|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी

सारी आठवण नाहीशी करणारी गाढ झोप लागली होती. जागं झाल्यावरही त्या झोपेची आठवण काढण्याकरिता केवळ सरलेला काळच साक्षीदार उरावा, इतकी मिट्ट झोप. मोडू नये असं वाटणारं सगळंच तर हमखास मोडतं, मोडलं जातं. ही तर एका नवतरुणाची य:कश्चित झोप. कुठलंही स्वप्न पडायच्या आत ती मोडणं हे जणू राष्ट्रकर्तव्य. ‘उठा! जागे व्हा!’ छापाच्या आरोळ्यांनी एतद्देशीय तरुणांच्या स्वप्नांचा आजवर अव्याहत घात केलाय. त्यामुळे आता आम्हाला साधा बॉलीवूड चित्रपटही कल्पनेची उसनवार केल्याबिगर तयार करता येत नाही. पण ते असो.

bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
Do you know the police in this city ride buffaloes for patrolling?
बफेलो सोल्जर्स! ‘या’ ठिकाणी पोलीस चक्क रेड्यावर बसून घालतात गस्त!
firing at ram mandir ayodhya
अयोध्या : राम मंदिर परिसरात सुरक्षेसाठी तैनात PAC जवान गोळी लागून जखमी, परिस्थिती गंभीर
khajina vihir Vitthal temple
सदाशिव पेठेतील खजिना विहीर विठ्ठल मंदिरात चोरी

तर बरं का, कंडक्टर गदागदा खांदा हलवीत होता. सुषुप्तीतून जागृतीत येताच हे आठवणीचं पहिलं माप पदरी सावरत त्यानं डोळे उघडले, चोळले.

‘‘नेवासा फाटाय, नेवासा फाटा’’ कंडक्टर मायेनं खेकसला. तिकीट काढताना तरुणानं विनम्रतेनं- ‘‘नेवासा फाटय़ाला उतरायचंय अन् माहिती नसल्याने उठवा’’ असं सांगितलं होतं. पोरगेला चेहरा, शुद्ध भाषा, सुटे पैसे आणि विनम्रता यांच्या एकत्रित परिणामातून पाझरलेली माया अजून कंडक्टरच्या डोळ्यांत आहे तोवरच उतरायला हवं, हे जाणवून तरुण घाईनं बरोबरचं अवजड सामान आवरीत, उचलीत उतरला. उतरताच मोकळ्या शिवारात वाऱ्याशी जोडसाखळी खेळत असलेल्या थंडीनं त्याला पकडलं. आता तरुणावर राज्य आलं. च्यायला काहीतरी नाव पाहिजे नाही? सारखं तरुण-तरुण करणं बरं लागत नाही कानाला. पण नाव ठेवणंही आजकाल सोपं का राहिलंय? जातीपातीच्या भावनात्मक सुभेदाऱ्या आहेत हो नावांवर. कुठलंही घेतलं नाव, तरी भावना दुखावली जातेच. आता ‘भावना’च म्हटलं म्हणूनही लैंगिक विद्वेष पसरवल्याचं खापर फुटू शकतं. म्हणून नाव ठेवायला नको वाटतं. तर नावबिव गेलं खड्डय़ात. उमदा तरुण म्हणून ‘उत’ म्हणूयात. त्यातून मनोशारीरिक स्थितीही निर्देशित होतेय. तरुणाठायीच तर मुसमुस वा ऊत ही क्रियाविशेषणं शोभतात. असो. असो.

तर बरं का, उत थंडीनं गारठला. दूर जाणाऱ्या निळ्यापांढऱ्या एशियाडचा रंग एकसारखा काळा होईस्तोवर तो गाडीच्या लाल पाठदिव्यांकडे पाहात राहिला. अखेर तेही विरले तशी त्याला म्हणावंच लागलं, ‘‘रेडी क्का?’’ भवतीनं नजर फिरवीत त्यानं पाठीवरची पिशवी सारखी केली आणि दोन्ही हातांतल्या उपकरणांनी भरलेल्या अवजड पिशव्या तोलल्या. आडव्या रस्त्याशी विशाल कोन साधणाऱ्या तिरप्या वाटेच्या मुखाशी जाऊन उभा राहिला. रातकिडय़ांना सोबत द्यायला दात वाजत होते.

