|| समीर गायकवाड

झिपरीच्या माळावर एक दशक काढलेली कलावती इथं आली तेव्हा ती पस्तिशीत असूनही तिच्या देहावर विशीतली गोलाई होती. केवडय़ाच्या कायेच्या कलावतीचं उफाडय़ाचं अंग आटीव दुधाच्या गोळ्यागत गच्च होतं. तिच्या तटतटलेल्या घोटीव देहात रसरशीतपणा होता, चेहऱ्यावरती विलक्षण आव्हान असायचं. अरुंद उभट कपाळावर रुळणारी कुरळ्या केसांची महिरप शोभून दिसे. कपाळावरती गोंदलेलं तुळशीचं पान कुंकवाच्या आड दडायचं. एखाद्या चुकार दिवशी नाहायच्या आधी मोकळ्या केसानं दारापाशी उभी असली, की कपाळावरचं गोंदण चित्त वेधून घेई. मासुळी पाणीदार डोळ्यांच्या कैदेतून मुक्तता नसायची. डाळिंबी जिवणीआडून दंतपंक्ती डोकावत, तेव्हा तिनं बोलतच राहावं असं वाटे. मखमली कंबरेला आवळून बांधलेल्या कंबरपट्टय़ाची हालचाल होताच लालबुंद झालेले वळ ठसठशीत दिसत. मांसल दंडावरचे कटदोरे लक्ष वेधून घेत. त्यात एखाद-दुसरा तावीज लाल धाग्यात बांधलेला असे. दांडरलेल्या लुसलुशीत पोटऱ्या उघडय़ा टाकून बसली, की माणसं तिच्या भवताली गोंडा घोळत, तिच्या पदर ढळण्यावर बुभुक्षितागत लक्ष ठेवीत. काळ्याभोर केसांचा सैलसर अंबाडा बांधलेला असला, की त्यावर अबोली मोगऱ्याचे अधाशी गजरे वेटोळे घालून बसलेले असत.. जणूकाही तेच तिचा आस्वाद घेत! पदर कंबरेला खोचल्यावर सैलसर रेशमी पोलक्यातून तिच्या छातीचा उभार स्पष्ट दिसे. त्यावर रुळणारी सोनसळीची सर जादूई हालचाल करे. सोनसरीचे रेशमी गोंडे नागिणीगत तिच्या पाठीवर असे काही रुळत, की पाठमोरं पाहणाराही खुळ्यागत बघतच राही. हातातली बिल्वरे, अंगठय़ा तिच्या समृद्धीच्या खुणा होत्या. माशाची नक्षी असलेली जाडजूड जोडवी बोटात इतकी घट्ट रुतलेली असायची, की निघणं अशक्य वाटावं. विशिष्ट लयीत छुमछुमणारी पैंजणं म्हणजे तिच्या चाहुलीची सुरेल खूण होती.

Ram Navmi 2024 Ram Raksha Stotra Reading Benefits in Marathi
Ram Navami 2024 : जाणून घ्या ‘रामरक्षा’ अन् भगवान शंकराचा ‘हा’ संबंध; पाहा, दररोज रामरक्षा स्तोत्र म्हटल्याचे फायदे
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम

