|| डॉ.  विनया जंगले

यापूर्वी दरवर्षी मे महिन्यात बुद्ध पौर्णिमेला जंगलात व्याघ्रगणना होत असे. त्यात स्वयंसेवी व्यक्तींचीही मदत घेतली जाई. मात्र, या तऱ्हेची प्राणीगणना अलीकडे बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी जंगलातील पाणवठय़ांवर कॅमेरे लावून तसेच अन्य शास्त्रोक्त पद्धतींनी वन्यप्राणी गणना केली जाते. पूर्वी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री होणाऱ्या वन्यप्राणी गणनेचे गतरम्य अनुभव..

या वर्षीपासून बुद्धपौर्णिमेला होणारी वन्यप्राण्यांची गणना वनखात्याने काही ठिकाणी रद्द केल्याचे कळले. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या काही अतिउत्साही मंडळींनी जंगलात काही गरप्रकार केल्याने नाइलाजाने वनखात्याला हा निर्णय घ्यावा लागला. दुसरी गोष्ट म्हणजे बुद्धपौर्णिमेच्या वन्यपशुगणनेचं तांत्रिकदृष्टय़ा असलेलं महत्त्व केव्हाच संपुष्टात आलेलं आहे. हल्ली वन्यप्राण्यांची गणना करण्यासाठी कॅमेरा ट्रॅपसारख्या अत्याधुनिक उपकरणांचा वापर सुरू झाला आहे. कॅमेरा ट्रॅपमध्ये बिबटय़ाच्या कातडीवरील गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या असलेल्या रचनेवरून एकेका बिबटय़ाची ओळख पटवता येते. जंगलातील वाघांच्या जनुकीय रचनेचा नकाशा तयार केला जातो. त्यासाठी  वाघाच्या लाळेचे नमुने त्याने केलेल्या शिकारीवरून गोळा केले जातात. शिकारीच्या आजूबाजूला जर वाघाच्या केसाचे नमुने मिळाले तर तेही जमा केले जातात. वाघाच्या विष्ठेच्या नमुन्यातील डीएनएचे विश्लेषण केले जाते.

हरणांच्या गणनेसाठी एक चौरस किलोमीटर क्षेत्रात किती हरणं दिसतात यावरून संपूर्ण जंगलात किती हरणं असू शकतील याचा अंदाज काढला जातो. एक चौरस फुटात सरासरी किती विष्ठेचे नमुने सापडतात यावरूनही प्राण्यांच्या संख्येचा अंदाज केला जातो. वन्यपशुगणनेमध्ये आज अत्याधुनिक तंत्रज्ञान आले आहे. परंतु तरीही बुद्ध पौर्णिमेच्या रूपेरी प्रकाशात एकेका प्राण्याची वाट बघत केलेल्या पशुगणनेच्या रम्य आठवणी मात्र विसरता येत नाही.

