News Flash

मीना.. ‘मीनाकुमारी’!

फ्लॅशबॅक हे तंत्र शक्यतो कॅमेऱ्यासमोरील माध्यमासाठी वापरलं जातं, पण नाटककार आपल्या जीवनातल्या  फ्लॅशबॅकमधून नाटकासाठी पात्र आणतो. मी आणली.. मीना!

मकरंद देशपांडे

फ्लॅशबॅक हे तंत्र शक्यतो कॅमेऱ्यासमोरील माध्यमासाठी वापरलं जातं, पण नाटककार आपल्या जीवनातल्या  फ्लॅशबॅकमधून नाटकासाठी पात्र आणतो. मी आणली.. मीना!

१९९० साली सईद मिर्झा यांच्या ‘सलीम लंगडे पे मत रो’चे चित्रीकरण मुंबईच्या दो टांकी भागातील बच्चू की वाडीमध्ये चालू होतं. पवन मल्होत्रा, आशुतोष गोवारीकर आणि मी असे तीन नट कॉस्च्युम घालून तिथं घडणाऱ्या साधारण घडामोडी पाहत होतो. रात्रीचे साडेबारा वाजले होते. तिथे छोटय़ा-मोठय़ा खोल्या होत्या. हार्मोनियम आणि तबल्याचा ठेका ऐकू येऊ लागला. मग घुंगरांचा आवाज. डोक्याला मोठ्ठं टेंगुळ असलेला, मेंदी रंगाचे (मेंदी लावून लावून लाल झालेले) केस असलेला बच्चूसेठ खाटेवर बसला होता. तो म्हणाला, ‘‘तुम्हारा शूटिंग जल्दी जल्दी खतम करो, धंदे का टाइम है!’’ पवन आणि मी तयार होणाऱ्या मुलींकडे पाहत होतो. एका मुलीचं नाव मीना आहे असं कळलं. ती मीनाकुमारीच्या गाण्यांवर नाचायची.

१९९९ साली नाटककार म्हणून सात वर्षांत वीस नाटकं लिहिल्यानंतर मला ती मीना आठवली. आणि मी विचार केला की, जर त्या मीनाला पोलिसांनी पकडून पुन्हा ती जिथून आलीये तिथे नेऊन सोडलं तर? ती काय करेल? ती परत येईल का? तिचंही नशीब चांगलं असू शकतं का? ..आणि मी नाटक लिहायला सुरुवात केली.

इन्स्पेक्टर पांडेला एका गुन्हेगाराला दिल्लीहून आणायचं असतं. तसंच त्याला मीनाला निझामुद्दीनला सोडायला सांगितलं जातं. पण इन्स्पेक्टर पांडे मधे मथुरेला उतरतो. मीनाला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देतो. कारण त्याला वृंदावनला जाऊन राधा-कृष्णाचं दर्शन घ्यायचं असतं. त्याच्या आजारी बायकोसाठी त्यानं मन्नत मागितलेली असते. वृंदावनात नवरात्रीच्या उत्सवात बरेच कार्यक्रम असतात. पांडेचे पाय धरून मीना विनवणी करते, की तिलाही जगातल्या या सगळ्यात सुंदर जोडीचं दर्शन घ्यायचं आहे. ते दोघं दर्शन घेतात आणि तिथला एक पंडा (पुजारी)- जो ज्योतिष बघतो- मीनाचा हात बघून सांगतो की, ‘‘तुझी जन्मभूमी तुझी कर्मभूमी नसणार आहे. तुला लग्नयोग नाही, पण आयुष्यात पुरुष सहवास आहे.’’ मीना हसते आणि पुजाऱ्याला सांगते की, मला इथे आणणारा मला घरी  सोडणार आहे. त्यावर पुजारी सांगतो की, ते अशक्य आहे. तुझे घरी जाणे नाही आणि गेलीस तर फार काळ राहणे नाही.

महाप्रसादासाठी इन्स्पेक्टर दोन दिवस थांबतो. मीना त्याच्याच बरोबर असते. तिथल्या विविध स्पर्धामध्ये ती भाग घेते. इन्स्पेक्टरला कुस्तीच्या स्पध्रेत भाग घ्यायला भाग पाडते. स्वत: यमुनेत पोहणं, रास-गरबा नाचणं वगरे स्पध्रेत भाग घेऊन ती स्पर्धा जिंकते. तिचं ते अल्लड, बेधडक, प्रेमळ जगणं पाहून इन्स्पेक्टर तिला विचारतो, ‘‘तू घरी जाऊन काय करणार?’’ त्यावर मीना म्हणते, ‘‘माझं घर निजामुद्दीन नाही; मुंबई आहे. मला मीनाकुमारीच्या गाण्यावर नाचायला खूप आवडतं.’’ इन्स्पेक्टर पुजाऱ्याला विश्वासात घेतो आणि सांगतो की, मी दिल्लीहून गुन्हेगाराला घेऊन येतो, तू मीनाला घेऊन प्लॅटफॉर्मवर भेट.