अवचित कधी गावातल्या महादेवाच्या मंदिरात भल्या सकाळीच गेल्यावर लोक आ वासून बघत, असा तिचा थाटमाट राही. चापूनचोपून नेसलेल्या साडीचा पदर डोक्यावरून घेऊन ती नजाकतीनं चाले. ती गेलेल्या वाटेनं अत्तराचा धुंद सुगंध किती तरी वेळ दरवळे. तिच्या नावानं कंडय़ा पिकवल्या जात, वावदूक माणसं मिशीवर ताव देत हवेतल्या गप्पांचं गुऱ्हाळ गाळीत राहत. गाव काहीही बोलत राहिलं, तरी तिनं गावाची कधी पर्वा केली नव्हती. गावाशी वैरही केलं नव्हतं आणि कुठलं नातंही जोडलं नव्हतं. तिच्या अलिप्त विश्वात ती मश्गूल होती. तिच्या वागण्या-बोलण्यात कधी चवचालपणा जाणवत नसे. चारित्र्याविषयी शंका यावी असं साचेबंद लक्षण तिच्या ठायी नव्हतं. ‘तशा’ बायकांच्या अंगी असतो तसा उठवळपणाही तिच्यात नक्कीच नव्हता. मात्र, पाहताक्षणी चित्त वेधून घेण्याची ताकद तिच्या सौंदर्यात होती. तिच्याकडे लावण्य होतं, अदाकारी होती, गायकी होती आणि जोडीला दिलदारपणाही होता! पाटलांच्या नातवानं- मदननंच तिला इथं आणलं, इतकीच माहिती गावाला होती. तीही स्वत:चा इतिहास कुणाला सांगत नव्हती. त्या विषयावर बोललेलंही तिला आवडत नव्हतं. ती इथं आल्यानंतर काही महिन्यांतच मदन निघून गेलेला.

कलावतीनं कुणावर फास टाकले नव्हते, की कुणाला जाळ्यात गुंतवलं नव्हतं. मात्र, तिच्याकडे एकदा गेलेला पुन:पुन्हा तिच्या उंबरठय़ापाशी दिसे. कुणी पैसेवाला गबरगंड असल्यानं त्याला लुबाडावं, कुणी एकदम फटिचर आहे म्हणून त्याला दारातही उभं करून घेऊ  नये अशी तिची नियत नव्हती. तिची कदर करणारा हरेक माणूस तिच्या लेखी समान होता. काही माणसं अधूनमधून येणारी होती, पण नेल्र्याचा गणू कायम तिच्या इथं पडीक असायचा. चिलटं, माश्या त्याच्या लाळगळत्या तोंडाभोवती घोंगावत राहायची; तो मात्र आशाळभूतपणे अर्धवट डोळे मिटून बसून राहायचा. आली-गेली माणसं त्याच्याकडून हवी ती खबरबात मिळवत. कोण येऊन गेलं, कधी येऊन गेलं, कुणी काय भेटवस्तू दिली, याची सगळी बित्तंबातमी त्याच्याकडे असे. त्या बदल्यात ते त्याला पैसे देत. त्यावर श्वासही सुरू राहत, शौकही पुरे होत! त्यानं घरी परत जावं म्हणून कलावतीनं प्रयत्न केलेले, पण त्यात अपयश आलेलं.

झिपरीचा माळ वगळता बाहेर कलावती क्वचित दिसे. त्यामुळं स्वत:ला सभ्य म्हणवून घेणारी मंडळी तिच्या लावण्यकथांवरच आपली तहान भागवत. तिच्याबद्दल जशी तिरस्काराची भावना होती, तसंच एक अनामिक आकर्षणही होतं. आलम दुनिया तिच्यावर फिदा होती आणि ती मात्र सोरटय़ाच्या सुऱ्यावर जीव टाकून होती. तो पीळदार ताशीव अंगाचा तरणाबांड कोवळा पोर अन् ही पस्तिशीतली! कसा त्यांचा मेळ बसणार? आखीव-रेखीव बांधणीच्या सुऱ्याच्या हातातलं जाडजूड तांब्याचं कडं त्याला शोभून दिसे. नाकापुढं बघून चालणाऱ्या सुऱ्यापर्यंत कलावतीच्या चिठय़ा कधी पोहोचल्याच नाहीत. जवळपास तीनेक वर्षे कलावती गळ टाकून होती, पण सुऱ्या काही केल्या तिला गवसला नाही. गावात नवी पंचायत आल्यावर त्यांनी झिपरीच्या माळावरचे गोरखधंदे बंद करण्याचा निर्णय घेतला. आठवडय़ात सगळं सामानसुमान टेम्पोत घालून कलावतीला गाव सोडून परागंदा व्हावं लागलं. सर्कशीतल्या जनावराकडं बघावं तसं लोक तिला न्याहाळत होते, काही नजरेनेच चाटत होते. जातानादेखील तिनं सुऱ्यासाठी गण्यापाशी चिठी दिली. जड मनानं कलावती निघून गेली. माळ ओसाड पडला. त्यातलं सत्त्व गेलं. लोकांची ये-जा बंद झाली. झाडांची सळसळ, पशुपक्ष्यांचे आवाज उरले. माळ पुरता भकास झाला. पडवीलगतचं खोपट अबोल झालं.

