|| सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू यास,

सदू धांदरफळेचा नमस्कार!

शेतातलं पीक चांगलं तरारून वर यावं आणि नेमकं त्या वेळेसच अवकाळी पावसानं शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घ्यावा, अगदी तशीच अवस्था बऱ्याचदा आम्हा नोकरदारांचीही होते. वर्षभर मान मोडून काम केलेलं असतं, प्रसंगी घरच्या बॉसची बोलणी खाऊन ऑफिसातील बॉसची मर्जी राखलेली असते. मागील वर्षी ‘बेल-कव्‍‌र्ह’चं निमित्त सांगून आपल्याला डावलताना, ‘पुढच्या वर्षी तुझं प्रमोशन नक्की’ असं बॉसनं आश्वासनही दिलेलं असतं. ‘आम्ही नाही त्यातले’ म्हणत म्हणत वर्षभर वरिष्ठांसमोर थोडीफार दिखाऊगिरी, सहकाऱ्यांच्या चुगल्या, बॉसला मस्का-पॉलिश हे सारं केलेलं असल्यामुळे आपण प्रमोशनच्या किंवा किमान चांगल्या पगारवाढीच्या अपेक्षेत असतो. आणि एक दिवस अचानक, देशाची अर्थव्यवस्था गाळात जात आहे किंवा जीडीपी कमी होत आहे किंवा कंपनीला मागच्या तिमाहीत तोटा झाला आहे.. अशा बातम्या येऊन थडकतात आणि आपल्या इन्क्रिमेंट, प्रमोशनचा मोहोर करपून जातो.

हे असं काही यंदाच झालंय अशातला भाग नाहीये. मागील कित्येक वर्ष सातत्यानं हे असंच चालत आलंय. पुढच्या वर्षी नक्की चांगलं इन्क्रिमेंट वा प्रमोशन मिळेल, या आशेवर आपण या वर्षी मरमर मरतो, तंगी सोसतो. पण खरं सांगू दादू, आता महागाई फेस करताना तोंडाला फेस येऊ  लागलाय. शेतीत काही राम नाही म्हणून आमच्या बापानं आम्हाला नोकरी धरायला लावली; पण आता नोकरीतही पोट भरत नाही म्हणून मी एखादा व्यवसाय करायचा विचार करतोय. पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी लागणारी व्यावसायिक वृत्ती, भांडवल आणि बँकेचं कर्ज बुडविण्याची धडाडी या तिन्ही बाबतीत आपण ठणठणगोपाळ असल्यामुळे वर्षभर विचार करून मनाच्या अत्यंत उद्विग्न आणि खचलेल्या अवस्थेत, आपण ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ व्हावं या निष्कर्षांप्रत मी आलेलो आहे. खरं म्हणजे, मला शुद्ध मराठीत ‘प्रेरक वक्ता’ असंही म्हणवून घेता आलं असतं. पण त्यामुळे स्वत:लाच थोडंसं डिमोटिव्हेटेड वाटतं आणि दुसरं म्हणजे, अधूनमधून इंग्लिश टम्र्स आणि कोट्स यूज करणे ही या प्रोफेशनची मूलभूत गरज आहे.

दादू, तुला माहीतच आहे की, मी रोज सोशल मीडियावर शेकडो लोकांच्या फालतू कविता वाचून त्यांना ‘एक नंबर’, ‘भारी’, ‘जब्राट’ अशा कमेंट देऊन प्रोत्साहित करीत असतो. मित्रमंडळींच्या चिंधी पोस्ट्सनासुद्धा ‘माइंड ब्लोइंग’, ‘हे फक्त तूच लिहू शकतोस’ असं म्हणून मोटिव्हेट करत असतो. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम अशा सोशल मीडियावरील महिलावर्गाचे फोटो पाहून ‘क्युट’, ‘ब्युटीफूल’, ‘हॉट’ अशा कमेंट देऊन, गुलाबी बदामांची लयलूट करून अजून फोटो शेअर करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. गावावरून ओवाळून टाकलेल्या कुणा उडाणटप्पू सोम्यागोम्याचा वाढदिवस असला तरी ‘ढाण्या वाघ’, ‘थोर समाजसेवक’, ‘भावी नेतृत्व’ अशा विशेषणांनी त्यांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहित करीत असतो. मी देत असलेल्या या प्रोत्साहनाबद्दल, एका फेसबुक मैत्रिणीच्या नवऱ्यानं दिलेल्या धमकीव्यतिरिक्त माझ्या पदरात फारसं काही पडलेलं नाही. पण यापुढे दुसऱ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं हेच माझं कौशल्य वापरून मी पैसा आणि नाव कमवायचं ठरवलंय.

