04 December 2020

News Flash

दखल : पारधी समाजातील स्त्रीचं भीषण वास्तव

भटक्या विमुक्त जातींची आत्मकथनं येण्याची लाट मराठीत येऊन आता बरीच र्वष झाली आहेत.

‘विंचवाचं तेल’- सुनीता भोसले, सहलेखन- प्रशांत रूपवते, रोहन प्रकाशन, पृष्ठे- २०८, मूल्य- २५० रु. ६

जुई कुलकर्णी – lokrang@expressindia.com

भटक्या विमुक्त जातींची आत्मकथनं येण्याची लाट मराठीत येऊन आता बरीच र्वष झाली आहेत. ‘गुन्हेगार’ असा शिक्का जन्माला यायच्या आधीच ज्यांच्यावर बसतो त्या पारधी समाजाचं वास्तव अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ‘िवचवाचं तेल’ या पुस्तकात आलं आहे. पारधी समाजातील कार्यकर्ती सुनीता भोसले यांचं हे आत्मकथन आहे. त्याचं सहलेखन केलंय प्रशांत रूपवते यांनी आणि संपादन केलंय अनुजा जगताप यांनी.

पांढरपेशा, सुशिक्षित, चारचौघांच्या समाजाच्या पलीकडे या देशात अजूनही बराच मोठा समाज राहतो. त्यांच्या जगण्याचं वास्तव हलवून टाकणारं आहे. भारतात एकाच वेळी अनेक काळ सुरू असतात याचा भीषण प्रत्यय हे पुस्तक वाचताना येतो. पारधी जमात भारतातील सगळ्या उपेक्षित,पीडित जमातींपेक्षा वेगळीच आहे. ब्रिटिशांच्या काळापासून त्यांच्यावर चोर, दरोडे घालणारे गुन्हेगार असा शिक्काच बसलाय. मुळात ही शिकारी जमात. शिकारी तंत्रात अतिशय कुशल . काही पारधी मजुरी करतात. जमीन कसतात. शेळ्या पाळतात. त्या बदल्यात त्यांना धान्यधुन्य मिळालं तरी त्यांनी गावात भीक मागूनच खायचं अशी विचित्र पद्धत आहे.

त्यात या जमातीत स्त्री ही सर्वात खालची मानली जाते. पारधी समाजातील रूढी, परंपरा अत्यंत भीषण, अमानुष, क्रूर आणि किळसवाण्या आहेत. स्त्रीचं लग्न झालं म्हणजे तिचा शरीरसंबंध आला म्हणजे ती बाटली असं समजलं जातं. पारधी समाजातील बाळंतपणाच्या पद्धती तर जनावरासारख्याच आहेत. हे सगळं वाचून भयंकर वाटतं. या देशात कधीच काहीच सुधारणार नाही का अशी निराशा दाटून येते. पण सुनीता भोसले यांचा कठोर संघर्षही पुस्तकातून दिसतो आणि जाणवतं, की निबीड अंधारातदेखील सूर्यकिरण पोहोचतात. ‘वो सुबह कभी तो आएगी’ या आशेवरच सुनीता भोसलेंसारखे लोक काम करत असतात.

साठ वर्षांचं स्वातंत्र्य मिळालं तरी कुणाला? या समाजापर्यंत पोहोचावंसं का वाटलं नाही शासनाला? हा विचार या पुस्तकात मांडलेला आहे. आपल्याही मनात तो निर्माण होतो. मात्र, या सगळ्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे ‘गुन्हेगार’ हा या जमातीवर बसलेला शिक्का! त्यामुळे इतर तळागाळाच्या जातींविषयी, त्यांच्या दुरवस्थेविषयी वाटते तशी कींव या जातीविषयी उर्वरित समाजाला वाटत नसावी. अजून एक कारण असं, की ही जमात फारच वेगळी राहणारी, समाजापासून तुटून पडलेली आहे. त्यांची भाषादेखील फार वेगळी आहे. पारध्यांची मूळची नावंदेखील अगदी वेगळी असतात. आजकाल नवीन नावं ते समाजात मिसळायला सोयीची म्हणून घेतात. पारधी संस्कृती िहदू संस्कृतीसारखी नाही. िहदू धर्मापेक्षा चालीरीती वेगळ्या आहेत. िहदूंसारखी त्यांच्यात दहन पद्धती नसून मृताचं ते दफन करतात. लग्नानंतर एकत्र कुटुंब पद्धती नाही. कुटुंबप्रमुख नाही. हुंडा मुलीला देतात. स्त्रीचे कपडे घराबाहेर ठेवतात. या आणि अशा अनेक कारणांमुळे पारधी समाजापर्यंत कुणी बाहेरचा सुधारक पोहोचूच शकला नसेल.

