|| राखी चव्हाण

जंगलाचा राजा वाघ! कधीकाळी त्यांची संख्या अंदाजे एक लाख इतकी होती. ती आता अवघ्या काही हजारांवर आली आहे. जगातील ३५ देशांमध्ये असलेले वाघांचे वास्तव्य आता त्यापैकी निम्म्याहून कमी देशांत शिल्लक उरले आहे. त्यात भारताचा क्रमांक अग्रस्थानी आहे. कारण जगभरात शिल्लक असलेल्या वाघांपैकी निम्मे वाघ भारतात आहेत. तरीही लाखाहून हजारांवर झपाटय़ाने आलेली वाघांची संख्या शेकडय़ांवर येण्यास वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच वाघांच्या एकूणच स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी चार दशकांपूर्वी व्याघ्रगणना हा प्रकार अस्तित्वात आला. या चार दशकांत व्याघ्रगणनेचे गणित बरेच बदलले आहे. व्याघ्रगणना आता पारंपरिक पद्धतीकडून अत्याधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीपर्यंत आली आहे. तरी त्यातूनदेखील अस्तित्वात असलेल्या वाघांची अचूक आकडेवारी प्राप्त होतेच असे नाही.

माणसांच्या गणनेप्रमाणे वाघांची किंवा इतर वन्यप्राण्यांची अचूक गणना करणे शक्य होत नाही. मात्र, व्याघ्रगणनेच्या पद्धतींत जसजसा बदल होत आहे, तसतसे त्यांच्या अचूक गणनेच्या जवळपास आपण पोहोचत आहोत असे म्हणायला हरकत नाही. जंगलातील प्राण्यांची आकडेवारी मिळवण्यासाठी दशकभरापूर्वी पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला जात असे. मचाण किंवा पाणवठय़ावरील प्रगणना आणि पाऊलखुणा पद्धतीने ही गणना होत असे. सात दिवसांच्या या व्याघ्रगणनेत वनकर्मचारी दररोज सकाळी आणि सायंकाळी जंगलाच्या विविध क्षेत्रांत फिरून प्राण्यांच्या पाऊलखुणांचे ट्रेसिंग घेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या द्रावणातून या पाऊलखुणांचे प्लास्टरकास्ट काढले जाई. पाऊलखुणांचे व ट्रेसिंगचे विश्लेषण करून त्यात  बोटातील अंतर, पंजाची गादी, बोटाचा आकार, गादीचा आकार, संपूर्ण पंजाचा आकार या सगळ्याचा विचार केला जात असे. त्यावरून मग वाघाची संख्या काढली जात असे. अशी आठवडाभर प्राण्यांची गणना करूनसुद्धा प्रत्यक्ष निष्कर्षांत मात्र अनेक त्रुटी आढळून येत असत. पाणवठय़ावरील गणना हा पारंपरिक व्याघ्रगणनेचाच एक प्रकार. यात फक्त वाघच नाही, तर इतरही वन्यप्राण्यांची गणना केली जात असे. वर्षांतून एकदा बुद्धपौर्णिमेला हा उपक्रम राबवला जात असे. या प्रगणनेत जंगलातील पाणवठय़ांवर मचाण उभारून चंद्राच्या प्रकाशात पाणवठय़ावर येणारे प्राणी न्याहाळायचे आणि त्यांची नोंद करायची. वन्यप्राणी त्यांच्या सवयीनुसार पाणवठय़ावर पाणी पिण्यासाठी येतात. निशाचर असणाऱ्या या प्राण्यांची हालचाल सायंकाळी अंधार पडल्यानंतरच अधिक वेगवान होते. त्यामुळे पाणवठय़ावर येणाऱ्या या वन्यप्राण्यांना हेरायचे आणि दिलेल्या नमुन्यात ते टिपायचे असा हा प्रकार होता. सुरुवातीला ही पद्धत गांभीर्याने राबवली गेली. पाणवठय़ावर कोणता प्राणी किती वाजता आला, कोणत्या दिशेने आला, पाणी प्यायल्यानंतर तो कोणत्या दिशेने गेला याची इत्थंभूत माहिती त्या नमुन्यात नोंदवली जात असे. मात्र, हळूहळू स्वयंसेवींच्या साहाय्याने होणाऱ्या या प्रगणनेत मचाणावर बसण्यासाठी चढाओढ करणाऱ्या हौशे-नवशे-गवशे यांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यातले गांभीर्य हरवले. या प्रगणनेतून मिळणाऱ्या आकडेवारीत नेमकेपणा नसे. बुद्धपौर्णिमेला होणारी पाणवठय़ावरील प्रगणना आणि पाऊलखुणांच्या सहाय्याने होणारी प्रगणना यांत अचूक आकडेवारी मिळत नसे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सारिस्का अभयारण्य!

