16 October 2019

News Flash

अशक्यतेचा जादूगार

संज्ञा आणि संकल्पना

|| पराग कुलकर्णी

दहावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या. येत्या काही महिन्यांत ही मुले शाळेच्या बंदिस्त वातावरणातून कॉलेजच्या मुक्त वातावरणात प्रवेश करतील. पण याचबरोबर कला, विज्ञान, वाणिज्य यांपकी एखादा रस्ता त्यांना निवडावा लागेल. शाळेत असलेली अभ्यासाच्या विषयांची वैविध्यता आता पुढे नसणार. भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र), गणित, साहित्य, चित्रकला, संगीत, खेळ यांतील काहीच गोष्टी पुढे सुरू राहतील- काही व्यवसायाभिमुख कौशल्य म्हणून अभ्यासण्यात येतील, तर काही फक्त आवड म्हणून राहतील. अर्थात, हे पुढील शिक्षणासाठी आवश्यक जरी असले तरीही रसायनशास्त्र की अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र की साहित्य, गणित की चित्रकला.. असे अवघड प्रश्न सोडवणे आलेच! पण हे असे वेगळे वाटणारे विषय अभ्यासून किंवा आवड म्हणून जोपासून त्यांच्या मिश्रणातून एक नवीन दृष्टी तयार होते आणि त्यातूनच त्या-त्या विषयात नवे प्रवाह निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते.

आजचा आपला विषय हा असाच गणित आणि चित्रकला या दोन विषयांच्या संगमातून कला निर्माण करणाऱ्या एका कलाकाराचा आहे. ज्याचे नाव आहे-  एम. सी. इशर!

मौरिट्स कॉन्रेलीस इशर (१८९८-१९७२) हा एक डच चित्रकार होता. लहानपणी अभ्यासात सामान्य गती असणाऱ्या इशरला सुतारकाम आणि संगीताची आवड होती. पुढे जाऊन त्याने स्थापत्यकलेचा अभ्यास करण्याचाही प्रयत्न केला; पण तेव्हा त्याला त्याचा खरा रस चित्रकलेतच आहे हे कळाले आणि त्याने चित्रकला, लाकडावर कोरून बनवलेली चित्रे यांचे रीतसर शिक्षण घेतले. तरुणपणात इशर युरोपमध्ये अनेक देशांत फिरला आणि झाडे, प्राणी, पक्षी, युरोपमधल्या इमारती यांचा त्याने चित्रांद्वारे अभ्यास केला; ज्याचा त्याला भविष्यात खूप फायदा झाला.

पण या प्रवासातील १९३६ मधील स्पेनचा दौरा हा त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. स्पेनमधील ‘अल्हम्ब्रा पॅलेस’ बघत असताना तेथील भूमितीय आकाराची नक्षी बघून तो त्यांच्या प्रेमातच पडला. एका टाइलवरचे अनियमित आकार आणि अशा अनेक टाइल बाजूबाजूला ठेवून बनवली नक्षी- त्यांच्यातली सममिती (Symmetry), त्यांचे प्रतिबिंब (Reflection), त्या आकृत्यांची होणारी पुनरावृत्ती (Repetition) आणि त्यातून निर्माण होणारी अनंततेची (Infinity) जाणीव याने इशरला पछाडलेच. अशा प्रकारे तयार झालेल्या आकृतिबंधाला ‘टेसलेशन’ (Tessellation) किंवा ‘Regular division of plane’ असे म्हणतात.

इशरने त्याने आतापर्यंत शिकलेल्या अनेक गोष्टींतून असे अनेक टेसलेशन बनवले. याच गणिती गोष्टी (सममिती, प्रतिबिंब, पुनरावृत्ती, अनंतता) त्याने त्याच्या आयुष्यात नंतर निर्माण केलेल्या कितीतरी कलाकृतींतून जाणवत राहतात.