मे महिन्यात जसजशी बुद्ध पौर्णिमा जवळ यायची तसतशी जंगलातील प्राण्यांची गणना करायच्या तयारीची धामधूम सुरू व्हायची. झाडांवरचे मचाण ठाकठीक केले जायचे. पाणवठय़ाच्या बाजूला उंचावर बांधलेल्या निरीक्षणस्थळांची डागडुजी केली जायची. निरीक्षणस्थळांच्या रचनेची प्राण्यांना सवय व्हावी म्हणून पंधरा दिवस अगोदरपासूनच निरीक्षणस्थळ पानांनी आणि फांद्यांनी झाकलं जायचं. वन्यप्राण्यांच्या मोजणीसाठी इच्छुक असलेल्या स्वयंसेवकांची नोंदणी केली जायची. प्राण्यांच्या मोजणीच्या दिवशी पर्यटकांना जंगलातील रस्ता बंद केला जायचा. स्वयंसेवक व वनोद्यानाच्या कर्मचाऱ्यांचे गट केले जायचे. प्रत्येक गटाला वेगवेगळा पॉइंट ठरवून दिला जायचा. बुद्ध पौर्णिमेच्या संध्याकाळी सारेजण उद्यानात जमायचे. जंगलाच्या रंगाचे हिरवे कपडे प्रत्येकाने घातलेले असायचे. सगळेजण जंगलाकडे निघायचे. त्यांच्यात नेहमी गणनेसाठी येणारे अनुभवी असायचे, तर काही जण नवखेही असायचे. प्रत्येक गटासोबत एक-दोन वनकर्मचारी असायचे. त्यांच्याकडे दुर्बणि, कॅमेरा वगरे असायचा. परंतु आणखी एक गोष्ट त्यांच्याकडे असायची; ती म्हणजे बिबटय़ाच्या पावलांच्या ठशांचे मोजमाप करण्यासाठी काच व ट्रेस पेपर. प्रत्येक गटाचा जंगलात प्रवेश व्हायचा. चालता चालता संध्याकाळच्या उजेडात बिबटय़ाच्या पावलांचे ठसे जमिनीवर दिसतात का, हे निरखायचा प्रत्येक जण प्रयत्न करत असे. एखादा अतिउत्साही नवखा जंगलात शिरतानाच उत्तेजित आवाजात ओरडायचा, ‘‘बिबटय़ाच्या पावलांचे ठसे!’’ सगळेजण त्या ठशांकडे धावायचे. ते ठसे  बघताच अनुभवी व्यक्तींच्या तोंडावर खटय़ाळ हसू पसरायचं. त्या नवख्याकडे बघत एखादी अनुभवी व्यक्ती म्हणायची, ‘‘अरे बाबा, हा बिबटय़ाच्या पावलांचा ठसा नाही. हा तर कुत्र्याच्या पावलांचा ठसा आहे. कुत्र्याच्या ठशांमध्ये त्याच्या नख्या स्पष्ट दिसतात. बिबटय़ाच्या पावलांच्या ठशांमध्ये नख्या दिसत नाहीत.’’ उत्तेजित होऊन ओरडणारा तो नवखा मग खजिल व्हायचा. एखाद्या गटाला जंगलात खरोखरच बिबटय़ाच्या पावलांचे ठसे दिसायचे. मग वनकर्मचारी पुढे व्हायचा. हातातली काचेची फ्रेम सावकाश त्या ठशावर ठेवली जायची. ठशाचा आकार हातातील स्केचपेनने काचेवर काढला जायचा. त्या काचेवर ट्रेस पेपर ठेवून त्यावर तो ठसा काळजीपूर्वक गिरवला जायचा. त्यानंतर ठशांचं मोजमाप घेतलं जायचं. ठशाच्या आकारावरून तो ठसा नराचा की मादीचा, यावर चर्चा व्हायची. त्या बिबटय़ाचं वय काय असेल याचा अंदाज बांधला जायचा.

ही चर्चा करतच सगळेजण आपापल्या मचाणाच्या दिशेकडे जायचे. प्रत्येक जण मचाणावरील आपली जागा पकडून बसायचा. सूर्य नुकताच मावळलेला असायचा. रातकिडय़ांची किरकिर चालू व्हायची. घरटय़ाकडे जायला उशीर झालेल्या एखाद्या दिनचर पक्ष्याचा आवाज आसमंतात घुमत राहायचा. निशाचर असलेली वटवाघळं झुंडीने पश्चिमेकडे उडताना दिसायची. तेवढय़ात तिन्हीसांजेच्या अंधुक प्रकाशात समोरच्या पाणवठय़ावर इकडे तिकडे पाहत पाणी प्यायला सांबरं यायची. प्रत्येक जण आपापल्या नोंदवहीत त्याची नोंद करायचे. मग थोडय़ा वेळाने चितळं यायची. पांढरे ठिपकेवाल्या चितळांचा मोठा िशगवाला नेता असायचा. त्याच्या आजूबाजूने माद्या असायच्या. नर सावधपणे पुढे व्हायचा. इकडे तिकडे पाहत राहायचा. त्याच्या तीक्ष्ण घ्राणेंद्रियांना कसली तरी चाहूल लागलेली असायची. तो संशयाने मचाणाकडे पाहत राहायचा. पानांनी झाकलेल्या मचाणावर आम्ही आमचं अंग अधिकच चोरून घ्यायचो. आमच्या श्वासाचाही आवाज होणार नाही याची काळजी घ्यायचो.  काही धोका नाही याची खात्री झाल्यावर चितळांच्या कळपातला नर  पाणवठय़ाकडे सरकायचा. पाणी पितानाही तो सावधपणे इकडे तिकडे पाहत राहायचा. त्याच्यामागोमाग माद्या आणि पिल्लं पाणी प्यायची. पाणी पिऊन झाल्यावर चितळांचा तो कळप अंधारात सावकाश दूरवर निघून जायचा.

