|| श्री. मा. भावे

मराठी या विषयात संशोधनाधारित पदवी (पीएच.डी.) मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इतकी मोठी आहे, की मार्गदर्शकांची वाट पाहात खोळंबून राहिलेले खूप विद्यार्थी आहेत. या संशोधनाच्या दर्जाविषयी मसालेदार चर्चा रंगत असतात. तथापि, या वाढत्या संशोधनामुळे आडबाजूला पडलेल्या काही महत्त्वाच्या प्रकरणांचा अभ्यास केला जातो ही स्वागतार्ह बाब होय.

डॉ. गीतांजली घाटे यांनी ‘साम्राज्यवादी सरकारने बंदी घातलेले साहित्य’ हा दुर्लक्षित विषय निवडला. अनेक अभ्यासकांचे साहाय्य प्राप्त केले. मुंबईतील सरकारी दफ्तरखाना, निरनिराळी ग्रंथालये येथून कागदपत्रे व पुस्तके मिळवली आणि ‘आक्षिप्त मराठी साहित्य’ हा प्रबंध डॉ. मृणालिनी शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धीस नेला. त्या प्रबंधाचे पुस्तकात रुपांतर करताना आमूलाग्र बदल केले. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने हे पुस्तक देखण्या रूपात प्रसिद्धही केले.

या पुस्तकातील ‘परिशिष्ट- दोन’मध्ये आक्षिप्त साहित्याची सूची दिलेली आहे. २१० पुस्तकांपकी ५३ पुस्तकांवर बंदी घातल्याचा पुरावा सापडत नाही, असे स्पष्टच म्हटले आहे. मग ती नावे सूचीत कशी आली? त्याचा खुलासा ‘माझे रामायण’ या कादंबरीविषयी डॉ. घाटेंनी जे म्हटले आहे, त्यावरून होतो : ‘..मात्र या कादंबरीची एकूण प्रकृती बघता आणि तिची लोकप्रियता लक्षात घेता, तिच्यावर बंदी घातली असेल असे खात्रीने सांगता येते.’ पुस्तकावर बंदी घातल्याची किंवा ती उठवल्याची सरकारी नोंद नाही, तेव्हा अशा तर्कावर विसंबणे चुकीचे आहे.

साहित्यकृतीची आक्षेपार्हता परिस्थितीसापेक्ष असते. ‘आमच्या देशाची स्थिती’ हा निबंध १८८१ साली प्रसिद्ध झाला. त्यावेळी व नंतरही २९ वष्रे त्यावर कसलाही आक्षेप सरकारने घेतला नाही. १९१० साली महाराष्ट्रात प्रक्षुब्ध वातावरण होते. जॅक्सनचा खून झाला होता. पोवाडे, मेळ्यातील गाणी, लेख, भाषणे यांमुळे जनसामान्यांतील असंतोष खदखदत होता. तेव्हा सरकारने आक्षेपार्ह साहित्यावर बंदी घालणारा नवा कायदा केला व या निबंधावर बंदी घातली. मात्र हा निबंध वगळून उरलेल्या ‘निबंधमाला’च्या आवृत्त्या निघतच राहिल्या. याच कायद्याने ‘कीचकवध’ या नाटकाच्या प्रयोगावर व संहितेवरही बंदी घातली. मात्र ‘आता हे नाटक प्रक्षोभक वाटत नाही’ अशा आशयाच्या अहवालावरून १९२६ साली बंदी मागे घेतली गेली.

आक्षेपार्ह साहित्याच्या टिळकयुग व गांधीयुग मिळून दोन लाटा मराठी साहित्यात आल्या. निबंध, नाटके, पद्यावल्या, कादंबऱ्या, चरित्रे अशा वाङ्मयप्रकारांतून हे साहित्य अवतरले. वर्तमानपत्री लेख, नाटके, मेळ्यातून व प्रभातफेऱ्यांतून गायलेली पदे हे वाङ्मय समूहलक्ष्यी होते. त्या काळी वर्तमानपत्रांचे घोळक्यातून वाचन होई. पदे जनसंमर्दावर रोमांच उभे करीत. नाटकांतील समरप्रसंग प्रेक्षकांना भारून टाकीत. मात्र जप्त झालेले निबंध, इतिहासपर लेख, चरित्रे व आत्मचरित्रे यांचे वाचन वाडय़ाच्या माळ्यावर, समई-पणतीच्या मिणमिणत्या उजेडात भणाणलेल्या मस्तकाचा तरुण पुस्तक लपवीत व जिन्यावरच्या पावलांची चाहूल घेत करीत राही. त्याच्या उशा-पायथ्याला कधीकधी भरलेले पिस्तूलही असे. त्या काळची ही नाटय़पूर्णता संशोधनपर पुस्तकात न उतरणे स्वाभाविक आहे.

आक्षिप्त वाङ्मयाची मर्यादित पोच, इतरांप्रमाणे डॉ. घाटेंनीही अधोरेखिली आहे-‘सुशिक्षित ब्राह्मणवर्ग या साहित्याचा लेखक आणि वाचकही असलेला दिसतो.’ खरे तर समूहलक्ष्यी साहित्य ब्राह्मणेतर व अशिक्षित लोकांपर्यंतही पोचत असणारच; पण या वाङ्मयाचा खरा विखार सुशिक्षित ब्राह्मणांच्या मनाला भिडत होता, हे खरे आहे. परकी अमलाखाली आपल्या कर्तृत्वाचा व आकांक्षांचा कोंडमारा होतो आहे, याचा जाच या वर्गाला पावलोपावली होत राही. या कोंडमाऱ्याची मार्मिक मीमांसा लोकमान्य टिळकांनी १८९६ सालीच ‘ब्राह्मण व त्यांची विद्या’ या पुस्तकाच्या संदर्भात केली होती. हा असंतोष उत्तरोत्तर वाढतच गेला. टिळक, सावरकर, शिवरामपंत परांजपे यांच्यासारख्या ज्वलंत मनोवृत्तीच्या लेखकांच्या तेजस्वी भाषेतून त्या कोंडमाऱ्याचा स्फोट झाला.

‘आक्षिप्त मराठी साहित्य’ – डॉ. गीतांजली घाटे,

कॉन्टिनेन्टल प्रकाशन,

पृष्ठे – २५८, किंमत – २७५ रुपये