‘‘फाटय़ावर ट्रक मिळेल’’- हापीसातून माहिती दिली गेली होती. उतरल्याक्षणी नाकात शिरलेल्या भपकाऱ्याचा विचार करायला थोडी फुरसत तयार झाली होती. वासाच्या उग्रतेवरून कारखान्याच्या अंतराचा कयास बांधत त्यानं हातातल्या पिशव्या खाली ठेवल्या. पाहिलेला कुठलाही भयपट, लहानपणीचे बागुलबुवा, भोकाडी, मुंजा इत्यादी कुणी कुणी आठवू नकोस, असं बजावत असतानाच दहा हातांवरच्या टपरीत हालचाल झाली. उत धपापला. मग सावरल्यावर कळलं, की कुणी मलबारी अण्णा रबरागत शरीर ताणत विसावला होता. ज्याचं भय वाटलं प्रथम, तोच आधार वाटून उतनं पुढं होत विचारलं, ‘‘ट्रक आते हैं ना?’’

‘‘अँ?’’

‘‘वो साखर कारखाने को जानेवाले ट्रक आते हैं ना इधरसे?’’

यावर ‘न’, ‘ळ’, ‘क’, ‘प’ इत्यादी अक्षरांनी युक्त, पण अगम्य बाराखडी म्हणत अण्णानं कूस बदलली. लाथेनं एक डबडं फरफटलं. त्यातला राग लक्षात घेत उत माघारी वळून उभा राहिला. झोपलेल्या जिवंत मानवी शरीराची सोबतही किती आश्वासक असते! उतनं विचार केला (तसा तो साहित्यबिहित्य वाचणाऱ्यांतला. वेगळंच कुणीतरी व्हायचा विचार तो सतत करीत असे.).. टायरांच्या उतरंडीत विसावलेल्या अण्णाला आवडत असेल हे पंक्चर काढणं? त्याच्याही घरची अडचण असेल. मग शिक्षण सोडून उपजीविकेसाठी आला असेल परमुलखात. आपण निदान इथलेच तरी आहोत. दीडदोनशे मैलांवर तर आपलं गाव, घर, माणसं आहेत. अर्धवट का होईना, शिकलो म्हणून हे सौख्य? असेलही. अभ्यासक्रमातल्या कशाचाच तूर्त काही उपयोग होत नाहीये हे मात्र खरंच. लवकर पैसे कमवता येतील याची हमखास खात्री देणारं शिक्षण घेतलं आपण, पण नोकरी मिळाली ती मात्र घरच्यांच्या जुन्या ओळखीतूनच. आता प्रत्यक्ष कामात शिक्षणाचा उपयोग होईल कदाचित.. उतच्या विचारांना सदोदित ऊत येत असे. त्याच्या एकटं राहण्याच्या अन् घुमं असण्याच्या पिंडामुळे ते होत असावं.

बहरहाल, ट्रक खरंच आला. उसानं भरलेला. पाठीवर भाराचं धनुष्य पेलत, फाटय़ाशी वळण घेत ट्रक उतपाशी उसासला. उतच्या पिशव्यांसकटचा भार घेत कारखान्याकडं धावू लागला. चार-पाच मैलांपासूनच बैलगाडय़ांची वर्दळ लागली अन् आठेक मैलांवर माळावर पांढऱ्या दिव्यांचे ठिपके अन् उंच धुराडं! ठरल्या ठिकाणी ड्रायव्हरनं उतारू उतरवले. तिथून पुढं पाचट आणि बैलांच्या शेणामुताचे सडे तुडवीत उतनं कसंबसं गेस्ट हाऊस गाठलं अन् पिशव्या दपटल्या. बिछाना दिसताच त्याला गाडीतल्या झोपेची आठवण आली अन् पुन्हा तो तसाच गाढ झोपी गेला.