नंतर निशाचर पक्ष्यांचे आवाज ऐकू येऊ लागत. त्यात मुख्यत: घुबडं असायची. त्यांचा घू-घू असा आवाज आसमंतात घुमत राहायचा. पाणवठय़ाच्या जवळ एखादी टिटवी दिसायची. तिची ‘टिटीव टिटीव’ अशी साद वातावरणात मोहकता आणत असे. मधेच टुणटुण उडय़ा मारत जाणारे जंगली ससे दृष्टीस पडायचे.

थोडय़ाच वेळात पौर्णिमेचा चंद्र पूर्वेकडून उगवायचा. वैशाख  पौर्णिमेचा तो तेजस्वी चंद्र बघून सगळे जण स्तब्ध व्हायचे. गोल वाटोळ्या चंद्राचा प्रकाश उंच झाडांमधून जमिनीवर ओघळत असायचा. रूपेरी प्रकाशात न्हाऊन निघालेलं जंगल उंचावरून वेगळंच भासायचं. चंद्राचा रूपेरी प्रकाश तुळशी तलावावर पडलेला असे. चंद्राचं डचमळणारं प्रतििबब तलावाच्या पाण्यात दिसायचं.

चंद्राच्या प्रकाशात दूरदूपर्यंतचं जंगल दिसे. दूरवर लंगूर माकडं कळपाने बसलेली असायची. मला उगाचच व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘सत्तांतर’मधील माकडांच्या टोळीच्या नेतेपदासाठी चाललेला संघर्ष आठवायचा. हळूहळू चंद्र माथ्यावर यायचा. एव्हाना मचाणावरचे बरेच जण पेंगायला लागायचे. पण आजूबाजूला गुणगुणणारे चावरे कीटक आणि डास कोणाचाच डोळा लागू द्यायचे नाहीत. एवढय़ात झाडीतून कसली तरी खुसपूस ऐकू यायची. त्याने सगळ्यांच्याच डोळ्यावरची झोप उडून जायची. समोरच्या झाडीतून दबक्या पावलाने बिबटय़ाचे आगमन व्हायचे. बिबटय़ा पाणवठय़ाकडे रुबाबदार पावले टाकत यायचा. मध्येच थांबून मचाणाकडे दृष्टिक्षेप टाकायचा. इकडे नवख्या माणसांना बिबटय़ाला नुसते पाहूनही घाम फुटायचा. अनुभवी लोकांना शांत बसलेलं पाहून त्यांना थोडासा धीर यायचा. सुमारे पाच फुट लांबीचे, अंगावर गुलाबाच्या पाकळ्यांसारखे ठिपके असलेले ते रुबाबदार जनावर पाहून सगळेच जण भारल्यासारखे त्याच्याकडे पाहू लागायचे. एखाद्याच्या कॅमेऱ्यात त्याचा फोटो यायचा. सगळ्यांनाच आपण मचाणावर असल्याबद्दल सार्थक झाल्यासारखं वाटायचं.

कधी कधी पहाटेच्या वेळी एखादं उदमांजर दिसायचं. एखाद्या गटाला निशाचर असलेली वाघाटी मांजर दृष्टीस पडायची. पहाटेपर्यंत विविध प्राणी, पक्षी प्रत्येकाच्या नोंदवहीत नोंदवले जायचे. पहाटेचं झुंजुमुंजू व्हायचं. पूर्व दिशा लालभडक दिसू लागायची. मग सारेजण मचाणावरून उतरायची तयारी करायचे. खाली उतरल्यावर वेगवेगळे गट एकमेकांना भेटायचे. रात्री कोणाला काय दिसलं याची उत्सुकतेनं एकमेकांकडे विचारणा व्हायची. पौर्णिमेच्या रात्रीचं जंगल मनात साठवतच सगळेजण एकमेकांचा निरोप घ्यायचे.

आता पुन्हा अशा तऱ्हेची गणना होणार नाही. पौर्णिमेच्या रात्री जंगलात मचाणावर बसून एक- एक प्राणी मोजण्याचा थरारक अनुभव यापुढे सामान्य माणसांना घेता येणार नाही. या तऱ्हेच्या वन्यप्राणीगणनेच्या केवळ आठवणीच यापुढील पिढीसाठी शिल्लक राहणार आहेत.

(लेखक पशुधनविकास अधिकारी आहेत.)

vetvinaya@gmail.com