सारिस्कासारख्या अभयारण्यात वाघ जवळजवळ पूर्णपणे नाहीसे झालेले असतानादेखील त्या ठिकाणी २०-२५ वाघ असल्याची नोंद केली गेली. जिथे वाघ नावालाही आढळत नाही, तिथे त्यांची एवढी मोठी संख्या? तपासाअंती हा प्रगणनेतील दोष असल्याचे  सरकारच्या लक्षात आले आणि मग ही पद्धतच बंद करण्यात आली. हा निर्णय संपूर्ण देशभर लागू करण्यात आला. त्यानंतर बरीच आरडाओरडही झाली. कारण यामुळे जंगलात मचाणावरून फुकटात वन्यप्राणीनिरीक्षण करण्याला लगाम घातला गेला. मात्र, त्यानंतर बुद्ध पौर्णिमेला पाणवठय़ावरील मचाणावरून वन्यप्राणी निरीक्षणाचा हा उपक्रम जंगल आणि वन्यप्राणी संवर्धनाकरता सुरू ठेवण्यात आला. परंतु त्यातून अधिकृत प्रगणना बाद करण्यात आली. अलीकडच्या काही वर्षांत या मचाणावर बसण्यासाठी जास्त पैसे आकारले जाऊ लागले. त्यावर बरीच आरडाओरड झाली. मात्र, त्यामागे वनखात्याचा उद्देश प्राणीनिरीक्षणाच्या नावाखाली नस्ता गोंधळ घालणाऱ्यांना लगाम घालणे आणि या उपक्रमाचे गांभीर्य कायम राखणे हाच होता. मागील वर्षीपासून ‘मचाण गणना’ हा शब्दच वनखात्याने बाद केला आणि ‘निसर्गानुभव’ असे त्याचे गोंडस बारसे केले.

