सतीश तांबे

मराठी साहित्यात गेल्या काही वर्षांमध्ये कादंबरीच्या नावाखाली जीवनानुभवांचं सूत्रहीन भरताड मांडणारं जे पीक माजलं आहे त्यामुळे मराठी कादंबऱ्या पूर्ण वाचणं हे दिवसेंदिवस एक कंटाळवाणं काम होऊन बसलं होतं. या पार्श्वभूमीवर ‘दंशकाल’ची ४२० पानं पाहून काहीसं हबकायलाच झालं. परंतु हृषीकेश गुप्तेंच्या काही भन्नाट कथा वाचून ते या पिढीतील अत्यंत ताकदीचे लेखक असल्याचं मत झाल्यामुळे समकालीन मराठी कादंबरीबाबतचे पूर्वग्रह बाजूला ठेवून वेगळ्या अपेक्षेने ‘दंशकाल’ वाचायला घेतली. आणि कादंबरीने इतकं झपाटून टाकलं, की ती पूर्ण वाचून झाल्यानंतर पुनश्च पहिलं पान उलटून सुरुवातीच्या सात-आठ ओळींचा थरार पुन्हा अनुभवासा वाटला. कादंबरीच्या सुरुवातीची ती वाक्यं अशी :

‘‘आगो बाई! हे काय ध्यान!! भानूसाहेब?’’ आई भानुकाकाला भानुसाहेब म्हणायची. आईचं किंचाळणं ऐकताच मी वळून पाहिलं. तो भानुकाकाच होता. विश्वास बसणार नाही अशा अवस्थेत असला तरी शंभर टक्के भानुकाकाच होता. मी पडवीत बसून विळ्याला धार लावत होतो. आई पुढच्या अंगणात सारवण घालता घालता एकदम किंचाळली. मी उठून बाहेर आलो, तेव्हा अंगणात जवळपास दिगंबर अवस्थेत उभा असलेला भानुकाका मला दिसला..’

एका गावकडल्या घराच्या अंगणात तरुण पुतण्या आणि वहिनीसमोर एक ‘साहेब’ म्हणावा एवढय़ा वयाचा काका/ दीर अचानक नागडा येऊन उभा ठाकला आहे, हे सूचित करणारी ही सुरुवातच अंगावर येणारी आहे. इथून कादंबरी जी पकड घेते ती अगदी शेवटापर्यंत. या कादंबरीचा निवेदक ‘मी’ पुढे सायकिअ‍ॅट्रिस्ट बनतो आणि भानुकाकापासून सुरुवात झालेल्या या कादंबरीमध्ये तो आपल्या घरातील अत्यंत गु मानल्या जाणाऱ्या गोष्टी सांगतो. यातून ही कादंबरी सहज विस्तारत जाते आणि एखाद्या गावात पुराचं पाणी शिरावं तशी आपल्या मनाच्या कानाकोपऱ्यापर्यंत भिनत राहते.

कथा-कादंबरीचा निवेदक निवडताना लेखकाला खूप विचार करावा लागतो. हा निवेदक कधी त्या कथानकातील एक पात्र असतो, कधी उपस्थित निरीक्षक/ साक्षीदार, तर कधी ‘परदे के पीछे’ राहून पात्रांना नाचवणारा कळसूत्री- ज्याचं अस्तित्व सहसा जाणवत नाही! ‘मी’च्या तोंडून ऐकलेलं कथानक वाचकाला जास्त विश्वसनीय (authentic) वाटतं. इतकं, की बऱ्याचदा ती लेखकाच्या आयुष्यात खरीखुरी घडलेली गोष्ट वाटावी. अशा प्रकारे ‘मी’/ प्रथमपुरुषी निवेदक निवडण्यात वाचकांना विश्वासात घेता येत असलं तरी त्यात मोठी जोखीम असते. त्यामुळेच लेखकाला ‘मी’चा वापर अत्यंत सजगपणे करावा लागतो. याबाबत ‘कोसला’च्या सुरुवातीचं एक वाक्य आठवतं-‘मी पांडुरंग सांगवीकर. आज उदाहरणार्थ पंचवीस वर्षांचा आहे.’ पहिल्याच वाक्यातील पहिलाच शब्द ‘मी’ हा असलेल्या या कादंबरीत सुरुवातीलाच पांडुरंग स्वत:ची व कुटुंबाची माहिती घडाघडा देतो. आपल्या वडिलांच्या उघडय़ा शरीराला तो चक्क ‘अश्लील’ असं विशेषण योजतो आणि अचानक त्याला जाणीव होते, की आपण चार भिंतीतील गोष्टी जगासमोर नेत आहोत. मग तो ब्रेक बसल्यागत म्हणतो, ‘यापलीकडचं घरचं खासगी आपण सांगणार नाही. एकतर सांगणारा बहुधा मूर्ख वगरे असतो आणि ऐकणारा उदाहरणार्थ नेहमी लबाड असतो.’