पण इशर हा स्वत: काही गणितज्ञ नव्हता. त्याची गणिताची जाणीव ही सूत्र, सिद्धांत यांवर आधारलेली व त्यातच अडकून पडलेली नव्हती. वस्तूंकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन, शक्य-अशक्यतांच्या धूसर सीमारेषा आणि मेंदूला चालना देणारा दृश्यविचार यातून इशरचे गणित त्याच्या कलाकृतीत उतरत होते.  इशरच्या अशा कलाकृतींमुळे गणितज्ञांचे त्याच्याकडे लक्ष वेधले गेले नसते तरच नवल.

रॉबर्ट पेनरोज आणि त्याचे वडील लिओनेल पेनरोज या पितापुत्र जोडीने ‘पेनरोज त्रिकोण’ आणि ‘पेनरोज स्टेप्स’ (न संपणाऱ्या पायऱ्या) या संकल्पना मांडल्या होत्या. या संकल्पनांवरच इशरने ‘Ascending and Descending’ आणि ‘Waterfall’’  ही त्याची सर्वात गाजलेली चित्रे बनवली. दृष्टीभ्रम करणारी आणि मेंदूला ‘अरे, हे कसं शक्य आहे!’ असा विचार करायला लावणारी ही चित्रे म्हणजे अशक्य वस्तूंचीच (Impossible Objects) काही उदाहरणे आहेत. अशा अशक्य गोष्टींची चित्रे ही आपल्या डोळे आणि मेंदूच्या अर्थ लावण्याच्या मर्यादा जाणवून देतात- ज्याचा अनुभव ही चित्रे प्रत्यक्षात पाहूनच घेता येतो. हा प्रकार आपण आधी बघितलेल्या ‘कॉग्निटिव्ह बायसेस्’चाच एक प्रकार आहे.

कागदावर काढलेले आकार हे 2D (लांबी-रुंदी) असतात हे आपल्याला माहिती असते. तरीही काही चित्रांतून आपल्याला ते 3D  (लांबी-रुंदी-उंची) असल्याचा भास होतो. हे कसे होते? तर, हे काम आपल्या मेंदूच्या काही बायसेस्मुळे होते. कागदावरच्या काही खुणा, विशेषत: वस्तूंवर पडलेला प्रकाश आणि त्याच्या सावल्या यांमुळे आपल्या मेंदूला त्या गोष्टी 3D असल्याचा भास होतो. मेंदूच्या अशा वागण्याचा अनुभव देणार चित्र म्हणजे- ‘Drawing  Hands’! यात दोन हात एकमेकांची चित्रं काढत आहेत. चित्राचा काही भाग हा 2D दिसतो, तर काही भाग 3D. म्हणजे 2D आणि 3D यांचे एकत्र अस्तित्व दाखवणे हा या चित्रामागचा  विचार होता.

रंग, रेषा, आकार, दृष्टिकोन (Perspective) यासोबतच चित्र बघणारा आणि चित्र यांच्यातील थेट विचारी संभाषणावर इशरच्या चित्रांचा भर होता. तत्कालीन कला जगताने जरी ही चित्रे स्वीकारण्यास वेळ लावला तरी १९६० च्या हिप्पी चळवळीने अशा चित्रांना आपलेसे मानून त्याला लोकप्रियता मिळवून दिली. पारंपरिक चित्रातील भावनांचे प्रदर्शन टाळून एका जादूगारासारखी धक्कातंत्र वापरणारी इशरची चित्रे म्हणूनच उशिरा का होईना, पण लोकप्रिय झाली- आणि अजूनही होत आहेत.

पण आज ‘संज्ञा आणि संकल्पना’मध्ये इशरबद्दल बोलण्याचे प्रयोजन काय? एक तर या चित्रांमुळे मिळालेला आनंद तुमच्यासोबत वाटून घेणे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या विषयांतल्या माहितीच्या मिश्रणातून नव्या शक्यता कशा निर्माण होतात, याचे एक उदाहरण पाहणे. शेवटी या सदरच्या माध्यमातून आपणही हा वैचारिक घुसळणीचा प्रयत्न करतोच आहोत. नाही का?

parag2211@gmail.com

First Published on April 7, 2019 12:05 am

Web Title: marathi article in loksatta lokrang by parag kulkarni 2