News Flash

मराठी माणसाची ‘पुरोगामी’ प्रतिबिंबे

कादंबरीमधून मराठी समाजाला पडणारे प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न अगदी कमी लेखक करतात.

|| जयदेव डोळे

कादंबरीमधून मराठी समाजाला पडणारे प्रश्न हाताळण्याचा प्रयत्न अगदी कमी लेखक करतात. म्हटले तर तो खास मध्यमवर्गीय साहित्याला मारलेला जोराचा फटकाच. कारण बहुतांश कादंबऱ्या समस्या अथवा पेच यांची उकल करायला धजत नाहीत. भूमिका घ्यावी लागणे हा लेखक म्हणून एक भयंकर प्रकार लेखकांना गार करत असतो. नोकरदार अन् व्यावसायिक कर्तव्य सांभाळीत मराठी समाजाचे प्रश्न मांडायचा प्रयत्न त्यांच्या अंगलट येऊ शकतो. त्यापेक्षा काहीतरी आविर्भावात्मक मांडावे अथवा जाता जाता स्पर्श करावा, अशा प्रकारचे लेखन मग बहरते. त्यात संशोधन, वाचन, अनुभव, कल्पनाशक्ती यांची टंचाई त्या लेखनाचे सौष्ठव काही ठसू देत नाही. सबब मराठी कादंबऱ्या विद्यमान राज्यकर्त्यांसारख्या बडबडय़ा, भाषणबाज अन् बोलक्याच जास्त. राकेश वानखेडे यांची ‘पुरोगामी’ ही कादंबरी दलित चळवळीच्या निमित्ताने डावे कार्यकर्ते, परिवर्तन चाहणारे नेते यांची कशी फरफट झाली, याचा शोध घेण्याचा एक प्रयत्न करते.

शुद्धोधन शिवशरण हा आंबेडकरी चळवळीतील एक नोकरदार कार्यकर्ता आपली कहाणी आपण स्वत: आणि आतला आवाज धनू यांच्या माध्यमातून आपल्याला सांगत राहतो. आरंभी काही पृष्ठे मराठवाडय़ातील आपली पाळेमुळे कशी आहेत, हे सांगता सांगता नायक शुद्धोधन कादंबरीचे मुख्य सूत्र उलगडतो. यशवंत बर्वे नामक साहित्यिकाच्या स्मारकासाठी ठिकठिकाणाहून जमवलेले १५ लाख रुपये शुद्धोधन कोषाध्यक्ष म्हणून खर्चतो आणि काही दिवसांनी लक्षात येते, की स्मारकासाठी निवडलेली जमीन व तिचा मालक ही सारी बनवाबनवी असते. केवळ साहित्यावर लुब्ध असलेला शुद्धोधन मुंबईतील फसवाफसवीच्या प्रचंड उलाढालीत सहज सापडतो. सारे कार्यकर्ते, सहानुभूतीदार, मित्र, समविचारी, सहप्रवासी त्याच्यावर संशय घेतात. त्याची यथेच्छ बदनामी सुरू होते. परतफेडीचीही स्थिती नसते. प्रत्यक्ष दोषी नाही; मात्र शंका, चारित्र्यहनन व आरोप यांमुळे शुद्धोधन एकाकी पडतो. कोणी त्याला मदत करीत नाही. अशा अवस्थेत महाराष्ट्रातील तमाम डाव्या चळवळींची समीक्षा हा नायक करत जातो. चर्चा आणि लेखन यांचा आधार घेत, अनेक मुद्दय़ांचा ऊहापोह करीत ‘पुरोगामी’ स्वत:चा ठावठिकाणा घेत पुढे जाते.

शुद्धोधनचा आंतरजातीय विवाह आहे. कर्मठ ब्राह्मण घरातील तरुणी बौद्ध नायकाशी लग्न करते. ती बदलते, पण सून व मुलगा मुलांची नावे वेदान्त व वैदेही ठेवून त्यांना धक्का देतात. पुरोगामित्वाची चर्चा मग प्रत्येकाच्या घरापासून होते. पुढे ओबीसी, नेमाडेसर, विद्रोही साहित्यिक, आंबेडकरवादी साहित्य, पानतावणेसरांचे ‘अस्मितादर्श’, पँथर चळवळ, ढसाळ अशा अनेक विषयांची चर्चा करीत ही कादंबरी वाचनीय ठरते. नक्षलवादावरही चार पाने तीत आहेत.

एका संधीसाधू, पथभ्रष्ट आणि प्रसिद्धिलंपट पात्रामधून शुद्धोधन दलित-आदिवासी संबंधांचाही ऊहापोह करतो. ‘आदिवासींनी कधी आंबेडकरवाद्यांना पाठिंबा दिला?’ असा एक प्रश्न मग नायकाला छळतो. पण हाच नायक बिबळवाडा नावे गावातील जमिनीच्या लुटीचा प्रश्न समाजापुढे मांडतो आणि एक हिरोही बनतो.

अशा कितीतरी राजकीय- सामाजिक घडामोडींची ‘पुरोगामी’ व्यवस्थित नोंद घेते. निर्भयपणे मतेही मांडते. ज्यांचे वय साठच्या आसपास असेल, त्यांना ही कादंबरी खूप ओळखीची वाटेल. लेखकाचे वय तेवढे नाही. तरीही त्याने मोठय़ा मेहनतीने माहिती जमवत, इतिहास सांगत कादंबरी लिहून खूप मोठी उलाढाल केली आहे. म्हटले तर आत्मपरीक्षण, म्हटले तर परखड मीमांसा असे स्वरूप या कादंबरीस आले आहे. मात्र, चर्चात्मक रूप पूर्ण न देता घटना, प्रसंग, वर्णने यातून लेखकाने रंगत वाढवली आहे. नायकाची पुतणी आदिवासी भागात जाऊन लढय़ात सामील होते, मार्क्‍सवादी तत्त्वज्ञानाजवळ जाते असे कथानक रचून लेखकाने नेमका संदेशही अखेरीस दिला आहे. शुद्धोधन एका आंदोलनानंतर तुरुंगात धाडला जातो. शेवटच्या पानावर कादंबरी सांगते, की त्याला १८ महिन्यांनंतरही जामीन मिळालेला नाही. त्याच्यावर ‘डावेपणा’चा आरोप झालेला आहे. कादंबरी कधी कधी पूर्वसूचना देत असते. कोरेगाव भीमा येथील आंदोलनानंतर असेच नाही का काही झाले?

‘पुरोगामी’ – राकेश वानखेडे,

लोकवाङ्मय गृह, मुंबई,

पृष्ठे – ३२४, मूल्य – ४०० रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2019 12:05 am

Web Title: marathi article in loksatta lokrang by jaydev dole
Next Stories
1 ‘स्टेशन पाड’
2 ग्रीक पुराणकथा
3 पैंजण.. 
Just Now!
X