नव्या दिवसानं खूप काही दाखवलं. दमेस्तोवर फिरवलं. उसाचा गोडवा साखरेच्या दाण्यात उतरावा म्हणून आलम दुनिया राबत होती. अवजड अन् भव्य यंत्रं होती. सरकते पट्टे अन् धगधगते बॉयलर होते. मजुरांचे तांडे अन् कामगारांचे गट होते. देखरेखीला साहेब होते आणि यंत्रात गुंतलेले इंजिनीअर्स होते. उतच्या कुतूहलास ऊत आला. फिर फिर फिरला तो. जिने चढला, मजले उतरला, मैदानभर चालला आणि चहात शंकरपाळी बुडवून कँटीनमध्ये विसावला. मजा वाटत होती त्याला हे सगळं नवं पाहून.. जगात किती नवलाईच्या गोष्टी आहेत नाही! आता सोपवलेलं काम जमलं म्हणजे हुश्श. इतर सगळी जशी सराईतपणे कामं करताहेत, तसं आपणही रमून जायचं कामात. साखरेची शंकरपाळी जिभेसकट मनभर गोडवा पसरवत होती.

तर बरं का, पुढचे चार-पाच दिवस कसे गेले कळलं नाही. दोन तर काम जमण्यातच गेले. एक खाडिलकर साहेब व्हिजिटला आले, तेव्हा त्यांची वाट पाहण्यात आणि आल्यावर त्यांना पाहण्यात गेला. आणि एक दिवस गेस्ट हाऊसवरच्या नव्या सोबत्याशी ओळख अन् दोस्ती करण्यात गेला. खाडिलकर साहेबांसमोर काम करताना छातीतल्या धडधडीला ऊत आला होता. सेंट्रिफ्यूगलमधल्या मोलॅसिसबरोबर आपणही फिरतोय की काय, असं वाटत होतं.

‘‘कमिशनिंगच्या वेळी मला बोलवा. यांची सिस्टीम उपयुक्त आहे. तिचं काम पाहण्याची उत्सुकता आहे,’’ असं धावणे इंजिनीअरला सांगून गेले.

‘‘लकी आहे राव तुमी. साहेब कदीच एवढं कौतुक करीत नाहीत तोंडावर.’’

मग काय, संध्याकाळी शंकरपाळ्यांनी जिभेवर तवंग पसरवला! त्याच दिवशी की दुसऱ्या, तो भेटला- रविचंद्रन, भास्करन, अरविंदन या पद्धतीचं भौगोलिकता दर्शवणारं नाव होतं त्याचं. भाषा इंग्रजी अन् दक्षिणी लहेज्याचा साज ल्यायलेली. आपण त्याला ‘डीईऽऽ’ म्हणू. म्हणजे डेक्कन इंजिनीअर असं समजू. तर, डेक्कन इंजिनीअरमुळे रात्री झोपताना भीती घालवण्याचा वेळ वाचू लागला. एकटं असताना साचून राहिलेल्या भित्या अंधारात परत लपवायला वेळ जाई. डीई बडबडय़ा, सालस अन् हुशार होता. तो अनुभवीही होता. त्याला लहानग्या उतबद्दल कौतुक वाटलं होतं. उत्साहानं त्यानं उतला अनेक गोष्टी ऐकवल्या. रम्य, न ऐकलेल्या, चकित करणाऱ्या अन् बऱ्याच. वयानं तो सुबुदादाएवढा असल्यानं उतला एक वेगळी आपुलकी वाटली होती.

त्या संध्याकाळीही तो डीईला काहीबाही सांगत होता. ओघात विषय शिक्षणाकडे गेला अन् उतला कळालं, की डीईनं बीएस्सी केलंय, इंजिनीअिरग नाही!

‘‘मग तू स्वत:ला इंजिनीअर का म्हणवतोस?’’

‘‘म्हणजे? मी केमिकल इंजिनीअर आहेच.’’

‘‘अरे, पण तू तर बीएस्सी केलंयस’’- ‘कसं कळत नाही राव’ छापाचं हसत उत उत्तरला.

‘‘मग त्यानं काय झालं?’’

‘‘तू इंजिनीअर नाहीयेस काही..’’

