|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी

हंसांना मानससरोवरातून हद्दपार करणाऱ्या कावळ्यांच्या कथेचे हे दिवस आहेत. की ते सदासर्वदा तसेच असतात आणि ‘सत्य’ नावाची काही चीज अस्तित्वातच नसते? जीएंच्या ‘विदूषक’ कथेत वाचलेली आठवते ही कावळ्यांची गोष्ट..

मानससरोवरात शुभ्रधवल हंस आपल्या प्रियेसमवेत क्रीडा करीत असता अचानक तिथे एक वृद्ध कावळा येतो आणि हंसाला सरोवर सोडून जायला सांगतो. यावर हंस आश्चर्यचकित होऊन म्हणतो की, ‘‘निसर्गानं हे सरोवर फक्त माझ्याकरिताच तयार केलं असता तुम्ही हे विपरीत काय बोलता आहात?’’

‘‘महाराज, हे आपण म्हणता; पण माझी धारणा वेगळी आहे. हे कावळ्यांसाठीचं जलविहाराचं साधन असून आपण घूसखोर आहात.’’

‘‘अहो, तुम्ही विचारा कुणाला हवं तर..’’ जन्मजात सभ्य हंसिणी हताश होत म्हणाली.

‘‘होय तर! विचारू या की!’’ कावळ्यानं आजूबाजूला चाललेली कावकाव थांबवीत म्हटलं. एव्हाना त्याचे बरेच भाईबंद गोळा झाले होते. तो धूर्तपणे म्हणाला, ‘‘आपण इथे उपस्थित असलेल्यांना विचारू. जर तुमचं खरं असेल तर ते तुमच्या पायाशी दगड आणून ठेवतील आणि ज्यांना माझं खरं वाटेल ते माझ्या!’’

आणि मग ओघानं कावळे बहुसंख्य असल्यानं हंसांच्या पायाशी फक्त त्याच्या प्रियेनं आणलेला दगड, तर काकपायी दगडांची रास! हंसाला हाकलून लावत कावळा नवं सत्य प्रस्थापित करतो अन् हंसाला मुकाटय़ानं निघून जावं लागतं.

वाचाच तुम्ही ही जीएंची गोष्ट!

तर.. बरं का, गोष्ट आठवली कारण निवडणुका नावाचा लोकशाहीचा उत्सव, तमाशा, गोंधळ.. काय तुम्ही म्हणाल ते चालू आहे. त्यातून बरंच काही सांगितलं जातंय, नवं काही प्रस्थापित केलं जातंय. सत्य, न्याय वगरे गोष्टींची अगदीच चाड न ठेवत आपापला कळप मोठा करणं चालू आहे. त्यात काही जणांना आपली इतिहासदत्त कर्तव्यं आठवून ते पत्र लिहिताहेत. त्यातही निश्चित काही न म्हणता त्यांना वाटत असलेल्या भीतीची दुहाई देत मला-तुम्हाला सजग करताहेत. या पत्रलेखकांत अनेक आवडती अन् प्रेमाची माणसं आहेत. एरव्ही त्यांनी बस म्हणता बसावं अन् ऊठ म्हणता उठावं अशा थोरवीचीही काही लोकं आहेत. हंसाला बेदखल केलं जाण्याची भीती त्यांना वाटते आहे कदाचित. किंवा कावळ्याबद्दलचे पूर्वग्रह अन् शंकांचं निरसन झालेलं नाही कदाचित. आपण केवळ कयासच बांधू शकतो, कारण त्या पत्रात नि:संदिग्धता नाही. ‘हंस’ हा हंसच आहे का अन् कावळा स्वयंप्रेरणेने बोलतोय की त्याचा बोलविता धनी कुणी निराळाच आहे, याची नेमकी खात्री पत्रलेखकांना नाही. त्यामुळे मतदाराला केवळ मोघम जागृत करीत त्यांनी पत्रोत्सव केला. गंमत अशी की, पत्राखाली सही करायला दबावही आणला. पण ते असो.

