|| नीलिमा बोरवणकर

एकदा हातात घेतली की खाली ठेवावी वाटू नये, पण त्यातली महत्त्वाची माहिती मेंदूत मुरवून घ्यायला किंचित थबकावं वाटावं, अशी ही कादंबरी : ‘फोर सीझन्स’! त्यातील एका मनस्वी मुलीच्या मनातला कल्लोळ एका माळरानावरचे चार ऋतू अनुभवताना कसा आपोआप निवत जातो, ते उलगडत जाताना बघणं हा अतिशय आनंददायी अनुभव आहे.

१३ वर्षांच्या मुलीला मुंबईत तिच्या वडिलांकडे ठेवून तिची आई घर सोडून परदेशी निघून गेलीय. वडील डॉक्टर. त्यांचा मुंबईत खारसारख्या ठिकाणी स्वतचा बंगला. शेजारी राहणाऱ्या बंगाली कुटुंबात ही कामायनी नावाची मुलगी घरपण शोधतेय. त्यांच्या एकुलत्या एक मुलाच्या प्रेमात आकंठ बुडलीय. वडिलांचा मित्र हिचाही सखा, मित्र आणि सतत पाठीशी खंबीरपणे उभा असणारा वडीलही.

जाहिरात विषयात सुवर्णपदक मिळवून, थोडे दिवस काम करून ही पर्यावरण कार्यकर्ता असलेल्या प्रियकरासोबत सुंदरबनात निघून जाते. तिथं रुजायचा मन:पूर्वक प्रयत्न करते. जगापासून स्वतला पूर्णपणे तोडणं मात्र तिला जमत नाही. प्रियकराच्या आयुष्यात जेवढं स्थान सुंदरबनातल्या पर्यावरणाला, तेवढं हिला नाही. तो दूरस्थ आणि निर्मम. लहानपणापासून जोपासलेल्या सनातन आकर्षणाला मिळालेला हा प्रतिसाद तिला मुंबईत परत यायला भाग पाडतो. असं परत येण्याचा ताण मनावर कायम ओझं बनून ती बाळगते.

पुढे युरोपला जाणं, तिथं घेतलेलं ग्रीन मॅनेजमेंटमधलं उच्च शिक्षण. सहा वर्षांनी परत मुंबई. तोपर्यंत वडिलांचा अकस्मात झालेला मृत्यू आणि घर पडलेलं असणं. चोहोबाजूंनी निराशा दाटलेली कामायनी सुरुवातीच्या पानांत आपल्याला दिसत राहते. जाहिरात क्षेत्रात ग्रीन कन्सल्टंटसारख्या वरिष्ठ पदावर असणाऱ्या मुलीला इतकी टोकाची निराशा कशामुळे आलीय, ही उत्सुकता वाचकाला वेधून घेते. ग्रीन कन्सल्टंट म्हणून ज्या प्रकल्पांवर ती काम करतेय, ते प्रकल्प ती अर्धवट सोडून देतेय. कारण त्याच्या पूर्णत्वाला जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी करायला ती नकार देतेय. ते करणं तिला भ्रष्टाचाराचा भाग वाटतंय, म्हणून.

अशा निराश अवस्थेत तिला नागपठाराला लागून असलेल्या अंजनमाळावर सुरू असलेल्या एका प्रकल्पावर ग्रीन कन्सल्टंट म्हणून रुजू व्हायचा सल्ला तिचा वडीलधारा, काळजीवाहू मित्र देतो. दोन वर्षांपूर्वी सुरू झालेला सरकारी इको-टूरिझम प्रकल्प. पण पर्यावरणवाद्यांनी त्यात अडथळे आणल्यानं आता त्यांनी ग्रीन कन्सल्टंट नेमायचा निर्णय घेतलाय. याचा उघड अर्थ असा की, प्रकल्प मुळात ग्रीन नव्हता, आता तसा फक्त कागदावर करून हवाय. हे काम करायचं, तर कामातल्या तडजोडींना पर्याय नाही. त्या आपण करू इच्छित नाही; सबब हे काम आपण स्वीकारू नये, असं तिचं मन तिला सांगत असतं. तिच्या मते, पर्यावरण हे तिचं क्षेत्र नाही, त्यातला फार अभ्यास नाही. जाहिरात आणि पर्यावरण अशा परस्पर विरोधी क्षेत्रांची सांगड घालायला जाणं चुकलंच. ती नकार देत राहते. मग तिचा तो मित्र तिला सांगतो, की त्या माळरानावर एक बोटॅनिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट आहे आणि त्याचे संचालक आहेत त्यांच्या मुंबईच्या जुन्या बंगल्यातले बंगाली शेजारी- ज्यांच्या मुलासोबत ती सुंदरबनात जाऊन एकटीच परतलेली असते. ही मात्रा परिणामकारक ठरते. मुंबईत राहायला तसंही कारण नसतंच. इथल्या कंटाळा व्यापून राहिलेल्या आयुष्यातून पळून जाण्याचा उपाय म्हणून ती माळावर येते.

