lr15नव्वदनंतरच्या मराठी कवितेत ‘विचार- कविता’ हा काव्यप्रकार अधिक जाणीवपूर्वक रुजविला गेला. अर्थात त्याची मुळे साठोत्तरी काळात निश्चितपणे सापडतात. कवयित्री नीरजा यांच्या कवितेनेही सुरुवातीपासूनच स्वत:ला विचार-कवितेशी जोडून घेतले आहे.
नीरजाच्या कवितेने आजपर्यंत स्त्रीवादी कवितेत निश्चितपणे एक पल्ला गाठला आहे. ‘निरन्वय’, ‘वेणा’, ‘स्त्री-गणेशा’पासून सुरू असलेला बाईपणाच्या शोधाचा त्यांचा प्रवास ‘निर्थकाचे पक्षी’ आणि आता नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘मी माझ्या थारोळ्यात’ या कवितासंग्रहापर्यंत येऊन ठेपला आहे .
या अखंड प्रवासात त्यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी बाई आणि बाईचं जगणं, मरणं, तिची सुखदु:खं आहेत. मात्र, ‘मी माझ्या थारोळ्यात’ या कवितासंग्रहात नीरजा यांनी स्वत:च्याच काव्य-जाणिवांच्या पार जात एक मोठी विचारझेप घेतली आहे. बाईच्या दु:खाचं, वेदनेचं वर्णन करता करता त्यापलीकडे जाऊन दु:खाच्या मूलस्रोताचा, इतिहासाचा वेध त्यांनी घेतला आहे. एका अर्थाने स्त्रीवादी कविता ज्या काहीशा आक्रोशाच्या, वैयक्तिक दु:खवर्णनाच्या कोशात अडकली होती, तो कोश फोडून नीरजांची कविता इतिहासाच्या खोल भुयारात शिरून त्याच्या तळाशी स्त्री-दु:खाची नेमकी कोणती कारणपरंपरा रुतून बसली आहे, याचा अस्वस्थ शोध घेते. त्याचबरोबर सभोवतालच्या वर्तमान वास्तवाशी इतिहासाचे कोणते नाते आहे, ते तपासण्याचाही प्रयत्न करते.
विशेषत: स्त्री-पुरुष संबंधांमधील सत्तासंघर्षांवर त्यांनी अचूक भाष्य केले आहे. तशीही सत्तासंघर्ष ही मानवी नात्यांतील एक अपरिहार्यता आहे. नाते कोणतेही असो, त्यात सत्तेचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संघर्ष हा असतोच. त्याचे वर्गीय, वर्णीय, आíथक, सामाजिक, राजकीय आविष्कार सभोवताली दिसत असतात. जेता आणि जीत यांच्यातील ताणांमधून मानवी जीवन वाहत असते. स्त्री-पुरुष संबंधांतील इतिहासाच्या कोणत्यातरी टप्प्यावर पालटलेले पारडे बाईच्या जीवनाला, तिच्यातल्या शक्तीला, सर्जनाला, तिच्या आशा-आकांक्षांना दुय्यम लेखत तिला उद्ध्वस्त करत गेले. धर्माचे, रीतिरिवाजांचे, संस्कृतीचे अगम्य वारूळ तिच्याभोवती जमत गेले. विशेष म्हणजे तीही त्यात रमली. गाढ झोपी गेली. या झोपी गेलेल्या बाईला ‘जागी हो’ म्हणणारी, तिला इतिहासाचे, वास्तवाचे भगभगीत दर्शन घडवून जागृत करणारी कविता या संग्रहात भेटते.
विद्युत भागवत यांनी प्रस्तावनेत नीरजांच्या कवितेचे योग्य मूल्यमापन केले आहे. त्या म्हणतात त्याप्रमाणे, नीरजांच्या कवितेत एक सजग सामाजिक भान आहे. बाईपणा आणि पुरुषपणा या दोहोंमधील वाढत जाणाऱ्या ध्रुवीकरणाबद्दल खूप प्रश्न आहेत. शहरांमधील िहसा, हरवत जाणारा संवाद आहे. खरे तर हे कवितेत यापूर्वी आले नाही असे नाही; परंतु नीरजांनी ज्या समग्रतेने बाईपणाच्या वर्तमानापर्यंतचा एक पट मांडला आहे तो अपूर्व नसला, तरी महत्त्वाचा आहे.
