News Flash

एका साथीचा जन्म

प्रसिद्ध औषधनिर्मिती तज्ज्ञ डॉ. मृदुला बेळे यांनी लिहिलेल्या ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ पुस्तकातील काही अंश..

जगामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील संघर्षांचा वेध घेणारे पुस्तक ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’

जगामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू असलेल्या कोरोनाविरोधातील संघर्षांचा वेध घेणारे ‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ हे पुस्तक राजहंस प्रकाशनातर्फे  अलीकडेच प्रसिद्ध झाले. प्रसिद्ध औषधनिर्मिती तज्ज्ञ डॉ. मृदुला बेळे यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील काही अंश..

२२ जानेवारी, २०२०

वुहान, चीन

बराच उशीर झाला होता. रात्रीचे अडीच-तीन वाजलेले असावेत. झोप येईना म्हणून फँग बिन टीव्हीवर एक चित्रपट पाहत बसलेला असताना एक बातमी खाली फिरणाऱ्या पट्टीत दिसू लागली आणि तो चरकलाच. ‘२३ जानेवारीला सकाळी दहा वाजता वुहानसकट जवळची हुआनगांग आणि इझू ही दोन शहरं लॉकडाउन (टाळेबंदी) करण्यात येत आहेत. वुहानमधून कुणालाही बाहेर पडता येणार नाही आणि कुणाला शहरात येताही येणार नाही. रोगाची स्थिती गंभीर होऊ लागलेली आहे. माणसामाणसांत हा विषाणू झपाटय़ाने पसरतो आहे. त्यामुळे नाइलाज म्हणून आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे..’ अशी ही बातमी होती.

टाळेबंदी? म्हणजे काय नक्की? रोगावरचा हा असला कुठला इलाज आहे? आणि कुणालाही बाहेर पडता येणार नाही म्हणजे काय? लोक बरे ऐकतील कुठे जायचं नाही, असं सांगून. लोकांना कामधंदे आहेत. त्यासाठी त्यांना फिरावं लागणारच ना! शिवाय वसंतोत्सव दोन दिवसांवर आलाय. तो साजरा करायला माणसं बाहेर पडणारच. आणि टाळेबंदी कधीपर्यंत असणार आहे ही? असं कसं सव्वा कोटीच्या आसपास लोकसंख्या असलेल्या कुठल्या शहराला टाळं लावता येईल? असे अनेक प्रश्न त्याला पडलेले होते. ते डोक्यात घेऊनच फँग बिन झोपी गेला.

तेवीस तारखेला सकाळी उठून तो कामावर निघाला, तर त्याच्या इमारतीच्या खालीच त्याला आपला शेजारी भेटला. फँगच्या छोटय़ा कारखान्याच्या शेजारीच त्याचाही एक कारखाना होता. काल रात्री काम संपवायला म्हणून त्याचा शेजारी कारखान्यातच राहिला होता. फँग बिनला तयार होऊन बाहेर पडताना पाहून शेजारी त्याला म्हणाला, ‘‘कुठे चालला आहेस तू? पोलीस सकाळीच येऊन सांगून गेलेत की, सगळे उद्योग, सगळे कारखाने, सगळी दुकानं बंद ठेवायची आहेत. फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहतील.’’

‘‘बंद ठेवायचा? कामधंदा बंद ठेवायचा? कधीपर्यंत?’’ फँग बिन किंचाळतच म्हणाला, ‘‘आणि धंदा बंद ठेवून खायचं काय?’’

‘‘ते काहीच आत्ता माहीत नाही. आजपासून कारखाना बंद ठेवायचाय.. पुढची सूचना येईपर्यंत.’’ शेजारी म्हणाला.

फँगला भोवळल्यासारखंच झालं. घराबाहेर पडला होताच, तर काय आहे परिस्थिती पाहून येऊ या म्हणून तो बाहेर पडला. त्याचा कारखाना असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या तोंडाशी कडक बंदोबस्त होता. कुणीही त्याला पुढे जाऊ दिलं नाही. त्याने तसाच आपला मोर्चा रेल्वे स्टेशनकडे वळवला. तिकीटघरावर प्रचंड मोठय़ा रांगा लागलेल्या होत्या. बाहेरच्या शहरांतून काही कामानिमित्त वुहानला आलेली किंवा नववर्षांनिमित्त गावी जायचं असलेली मंडळी इथं अडकून पडू नये म्हणून घाईघाईनं परतू लागलेली होती. दहानंतर ट्रेन मिळणार नव्हती. तीच तऱ्हा विमानतळं, बसस्थानकं आणि फेरीबोटींच्या जेट्टय़ांची होती. आंतरराष्ट्रीय विमानसेवा मात्र चालू होती. जी साथ वुहानहून चीनच्या इतर शहरांत पसरू नये याची काळजी घेतली जात होती; ती जगात पसरू नये याची मात्र काहीही चिंता सरकारला नसावी. तिथून तसाच तो वुहान रुग्णालयात गेला. इथं आज प्रचंड गर्दी होती. श्वास घेता न येणारे, तापाने फणफणलेले कितीतरी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रांगा लावून उभे होते. डॉक्टर आणि नर्सेसची त्यांना तपासताना, अ‍ॅडमिट करून घेताना प्रचंड तारांबळ उडालेली होती. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नव्हता. या वेगाने रुग्ण येत राहिले तर वुहानमधल्या वैद्यकीय सुविधा पुऱ्या पडणं केवळ अशक्य होतं. ऑक्सिजनची नळी नाकात घातलेल्या आणि सलाईन लावलेल्या एका वृद्ध माणसाचा रुग्णालयात दाखल करायला नेता नेता स्ट्रेचरवरच मृत्यू झालेला पाहून तो चरकलाच. तिथून बाहेर पडून तो घरी परत निघाला तेव्हा रस्त्यावर प्रचंड पोलीस बंदोबस्त होता. पोलीस येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांना हटकून मास्क घालायला सांगत होते.