सारिस्का प्रकरणानंतर सरकारने थेट डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडे व्याघ्रगणनेसाठी वैज्ञानिक पद्धती तयार करण्याची गळ घातली. त्यानंतर संपूर्णपणे वैज्ञानिक अशी ‘ट्रान्झिट लाइन मेथड’ ही पद्धत या दोन्ही संस्थांनी तयार केली. २०१० मध्ये पहिल्यांदा या पद्धतीचा वापर करून संपूर्ण देशभरात एकाच वेळी प्राणीगणना करण्यात आली. चार टप्प्यांत ही पद्धती विभागली गेली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष जंगलात जाऊन वन्यप्राण्यांचे दर्शन, त्यांची विष्ठा, झाडावर चढताना प्राण्यांच्या नखाद्वारे होणारे ओरखडे, ठसे अशा अप्रत्यक्ष नोंदींचा यात समावेश आहे. शिवाय हरित आच्छादन व मानवी हस्तक्षेपाच्या नोंदीदेखील त्यात घेतल्या जातात. यात जीपीएस रीडिंगदेखील वन-कर्मचाऱ्याला घ्यावे लागते. नंतर ही माहिती एकत्र करून तिचे विश्लेषण केले जाते. पहिल्या दोन टप्प्यांत मिळणाऱ्या माहितीचे विश्लेषण करून वाघ तसेच इतर मांसाहारी प्राणी कोणत्या भागात अधिवास करतात हे आधी ताडले जाते. त्यानंतर दर १०० चौरस किलोमीटर क्षेत्रामागे दोन्ही बाजूने कॅमेरे लावले जातात. गेल्या काही वर्षांपासून हे कॅमेरे लावण्याचे काम भारतात डब्ल्यूआयआय, डब्ल्यूसीटी यांसारख्या संस्था करत आहेत. वाघांच्या किंवा वन्यप्राण्यांच्या संचार मार्गावर किंवा पाणवठय़ावर हे कॅमेरे लावले जातात. दोन्ही बाजूने त्यांचे छायाचित्र येईल अशा पद्धतीने ते बसवले जातात. कॅमेऱ्याच्या हद्दीत येणाऱ्या वन्यप्राण्यांवर दिवसरात्र या कॅमेऱ्यांची नजर राहते. या कॅमेऱ्यांत ट्रॅप झालेल्या छायाचित्रांचे विश्लेषण करून वाघाचा आकार, त्याच्या शरीरावरील पट्टे, त्यातील अंतर, आकार आदींचा अभ्यास केला जातो. हा संपूर्ण तपशील गोळा केल्यानंतर तज्ज्ञांमार्फत त्याचा अभ्यास केला जातो. ‘एमस्ट्रीप’ या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या छायाचित्रांचे विश्लेषण केले जाते. यातील पहिल्या टप्प्याची प्रक्रिया शक्यतोवर हिवाळ्यात पार पाडली जाते. कारण उन्हाळ्यात वन्यप्राणी पाण्याच्या शोधात स्थलांतर करतात, तर पावसाळ्यात दळणवळणाची अडचण येते. या पद्धतीत किमान संख्येचा खात्रीलायक दावा करता येतो.

‘ट्रान्झिट लाइन मेथड’ ही सहा दिवसांची प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष वनक्षेत्रात मांसाहारी प्राण्यांच्या पायाचे ठसे, त्यांची विष्ठा, नखांचे ओरखडे, मूत्रविसर्जन, त्यांनी केलेली शिकार या गोष्टींचा समावेश होतो. त्यासाठी दिलेल्या नमुन्यात या नोंदी कराव्या लागतात. तसेच त्यांचे छायाचित्रण आणि जीपीएसने अक्षांश-रेखांश घ्यावे लागतात. तीन दिवसांत वेगवेगळ्या मार्गावरून चालावे लागते. कित्येकदा ज्या ठिकाणाहून कार्यक्षेत्राची सुरुवात होते ते अंतर बरेच असल्याने दहा किलोमीटरपेक्षाही अधिक चालणे होते. नागझिरा अभयारण्यातील पहिल्या ट्रान्झिट लाइन पद्धतीने झालेल्या गणनेतील माझा पहिल्या दिवसाचा अनुभव १७ कि. मी. इतके अंतर चालण्याचा होता. पहिल्या तीन दिवसांनंतर विश्रांती असते. त्यानंतरचे तीन दिवस दोन कि. मी.च्या ‘ट्रान्झिट लाइन’वर चालावे लागते. हा मार्ग वेगवेगळा नव्हे, तर तोच असतो. या लाइनवरून दोनच व्यक्ती जाऊ शकतात. कारण चालताना प्रचंड शांतता असावी लागते. तृणभक्षी प्राणी थोडय़ा आवाजानेही दूर पळतात. या मार्गावरून चालताना जे प्राणी निदर्शनास येतात त्यांची संख्या, नर/मादी, तसेच त्यांच्या वयाचा अंदाज बांधून प्राणी किती अंशाच्या कोनात होते, याची नोंद करावी लागते. प्राणी किती अंशाच्या कोनात होते, ही माहिती जीपीएसच्या उपयोगातून मिळते. दोन किलोमीटर चालून झाल्यानंतर परत फिरताना एका बाजूच्या दिशेने १५ मीटर वर्तुळात किती आणि कोणती झाडे आहेत, पाच मीटरच्या वर्तुळात किती झुडपे आहेत, एक मीटरच्या वर्तुळात कोणते गवत आहे याबद्दलची नोंद करावी लागते. या ठिकाणच्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्याचे प्रमाण किती टक्के आहे, गवताची टक्केवारी काय आहे, झाडांचे आच्छादन किती टक्के आहे, हेदेखील पाहिले जाते. दोन किलोमीटर अंतरात घेतलेल्या नोंदी दर ४०० मीटर अंतरावर एका बाजूने कराव्या लागतात. या ठिकाणावरून जाताना जर कुठे तृणभक्षी प्राण्यांच्या लेंडय़ा  दिसल्या तर त्या कोणत्या प्राण्याच्या आहेत, अंदाजे किती आहेत, याचीही नोंद ठेवावी लागते. हा सर्व तपशील डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेकडे पाठवला जातो. तज्ज्ञांकडून त्याचा अभ्यास केला जातो आणि प्रत्येक वनक्षेत्रातील वाघांच्या संख्येचा अंदाज घेतला जातो. संपूर्ण देशभरात हीच पद्धत वापरली जाते.