कलावती गेल्यानंतर महिन्याभरानं गण्याची गाठ सुऱ्याशी पडली, तेव्हा त्याला चिठीतून कलावतीचं प्रेम उमगलं. आधीच्या चिठय़ांचीही माहिती मिळताच तो थक्क झाला. हिरा आपल्याला शोधत होता आणि आपण अनभिज्ञ होतो याची जाणीव त्याला खाऊ  लागली. रोजंदारीनं कामावर जाणारा सुऱ्या तिच्या शोधात गावोगाव फिरू लागला. त्यापायी त्याची सगळी कमाई खर्ची पडली. सारखे खाडे होऊ  लागल्यानं काम सुटलं. घरातलं लक्ष कमी झालं, भावांबरोबर भांडणं होऊ  लागली. हातातोंडाची गाठ पडेनाशी झाली तरीदेखील कलावती काही डोक्यातून जात नव्हती. अशीच काही वर्ष गेली. छातीचं खोकडं झालेला गण्या मरून गेला आणि त्याची जागा सुऱ्यानं घेतली. पाटलांच्या भग्न वाडय़ापाशी तो ईळभर फुल्ल होऊन पडून असायचा. कुठून तरी कलावतीला याची भनक लागली, तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. सुऱ्यासाठी तिला परतायचं होतं, पण गावानं बंदी केलेली होती. तरीही वेशांतर करून ती एका रात्री परतली. ती परतली, पण तिचं चैतन्य हरपलेलं होतं, सौंदर्य लोप पावलं होतं. अनेकांनी ओरबाडल्यामुळे तिचं नुसतं चिपाड झालेलं.

ते दोन दिवस त्या दोघांनी स्वर्गसुखात काढले. एक-दोन अनोळखी माणसं झिपरीच्या माळात ये-जा करताना पाहून काहींना शंका आली, पण कुणी खोलात गेलं नाही. कलावतीचं तिथं राहणं धोक्याचं होतं. तिला परतणं क्रमप्राप्त होतं. देहाचा पालापाचोळा झालेला सुऱ्या तिच्याविना जगू शकला नसता. तिसऱ्या दिवशी गर्दपहाटे एका रिक्षातून ती त्याला अलगद घेऊन गेली. गावाला हरवल्याची भावना तिच्या मनात आली, पण नियतीनं दोघांना चकवलं. तांबडफुटीच्या वेळेस हायवेवर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. त्याचा जर्जर देह तिच्या छिन्नविच्छिन्न बाहूत विसावला. दोघांची तगमग थांबली. बातमी गावात पोहोचली. सर्वत्र सुस्कारे निघाले. बेऔलाद कलावतीला जग्गूने अग्नी दिला. सुऱ्याची चिताही तिच्याशेजारीच धडाडून पेटली. त्यांचं हे मीलन कुणी अडवू शकलं नाही.

मागच्या वर्षी झिपरीच्या माळावरचं सगळं रान लेव्हलिंग करून तिथं प्लॉटिंग केलं गेलं. वाडय़ाचे, खोपटाचे अवशेष आजोऱ्यात जमा झाले. त्यातच घुंगरू चेमटून गेलेलं एक पैंजण आणि तांब्याचं कडं सापडलं. ते संदुकीत जपून ठेवलंय. त्यातून कधी कधी कलावतीचे स्वर कानी पडतात, तर कधी जर्जर सुऱ्या तिच्या आर्त मिठीत दिसतो. लोक म्हणतात, माळ आता शांत झालाय; पण वास्तव वेगळंय. अजूनही रात्री तिथं कलावतीची मैफल भरते, सगळे शौकीन गोळा होतात. त्यांना अनुभवतानाच थकलेल्या पहाटेस माझा डोळा लागतो..