‘‘वॉट! वाय! हाऊ?’’ डीईच्या आश्चर्याला अवकाश पुरेना.

‘‘अरे, तू डीएमई किंवा बीई झाला असतास, तर तू इंजिनीअर म्हणू शकला असतास स्वत:ला’’ आकाशातले सगळे तारे तोडत उत.

‘‘यू आर टाकिंग नानसेन्स’’ डीईच्या इंग्रजीला दक्षिणी साजासह विरळा धार.

बहरहाल, करता करता संवादाचं वितंड झालं. त्याला कारण अपुरं शिक्षण अन् उणापुरा अनुभव यांच्या संयुगाने घट्ट भिजवलेला उतचा पूर्वग्रह आणि टणक अज्ञानाला सामोरं जाताना डीईचा हरवलेला संयम. कालपर्यंत भय घालवणारा हा दोस्त आता ‘डेंजर’ वाटू लागला. त्याच्या आडमुठेपणाचा राग यायला लागला. सगळीकडे महाराष्ट्रासारखं शिक्षण का नाही दिलं जात, असंही वाटून गेलं. शेजारच्या खाटेवरचा निद्रिस्त डीई लवकर दक्षिणायन करेल तर बरं, या विचारानंतर काहीही न आठवणारी ती गाढ झोप लागली. उत निजला तो अचानक दचकून उठायलाच. परत एकदा स्वप्नघात करीत जागं केलं कुणीतरी त्याला. त्यालाच का? डीईलाही कुठल्याशा दक्षिणी सुपरस्टार नटीच्या बाहुपाशातनं खस्सकन् खेचून उठवलं गेलं. जागृती साधता दिसलेलं दृश्य अचंबित करणारं होतं. पण प्रथम नाकात भरला तो ताज्या मोलॅसिसपासून बनलेल्या ताज्या देशी मद्याचा दर्प. एकूण प्रसंगाला त्यानं एक निराळी धुंदी चढवली होती.

तर बरं का, एक धोतर, तीन बटणी टोपी आणि काळ्या बांधीव वहाणा घातलेले पांढऱ्या मिशीचे उग्र आजोबा डीईच्या कॉटवर मधोमध पाय सोडून बसले होते. डीई बाजूला त्याच्या अम्मानं दिलेली शाल हातात धरून नाइटसूटवर उभा होता. खोलीत किती जागा आहे, हे मापण्याकरता आल्यागत साताठधा टगे कार्यकर्ते उभे होते. ते ‘कार्यकर्ते’ आहेत, हे अण्णा बोलल्यावरच कळालं अर्थात. अण्णा म्हणजे तेच.. कॉटवर बसलेले पांढऱ्या मिशीचे उग्र आजोबा हो!

तर, उत जागा झाला तेव्हाचं आणि त्यानंतर बराच वेळपर्यंतचं हे दृश्य. उत त्याच्या स्वत:च्या कॉटवर टोकाला अन् उरलेल्या कॉटवर कार्यकर्ते. लाथ मारून उठवलेलं असल्यानं दोन्ही खाटांचा आपसात लघुकोन तयार झालेला. या समीपतेमुळे संवादाच्या मध्येमध्ये अण्णांना तंबाखू, सुपारी, चुना, पान इत्यादी सामुग्रीचा पुरवठा सुलभ शक्य झाला होता.

‘‘कुठले रे तुमी, मा xxxx?’’ अण्णांनी धक्कादायक; परंतु एकंदरीनं त्यांचा आब, सत्ता, बैठक, स्थान, प्रसंग इत्यादी पारखूनच संबोधन वापरलं होतं.

‘‘झोपता खुशाल xx वर करून? येवढाले पैशे घ्येता कारखान्याकडून अन् फुटकी मशिनरी लावता काय आ xxxनो? तू कोने रे?’’

डीईनं नाव-गाव-फळ-फूल सांगितलं. इंजिनीअर असल्याचंही बोललाच!

‘‘इंजिनेर? तुमी तं लई बारा७७चे मायला. इंग्लिश बोलून अडानी बनवता आमच्यासारक्याला. कारखान्याचा डायरेक्टरे मी! अन् खुशाल झोपता? आनि तू रे बारक्या? भडव्या दुसरी जागा मिळाली नाई का तुला शेन खायला? तू बी इंजिनेर असशील?’’