तिकडं लोकशाहीचा प्रणेता साहेब आपल्या स्वगृही बहुमताच्या निर्णयानं अडचणीत आलाय. ‘ब्रेग्झिट’ हाच शाश्वत समृद्धीचा पर्याय समजून त्याची बहुमतानं प्रस्थापना केली गेली. पण त्याच देशातल्या काही पत्रकार मंडळींनी हे उघडकीस आणलंय, की सांगितलं गेलं ते सगळं खोटंच होतं. म्हणजे ज्या कारणांकरिता ‘ब्रेग्झिट’ घडवून आणलं गेलं, ती फोल होती आणि वस्तुस्थिती वेगळीच आहे.

आता झाली का पंचाईत? अहो, साहेबच गोंधळला तर आम्ही पाहायचं कुठं! लोकशाहीचा पेपर सोडवताना तिथूनच तर कॉप्या येतात. लोकशाहीचाच का, साधा एफबी स्टेटस लिहायचा पेपरही तसाच सोडवला जातो. आमच्या पश्चिमगामी निष्ठेची पूर्वापार ख्याती आहेच. असो. तर, त्यांच्या लक्षात असं येतंय की मानससरोवर आपलं आहे आणि कावळे बहुसंख्येनं येऊन कब्जा करतील अशी जी भीती घातली गेली होती, ती व्यर्थ आहे. कारण कावळे मुळी नाहीतच त्या प्रदेशात. आता ज्यांनी ही भीती घातली, तेही मुळात हंस नाहीत.

असं सगळं लख्ख उजाडल्यागत पुराव्यानिशी साबीत झाल्यावर पेच पडलाय, की लोकशाही किंवा बहुमत हे सत्यप्रस्थापनेचं योग्य साधन आहे काय? ज्या बहुमतानं निर्णय होताहेत, ती बहुमतं चक्क तयार केली जात आहेत. तंत्रज्ञान नावाचा ब्रह्मराक्षस एकीकडे माणसाला आजवरच्या प्रवासात आवाक्यात न आलेली बहुआयामी कार्यक्षमता अन् अभिव्यक्ती मिळवून देतो आहे. तर दुसरीकडे तोच सत्य आणि न्याय नावाची अभिजात मानवी मूल्यंच भस्मसात करायला निघालाय. अमेरिकी निवडणुकीपाठोपाठ दुसऱ्यांदा हे सत्य सामोरं आलंय. ते जर खरंच सत्य असेल, तर टवकारून जागं व्हायला हवं. अजूनही मतदानासारख्या महत्त्वाच्या कर्तव्याबद्दलची दाटून असलेली अपार अनास्था टाकून द्यायला हवी. इतकंच नाही, तर या कर्तव्यपूर्तीसाठीची योग्य सिद्धता करायला हवी. प्रचारकी भूलथापांना बळी न पडता अनुभवाधारित मत तयार करायला हवं. सत्यप्रस्थापनेच्या शाश्वत कसोटय़ा तयार करायला हव्यात. आणि हे सगळं व्यक्ती म्हणून स्वतंत्ररीत्या करायला हवं. लोकशाही हे कळपांना बळ देणारं साधन नसून व्यक्तीला न्याय, स्वातंत्र्य अन् समता देऊ करणारी व्यवस्था आहे हे समजून घेत कुठल्याही कळपाचा भाग न होण्याची मानसिकता घडवायला हवी. त्याचबरोबर स्वत:च्या स्वतंत्र मताचा आदर करणारी निर्भय सभ्यताही मिळवायला हवी. अतीच अवघड आहे ही गोष्ट.