१ फेब्रुवारी २०२०

वुहान, चीन

फँग बिन आज एका रुग्णालयात चालला होता. याआधी त्याने समाजमाध्यमांवर टाकलेले व्हिडिओज् हजारेक लोकांनी पाहिलेले होते. या सगळ्या व्हिडिओज्मध्ये फँग वुहानमधल्या वेगवेगळ्या भागांतून आपली कार चालवत जात होता आणि तिथली परिस्थिती लोकांना दाखवत होता. एक फेब्रुवारीलाही तो एका रुग्णालयात शिरला तेव्हा बाहेर उभ्या असलेल्या एका शववाहिकेत तीन मृतदेहांच्या पिशव्या पडलेल्या त्याला दिसल्या होत्या आणि त्या त्याने आपल्या कॅमेऱ्यात पकडल्या होत्या. आत शिरल्यावरही दोन-तीन स्ट्रेचर्सवर मृतदेह पडलेले त्याने पाहिले. मग एका वृद्ध माणसाला आपल्या मुलासमोर प्राण सोडताना त्याने पाहिले. काही मिनिटांनी तो रुग्णालयाबाहेर आला तेव्हा त्या शववाहिकेत पडलेल्या मृतदेहांची संख्या आठ झालेली होती.. अवघ्या काही मिनिटांत! हे सगळं आपल्या कॅमेऱ्यात पकडून त्यानं त्या दिवशी यूटय़ूबवर टाकलं होतं. मरणाऱ्या लोकांचं प्रमाण काय आहे, हे यावरून लगेच लक्षात येत होतं. हा व्हिडीओ तब्बल दोन लाख लोकांनी पाहिला होता.

त्याच दिवशी रात्री त्याच्या घराचं दार पोलिसांनी ठोठावलं. त्याला पकडून पोलीस स्टेशनवर नेण्यात आलं होतं, पण धमकी देऊन सोडून देण्यात आलं होतं. घरातून त्याला जबरदस्तीने पकडून नेतानाचा व्हिडीओही त्याने चित्रीत केला होता.

४ फेब्रुवारी २०२०

वुहान, चीन

बीबीसीच्या एका पत्रकाराला मुलाखत देताना चेन किशी म्हणाला होता, ‘‘मी हाँगकाँगला गेल्यापासूनच सरकारची माझ्यावर नजर आहे. हे किती दिवस चालेल, सांगता येत नाही. मला माहीत आहे, माझ्या जिवाला धोका आहे. मला माझ्यासमोर हा विषाणू दिसतो आहे आणि माझ्या मागे पोलीस लागलेले आहेत. मी माझ्या अनेक मित्रांना माझ्या अकाऊंटचे पासवर्ड देऊन ठेवले आहेत. माझं काही बरं-वाईट झालं तर माझे मित्र जगाला ते सांगतीलच.’’

७ फेब्रुवारी २०२०

वुहान, चीन

चेन किशीच्या अकाऊंटवरून त्याच्या एका मित्रानं एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात चेन किशीची आई बोलत होती. ‘‘कालपासून चेन किशी घरी आलेला नाही आणि फोनही उचलत नाही,’’ असं ती रडत रडत सांगत होती. त्यानंतर आजतागायत चेन किशी घरी आलेला नाही!

