून भेटते आणि मनात घर करून राहते. ‘हळदीघाटचे युद्ध’ हा सदाशिव दिनकर वझे यांनी अनुवादित केलेला ऐतिहासिक ग्रंथही हळदीघाटच्या युद्धाची कथा सांगतो.

मूळ ग्रंथ गुजराथी भाषेत आहे. इच्छाराम सूर्यराम देसाई यांनी हा ग्रंथ गुर्जर भाषेत प्रसिद्ध केला. लोकांपर्यंत हा ग्रंथ पोहोचवण्यासाठी या विद्वान संपादक- पत्रकारांनी तो ‘गुजराथी’ या आपल्या पत्राच्या वाचकांना बक्षीस म्हणून दिला. मराठी अनुवाद सर्वप्रथम १९१० मध्ये प्रसिद्ध झाला. मालवणस्थित राहणाऱ्या स. दि. वझे आणि ‘लोकमित्र’ या पत्राचे संपादक द. गो. सडेकर यांनी हे पुस्तक काढण्याचे मनावर घेतले. त्यामुळे मराठी साहित्यात तोवर दुर्लक्षित राहिलेल्या एका चांगल्या साहित्यकृतीची भर पडली.

१९१ पृष्ठे आणि ३९ प्रकरणांनी ‘हळदीघाटचे युद्ध’ हा ग्रंथ सिद्ध झाला आहे. प्रस्तावनेत कोठेही हा ग्रंथ कादंबरी आहे वा ऐतिहासिक संशोधनपर ग्रंथ आहे याचा खुलासा नाही. अनुवादकाने मूळ ग्रंथाचे नावसुद्धा दिले नाही. मूळ लेखकाची माहिती, मूळ भाषेत त्याला मिळालेला प्रतिसाद या कशाचाच बोध प्रस्तावनेतून होत नाही. वरदा बुक्सने इतक्या वर्षांनंतर हा ग्रंथ प्रकाशित केला याबद्दल त्यांचे अभिनंदन केले, तरी नव्या आवृत्तीत या गोष्टींचा समावेश करण्यास हरकत नव्हती. लेखक-अनुवादक यांचे छायाचित्र आणि माहिती मलपृष्ठावर आल्यास वाचकाना उपयुक्त ठरते. संशोधकांना नवसंशोधनाच्या दिशा सापडतात. तसेच यामुळे महाराष्ट्र- गुजरात संबंधांवर प्रकाश पडू शकला असता.

हा ग्रंथ ऐतिहासिक संशोधनाच्या कसोटय़ा वापरल्यावर तो कादंबरीच्या जवळ जाणारा आहे हे ध्यानात येते. यातील काही प्रकरणांची नावे ‘प्रेमपिपासा’, ‘महिला मेळा’, ‘पिशाचाचा पिशाचधर्म’, ‘तरुण प्रवासिनी’, ‘स्वप्न सत्यता’, ‘यमुनेची प्राणाहुती’ अशी आहेत. अशी शीर्षके ऐतिहासिक संशोधनपर ग्रंथात येत नाहीत. पुस्तकाची रचना चार खंडांत केली आहे. प्रकरणशीर्षकावर प्रथम परिच्छेद, द्वितीय परिच्छेद.. असा उल्लेख आहे. त्याचे मराठीकरण का केले नाही, ते समजण्यास मार्ग नाही. ‘प्रथम खंड- उद्बोधन- प्रथम परिच्छेद- चंदावतकृष्ण व प्रताप’ या पहिल्याच प्रकरणात पहिलीच ओळ ‘छप्पय’ अशी कंसात छापली आहे. प्रथम ग्रासे मक्षिकापात: अशीच परिस्थिती या पहिल्या ओळीत होते! मराठी वाचकांना ‘छप्पय’ म्हणजे काय हे माहीत असणे अवघड आहे. ‘बन्धुविग्रह’ या प्रकरणातील राणा प्रताप यांचे चित्रण मराठी वाचकांना अपरिचित आहे. परंतु हळदीघाटच्या लढाईचे वर्णन करताना लेखकाची लेखणी सर्वसंचारी झाली आहे.  चेतक अश्वाचे बलिदान हा प्रसंगही सरस आहे.

‘प्रेमदर्शन’ या शीर्षकाच्या तृतीय खंडातील ‘यमुना व जोधाबाई’ या प्रकरणातील मजकूर कादंबरीच्या मूळ हेतूलाच बाधा आणणारा आहे. पुढे कादंबरी प्रेम आणि कर्तव्य याच हिंदोळ्यांवर हेलकावत राहिली आहे. हा कादंबरीवजा इतिहास ज्या काळात (इ. स. १९१० च्या आधी) लिहिला गेला आहे. त्या काळात याच प्रकारे कादंबऱ्या लिहिल्या जात होत्या. नायकाचे अती अती मोठेपण रेखाटण्याच्या नादात आपण काय लिहीत आहोत, याचेही भान लेखकाला राहत नाही. मागील शतकात या गोष्टी ठीक होत्या.

मात्र, २१ व्या शतकात अशा स्वरूपाची पुस्तके पुन्हा छापताना योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे. त्या-त्या विषयातील तज्ज्ञ नेमून पुस्तकाचे संपादन करण्याची गरज असते. पुस्तकाला संपादकीय टीपा देण्याची गरज असते. इतिहासाच्या पुस्तकात वर्णिलेली स्थळे आजच्या काळात कोठे आहेत, हे सांगण्याची गरज असते. अन्यथा नवा वाचक त्याच्याशी जोडला कसा जाणार?

ऐतिहासिक कादंबऱ्या म्हणजे दुधारी शस्त्र असते. तुम्ही त्याचा कसा वापर करणार, हे खूप महत्त्वाचे आहे. ‘हळदीघाटचे युद्ध’ ही इतिहास आणि कल्पिताचे मिश्रण असणारी कादंबरी म्हणूनच अपुरी वाटते. कादंबरीचे मुखपृष्ठ चांगले आहे. परंतु त्यावर मूळ लेखकाचे नावच नाही. कादंबरीत एकही चित्र वा नकाशा नाही. त्या काळी ही सोय उपलब्ध नसली, तरी आजच्या काळात या सोयी उपलब्ध आहेत. महाराणा प्रताप यांचा वंशवृक्ष देता आला असता. अर्थात, काय हवं याची यादी प्रचंड वाढविता येते. अपेक्षा खूप असल्या तरी वास्तव महत्त्वाचे असते. काही ऐतिहासिक आणि काही शुद्धलेखनाच्या चुका असल्या, तरी त्यांची चर्चा करण्याची ही जागा नाही. ऐतिहासिक कादंबऱ्यांना सध्या चांगले दिवस आलेले आहेत. ‘हळदीघाटचे युद्ध’ हा चित्रपट, मालिका यांचा विषय आहे. तो अतिव्याप्त आहे. तो आजही प्रेरणादायी आहे. मात्र, आजच्या मतामतांच्या गलबल्यात आणि समाज माध्यमांकडून होणाऱ्या माहितीच्या माऱ्यात असे ऐतिहासिक विषय अधिक नीटस पद्धतीने वाचकांसमोर येणे आवश्यक आहे.

‘हळदीघाटचे युद्ध’ – इच्छाराम देसाई,

अनु.- सदाशिव दिनकर वझे,

वरदा बुक्स,

पृष्ठे- १९१, मूल्य- २०० रुपये