|| गिरीश पांडुरंग कुलकर्णी

माठ पाणी गार करेना हो. आलं का तुमच्या ध्यानात? का माझाच माठ चुकारपणा करतोय? कुणाला विचारावं? असतील का कोणी समदुखी वा विषयतज्ज्ञ? ट्विट करू का? का गुगल करून कारणं शोधू? मेंदू वापरण्याचा पर्यायही आहे. च्यायला! हे त्रांगडंय या काळाचं. अनेक विकल्प. अलिबाबाची गुहाच जणू! हे घेऊ की ते? अन् ते करू की हे? मूळ प्रश्न बाजूला; भंडावलेपण मात्र निराळ्याच कारणांनी. चालायचंच. सवयीचं झालंय आता. स्वत:ला सल सोडत चक्राकार गतीशी तादात्म्य पावायचं. मग भोवंड फिरवीत ठेवते या तंत्रज्ञानकुशल नित्य बदलणाऱ्या विश्वाच्या पसाऱ्यात. साध्या प्रश्नाचंही खोल कृष्णविवर होतं आणि अथांग काळाच्या माळावर अवास्तव पसरत राहतं. असो. असो.

पण तरी बरं का, माठ हल्ली पाणी गार करीत नाही, हे खरंच. म्हणजे सार्वत्रिक सत्य म्हणून नव्हे, पण निरीक्षण म्हणून नक्की नोंदवायला हवं इतक्या प्रकर्षांनं येत असलेला हा अनुभव. का होत असावं असं? माठाची सच्छिद्रता कमी झाली आहे का? सावकाशीनं दाह बाहेर टाकून तृप्त करणारा गारवा निर्माण करण्याचा त्याला कंटाळा आला आहे का? हल्लीच्या काळात तो ‘कूल’ ठरलेला नाही याचा राग त्याच्या मनात धुमसत राहून पाणी गरम करीत असणार, किंवा किमान थंड होऊ देत नसणार. पण ‘कूल’ असण्याचा इतका कशाला अट्टहास? पाणी कूल करावं अन् मोकळं व्हावं की! नाही होत तसं. सांगायला सोपं आहे; जगायला अवघड. आजच्या चालू घडीला माझं अस्तित्व हवंहवंसं वाटण्याकरिता ‘कूल’ असणं गरजेचं आहे.

सामाजिक, राजकीय, आíथक, जातीय उतरंडीत कुठंही असलं तरी ‘कूल’ राहण्याचं ‘प्रेशर’ आहे. त्याकरिता प्रत्येकानं प्रयत्नरत राहणं यातच सारं सौख्य सामावलं आहे. पण सतत काय आयडिया काढणार हो? बरं, जातिवंत माठानं नेमकं काय केलं असता तो कूल ठरेल, याचा कोणताही संस्कार माठावर झालेला नाही. कारण त्याच्या कुंभाराला मुळी कल्पनाच नव्हती- काळाच्या ओघात बदलणाऱ्या जगाच्या अपेक्षेची! दैवजात दु:ख जणू जन्मानंच लाभलेलं. जन्माचा काळ चुकला. मग आता मुकाट कालबा व्हावं, तर तसाच कसा फुकट घालवायचा जन्म, असा प्रश्न येतो. मग हरप्रयत्ने माठही कूल व्हायचा प्रयत्न करीत राहतो. अगदीच राहवेना म्हणून म्हटलं, मदत करू आपण. काय करावं? उन्हात ठेवावा का माठ? काटय़ानं काटा पद्धत वापरून पाहू. बाहेरचा अतिउष्मा अन् आतला धुमसता दाह. जाळतील एकमेकाला. पण मग नंतर वाटलं, ‘अ‍ॅव्हेंजर’ला न्यावं का? ओह! कसली भारी कल्पना! का बरं सुचली नाही लवकर? स्वत:चा मेंदू चालवला म्हणून. जरा ट्विटरणारी चिमणी ऐकली असती तर वेळ गेला नसता. अहो, माठातला माठही ‘अ‍ॅव्हेंजर’बरोबर नातं सांगू पहात होता तिथं. नुसता टिवटिवाट. आता माझ्यासारख्या अनेकांना ठाऊकच नव्हतं हे ‘अ‍ॅव्हेंजर’ प्रकरण. पण सोय आहे का आजच्या काळात असं अज्ञान मिरवण्याची? छे! पटकन् गुगलायचं अन् रंध्रारंध्रात माहिती करून घ्यायची. पण तरीही माझ्यासारख्या इंटरनेट वापरणाऱ्या काही कोटी अन् इंटरनेटच माहीत नसलेल्या काही कोटी लोकांना हे अमेरिकन फॅड माहिती नव्हतं. मात्र ‘कूल’ मिलेनियल्स अन् ९ जनरेशनच्या सगळ्यांसकट काही माहीतगार मात्र या अमेरिकन भुलवणीची इतकी भलावण करत होते की वाटलं, न्यावा माठ ‘अ‍ॅव्हेंजर’ दाखवायला अन् करून टाकावा कूल. पण तिकीट मिळेना हो. लोकांनी म्हणे आदल्या पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. सिनेमागृह दिवसाचे चोवीसही तास अमेरिकन ‘चांदोबा’तील गोष्ट दाखवीत आहेत, तरीही ही स्थिती! असो.