‘‘नाही. मी डिप्लोमा आहे.’’ उतला हे सांगताना नेमकं काय वाटत होतं हे सांगता यायचं नाही. अण्णांचं लोकभाषेवरील प्रभुत्व, इंजिनीअर्सवरचा राग, दारूमुळे आलेली असंगती या सगळ्याचा एकसमयावच्छेदेकरून प्रभाव पडत होता.

‘‘आमी मायला डायरेक्टर तर झोपत नाई, कार्यकर्त्यांला जागा नाई झोपायला आन् इंजिनेर ढुंगान वर करून झोपत्यात. बुडवला कारखाना ह्य मा७७७७नी.’’

मुंडकं उडवलं गेलं असताही पट्टे फिरवणारं इतिहासातलं मुरारबाजीचं धड का आठवावं इथं? हं! अण्णांचंही डोकं ठिकाणावर नव्हतं ना म्हणून कदाचित. अजूनही काही संवाद झाला. खरं म्हणजे बोध, बरळणं, प्रवचन, भाषण असंच काही म्हणावं लागेल. कारण अण्णा एकटेच बोलत होते. डीईनं त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना स्वत:च्या अन् स्वत:च्या कंपनीच्या प्रामाणिकपणाची दुहाई द्यायचा प्रयत्न केला, पण अण्णांनी संबोधनात ‘मा’ऐवजी ‘भें’ वापरण्यापरीस दखल घेतली नाही. कार्यकर्ते काही लुडकले होते. अण्णाही दोनदा उजवीकडं ऊसं धरून आडवे होत कारखान्याच्या कळवळीनं पुन्हा बसते झाले होते. हा प्रसंग संपणारच नाही की काय, असे वाटत असतानाच बाहेर एक-दोन गाडय़ा आल्या. दहा-पंधरा माणसं आत आली. एकच गर्दी. त्यांनी मिठय़ा मारल्या, हार घातले, टाळ्या दिल्या, तंबाखू खाल्ली, पिंका टाकल्या, पेढे वाटले, हसले, आरडले अन् अखेरी एकेक करीत गेले. गाडय़ाही गेल्या. डीई खाटेचा लघुकोन मोडून समांतर करीत असतानाच गेस्ट हाऊसचा ‘वाचमेन कम एटेंडेड’ आला-

‘‘मारलं नाय ना? (आतले दोघे दिग्मूढ!) नाय, काय काय येळला गेस्टला मारत्यात त्ये. आन्ना नाय, पन बाकीचे हानत्यात. इलेक्शन लागलीयेना. म्हनून रात्चे फिरत्यात कालवा करत. त्येला फोड, त्येला दम दे चालू ऱ्हाईन आता. झोपा. काय नाय व्हत. मी हाए.’’

स्वत:ची ‘गेस्ट हाऊस एटेंडेड’ अशी ओळख सांगणारा ‘वाचमेन’ म्हणून उल्लेखला जाणारा संग्राम बाहेर गेला. दोघं आपापल्या खाटांवर बसून होते. अखेर डीई म्हणाला, ‘‘आई शुडॅव्ह एक्सेप्टेड युवर थिऊरी. आईएम नाटे इंजिनीअर मा डा रे चो चा..’’

हसण्यालाही ऊत आला.

बहरहाल, देशात निवडणुका लागल्यात. प्रचाराला आता ऊत येईल. ‘उत’साठी प्रचार होईल. कोटय़वधी उमदे तरुण प्रथमच मतदान करणार आहेत म्हणे. त्यांना त्यांचे शिक्षण, पूर्वग्रह, अनुभव.. सगळ्याचा मत ठरवताना उपयोग होवो. भीती अन् आस्था, दुही अन् निष्ठा, सुभेदार अन् चौकीदार.. साऱ्या शब्दांचे अर्थ लागोत. नाही तर, पुन्हा शिळ्या कढीला यायचा ऊत! नाही?

girishkulkarni1@gmail.com