‘मोटिव्हेशन’ या विषयावरील जगातील विविध भाषांतील (मराठीत भाषांतर झालेली) पुस्तकं, व्याख्यानं आणि यूटय़ूबवरील व्हिडीओ असा सर्वंकष अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं आहे, की माणसाला व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-डी यांच्याइतकीच ‘व्हिटॅमिन-एम’ अर्थात मोटिव्हेशनचीदेखील गरज असते. गरज ही शोधाच्या बापाची लिव्ह-इन-पार्टनर असल्यामुळे काही वाचाळोद्योगी लोकांनी मोटिव्हेशनचा बूस्टर डोस शोधून काढला

आहे आणि स्वत:ला ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ म्हणवत कॉर्पोरेट ऑफिसेसपासून मंदिरापर्यंत व्हाया फाइव्ह स्टार हॉटेल्स असा सर्वत्र संचार मांडला आहे.

तुमच्या कुटुंबात, नातेवाईकांत, ओळखीच्या लोकांत कुणी कर्तृत्ववान व्यक्ती असेल आणि तुम्ही त्या व्यक्तीकडून फुकटात प्रेरणा घ्यायचा विचार करीत असाल, तर तर तुमचं मोठं व्हायचं स्वप्न मुदलातच गंडलं आहे असं समजा. तुम्हाला आयुष्यात मोठं व्हायचं असेल, तर किमान पंचवीस-पन्नास हजार रुपये एका तासाचे घेऊन एअर कण्डिशण्ड् हॉलमध्ये घाऊक प्रेरणा देणाऱ्या ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ नामक गुरूचं भाषण ऐकणं कम्पलसरी आहे.

दादू, गम्मत अशी आहे की, जवळजवळ सगळ्याच मोटिव्हेशनल गुरूंच्या भाषणात एक मुद्दा समान असतो; तो म्हणजे- हे सगळे गुरू लहानपणी अभ्यासात ढ होते, बोलायला तोतरे होते, कामात कच्चे होते, इत्यादी इत्यादी आणि आज ते जे काही (आपल्याकडून हजारो रुपये उकळण्याइतके) यशस्वी झाले आहेत, ते केवळ योग्य वेळी, योग्य प्रकारचे मोटिव्हेशन मिळाल्यामुळे! त्यालाच जोडून दुसरा मुद्दा असतो, की त्या गुरूंसमोर बसलेले आपण सर्व जण भाग्यवान आहोत. कारण त्यांच्या रूपाने आपल्यालाही योग्य वेळी, योग्य प्रेरणा देणारा गुरू प्रसन्न झालेला आहे.

मोटिव्हेशनल गुरू होण्यासाठी फारशी गुंतवणूक करावी लागत नाही. तुमच्याकडे एक ऑफ-व्हाइट रंगाची ट्राऊझर आणि सेकंड्स सेलमध्ये घेतलेला एक सूट असावा लागतो. दाढी शक्यतो फ्रेंच कट असलेली बरी आणि केसाचा तुळतुळीत गोटा केलेला असला, तर सोने पे सुहागा! शाळेत एकेका वर्गात काढलेली दोन-दोन वर्ष आणि डोक्यावरील केसांचे अकाली नष्ट होणे हा माझ्या मोटिव्हेशनल गुरू होण्यासाठी एक दैवी संकेत आहे, असे समजून मी बाकीच्या गोष्टींची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे.