इन्स्पेक्टर गुन्हेगाराला घेऊन जेव्हा परत येतो तेव्हा मीनाबरोबर पुजारीही तिकीट काढून मुंबईला येणाऱ्या गाडीत चढतो. कारण त्यानं अनेक वष्रे पहाटे उठून, स्नान, पूजा करून खूप पुण्य कमावलं असलं तरी त्याला जीवन संपूर्णत: कळलेलं नसतं. त्याला मीनाबरोबर राहून रात्र अनुभवायची होती. रात्रीच्या काळोखातलं ज्ञान जाणून घ्यायचं होतं.

मीनाकुमारी आणि तिच्याबरोबर तीन पुरुष.. इन्स्पेक्टर, गुन्हेगार आणि पुजारी. नशिबाने ही तीन टोकाची तीन माणसं तिच्या आयुष्यात आणली. तिला प्रेम, आदर, सन्मान मिळाला. पण तिच्यापासून त्यांना काय मिळालं?

नाटकाचं लिखाण पूर्ण झालं. मीनाकुमारीच्या पात्रासाठी बऱ्याच नटय़ांच्या ऑडिशन्स घेतल्या, पण काही मजा येत नव्हती. कारण मला ती फक्त छान डान्सर किंवा छान अभिनेत्री नको होती, तर मला तिच्यात या तीन पुरुषांना आकर्षति करेल अशा काही खुबी हव्या होत्या.

एका फिल्मच्या पार्टीला गेलो होतो. एक मुलगी संगीताच्या तालावर बसल्या जागीच डोलत होती, पण डान्स फ्लोअरवर उतरत नव्हती. मी तिला विचारलं की, ‘तू नाचत का नाहीयेस?’ तर तिनं उत्तर दिलं की, ‘इंग्लिश गाण्यांचे शब्द मला नीट कळत नाहीत, तर त्यावर नाचायचं कसं? शब्दांच्या अर्थावर नाचायला मजा येते.’ झालं! मला माझी मीना मिळाली. मी तिला म्हटलं, ‘उद्या तू पृथ्वी थिएटरला ये.’ तिचं नाव- कश्मिरा शाह.

ती पृथ्वीला आली तेव्हा सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. ती खूपच हॉट आणि आकर्षक होती. आणि थोडीशी खोडकरही होती. ती मुद्दामहूनच अशा पेहरावात आली होती, की सगळ्यांनी एकदा तरी तिच्याकडे पाहावं आणि एकदा पाहिलं की मग पाहतच राहावं. काही जणांची मतं पडली की, ‘ये क्या हो गया है मकरंद को? अ‍ॅक्ट्रेस को नकारकर एक हॉट मॉडेल को कास्ट कर रहा है!’ काहींनी तर मला तोंडावर हे बोलून दाखवलं. आणि त्यामुळेच माझ्या मनात काश्मिराचं मीना म्हणून कािस्टग पक्कं झालं. तिचा हेवा वाटावा किंवा तिच्या असण्याने त्रास व्हावा असंच व्यक्तिमत्त्व हवं होतं माझ्यातल्या दिग्दर्शकाला.

इन्स्पेक्टरच्या भूमिकेसाठी दीपक काझीर आणि पुजारी म्हणून ललित परीमू हे सीनिअर नट घेतले. मी त्यांच्याबरोबर आधी काम केलं नसलं तरी त्यांच्याबद्दल मला ऐकून माहिती होतं. मला नेहमीच अनोळखी लोकांबरोबर काम करायला जास्त मजा वाटायची. गुन्हेगारासाठी माझाच नट विजय मौर्य घेतला. पण तो फक्त शेवटच्या सीनमध्ये होता.