त्याच दिवशी कोव्हिडशी लढता लढता डॉ. ली वेन्लियांगचे प्राण गेल्याची बातमी आली आणि सगळा चीन शोकसागरात बुडून गेला. ३१ जानेवारीला एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत डॉ. ली म्हणाला होता, ‘‘चांगल्या सुदृढ समाजात एक नाही, अनेक आवाज ऐकू आले पाहिजेत, ऐकून घेतले पाहिजेत, नाही का?’’ तो गेल्याने लोक नुसते शोक करत नव्हते, हा त्यांचा आकांत होता. एका कर्तव्यतत्पर डॉक्टरचा आवाज राजकारण्यांनी दाबल्याचा आक्रोश होता. कितीतरी नागरिकांचे आवाज सरकार नेहमीच दाबत आलेलं होतं. जनतेचा त्याबद्दलचा सगळा राग त्या टाळेबंदीतही उफाळून आला होता. चीनमध्ये ठिकठिकाणी डॉ. लीसाठी शोकसभा घेतल्या गेल्या. आपल्या नागरिकांचा हा ‘न भूतो न भविष्यति’ असा  शोक आणि रोष पाहून चिनी सरकार मोठय़ा कात्रीत सापडलं होतं. #वीवॉन्टफ्रीडमऑफस्पीच हा हॅशटॅग चीनच्या सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला होता. चिनी अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे सुरुवातीला परिस्थिती हाताळली आणि सत्य परिस्थिती लपवण्यासाठी ज्या प्रकारे लोकांची मुस्कटदाबी केली, त्याबद्दलचा नागरिकांचा संताप व्यक्त करण्याचं लीचा मृत्यू एक निमित्त ठरलं. तियानमेन चौक घटनेनंतर जनतेकडून आपल्या एकाधिकारशाहीला इतका धोका निर्माण झालेला चिनी सत्तेने प्रथमच पाहिला होता. हा रोष टाळण्यासाठी झालेली चूक मान्य करत सरकारने डॉ. ली’ला श्रद्धांजली वाहिली होती. इतकंच काय, चीनमध्ये देण्यात येणारा सगळ्यात मोठा नागरी सन्मान डॉ. ली’ला देण्यात येईल अशी घोषणा सरकारने रातोरात केली.

९ फेब्रुवारी २०२०

वुहान, चीन

फँग बिनने एक तेरा सेकंदांचा व्हिडीओ युटय़ूबवर पोस्ट केला, त्यावर फक्त हे एक वाक्य होतं : ‘सगळ्या जनतेने क्रांती करून सरकारची सत्ता आपल्या हातात घ्यायची वेळ आता आली आहे.’ त्यानंतर फँग बिन कुणालाही दिसला नाही. त्याचा फोन कुणीही कधीही उचलला नाही. त्याचं यूटय़ूब अकाऊंट त्या दिवशी शांत झालं, ते कायमचं!

फँग बिन, चेन किशी, डॉ. ली वेन्लियांग! १९८९ सालात बीजिंगच्या तियानमेन चौकात सरकारी रणगाडय़ांच्या जथ्थ्यापुढे निधडय़ा छातीने एकटा उभा राहणाऱ्या आंदोलकासारखे हे तिघं अजरामर व्हायचे नाहीतही कदाचित! पण सत्य चव्हाटय़ावर आणण्यासाठी जिवाची पर्वा न करता लढणारी ही साधीसुधी माणसं रातोरात सामान्य चिनी नागरिकांच्या गळ्यातली ताईत होऊन बसली, हे मात्र नक्की.

या नागरिकांसाठी ही माणसं सत्याचा एक छोटासा हुंकार होती. कर्तव्यदक्षतेचा परिपाठ होती. सरकारच्या अरेरावीविरुद्ध, खोटारडेपणाविरुद्ध, आरोग्यसेवकांच्या तत्परतेवर आपल्या राजकारणाने बोळा फिरवण्याच्या वृत्तीविरुद्ध सगळ्या समाजाने उठवलेला एक आवाज होती!

ही साथ दाबून टाकण्याचा प्रयत्न वुहानच्या अधिकाऱ्यांनी केला, तो ही बातमी बीजिंगपर्यंत पोहोचू नये म्हणून असावा. आपला निष्काळजीपणा बीजिंगमध्ये कळू नये, हाही त्यांचा उद्देश असणार. लोक या साथीला घाबरून घरी बसले तर चिनी नववर्षांच्या तोंडावर होणारी सगळी आर्थिक उलाढाल थांबेल, अशी भीतीही वुहान प्रशासनाला वाटली असावी. गोष्टी हाताबाहेर गेल्यावर बातमी बीजिंगपर्यंत पोहोचली. मग चायनीज कम्युनिस्ट पार्टीने ती दाबण्याचा प्रयत्न केला, त्याचीही कारणं तीच असली पाहिजेत. त्यांना जनमानसातल्या आपल्या प्रतिमेची काळजी होती, जगातल्या आपल्या प्रतिमेची काळजी होती आणि आपल्या अर्थव्यवस्थेचीही काळजी होती. हेच सगळं नंतर इतर अनेक देशांनीही केलं आणि त्यापायी सगळ्या जगाला एका भयंकर आपत्तीच्या खाईत लोटलं!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 12:57 am

Web Title: marathi book on corona pandemic by writer doctor mrudula bele dd70
Next Stories
1 न्यायालयीन निकाल लोकभाषेत!
2 अक्षर जादूगार
3 हास्य आणि भाष्य : ग्रह आणि उपग्रह
Just Now!
X