हातात त्यानं दिलेली हँडमेड कागदाची डायरी. माळावरचे चार ऋतू अनुभवताना लिहिलेली डायरी म्हणजे ही कादंबरी! डायरी लिहिण्याचा आधीचा काही काळ सोडला, तर पुढे सगळं प्रथमपुरुषी निवेदनातून आपण वाचत जातो.

मुंबईतील ऑफिसातल्या बैठकीत अंजनमाळ ग्रीन प्रोजेक्ट या परिसराची जिओ- बायो-अ‍ॅन्थ्रोपॉलॉजिकल माहिती तिला मिळत नाही. काही फुटकळ भौगोलिक माहिती मिळते; त्यावरून हा परिसर निर्जन, खडकाळ, लांबलचक मदान असावा एवढय़ा अंदाजावरून ती ऐन मध्यरात्री जवळच्या रेल्वे स्थानकावर उतरते.

या मुलीचे आई-वडील विभक्त झाल्यावर हिचं बालपण नेमकं कसं गेलं असेल? १३ वर्षांच्या मुलीला वडिलांजवळ ठेवून आई अशी कशी परदेशी निघून गेली? शेजाऱ्यांच्या अनिर्बन नावाच्या मुलासोबत ही तरुण मुलगी अचानक सुंदरबनात का निघून जाते? बरं जाते तर परत का येते? आणि त्या परत येण्याचं भळभळतं दु:ख अंगावर का बाळगते? मग युरोपात शिक्षण, काम करून परत कशासाठी येते? येते ती थेट बंगल्यात आणि तिथं फक्त मातीचे ढिगारे? हिच्या वडिलांच्या पश्चात एवढा मोठा निर्णय घेताना आई हिला सांगत का नाही? हिच्या तीव्र निराशेचं कारण काय असेल? ग्रीन कन्सल्टंट म्हणून कामाचं नेमकं स्वरूप काय असेल?

कादंबरीच्या या टप्प्यावर आपल्याला असे अनेक प्रश्न पडतात. आणि इथून सुरू होतात डायरीतल्या नोंदी : ‘ऋतू पहिला (ऑक्टोबर- नोव्हेंबर- डिसेंबर).. पानगळ आणि निष्प्राण उन्हं’; ‘ऋतू दुसरा (जानेवारी- फेब्रुवारी- मार्च).. स्थिरावलेली थंडी आणि उबदार वसंताची चाहूल’; ‘ऋतू तिसरा (एप्रिल- मे- जून).. उबदार उष्ण उन्हाळा आणि रंगांची उधळण’; ‘ऋतू चौथा (जुल- ऑगस्ट- सप्टेंबर).. धुवाधार पाऊस आणि पंथविराम.’

प्रत्येक प्रकरणाची सुरुवात कामायनीचा बदलत गेलेला मूड दाखवणारी. पानगळ आणि निष्प्राण उन्हं यांपासून तिचा माळरानावरचा प्रवास सुरू होतो. ‘कोरडय़ा घोटाभर गवताचा अथांग, मातकट पिवळा महासागर लखलखीत उन्हात हेलकावे घेतो आहे. क्षितिजाची कडाही न दिसणारा अंतहीन रखरखाट. हा अंजनमाळ? या पिवळ्या महासागरात अनंतकाळ पोहत राहिलो तरी किनाऱ्याचा काहीच थांग लागायचा नाही.’ क्षणभर आपलंही काळीज गलबलतं. यात माळरानाच्या उजाडपणाची वर्णनं येतात, ज्यातून आपण तिचं भकासपण अनुभवत राहतो.