सिलिकॉन व्हॅलीत बसून जिथे जगानं कोणती अंतर्वस्त्रं घालावीत वा कुठल्या अत्तराचे फवारे उडवावेत हे जेव्हा ठरवलं जातंय, तेव्हा हंसाची पारख करणं नितांत कठीण होऊन बसलंय. त्यात पुन्हा आमच्या शिक्षणानं सत्याची चाड द्यायला म्हणून शेंगांच्या टरफलागत फोल गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. किंवा परटानं डाउट खाल्ला म्हणून सीतेला वनवासी धाडणाऱ्या रामाचा ‘सत्यवचनी’ असा पगडा बसवून ठेवला आहे. साहजिकच, जगण्याच्या ओघात ‘सत्य’ नावाचं मूल्य ‘सोयीस्कर’ अर्थानं आम्ही वापरीत आहोत. आणि त्यामुळे तंत्रज्ञानानं आणलेल्या ‘पोस्ट- ट्रथ’च्या जमान्यात आमची हबेलंडी उडालेली आहे. प्रत्येकालाच सत्य गवसल्याचा आनंद देणारं अभ्रकी असत्याचं अस्तर या काळाचं व्यवच्छेदक लक्षण ठरेल कदाचित!

आजपासून शेदीडशे वर्षांनी जेव्हा मागे पाहिलं जाईल, तेव्हा नीरक्षीरविवेक असलेला हंस शोधण्याची नामी संधी घालवलेला काळ अशी आमची संभावना होईल कदाचित. पण तूर्त तरी साधेपणानं हंसाच्या प्रियेगत एकल प्रामाणिक मत विकसित करायला हवं. हयातभर दूध का दूध अन् पानी का पानी करणारा हंस तिनं पाहिला होता, अनुभवला होता. मानससरोवर त्याचं आहे की नाही, हे ठरवताना तिनं हंसाच्या मताला पुष्टी दिली. याचं कारण तिचा अनुभव हेच असणार. तो खरं तेच पाहील, खरं तेच बोलेल याची खात्री तिला होती. त्याला मत दिल्यानं कावळे टोचून मारतील या भीतीची पर्वा न करता तिनं मत दिलं. तेच काम इंग्लंडातल्या पत्रकार मंडळींनी केलं. आपणही करू.

असं म्हणतात की, भीती मनात राहिली असता मोठी होत जाते, पण वास्तवात मात्र तिच्यात फारसा जीव नसतो. सभ्य निर्भय होणं अजून तरी माणसांच्या पचनी पडलेलं नाही. अनेक सभ्य निर्भय माणसांहातीच सारी सृजनाची कामे घडत असताही आम्हाला तसं व्हायची आस लागत नाही हे खरं दु:ख आहे. अर्थात, कृष्णविवराच्या अस्तित्वाचं शास्त्रीय सत्य वर्षांपूर्वीच गवसूनही त्याचं छायाचित्र मिळवून ते सत्य पारखून घेणाऱ्या माणसाची जात करेलच की काहीतरी. केवळ कळप करायचे असते तर फुका एवढी वाट चाललो असतो का आपण?

बहरहाल, अजूनही विश्वास वाटतो आहे. त्याचं कारणही अनुभवाधारित आहे. एकीकडे या निवडणुकीच्या शिमग्यात निरनिराळे कळप हंबरत असता लाखोलाख लोकं उन्हातान्हात राबत दुष्काळाच्या रोकडय़ा सत्यावर उतारा शोधताहेत. एकीकडे कळपांचा वापर भय निर्माण करायला केला जातोय, तर दुसरीकडे आत्मप्रेरणेनं कार्यप्रवण झालेल्या व्यक्तींचे समूह महाराष्ट्रात पाणी आणण्यासाठी एकत्र येताहेत. तंत्रज्ञानाच्या रमलातून विश्व ग्रासणारी भयं एकीकडे तयार केली जात असताना, ‘नरकाचं दार’ अशी संभावना झालेलं कृष्णविवर दिसतं तरी कसं हे पाहण्यासाठीची निर्भयताही तंत्रज्ञानच पुरवत आहे. माणसाला शोधायला, घडवायला या सृष्टीत अजूनही बरंच काही शिल्लक आहे. कावळ्याचं की हंसाचं, हे भांडण महत्त्वाचं असलं तरी मुळात मानससरोवर टिकवणं भाग आहे.

बहरहाल, मतदान करून या माळावर एक मेला महाश्रमदान करू..

girishkulkarni1@gmail.com