विशेष म्हणजे स्त्रीपणाच्या खोटय़ा मखरात बसून गाढ झोपी गेलेल्या बाईलाही ती टोचणी लावते-
‘माझं पोतेरं मीच केलं आणि सर्वात बसले
धगधगीत चुलान’ अशा शब्दांत ती व्यक्त होते. नीरजांच्या कवितेतून सभोवतालच्या वास्तवाचे अचूक विच्छेदन, विश्लेषण आणि अन्वयार्थ सापडतात. वास्तवाचे अचूक आकलन त्यांच्या कवितेत आहेच; परंतु त्याविषयी वाटणाऱ्या एका अंतस्रावी दु:खाचा अव्याहत झरा कवितेच्या ओळी-ओळींमधून वाहतो आहे. शहरामधील िहसा, क्रूरपणा, बकालपणा, स्वार्थामधून येणारी संवेदनशून्यता नीरजा व्यक्त करतात. या शहराने भाकरी दिली, पण आमचं स्वत्व काढून घेतलं, मातीपासून आम्हाला दूर नेलं, याची एक दुखरी ठसठस या कवितेत जाणवते. नागरी आणि अनागरी माणसांच्यात पडलेले अंतर, दुरावा याबद्दलची अस्वस्थ जाणीव या कवितेत दिसते.
‘तो जातो आहे रोज मातीआड
आणि आम्ही देतो त्याला सल्ला
जीन्स घालून नांगर धरण्याचा’
अशा धारदार शब्दांत विपरित वास्तवावर ती बोट ठेवते. मॉल्सने पिळल्या जाणाऱ्या कॉर्पोरेटमध्ये हरवून जाणाऱ्या माणसाचे दु:ख नीरजांच्या कवितेत येतं. जागतिकीकरणाच्या, यांत्रिकीकरणाच्या, मार्केटिंगकरणाच्या रेटय़ात भरडली जाते आहे ती बाईच- हे सत्य त्या कवितेतून मांडतात. बाजारीकरणाच्या या युगात स्त्रीच्याच शोषणाचे नवे नवे मार्ग धुंडाळले जाताहेत याचे भान नीरजा यांना बाईला आणून द्यायचे आहे. चंगळवादी संस्कृतीत रमलेल्या स्त्रीला नीरजांना नवे भान द्यायचे आहे. गेली ३५-४० वष्रे जो
स्त्रीमुक्तीचा विचार निदान जाणिवेच्या पातळीवर झिरपला होता, तो पुन्हा विरला आहे याची खंत त्या व्यक्त करतात. पुन्हा अठराव्या शतकात पोहोचविणाऱ्या मॉडेिलग, पोर्नोग्राफी, टीव्ही मालिकांमधल्या भरगच्च वस्त्रालंकारांतल्या पारंपरिक मठ्ठ स्त्रीचित्रणातून आपल्याला पुन्हा खेळवलं जातंय, याचं भान हरवलेल्या स्त्रीला त्यांना स्वत्वाची जाणीव द्यायची आहे. एकीकडे चंगळवाद आणि दुसरीकडे अंध धार्मिकतेची उसळलेली लाट अशा दुहेरी िपजऱ्यात आजची स्त्री सापडली आहे. पण तिला स्वत:ला याचे कसलेच भान नाही. ते भान तिला यावे याविषयीची तळमळ नीरजा व्यक्त करतात.
‘निर्भया’सारख्या घटनांचे पडसाद ‘माझ्याच थारोळ्यात रुतलेली मुलगी’ या दीर्घकवितेत अपरिहार्यपणे उमटले आहेत. या विपरित घटनेने समाजमन- विशेषत: स्त्रीमनावर उमटलेले भयचकित ओरखडे, हादरे या कवितेत जाणवतात.
‘अस्ताव्यस्त थारोळं इच्छांचं
आणि त्यात रुतलेली मुलगी
माझं प्रतििबब स्थिरावताना
तिच्यावर गोठत जातो काळ’
असा एक सुन्न, बधीर करून टाकणारा अनुभव नीरजांनी या कवितेत बंदिस्त केला आहे. ‘झोपू दे मला निवांत माझ्याच थारोळ्यात’ या कवितेत वेदनादायी, निर्थक, कंटाळवाणे, संघर्षमय जीवन जगत राहण्याविषयीचे दु:ख आणि सुटकेची इच्छा व्यक्त झाली आहे. ती काहीशी आजच्या संवेदनशील माणसाची प्रातिनिधिक विव्हलतेची साक्षी आहे.
या संग्रहात विद्रोहाची जाणीव तर आहेच; परंतु ती नीरजांच्या इतर, किंवा एकूणच स्त्री- कवितेप्रमाणे आक्रमक न होता तिने अधिक उत्कट, अधिक कोवळी आणि तरल रूप धारण केले आहे. मराठी स्त्री-कवितेसाठी हे एक नवीनच वळण आहे.
‘मी माझ्या थारोळ्यात’- नीरजा, मौज प्रकाशन, पृष्ठे- ५९,
किंमत- १०० रुपये.
अंजली कुलकर्णी

peter higgs
अन्वयार्थ: ‘देव कणा’मागचा द्रष्टा!
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)