News Flash

स्त्रीजीवनाचे गतकालीन उद्गार

सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया ही संथगतीने चालणारी प्रक्रिया असते.

|| मीना वैशंपायन

मराठी वाङ्मयातील आत्मचरित्रांचे दालन समृद्ध करण्यात, या वाङ्मयप्रकाराचे पारंपरिक स्वरूप बदलून तो अनेकपदरी करण्यात स्त्रीलिखित आत्मचरित्रांनी महत्त्वाची भर घातलेली आहे. आत्मचरित्रात्मक साहित्य हे सामाजिक इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन असते. ते केवळ स्मृतिरूप गतकाळात रमणे नसते, तर त्यातून तत्कालीन समाजस्थितीचा, समाजमनाचा मागोवा घेता येतो, असा विचार अलीकडच्या काळात रुजला. ‘गतकाळाची गाज’ हे नीलिमा गुंडी यांचे पुस्तक या दृष्टीने केलेल्या अभ्यासाचे फलित आहे. स्त्रियांच्या आत्मकथनांतून प्रकट होणारी सामाजिक स्थिती, रूढी-परंपरा यांचे घडणारे दर्शन, स्त्रियांना करावा लागलेला अनेक पातळ्यांवरचा संघर्ष इत्यादी बाबींचा विचार करत त्यांनी गेल्या शतकभरात महाराष्ट्रातले सामाजिक संक्रमण कसे होत गेले, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

मराठीतील स्त्रीलिखित आत्मचरित्रांचा अभ्यास आजवर वाङ्मयेतिहासाच्या दृष्टीने व कधी एकेका आत्मचरित्रावर झाला आहे. येथे सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने लेखिकेने केलेली मांडणी वेगळी आहे. आत्मचरित्रांमधून चित्रित होणारी स्त्री अर्थातच येथे केंद्रिभूत आहे. पण त्यातून दिसणारे तिचे भावविश्व, संवेदनविश्व, स्त्रियांचे सहजीवन, स्त्रियांचे कुटुंबाशी असणारे नातेसंबंध व इतर स्त्रियांशी असणारे परस्परनाते, काळानुरूप त्यांच्या सामाजिक भूमिकेत, स्थानात झालेला बदल, त्यांच्यापुढील आव्हाने आणि आधुनिक काळात त्यांना खुल्या झालेल्या नव्या वाटा असा समग्र पट लेखिकेने डोळ्यांपुढे ठेवला आहे. प्रस्तावना, नंतर एकूण चौदा प्रकरणे आणि संदर्भसूची अशी पुस्तकाची रचना.

सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया ही संथगतीने चालणारी प्रक्रिया असते. कोणतीही सुधारणा तळागाळापर्यंत पोहोचून तिचा परिणाम होण्यास काही काळ जावा लागतो. विसाव्या शतकापर्यंत स्त्रिया अनेक रूढींच्या, परंपरांच्या जाचात अडकलेल्या होत्या. सुधारकांच्या मदतीने त्यांना शिक्षणाची दारे खुली होऊन त्यांच्या प्रगतीची वाटचाल सुरू झाली आणि त्या व्यक्त होऊ  लागल्या. १९१० साली प्रकाशित झालेल्या रमाबाई रानडे यांच्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ ही स्त्रीची पहिली आत्मपर अभिव्यक्ती होती. नंतर स्त्रिया आपल्या आठवणी, आपल्या जीवनाची गाथा वाचकांसमोर उलगडू लागल्या. हे प्रमाण तेव्हा अल्प असले, तरी काही प्रमाणात त्यांची दखल समाज घेऊ  लागला.

लेखिका म्हणते की, पहिल्या आत्मचरित्रानंतर शतकभरात साधारण २०० स्त्रीलिखित आत्मकथने उपलब्ध झाली आहेत. काही ठिकाणी स्त्रियांनी आठवणी लिहून ठेवल्याच्या नोंदी आढळतात, पण त्या उपलब्ध नाहीत. सामाजिक संक्रमणाची प्रक्रिया कशी होत गेली असावी, ते सांगताना या सर्व आत्मकथनांचा विचार करत, त्यातून प्रत्येक विषयाशी संबंधित अशी उदाहरणे देत लेखिका आपले म्हणणे मांडते आहे.