असाच एक वेगळा ‘मी’ आठवतो तो श्याम मनोहरांच्या ‘अंधारात मठ्ठ काळा बल’ या गाजलेल्या कथेतील. हा मी जणू समाजपुरुष आहे आणि हा वाचकाच्या तोंडून त्याचीच उणीदुणी वदवून घेतो.

‘दंशकाल’मधला ‘मी’ आणखी वेगळा आहे. ‘कोसला’ व ‘अंधारात मठ्ठ काळा बल’ या दोन्ही कलाकृतींमधील ‘मी’ हा वाचकांना तसा प्रातिनिधिक/ सार्वजनिक वाटला आणि त्यामुळेच या दोन्ही कलाकृतींचे ढाचे (template) बनून त्यांची अनुकरणं अनेक र्वष सुरू राहिली. ‘कोसला’ तर आजवरच्या पिढय़ांची कादंबरी प्रांतात उतरतानाची अनिवार्य पहिली पायरी ठरली. तसं ‘दंशकाल’मधल्या ‘मी’च्या बाबतीत घडू शकणार नाही. कारण सदरहू ‘मी’ म्हणजेच ‘नानू देशमुख’ आपल्या कुटुंबाची जी माहिती देतो, तेवढी सांगोपांग सखोल माहिती देण्यासाठी विरळ लेखनकौशल्य आणि पर्यायाने धारिष्टय़ व Vision लागेल. हे ‘येरागबाळ्याचे काम नोहे’! ‘दंशकाल’साठी हृषीकेश गुप्ते यांनी निवडलेला असा विचक्षण प्रथमपुरुषी निवेदक ही या कादंबरीची सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

‘दंशकाल’च्या या प्रथमपुरुषी निवेदकाचं वेगळेपण असं की, अशा ‘मी- निवेदित’ बहुतांश साहित्यकृतींमध्ये ‘मी’ हा स्वत:चं उदात्तीकरण करतो. आपली कैफियत मांडतो. कधी स्वत:चं समर्थन/ वकिली करतो. आणि हे करताना मनातून वाचकाकडून गौरव किंवा सहानुभूतीची अपेक्षा बाळगतो. मात्र,  ‘दंशकाल’चा निवेदक वाचकाकडून कसलीही याचना करीत नाही. तो वाचकांचं केवळ ‘लक्ष’ (attention) वेधून घेतो. हे करताना तो आपल्या घरातील- समाजात एरवी ज्यांना विकृती समजून त्यावर बोलणं टाळलं जातं अशा- घडामोडींची एवढी आतल्या गोटातली माहिती देतो, जी सहसा कुणी देऊ शकत नाही. या घडामोडींची माहिती वाचताना आपल्याकडेही असं सांगण्यासारखं काही आहे, पण ते ‘गुह्य’ आपण सांगणं शक्यच नाही, हे वाचकाला समांतरपणे जाणवतं. ‘दंशकाल’चा निवेदक मात्र ते गुह्य बारकाव्यांसह आणि कंगोऱ्यांसह सांगतो, कारण ‘दंशकाल’चा निवेदक हा ‘सायकिअ‍ॅट्रिस्ट’ आहे. माणसाच्या मनाच्या भुयारात काय चालते याची त्याला पुरेपूर कल्पना आहे. स्वत:च्या आतदेखील तो तटस्थपणे डोकावतो आणि तिथे घडणारंदेखील कोणतीही लपवाछपवी न करता सांगतो.