‘थोरोने मानसिक कोलाहलावर त्याच्यापुरता उपाय शोधला आणि तो एकांतवास मिळवायला तळ्याकाठी जाऊन राहिला. मी या माळरानावर आलेय. स्वतहून नाही, जोसेफनं आणि परिस्थितीनं ढकललं म्हणून. तरीही मानसिक कोलाहल हे साम्य जास्त महत्त्वाचं आहे.’ असं मान्य करत ती तिथं नव्यानं जगायला किमान सुरुवात तरी करते. या प्रकरणाच्या शेवटी मात्र ती कबूल करते की, ‘जे झालं ते टाळता येण्यासारखं नव्हतं. वाळूत मान खुपसून बसलेल्या शहामृगासारखी पाच र्वष युरोपात काढूनही काहीच फरक पडला नाही. जी देणी चुकवायची ती चुकवायलाच हवीत. त्याची ही सुरुवात. अजून किती ऋतू ओलांडायचेत, भटकायचंय माहीत नाही. पण इथं एकांत आहे. विखुरलेले तुकडे गोळा करायला माळरान मदत करत आहे. त्याबद्दल मी त्याचे आणि त्याच्याकडे मला पाठवणाऱ्या जोसेफचे आभार मानते.’

माळरानावरच्या जुन्या गेस्टहाऊसमध्ये तिचा मुक्काम असतो. तिथली व्यवस्था बघणारा त्याच्या बायको-मुलीसोबत बाहेरच्या खोपटात राहतो. इथल्या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहित केला गेलेला तो एक स्थानिक आदिवासी. त्याला इथल्या निसर्गाची बारीकसारीक माहिती आहे. त्याची छोटी मुलगी कामायनीबरोबर फिरायला जाते, इथल्या रुढींविषयी तपशील सांगते.

या गेस्टहाऊसमध्ये कामायनीला नोंदी असलेली एका ब्रिटिश अभ्यासिकेची वही सापडते. मागच्या शतकातली. या जागेवर ब्रिटिश सनिकांच्या विश्रांतीसाठी हिलस्टेशन वसवायला आलेल्या एका गोऱ्या अधिकाऱ्याच्या बायकोची. त्यात या जागी आढळणाऱ्या फुलं- पानं- पशू-पक्ष्यांची चित्रं, माहिती आहे. कामायनी ते बघताना सुरुवातीला चकित होते, की आता इतका उजाड असलेला हा माळ पूर्वी इतक्या विविधतेनं नटलेला होता? मग त्या नोंदींची शहानिशा करणं, त्यासाठी तिथल्या बोटॅनिकल इन्स्टिटय़ूटचं ग्रंथालय वापरणं असं सगळं सुरू होतं. तिथं काम करणाऱ्या एका मुलाशी ओळख आणि नंतर मत्री होते. तोही पर्यावरणप्रेमी, पण तिच्या पहिल्या प्रियकरासारखा टोकाचा विचार करणारा नाही. माणूस हा निसर्गाचा अविभाज्य घटक आहे, असं मानणारा. ओसाड माळरानावर हळूहळू असं मन रमत जातं.

दुसऱ्या प्रकरणाच्या शेवटी कामायनी डायरीत नोंदवते : ‘या खोलीतली माळरानावरची पहिली सकाळ आठवते. असाच शुभ्र, पांढरा प्रकाश उघडय़ा खिडकीतून आत ओतला जात होता. त्रासिकपणे मी गच्च आवळून धरलेल्या पापण्या. त्या उघडून प्रकाशाचे किरण डोळ्यांत घ्यायची मुळी तयारीच नव्हती. आजचा तोच प्रकाश किती कोवळा आणि शीतल झालाय. ऋतू बदलतात पाहता पाहता. आपणही बदलत जातो.’

कामायनी या वातावरणात गुंतत चाललीय. ऋतूनुसार होत जाणारे बदल न्याहाळणं, बोटॅनिकल इन्स्टिटय़ूटमध्ये सुरू असलेल्या प्रयोगांची माहिती घेणं, स्थानिक लोकांच्या रुढी-परंपरा, त्यांचं निसर्गाबद्दल असलेलं भान या साऱ्यात ती रमलीय. बोटॅनिकल इन्स्टिटय़ूटमध्ये काम करणारा विहान, त्याचे काका आस्ताद तिला माणूस आणि निसर्गातलं नातं उलगडून दाखवतात. मार्गारेटच्या जुन्या नोंदी तिला आजचा निसर्ग वाचायला मदत करतात. कामायनी म्हणते, ‘परिसंस्था वाचायला शिकवून पर्यावरण या शब्दाची धास्ती मनातून कायमची काढून टाकल्याबद्दल मी विहान, आस्ताद आणि मार्गारेटची आयुष्यभर ऋणी राहीन.’

