|| सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यास,

सदू धांदरफळेचा नमस्कार.

विदर्भ, मराठवाडय़ाकडे तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पलीकडे गेलाय म्हणे. खरं म्हणजे आता निवडणुका होऊन गेल्या आहेत. शाळा-कॉलेजच्या परीक्षा संपलेल्या आहेत. पोरांचा जो काही बरा-वाईट लागायचा होता तो निकाल लागलेला आहे. इतरांच्या मुलांना आपल्या मुलांपेक्षा जास्त गुण मिळाल्याबद्दल जळणारी थोडीफार मंडळी सोडली तर बाकीचे तसे ‘कूल’ आहेत. देशाचा निकाल ईव्हीएम मशीनमध्ये सुरक्षित आहे. (निदान अशी आपली श्रद्धा आहे.) त्यामुळे एकंदरीतच पारा उतरायला हवा होता. पण आपली विनंती ऐकून खाली उतरायला पारा म्हणजे काही ‘शोले’मधला वीरू नाही आणि आपण काही बसंतीची मावशी नाही. असो.

शहाणेसुरते लोक म्हणतात की, ग्लोबल वॉर्मिग आणि ओझोन इफेक्टमुळे संपूर्ण जगाचं तापमान वाढतंय. असेलही. जगाचं मला फारसं काही कळत नाही; पण घरातल्या घरात बसून मला झालेला साक्षात्कार असा आहे की, ग्लोबल वॉर्मिग, ओझोन इफेक्ट हे सगळं झूठ आहे! देश-विदेशातल्या थंड हवेच्या ठिकाणी व्हेकेशनसाठी गेलेली मित्रमंडळी, त्या लोकांनी फेसबुकवर टाकलेले ‘ट्रॅव्हलिंग टू अमुक तमुक’ असे स्टेटस, इन्स्टाग्रामवर घातलेला फोटोंचा रतीब आणि त्यांचे दिवसाला चार-चारदा बदलणारे व्हॉट्सअ‍ॅपचे डीपी.. माझ्या घरच्या तापमानवाढीचं खरं कारण हे आहे!

काही लोकांची आर्थिक स्थिती अशी असते की त्यांना व्हेकेशन खरोखरच परवडत नाही. तर काही लोक असे असतात की त्यांनी कितीही पैसा कमावला तरी ते मनानं नेहमीच केशरी रंगाचं रेशनकार्डधारक असतात. या दोन प्रकारची जनता सोडली तर बाकीचे लोक आपापल्या क्रेडिट कार्डच्या लिमिटनुसार आणि बायकोच्या धाकानुसार सुट्टी घेऊन गावी, परगावी, परराज्यात किंवा परदेशात फिरायला जाऊन जिवाचं व्हेकेशन करीत असतात.

आपण जर सोशल मीडिया बघायला लागलो तर असं वाटतं की सगळेच लोक फिरताहेत. खाताहेत. पिताहेत. बर्फात नाचताहेत. समुद्रात पोहताहेत. एन्जॉय करताहेत. हे सगळं करताना न चुकता सेल्फी काढताहेत. सोशल मीडियावर ते अपलोड करताहेत.. आणि केवळ आपणच सुट्टी न देणाऱ्या बॉसची दादागिरी सहन करीत, फिरायला नेत नसल्याबद्दल बायकोची बोलणी खात आणि पोरांची पिरपिर ऐकत घरात खितपत पडलो आहोत. पण मला खात्री आहे- माझ्यासारख्याच (ओझोनच्या थराला पडलेल्या भोकापेक्षा आपल्या खिशाला पडणाऱ्या भोकाची जास्त चिंता असल्यामुळे) व्हेकेशनला जाऊ  न शकणाऱ्या लोकांचीही संख्या खूप असणार. असणार काय? आहेच! व्हेकेशनला जाता आलं किंवा नाही आलं तरी सोशल मीडियावर मिरवता आलं पाहिजे असं वाटणाऱ्या जनतेमध्ये माझ्या एका संधिसाधू मित्राला व्यवसायाची संधी दिसली आणि त्यानं बसल्या बसल्या सुरू केलेल्या धंद्याची ही जाहिरात बघ..