कादंबरीतील इतर पात्रांच्या तुलनेमध्ये नानू कमी बोलतो. स्वत:विषयी सांगताना तो आपण घुम्या असल्याचं कबूलदेखील करतो. मात्र, स्वत:सकट घरातील लोकांच्या वर्तनामुळे त्याच्या मनात उमटणारे तरंग तो बिनदिक्कतपणे मांडतो. ‘पैशांविषयी आपल्या मनात अनावर लालसा आहे आणि आपण उपजतच लोभी माणूस असल्याचंही’ नानू उघडपणे सांगतो. एकुणातच समाजात लोकापवादाच्या भीतीने जे जे लपवलं जातं, ते उघड करून मांडण्याचं नानूला नेमकं भान आहे. मात्र, या निवेदकाची खुबी ही, की आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सायकिअ‍ॅट्रिस्ट असूनही तो आपण सायकिअ‍ॅट्रिस्ट असल्याचं आपल्या वागण्या-बोलण्यात सदान्कदा अधोरेखित करत नाही. ‘देशमुख घराण्याचा वारस’ आणि एक ‘सायकिअ‍ॅट्रिस्ट’ या दोन्ही दृष्टींची त्याच्या निवेदनामध्ये बेमालूम सरमिसळ साधलेली आहे. कधी तो सायकिअ‍ॅट्रिस्टच्या भूमिकेतून पूर्णपणे बाहेर पडून ‘नानू देशमुख’ होऊन वावरतो, कधी तो ‘नानू देशमुख’ असल्याचं कौटुंबिक दडपण झुगारून केवळ सायकिअ‍ॅट्रिस्ट म्हणून तटस्थपणे निरीक्षणं नोंदवतो. या दोन भूमिकांची कादंबरीभर घातलेली सांगड आशयद्रव्याचं एक विलक्षण रसायन घडवते.

नानू देशमुखचं घराणं हे भूगावातील एक प्रतिष्ठित कायस्थ घराणं आहे. इभ्रत सांभाळण्यासाठी घरातील गोष्टी चार भिंतींच्या बाहेर जाऊ न देणं हा अशा प्रतिष्ठित घराण्यांचा स्थायीभाव/ शिरस्ता असतो. आपल्या घराण्याच्या गावातील स्थानाची घरातील प्रत्येकाला पूर्ण कल्पना आहे. या अब्रुदार घराची वासनेमुळे जी वाताहात होते त्याची इत्थंभूत हकिगत हा ‘दंशकाल’चा मज्जारज्जू (spinal cord) आहे.

सुरुवातीला ज्याचा उल्लेख आहे त्या भानूकाकाची बायको म्हणजे नानूची रेवाकाकू ही खानोलकरांच्या ‘रात्र काळी घागर काळी’मधील ‘लक्ष्मी’ आठवावी अशी व्यक्तिरेखा आहे. तशी काकू ही व्यक्तिरेखा श्री. ना. पेंडसेंची ‘रथचक्र’, भाऊ पाध्येंची ‘राडा’ अशा आणखीही काही गाजलेल्या कादंबऱ्यांमध्ये आलेली आहे. स्त्री उंबऱ्याबाहेर पडायच्या आधीच्या काळातील एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये घरातल्या घरात शारीरिक संबंध येणं हे अनिवार्य होतं आणि त्यामुळेच ‘काकू’ हे पात्र त्याकाळच्या मराठी कादंबऱ्यांमध्ये येणं हे तसं वास्तवदर्शीही होतं. ‘दंशकाल’ची कथाही तशी जुन्या काळातीलच आहे. मात्र, ती आधुनिक काळात लिहिल्यामुळे असेल बहुधा- पण समाजामध्ये काळाच्या ओघात जी लैंगिक धिटाई आली आहे त्यामुळे ‘दंशकाल’मधील रेवाकाकू ही मराठी साहित्यातील आजवरची सर्वात ठसठशीत काकू असावी. ‘दंशकाल’च्या कथानकात या काकूची भूमिका मध्यवर्ती आहे. सारं कथानक तिच्याभोवती घुमत राहतं. नानूचे वडील अण्णा हे आपल्या भावाच्या बायकोशी- म्हणजे रेवा या भावजयीशी संबंध ठेवून तिला गरोदर करतात. इथून पुढे या कुटुंबाच्या दंशकालाची दृश्य सुरुवात होते.