कामायनीला डायरी लिहिताना आपोआप उमजत जातं, की या फक्त निसर्गबदलाच्या नोंदी नाहीत. नाती, भावना, प्रेम यांचंही एक स्वतंत्र पर्यावरण असतं. पर्यावरण आणि माणूस यांचं नाळेचं नातं असल्याची समजूत तिला डायरीतून व्यक्त होताना येत जाते.

ती ज्या प्रकल्पावर काम करण्यासाठी आलीय, त्याच्या मार्गात मात्र अनंत अडचणी आहेत. मुळातून पर्यावरणस्नेही नसलेला प्रकल्प तसा भासवायचा, हे तिला आधीपासूनच पटलेलं नसतं. त्यात इथं आल्यावर, निसर्गाच्या जवळ राहिल्यावर, स्थानिकांना, अभ्यासकांना भेटल्यावर तर ती कामात कुठलीही तडजोड खपवून घेत नाही. व्यवसाय आणि नतिकता यापकी काय निवडायचं, याचं भान तिला माळरानावरच्या मुक्कामात येतं. याच वैचारिक गोंधळलेपणातून तिचा युरोपमधला प्रियकर दुरावलेला असतो.

एकूणच आयुष्यात आलेल्या माणसांचा, त्यांच्याशी असलेल्या नात्याचा, त्यातल्या तुटलेपणाचा, अपेक्षांचा, उपेक्षांचा अर्थ तिला या मुक्कामात गवसत जातो.

मुंबईत, युरोपात राहून शिकता न आलेलं तिला इथला कातळ शिकवून गेला. सगळं संपलं असं वाटल्यानंतर नव्यानं आयुष्य सुरू करण्याची उमेद, जगण्यातली लय, ठामपणा, चिवटपणा, आयुष्यानं दिलेलं दान स्वीकारून कुढत न बसता नव्या वाटा शोधत पुढे जाण्याची जीवनेच्छा, विस्थापनानंतरचं स्थलांतर आणि नवजीवन.. माळरानाचे पुन:पुन्हा भंगूनही सांधले गेलेले मातीचे थर तिला भक्कमपणे पाय रोवायला शिकवतात.

इथला मुक्काम संपवून कामायनी परत निघालीय ती अशी संपूर्णपणे बदलून. तिचे गुंते तिनंच उकललेत. कामायनीचा गोरा रंग उन्हानं काळवंडलाय, पण तिचं उजळलेलं अंतर्मन आपल्याला लखलखीत करून टाकतं.

ही बदलत चाललेली कामायनी आपल्याला टप्प्याटप्प्यानं अंतर्बा दिसत राहते, कळत जाते. तिच्या सुखदु:खाशी आपण एकरूप होतो. म्हणून प्रदीर्घ असली, तरी ही कादंबरी दीर्घकथेशी जवळीक साधणारी वाटते. यातल्या व्यक्तिरेखांना आपण भेटतो ते फक्त तिच्या नजरेतून. तिला त्या जशा दिसतात तशा. तिच्या त्यांच्याप्रतीच्या भावना थेट आपल्यापर्यंत पोहोचतात, पण तरीही यातल्या व्यक्तिरेखा अधिक फुलवलेल्या बघायला जास्त आवडलं असतं. तसंच अनेक व्यक्तिरेखा असल्या तरी त्यांच्यातली व्यामिश्रता तितकीशी समोर येत नाही. म्हणून या कथेला कादंबरी म्हणावं का, असा प्रश्न पडतो. तरी अतिशय वेगळ्या वातावरणात नेऊन सोडणारं, अभ्यासू, वाचनीय असं हे लेखन आहे हे सर्वात महत्त्वाचं. काव्यात्म आणि चित्रात्म शैलीमुळे वाचक त्यात गुंतत जातो, एवढं नक्की!

‘फोर सीझन्स’ – शर्मिला फडके,

मेहता पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे – ३५२, मूल्य – ३९५ रुपये