स्त्री-शिक्षणासंबंधीच्या पहिल्या प्रकरणात स्त्रियांना शिक्षणासाठी बा संघर्ष तर करावा लागलाच, पण आंतरिक संघर्षांलाही कसे तोंड द्यावे लागले, हे दाखवले आहे. रमाबाई रानडे, आनंदीबाई जोशी, डॉ. रखमाबाई यांसारख्यांची शिक्षणगाथा बरीचशी परिचित असते. पण शिक्षणाचे लोण तळागाळापर्यंत पोहोचल्यावर गावकुसाबाहेरच्या, मागास समाजातील स्त्रियांना किती जिद्द धरावी लागली, याचा प्रत्यय शांताबाई रावखंडे, नलिनी लढके आदींच्या उदाहरणांमधून लेखिका देते. अलीकडच्या काळातील, भिक्षेकरी समाजातील एखादी जनाबाई कचरू गिऱ्हे जेव्हा फुटकी पाटी नि फाटके पुस्तक घेऊन शिकते, सगळ्यांच्या विरोधाला तोंड देत मॅट्रिक उत्तीर्ण होते, तेव्हा तिचा आनंद असा सहज व्यक्त होतो : ‘पाऊस पडल्यावर रानातलं ढेकूळ ईरून जावं, तशी भुई भिजून भिजल्यासारखी वाटत होती. वाटंवर जणू हिरव्यागार हिरवाळीची मखमल असल्यागत वाटत हुतं.’(‘मरणकळा’, १९९८) महात्मा फुले, महर्षी कर्वे यांचे स्त्री-शिक्षणासाठीचे प्रयत्न किती यशस्वी झाले, तेच यातून दिसते.

स्त्रीचे स्त्रीशी असणारे नाते विविध अवस्थांमधून जात असते. पूर्वीच्या सासुरवासाच्या कथा आपल्याला आज अतिशयोक्त वाटतात; पण आजही अनेक ठिकाणी घरी आलेल्या सुनेला वेगवेगळ्या प्रकारांनी त्रास दिला जातो, असे ही कथने सांगतात. तर कधी आपली आई, आजी यांच्याप्रमाणे सासूही आपल्याला किती समजून घेत होती, याचीही उदाहरणे दिसतात. अलीकडच्या काळात  महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळींमुळे झालेल्या जागृतीची स्त्रीचे स्त्रीशी आंतरिक नाते जोडायला मदत झाली आहे, असे लेखिका दाखवते.

स्त्रीचे स्पर्शसंवेदनविश्व हे अजूनही बरेचसे बंदिस्त आहे, असे जाणवल्याने लेखिकेने या नाजूक विषयाबद्दल एका स्वतंत्र प्रकरणात विचार केला आहे. काळ बदलत गेला तसे स्त्रियांना स्पर्शसंवेदनेचे पारंपरिक संकेत पाळणे कधी अवघड झाले, तर कधी आपल्यातील अनावर नैसर्गिक शारीरिक ऊर्मीचा उच्चार करणे ही सहज भावना आहे असे वाटून त्यांनी तसे व्यक्तही केले आहे, असे दिसते. याविषयी ऊहापोह करताना लेखिकेने संवेदनशील पुरुषांची संख्या वाढण्याची गरज आग्रहाने प्रतिपादिली आहे.

स्त्रीचे भावजीवन व तिचे पतीबरोबरचे सहजीवन यासंबंधी बरेच वेळा चर्चा होत असते. तरीही तिच्या भावजीवनाशी संबंधित छोटय़ाछोटय़ा बाबी दाखवत, विविध उदाहरणे देत येथेही पुरुषांची संवेदनशीलता हा सुखी सहजीवनातील फार महत्त्वाचा घटक आहे, असे लेखिका म्हणते.

यातील सर्वच प्रकरणांचा विचार येथे करणे शक्य नाही. तरी स्त्रीची भाषा, त्यातून निर्माण होणारी मौखिक संस्कृती व कलात्मक निर्मिती याचा उल्लेख करायला हवा. गेल्या दीडशे वर्षांत स्त्रीची भाषा कसकशी बदलत गेली, हे पाहणे मनोरंजक आहे. तसेच वेगवेगळ्या समाजघटकांतील स्त्रिया लिहू लागल्याने, परिस्थितीनुसार एकमेकींशी अधिक मोकळेपणाने मिसळू लागल्याने त्यांच्या भाषेत बदल झाले, ती अनेकदा अधिक संपन्न झाली असे दिसते. विविध क्षेत्रांतील कलाकार स्त्रिया आपल्या कलाकृतींविषयी, सर्जनशीलतेविषयी गांभीर्याने, चिंतनशील वृत्तीने लिहू लागल्या ही फार स्वागतार्ह बाब आहे. उदा. विजया मेहता (‘झिम्मा’), रोहिणी भाटे (‘लहजा’), इत्यादी.