‘दंशकाल’मध्ये काकूच्या जोडीने आजी, आई-वडील, दोन काका, बायको, आत्या, धनाकाका, नंदाई वगरे कौटुंबिक गोतावळ्यातील पात्रं तर वारंवार येतातच; सोबतीला ग्रामीण भागात घडत असल्याने समाजातील नित्य व्यवहारातील सर्वस्तरीय माणसंही खूप येतात. शिवाय भानूकाकाच्या अंगात संचारणाऱ्या ‘दादुमिया’ आणि ‘भिवलीबाई’ या दोन काल्पनिक रूपरेखा तर कमालीच्या नाटय़पूर्ण आहेत. जी गोष्ट पात्रांची, तीच प्रसंग आणि घटनांची. इथे घटनांमध्येही रेलचेल आणि वैविध्य आहे. नाटय़ निर्माण करण्यात गुप्ते यांची लेखणी भलतीच तरबेज आहे. गूढ वातावरण उभं करण्यात तर त्यांचा हातखंडा आहे. ‘दंशकाल’मध्येही वातावरण गूढ आहेच, परंतु इथे निवेदक हा सायकिअ‍ॅट्रिस्ट योजल्यामुळे त्यांनी या गूढामागचा अन्वय अधिकाधिक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, ‘विहिरी’च्या प्रतीकात्मक वापरातून नेणिवेच्या विहिरीचा कितीही उपसा केला तरी सगळ्याच गुह्यंची उकल शक्य नसते, ही सायकिअ‍ॅट्रीची- पर्यायाने विज्ञानाची मर्यादादेखील ते जाणवून देतात. चंद्रमोहन कुलकर्णीचं मुखपृष्ठ या मर्यादेचं चित्रात्मक दर्शन घडवण्याचं काम चोख बजावतं.

‘दंशकाल’मधील निवेदनामध्ये सायकिअ‍ॅट्रिस्टचा केलेला वापर हा नेमाडे यांच्या ‘हिंदू’मधील ‘आर्केओलॉजिस्ट’च्या वापराची आठवण करून देणारा आहे. ‘दंशकाल’मधील मृत्यूसंबंधित वर्णनं वाचतानाही ‘हिंदू’ आठवते. ‘दंशकाल’मध्ये अनावश्यक भरताड अजिबात नाही. त्यामुळे इतरत्र तपशिलांची वर्णनं आली की डोळे जसे प्रत्येक शब्द न वाचताच आपोआप पुढे पुढे घरंगळत जातात तसं ‘दंशकाल’ वाचताना होत नाही. सुसंगत सूक्ष्मातिसूक्ष्म तपशिलांचा इथे जेवढा वर्षांव होतो तेवढा आणखी कुठे क्वचितच झाला असेल. नेमाडेप्रणित ‘अवकाश भरणे’ या संकल्पनेचा ‘दंशकाल’ हा अनेक वर्षांनंतर अवतरलेला आदर्श नमुना ठरावा.

लेखकासाठी तो रंगवत असलेली पात्रं आणि प्रसंग या ‘काया’च असतात. यातील काही तर काल्पनिक परकाया! आणि या परकायांमध्ये लेखक जेवढा समरस होतो तेवढी ती कलाकृती सखोल व सच्ची वाटत जाते. परकायाप्रवेशाच्या या प्रक्रियेत भाषा आणि अवधानाचा कस लागत असतो. ‘दंशकाल’मध्ये हे इतक्या तन्मयतेने घडलं आहे, की त्यामुळे पानोपानी सापडणाऱ्या ‘अनुभवाचे बोल’ स्वरूपाच्या चिंतनप्रवण (insightful) वाक्यांची यादी करायची म्हटलं तरी कोणत्याही परीक्षणापेक्षा ही वाक्यंच कादंबरीची सर्वोत्तम शिफारस ठरतील.