तालमी सुरू झाल्या व बिनधास्त काश्मिरात एक अ‍ॅक्ट्रेससुद्धा आहे हे सगळ्यांना दिसायला लागलं. ललित परीमू हा नसीरचा आभास देणारा अप्रतिम नट. दीपक काझीर हे खरंच खूपच खरे वाटणारे इन्स्पेक्टर. तालमी रंगायलाही लागल्या. मध्येच भांडणंही व्हायची. कारण काश्मिराचं बेधडक वागणं आणि तिच्या वागण्याचा चुकीचा अर्थ लागणं. ललित परीमूनी एकदा चिडून फाईल टाकून एक्झिटसुद्धा घेतली. दोन दिवस त्यांच्याशिवाय तालीम केली. काहीच संवाद न करता ते पुन्हा परतलेही. मला कधीच वाटलं नव्हतं की ते नाटक सोडून जातील. पण एवढं पक्कं होतं, की त्यांना पुजारी करायला खूप आवडत होतं. दोन्हीही गोष्टी नाटकासाठी चांगल्या होत्या.

दीपक काझीर सीनिअर असल्याने काश्मिराची काळजी घ्यायला लागले होते. वृंदावनामध्ये इन्स्पेक्टर कुस्ती खेळतो तेव्हा मीना त्याला चीअरअप् करते, किंवा रास-गरब्यात त्या दोघांचं नाचणं- हे प्रवेश त्यांच्या आपसातल्या वैयक्तिक टय़ुनिंगमुळे फारच छान बसले.

खरं तर वृंदावनाचा परिसर.. त्यात मीनामुळे आलेलं वेगळंच चतन्य उभं करताना एके दिवशी स्टेशनवरचा अंतिम प्रवेश करताना पुजारीचं पात्र करणारा ललित परीमू म्हणाला, ‘‘मकरंद, यह मीना गज़्‍ाब की ले आए हो. घर जाने पर भी याद आती रहती है!’’ त्यांच्या या खऱ्या बोलण्यामुळे मला असं वाटलं की हे नाटक इथेच संपू नये. आणि मी घोषणा केली की, इथे नाटक संपत नाही, तर हा मध्यांतर आहे. दुसरा अंक मीना मुंबईत- बच्चूच्या वाडीत आणि पुजारी तिच्याबरोबर. गुन्हेगार हा साक्षीदार नसल्याने सुटून तिच्याकडे येतो आणि तो परिसर इन्स्पेक्टरच्या हद्दीत असतो.

पहिला अंक- मीना मथुरेत, दुसरा अंक- मीना मुंबईत.

नेपथ्य : पहिल्या अंकात- वृंदावन, दुसऱ्या अंकात- बच्चू की वाडी.

पहिल्या अंकात-  खांब,  दुसऱ्या अंकात- खिडक्या.

नृत्य : पहिल्या अंकात रास-गरबा, दुसऱ्या अंकात मुजरा.

मनुष्याला देवाचं आणि दानवाचं दर्शन एकाच नाटकात देणारं हे नाटक ठरलं. विजय मौर्याने गुन्हेगार लाजवाब केला. आता जरी त्याने ‘गली बॉय’ फिल्मचे संवाद लिहिले असले तरी वीस वर्षांपूर्वी त्याच शैलीतले संवाद तो या नाटकात बोलत होता, हे कदाचित त्याला आठवत असावे.

नाटकाच्या पहिल्या अंकात जेवढा सजेस्टिव्ह आणि काव्यात्मक बाज होता, तेवढाच दुसऱ्या अंकात अगदी वास्तवाच्या जवळ जाणारा. भाषा, नेपथ्य- म्हणजे आवारात असलेलं कबाबचं दुकान ते लाइटखालचा कॅरमबोर्ड, व्हीसीआर, टीव्ही, त्यात चाललेली फिल्म.. सगळंच वास्तवाच्या जवळचं. शेवटचा सीन मात्र जरा हाताबाहेर गेला.

क्लायमॅक्स मला मीनाच्या, मीनाकुमारीच्या ‘पाकीज़ा’तील ‘चलते चलते’ गाण्यावर सुरू झालेल्या नाचाने करायचा होता आणि त्यावेळी तिचे गिऱ्हाईक बसलेले आहेत असं दाखवायचं होतं. म्हणून मी मोगऱ्याचे गजरे त्या दृश्याआधी नाटकाच्या पात्रांकडून प्रेक्षकांत वाटले. तेव्हा काही प्रेक्षकांनी आक्षेप घेतला आणि मला अचानक नाटक या माध्यमाची ताकद पुन्हा कळली. प्रेक्षक नाटक बघता बघता हाताला गजरे बांधायला तयार झाले नाहीत. याचा अर्थ अगदी समोर घडणारं नाटक अगदी खरं होऊन गेलं होतं.

जय नाटक! जय मीनाकुमारी! जय प्रेक्षक!

mvd248@gmail.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 2:49 am

Web Title: marathi article in loksatta lokrang by makarand deshpande 6
Next Stories
1 एंट्रॉपी
2 आभाळाचं गणगोत
3 गाणारा वसंत
Just Now!
X