अलीकडच्या काळात समाजात भिन्नधर्मीय, भिन्नजातीय घटकांची घुसळण होत असताना विवाहसंस्थेतही खूप बदल झालेले आपण अनुभवतो. लग्नानंतर संपूर्णपणे भिन्न सांस्कृतिक स्तरातील घरी जाण्याची वेळ येते, तेव्हा स्त्रीसमोर कोणते प्रश्न उभे राहतात, पूर्वी कोणत्या प्रश्नांना तिने कसे तोंड दिले, याच्या हकिकती यात आहेत. आज एकीकडे स्त्री अवकाशही पादाक्रांत करीत असताना, दुसरीकडे अजूनही तिला विवाहवेळचे सांस्कृतिक अंतर ओलांडणे फार कठीण जाते असाच अनुभव आहे. याचा विचार सर्वच समाजघटकांनी करणे अगत्याचे आहे.

१९७५ च्या स्त्रीमुक्ती चळवळीने स्त्रीसंबंधित अनेक गोष्टींचा समाजाला नव्याने विचार करण्यास भाग पाडले. स्त्रियांचे आत्मभान या चळवळीने जागे केले. ‘आत्मभान’ हा शब्दही स्त्रीचळवळीमुळे अधिक प्रचारात आला. स्वत:बद्दलची जाणीव, तसेच सामाजिक कर्तव्याबद्दलची जाणीव अधिक तीव्र झाली. राजकीय क्षेत्रातही स्त्रिया कर्तृत्व गाजवू लागल्या. या सर्वाचे प्रतिबिंब त्यांच्या आत्मकथनांमधून स्पष्ट उमटत राहिले. त्याचाही मागोवा याच पद्धतीने लेखिकेने यात घेतला आहे. आत्मकथनांवर असणारी अलिखित नियंत्रणे विषयाला बाधक ठरतात, असे म्हणताना लेखिकेने अलीकडच्या काळात लिहिल्या गेलेल्या काही आत्मचरित्रांमधील स्पष्टपणा, धिटाई यांचा आवर्जून उल्लेख केला आहे.

वाचकसंवादी भाषा व विषयावरची पकड यामुळे पुस्तक वाचनीय आहे. मात्र, स्त्री-आत्मकथनांचा अभ्यास करण्याच्या या पद्धतीमुळे काही आत्मकथनांमधील उदाहरणे पुनरावृत्त होतात असे वाटते. शेवटच्या प्रकरणात मुद्दय़ांना दिलेल्या उपशीर्षकांमुळे अधिक स्पष्टता येते. इतर प्रकरणांतही अशी पद्धत स्वीकारली असती, तर अधिक परिणाम झाला असता.

पुस्तकाचे शीर्षक अर्थपूर्ण वाटते. समुद्राची गाज मंद असते, ती कान देऊन ऐकावी लागते. पण त्यातून अथांग समुद्राच्या अफाट विस्ताराची जाणीव नकळत मनात निर्माण होतेच. स्त्रीजीवनाचे हे गतकालीन उद्गारही आजच्या जीवनाच्या कोलाहलात अस्पष्ट, मंद वाटले तरी त्यामागे त्या स्त्रीजीवनातील कर्तृत्वाची, शक्तीची जाणीव अनुस्यूत आहे. ती ऐकणे आवश्यक आहे, कारण भविष्याला जोडणारा तो दुवा आहे

महाराष्ट्रातील गेल्या दीडशे वर्षांमधील समाजपरिवर्तनाची प्रक्रिया कशी होत होती, त्यातून स्त्रीजीवनाचे कोणते चित्र आपल्यापुढे येते, याचा आलेख यात काढलेला दिसतो. आपला मुद्दा ठसवताना दिलेली उदाहरणे, बारकाईने केलेली निरीक्षणे, योग्य व अचूक संदर्भ, शेवटी असणारी संदर्भसूची यामुळे पुस्तकाचे संदर्भमूल्य वाढले आहे. प्रत्यक्ष आत्मकथनांप्रमाणेच त्यांना पूरक अशा इतरांच्या प्रस्तावना, पुस्तकांच्या अर्पणपत्रिका, आत्मकथनांसंबंधित इतरांचे लेख या साऱ्यांचा जरूर तेवढा उपयोग लेखिकेने केलेला आहे. डॉ. नीलिमा गुंडी या कवयित्री आहेत तशा काटेकोर अभ्यासकही आहेत, याचा पुन:प्रत्यय या पुस्तकातून येतो.

‘गतकाळाची गाज’ – नीलिमा गुंडी,

मौज प्रकाशन गृह,

पृष्ठे- २१२, मूल्य- ३५० रुपये

meenaulhas@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 2:58 am

Web Title: marathi article in loksatta lokrang by meena vaishampayan
Next Stories
1 चिमूटभर अवकाशातील वादळी वारे
2 मीना.. ‘मीनाकुमारी’!
3 एंट्रॉपी
Just Now!
X