‘आमच्या येथे अत्यंत वाजवी दरात-

१) तुम्ही जाऊन आलेल्या फॉरेन ट्रिपचे फोटो फेसबुक/ इन्स्टाग्रामवर टाकण्यासाठी आकर्षक शीर्षकं (कॅप्शन्स) लिहून मिळतील. फोटोशॉप टच्अपचा वेगळा चार्ज आकारला जाईल. (तुम्हाला काय झाकायचंय, काय हायलाइट करायचंय आणि काय मॉर्फ करायचंय, त्यावर त्याचा रेट ठरेल.)

२) तुम्ही ऑलरेडी फॉरेन टूरवर असाल तर सोशल मीडियावर शेअर करावयाच्या फोटोंसाठी रिअल टाइम बेसिसवर लोकेशन्स, पोझिशन्स, कॉश्च्युम, डूज् अ‍ॅण्ड डोन्टस्च्या टिप्स दिल्या जातील.

३) नजीकच्या काळात फॉरेन टूरला जायचा बेत असणाऱ्यांनी जर वरील कामाचं कंत्राट दिलं तर ‘एक्सायटेड टू व्हिजिट..’वाले सात हटके स्टेटस अपडेट फ्रीमध्ये लिहून मिळतील.

टीप : फेसबुकवर शंभरहून कमी लाइक्स आणि दहाहून कमी कमेंट मिळवणाऱ्या फोटोंचे दुप्पट पैसे परत मिळतील.’

दादू, आहे की नाही व्यवसायाची भन्नाट आयडिया! सालं, आपल्याला कुठे जाणं झेपत नाही, कुणी गेलेलं रुचत नाही आणि चार पैसे मिळतील असं काही सुचतही नाही. असो.

तर.. सांगायचा मुद्दा असा की, सुट्टीमध्ये सगळेच कुठे ना कुठे फिरायला जातात म्हणून आपणही जाऊ या, असा आपल्याही घरून बूट निघतो. घरून निघालेल्या बुटाला सकारात्मक प्रतिसाद नाही दिला तर चप्पल खायची वेळ येते, हे नवरेपणाची ग्रॅच्युइटी लागू झालेल्या तुला ठाऊक असेलच. तरीही धीर करून मी महागाई वाढलीय आणि जगणं दिवसेंदिवस महाग कसं होत आहे, ही गोष्ट कुटुंबाला पटवायचा प्रयत्न करतो. आपण जगण्यासाठी खर्च करीत असलेल्या पैशात आपल्याला रोज एक फेरी पृथ्वीभोवती आणि वर्षांला एक फेरी सूर्याभोवती फुकट मारायला मिळते, त्यात आणखी खर्च करून व्हेकेशनला कशाला जायला हवं, अशी काहीतरी दिव्यांग सबब काढतो. (हल्ली सबबीलाही ‘लंगडी सबब’ बोलायची भीती वाटते. कुणाच्या भावना दुखावतील सांगता येत नाही.) पण नेहमीप्रमाणे पोराबाळांसमोर आपली आणि आपल्या खानदानाच्या कंजूषपणाची शक्य तितकी इज्जत काढून आपली सूचना उडवून लावली जाते. तुला सांगतो दादू, कितीही अपमान झाला तरी मी चेहऱ्यावर तसं दाखवत नाही. एका खूप मोठय़ा सद्गुरूनं मला गुपचूप कानात सांगितलंय (म्हणजे मी हेडफोन लावून यूटय़ूबवरील व्हिडीओ पाहिलाय रे!), की माणसानं नेहमी हसतमुख राहावं. आपण नेहमी असं हसतमुख राहिल्यानंच बायको, बॉस आणि सरकारला आपल्याला अधिकाधिक छळण्यासाठी उत्तेजन मिळू शकतं!

हल्ली भारताच्या आजूबाजूच्या देशांत जाऊन ‘फॉरेन टूर’ला जाऊन आल्याचं सुख मिरवणारेही लोक आहेत. मी आजवर अशा जवळच्या फॉरेन टूर टाळत आलोय. त्यामागे विचार असा आहे की, आज ना उद्या पाकिस्तान, भूतान, म्यानमार, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान या देशांसकट अखंड हिंदुस्थान होणारच आहे. आता उगीच व्हिसाचा खर्च का करा?