मात्र, याही पद्धतीत शंभर टक्के वाघ कधीच गणले जात नाहीत. कारण वनखात्याच्या सर्वच विभागांतील क्षेत्रात ही गणना होत नाही. अलीकडे वाघांचा वावर संरक्षित क्षेत्राबाहेरदेखील वाढला आहे. या पद्धतीतसुद्धा काही त्रुटी निश्चितच आहेत. याचे कारण- प्रत्यक्षात गणनापद्धतीत काम करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण! वन्यजीव विभागातील वनकर्मचारी प्रशिक्षित असले तरी प्रादेशिक विभागातील कर्मचारी प्रशिक्षित असतीलच असे नाही. त्यांना पुरेसे प्रशिक्षण आणि अनुभवाचा अभाव असतो. व्याघ्रगणना करताना एका बीटमध्ये एक ते चार ट्रान्झिट करण्याचे निर्देश आहेत. अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्पांत त्याचे पालन होत असले तरी प्रादेशिक वा इतर जंगलांत हे निर्देश पाळले जातातच असे नाही. ट्रान्झिटसाठी निवडले जाणारे क्षेत्र बऱ्याचदा वनकर्मचाऱ्याच्या सोयीने निवडले जाते. त्यामुळे निवडलेले हे क्षेत्र त्या संपूर्ण जंगलाचे प्रतिनिधित्व करतेच असेही नाही. अशावेळी निरीक्षण आणि आकडेवारीत गफलत होते. त्यामुळे या पद्धतीतही शंभर टक्के वाघ गणले जातीलच किंवा वाघांची नेमकी आकडेवारी मिळेलच असे नाही. भारतीय वन्यजीव संस्था इतके वाघ आहेत किंवा तितके वाघ आहेत असा दावा कधीच करत नाही, तर गोळा केलेल्या तपशिलाच्या आधारे ते अंदाज बांधतात. एवढे मात्र खरे की, पूर्वीच्या तुलनेत ही पद्धती अधिक वैज्ञानिक, शास्त्रोक्त असल्याने एकूण व्याघ्रसंख्येच्या बऱ्याच अंशी जवळ नेणारी आहे. या पद्धतीमुळे वाघांबरोबरच जंगलातील इतर प्राण्यांच्या अस्तित्वाचीदेखील माहिती आणि संख्या मिळते. या पद्धतीमुळे गेल्या काही वर्षांत वाघांच्या संख्येचे उत्तम डॉक्युमेंटेशन होत आहे. वाघ तसेच इतर वन्यप्राण्यांच्या संख्येवरून त्या जंगलाची समृद्धता लक्षात येते आणि त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी योग्य ते प्रयत्न केले जातात. काळानुसार आता प्रगणना पद्धतीत बदल होत आहेत. गणनेची पद्धती कोणती, यापेक्षा त्यातून मिळणारा तपशील वन्यप्राण्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या संवर्धनसाठी दीर्घकालीन उपाययोजना आखण्याकरता उपयुक्त ठरत आहे.

rakhi.chavhan@expressindia.com