बहरहाल, लक्षात आले ते असे की, सांप्रतकाळी स्वमति मंद करीत इतर करतात ते बिनदिक्कत केले असता कूल होता येते. त्याकरिता सदासर्वकाळ उपलब्ध असलेल्या या माध्यमांच्या पारावर फक्त जाऊन बसायचे. समोर येईल ते पुढे ढकलीत राहायचे अन् एका खड्डय़ातून दुसऱ्या खड्डय़ात सर्वासमवेत उडय़ा मारत राहायच्या. खरं तर या अमेरिकन चांदोबा गोष्टीत फार निराळं काही नाही. सृष्टी व मानवजात संकटात घालणारा एक दैत्य अन् त्याच्याशी लढा देणारे अतिमानव. सुष्ट-दुष्टाची लढाई. अचाट आकारमानाचा कल्पनाविस्तार. त्याचा अत्यंत परिणामकारकरीत्या केलेला विक्रय. उभ्या मानवजातीस उपभोक्ता करण्याची धडपड अन् त्याकरिता या नामी युक्त्या. कधी गोष्ट विकायची, तर कधी वस्तू, तर कधी कल्पना. या विक्रेत्याचे बळ अचाट. हट्टानं मागं राहायचं म्हटलं तरी अशक्य व्हावं असा खरेदीदारांचा रेटा. या प्रकारच्या प्रत्येक खरेदीतून स्वत:ला कालसुसंगत अन् कूल ठेवायची केविलवाणी धडपड. या सगळ्याला जगणं म्हणायचं? त्यापरीस फुटून जावं माठानं. शांतपणानं कोपऱ्यात बसून दाह सोशीत पाणी गार करण्याचं आपलं काम निष्ठापूर्वक करीत राहावं. आणि असा विचार करणं ‘ओल्ड स्कूल’ असलं तरी अशी अनेक जणं दिसतात आजूबाजूला. जरा या खरेदीच्या झटक्यातून बाहेर काढावं स्वत:ला. मग दिसतील अनेक जणं- जी बिघडू लागलेला सृष्टीसमतोल नसíगक क्षमतेनं पुन:प्रस्थापित करण्यासाठी लढत आहेत. त्यांना अतिमानवी क्षमतांचा मोह पडत नाही. किंबहुना, असल्या भाकडकथांवर त्यांचा विश्वास नाही. मुळात हे सुपरहिरो प्रकरण आपल्याकडच्या यदायदाही धर्मस्य टाईप मला निष्क्रिय बनवणारी भूलथाप आहे. पण ते सारंच आता ‘कूल’ म्हणून प्रस्थापित करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत.