दादू, तुला माहीतच आहे, मला काही प्रवासाची फारशी आवड नाही. लोक म्हणतात, हवापालटासाठी गेलं की मनावरचा ताण हलका होतो. खिशावरचा ताण किती कमी होतो, हे कुणी बोलतच नाही. त्यात मला प्रवासाचा त्रासही होतो. मला गाडी लागते, बस लागते. डोकं गरगरतं. पोटात मळमळतं. मी काही खाल्लं तर माझ्या पोटात दुखतं. आणि मी असा नाइलाजानं उपाशी असताना दुसऱ्यांनी खाल्लं तर माझ्या पोटात जरा जास्तच दुखतं.

प्रवासाचं आणि निरनिराळ्या ठिकाणांचं कुतूहल मात्र मला खूप आहे. मागच्याच आठवडय़ात आमच्या शेजारचे शामराव बॅगा घेऊन येताना दिसले. मी त्यांना थांबवून म्हटलं, ‘‘उगाच विचारून तुम्हाला अडवत नाही. सांगा ना, कुठे जाऊन आलात?’’ शामराव चपापले. त्यांच्या नातीनं गौप्यस्फोट केला- ‘‘आजोबा चीनला गेले होते.’’ चीनच्या मालावर बहिष्कार टाकण्याचं व्हॉट्सअ‍ॅपवरून आवाहन करून तसं न करणाऱ्या देशद्रोही लोकांना सोसायटीनं वाळीत टाकावं, असा फतवा याच शामरावांनी मध्यंतरी काढला होता! तुला सांगतो दादू, देशद्रोही ठरण्याच्या भीतीने आम्ही जेवणात ‘चिंच’ खायचंही सोडून दिलं होतं. पण तो विषय न काढता मी म्हटलं, ‘‘शामराव, मला एक कुतूहल आहे, की आपल्याकडे जसं लहान बाळांना भरवायला छान छोटे छोटे चमचे असतात, तसं चिनी लोक लहान बाळांना भरवण्यासाठी चॉपस्टिकऐवजी टूथपिक वापरतात काय?’’ पण आपली चायनीज देशभक्ती पकडली गेल्याच्या रागात शामराव काही न बोलता निघून गेले.

मध्यंतरी एका मित्रानं काश्मीरहून फोन केला आणि म्हणाला की, ‘‘आज इथलं तापमान शून्य अंश आहे आणि उद्या आजच्या दुप्पट थंडी पडणार आहे असं म्हणताहेत.’’ पण शून्याच्या दुप्पट म्हणजे नक्की किती, हे काही तो मला सांगू शकला नाही. मागे माझ्या एका मित्राचा मुलगा आसामला चहाच्या कंपनीत टी टेस्टर म्हणून नोकरीला लागला. मी त्याला मेसेज केला की, ‘बाबारे, नोकरीचा भाग म्हणून दिवसभर चहा चाखणारे लोक टी-ब्रेक घेतात काय?’ त्याचं काही उत्तरच नाही. कट्टी घेतली की काय, कुणास ठाऊक. तर, सांगायचा मुद्दा असा की, देवानं मला रूप, अक्कल, पैसा, नशीब हे सारं सोनाराच्या तागडीत तोलून दिलं असलं तरी कुतूहल देताना मात्र भंगारवाल्याकडचा स्प्रिंगचा काटा वापरला असावा.

दादू अरे, बोलता बोलता जे सांगण्यासाठी पत्र लिहायला घेतलं होतं ते राहूनच गेलं बघ. अरे, सालाबादाप्रमाणे या वर्षीदेखील आम्ही फॉरेन ट्रिपचा बेत कॅन्सल करून भारतातच फिरायला जायचा प्लान केलाय. जगलो, वाचलो आणि सांगण्यासारखं काही असलं तर पुढच्या पत्रात त्या प्रवासाविषयी लिहीनच. आणि हो, मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं की, पासपोर्ट काढला असेल आणि त्याची १५ वर्षांची मुदत संपेपर्यंत एकदाही परदेशी जाण्याचा योग आला नसेल तर अशा दुर्दैवी लोकांना सरकारकडून ‘पांढऱ्या पायांचा भत्ता’ मिळणार आहे. या ‘पांढऱ्या पायांच्या भत्त्या’साठी अर्ज वगैरे कुठे करायचा असतो, प्रोसिजर काय आहे याविषयी काही माहिती मिळाली तर कळव.

तुझा सफिरग मित्र..

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com