ही कादंबरी ‘सिनेमॅटिक’ असूनही ‘फिल्मी’ होत नाही. कुलाबा जिल्ह्यच्या एका ग्रामीण भागातील आशयद्रव्य असूनही ती ‘प्रादेशिक’ राहत नाही. ‘दंशकाल’च्या मुळाशी आदिम प्रेरणांचं तीव्र भान आहे. स्थळ-काळ निमित्तमात्र आहेत. यातील पात्रं नियत लैंगिक प्रेरणेच्या हातातील बाहुल्या असल्यासारखी वागतात. इतकी, की मानवी नियती म्हणजे लैंगिक प्रेरणाच की काय असेही वाटून जाते. नसर्गिक प्रेरणा आणि सामाजिक धारणा यांच्या कचाटय़ात सापडलेल्या व्यवस्थेत नीतिनियमांच्या अवडंबरामुळे होणारी शारीरिक कुचंबणा, त्यासंबंधात वाच्यताही करायची नाही या दंडकामुळे तयार होणाऱ्या आणि दडपल्या जाणाऱ्या मनोविकृती यांचं निवेदक असलेल्या सायकिअ‍ॅट्रिस्ट नानूला नेमकं भान आहे. परिणामी अस्सल ‘लोकल’ जसं आपोआप ‘ग्लोबल’ बनतं, तद्वतच ही कादंबरी एका कुटुंबाची न राहता एका सामाजिक घुसमटीची कहाणी बनते.

‘दंशकाल’ वाचताना कुणाला भौगोलिक पाश्र्वभूमीमुळे पेंडसे-खानोलकर आठवतील; सरंजामी वातावरणामुळे महेश एलकुंचवारांचं ‘वाडा’ नाटय़त्रयी आठवेल; लैंगिक उल्लेखांमुळे जयवंत दळवी- भाऊ पाध्येंच्या कादंबऱ्या आठवतील; कायस्थांच्या राहणीची रसरशीत वर्णनं वाचून विश्राम गुप्ते यांची ‘चेटूक’ आठवेल; लैंगिक छुपेपणाला नियतीचा आघात मानलं तर जीए आठवतील; नेमाडेंचा उल्लेख वर आलाच आहे. परंतु कथानकाला साजेसा निवेदक अचूक निवडल्यामुळे ‘दंशकाल’ या सर्वाच्या खांद्यावर हातपाय ठेवून पुढे झेपावली आहे. जातवास्तवात आणि हालअपेष्टांच्या वर्णनात अडकून पडलेल्या मराठीतील ग्रामीण वास्तववादी साहित्याची कोंडी ग्रामीण पाश्र्वमूमीवर घडणाऱ्या ‘दंशकाल’ने फोडली आहे.

‘दंशकाल’मध्ये शैली, घाट  यांचा जाणीवपूर्वक कोणताही प्रयोग केलेला नाही. यात ‘पोस्ट मॉडर्न’ वगरे चलनी विशेषणांना साजेसं असं काहीही नाही. नव्या जागतिकीकरणपश्चात काळाशी नातं सांगण्यासाठी आधुनिक जीवन अधोरेखित करणारे संदर्भ नाहीत. उलटपक्षी ‘विहीर’, ‘पत्त्यांचा बंगला’, ‘गुलबकावलीची गोष्ट’ अशा विस्मृतीमध्ये गेलेल्या अनेक संदर्भाचा यात सढळ वापर आहे. मात्र, ‘दंशकाल’मध्ये विस्तृत दखल घ्यावी असे अनेक पलू आहेत. यात वास्तव आणि कल्पिताचा जो मेळ आहे तो इतका विलक्षण आहे, की मराठी साहित्यात हाच एक महत्त्वाचा प्रयोग ठरावा. वाचकच नव्हे, तर कादंबरी लिहिण्याची ज्यांना इच्छा आहे, त्यांच्यासाठीही हा साहित्यानुभव एक महत्त्वाचा वस्तुपाठ आहे. म्हणूनच ‘दंशकाल’ सर्वानी वाचायला हवी. तिच्यावर विस्तृत चर्चा घडणं, हेही मराठी साहित्याची कोंडी फोडून साहित्याच्या निकोप वाटचालीसाठी महत्त्वाचं ठरेल.

‘दंशकाल’ – हृषीकेश गुप्ते,

राजहंस प्रकाशन,

पृष्ठे- ४२०, मूल्य- ५०० रुपये.