बहरहाल, माठ ‘अ‍ॅव्हेंजर’ पाहून कालसुसंगत वा कूल ठरेलही कदाचित; पण म्हणून तो पाणी गार करेल का? माझं जन्मजात काम काय आहे याची ओळख त्याला अन् मला लागेल का? स्वत:ची बुद्धी अन् ऊर्मी स्वतंत्र ठेवता येईल का? हे काही सतत पडणारे प्रश्न. आयुष्यभर जाता-येता पाहिलेली माझ्या घराभोवतीची झाडं मला अजूनही नावानिशी ओळखता येईनात; अन् तरीही नव्या दिसाची नवी माहिती घ्यायला मी पारावर जातोच आहे. त्या माहितीचे सात खरेदीदार तयार करतो आहे. मग ते सात पुढचे एकोणपन्नास तयार करीत आहेत. अन् या साखळी प्रक्रियेत जगाचा दाह वाढतो आहे. गेल्या तीन आठवडय़ांत उत्तर गोलार्धात जाऊन कमी झालेली थंडी अनुभवली, तर विषुववृत्तानजीक जाऊन वाढलेला उष्मा! या बदलत्या परिस्थितीत खरं तर माठानं हेकेखोरपणे कंबर कसायला हवी. बर्फाच्या सुबक तुकडय़ांच्या तोंडात मारील अशी शीतलता निर्माण करून दाखवायला हवी. वाढलेला अतिरिक्त दाह आणखी सच्छिद्र होत स्वत:त जिरवायला हवा. त्याचं कूल होणं महत्त्वाचं नसून पाण्याचा गारवा टिकवणं महत्त्वाचं आहे हे त्याला पटायला हवं. नपेक्षा पटवायला हवं. आणि उदाहरणादाखल १ मेच्या महाराष्ट्रदिनी होणाऱ्या महाश्रमदानासाठी स्वत:च्या घरचं कार्य असल्यागत नोकरी सांभाळून साडेचारशे-पाचशे माणसं उभी करण्याचं काम करणाऱ्या आमच्या मित्राचं- हेमंत आगारकरचं उदाहरण द्यायला हवं.

काय वाटतं? करावं असं? किंवा मग त्याला पुरंदरातल्या बेलसर गावी घेऊन जावं १ मे’ला. तिथं केवळ दोन हातांची अन् धडधडत्या हृदयाची निसर्गदत्त क्षमता घेऊन अनेक सामान्य जन जमणार आहेत. होय, होय. सृष्टीसमतोल साधण्याकरिताच. दुष्काळाचा थॅनोस पराभूत करतील ही मंडळी आपल्या दोन हातांच्या एकजुटीनं. अन् या श्रमिकांची तहान भागवेल माझा माठ. एका निर्माणाचं स्वप्न पाहून एका साध्या माणसानं लढा उभारला होता काही शतकांपूर्वी. या बेलसरलाच पहिली लढाई खेळला होता गडी. ‘स्वराज्य’ मिळविण्याकरिता अशीच दोन हाती माणसांची एकजूट उभी केली होती त्यानं अन् बलाढय़ फत्तेखानाचा पराभव करून विजयी मुहूर्तमेढ रोवली होती. शिवाजी नावाचा आमचा पूर्वज आम्हाला सतत वेगळं शिकवीत आलाय. मग आम्हाला या अतिमानवी सुपरहिरोंची भुरळ का पडते आहे? आमचा स्वतच्या गारवा निर्माण करण्याच्या क्षमतेवरचा विश्वास दृढ करण्यासाठी या १ मे’ला बेलसरच्या माळावर जाणार आहे. मी आणि माझा माठ!

(हा लेख १ मेपूर्वी लिहिलेला आहे.)

girishkulkarni1@gmail.com