यशस्वी मोटिव्हेशनल स्पीकर होण्यासाठी तुम्हाला- ‘यशाचा मार्ग नेहमी अंडर-कन्स्ट्रक्शन असतो’, ‘The most difficult part of getting to the top of the Ladder is getting through the crowd at the bottom, ‘इंतजार करनेवालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना कोशिश करनेवालों से बच जाता है’.. अशी विविध भाषांतील चित्रविचित्र वचने समोरच्यांनी ज्यांची नावे कधीच ऐकली नाहीत अशा थोर थोर माणसांच्या नावाने खपवता आली पाहिजेत. कुठल्याही प्रश्नावर मोठमोठय़ा लेखकांची, शास्त्रज्ञांची, तत्त्ववेत्त्यांची परस्परविरोधी विधानं आत्मविश्वासानं तोंडावर फेकता आली पाहिजेत. रोजच्या जीवनातील फालतू उदाहरणे देऊन त्यातून लोक अंदाज करतील त्यापेक्षा वेगळा अर्थ काढून दाखवता आला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, वाक्यावाक्याला मोठमोठे इंग्रजी शब्द- ज्याला ‘जार्गन’ म्हणतात ते- वापरता आले पाहिजेत. हे सारं करता आलं तरच आपल्याकडे प्रेरणा घ्यायला आलेलं गिऱ्हाईक इम्प्रेस होईल. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा चौकीदार’ हे त्याला आधीच माहीत असलेलं सत्य, मोटिव्हेशनल स्पीकर नावाच्या बोधीवृक्षासमोर बसल्यावर त्याला नव्यानं गवसेल आणि आपण फीसाठी भरलेल्या पैशाचे पनीर न होता चीज झाल्याच्या भावनेनं कृतकृत्य होऊन तो बाहेर जाईल.

तुला एक गम्मत सांगतो दादू, आमच्या सोसायटीतील एका बाईने गर्भसंस्काराचे वर्ग सुरू केले आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला, की तिच्या या यशानं तिच्या नवऱ्याला फ्रस्ट्रेशन आलं. तो एका मोटिव्हेशनल गुरूकडे गेला. गुरूनं तासभर त्याचं बौद्धिक घेऊन त्याला त्याच्या बायकोच्या व्यवसायाच्या एक पाऊल पुढे जाता येईल असा व्यवसाय करण्याची प्रेरणा दिली. आज त्या इसमानं गुरूचा सल्ला शब्दश: मनावर घेऊन सुरू केलेल्या ‘वीर्यसंस्कार’ या यूटय़ूब चॅनेलला लाखो हिट्स मिळत आहेत.

पण दादू, विज्ञान इतकं पुढारलं असताना प्रेरणा घेण्यासाठी अजूनही आपल्याला दुसऱ्या कुणाची गरज का लागावी? लोक स्वत:च स्वत:ला प्रोत्साहित करू शकतील असं काही उपकरण आपले वैज्ञानिक का बनवीत नाहीत? असा प्रश्न तुला पडला असला तर त्याचं उत्तर हेच आहे, की अशाप्रकारचं संशोधन करण्यासाठी आपल्या वैज्ञानिकांना माझ्यासारख्या मोटिव्हेशनल गुरूच्या प्रोत्साहनाची गरज आहे!

मला मात्र मोटिव्हेशनल स्पीकर व्हायची प्रेरणा मिळाली ती नुकत्याच पाहिलेल्या एका सिनेमामुळे. प्रेरणा देण्याचं जे काम मोटिव्हेशनल स्पीकर्सची डझनावारी लेक्चर्स ऐकून साधलं नव्हतं, ते काम ‘गली बॉय’ नावाच्या या सिनेमानं कथेच्या ओघात करून दाखवलं. आपल्या स्वप्नांसाठी, पॅशनसाठी, प्रेमासाठी जीवतोड संघर्ष करण्याची प्रेरणा हा सिनेमा देतो आणि त्यासाठी सारं हलाहल पचविण्याची ताकदही देतो. म्हणूनच आज मी या नवीन करिअरला सुरुवात करीत असताना आत्मविश्वासानं सांगू शकतो, की माझ्या आणि यशाच्यामध्ये काळाचा एक छोटासा तुकडा जाणे बाकी आहे आणि फक्त तोवर मला प्रयत्न करायचे आहेत, वाट पाहायची आहे, कळ सोसायची आहे. कारण मला केवळ आशाच नव्हे तर पूर्ण खात्री आहे की.. अपना टाइम आयेगा.. जरूर आयेगा!

तुझा चु-गली बॉय,

सदू धांदरफळे.

sabypereira@gmail.com