इतर जाती व समाजांतील संस्कृतीवर थोडंफार लिहिलं गेलंय. त्यामुळे लोकांना त्या संस्कृती थोडय़ाफार माहीत असतात. तसं पारधी संस्कृतीचं नाहीये. एकतर या जमातीत लिहिणारे, वाचणारे फार कमी आहेत. बहुतेक अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहेत. ‘बोकडाला मारून रक्त पिणारी ही संस्कृती’ असं एके ठिकाणी लेखिका म्हणते. दुसरीकडे िहदू कायद्यांवर ती टीकाही करते. पारध्यांच्या सरसकट कज्ज्यांमध्ये िहदू कुटुंब कायदे लावून निर्णय दिले जातात. त्यामुळे त्यांना  न्याय नीट मिळत नाही. बहुतेक पारध्यांकडे नागरिकत्वाचेही पुरावे नसतात. त्यामुळे मतपेटी म्हणूनही ते कमकुवत आहेत. तरीही या देशाचे संविधान हाच खरा सुनीता भोसले यांचा आधार ठरला.

तसंही व्यक्ती असो की समाज; स्वत:ला मदत करायला स्वत:च उभं राहावं लागतं. अशा बंदिस्त समाजात सुनीता भोसलेंसारखी एखादी फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणारी कार्यकर्ती निपजावी हा चमत्कारच आहे. याला कारण ठरलं आधुनिक शिक्षण! सुनीता भोसले यांनी मेहनत घेऊन सहावीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यामुळे आधुनिक जग त्यांच्यापर्यंत पोहोचलं. पुढे हलाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षण जरी अर्धवट सोडावं लागलं तरी जिद्द सुटली नाही. त्यांना प्रवाहात वाहत जायचं नव्हतं. लग्नानंतरच्या घाणेरडय़ा रूढी, घरगुती िहसाचार नको होता. याच कारणाने त्यांनी लग्नही करायचं नाकारलं.

१९९५ साली मानवी हक्क अभियान अधिवेशनात सुनीता भोसले गेल्यामुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. अवघ्या अकराव्या वर्षी सुनीता भोसले सामाजिक कामाच्या प्रवाहात आल्या आणि तिथून पुढे त्यांचं आयुष्य बदललं. मराठवाडय़ातील कार्यकत्रे एकनाथ आव्हाड यांच्या संपर्कात सुनीता आल्या. नंतर त्यांनी भरपूर काम केलं. पारधी समाज संघटना उभारली. हजारो निरपराध पारध्यांना पोलीस ठाण्यातून सोडवलं. कौटुंबिक केसेस सोडवल्या. दौंडमध्ये दीड हजार पारध्यांना जातीचे दाखले मिळवून देण्याचा लढा तर विस्मयकारकच होता. या अनुभवांसोबत सुनीता भोसले यांच्यासमवेत काम केलेल्या अनेक कार्यकर्त्यांचे अनुभव, गाजलेल्या केसेसही दिल्या आहेत. त्याने अजूनच हादरून जायला होते.

पारधी जातीचं मूळ सांगणाऱ्या पुराणकालीन कथा हे परिशिष्ट रोचक आहे. या पुस्तकाचा फॉर्म हा रूढ आत्मकथनापेक्षा वेगळा आहे. भाषा अपेक्षेप्रमाणे वेगळी आहे आणि ती तशीच ठेवली आहे ते उत्तम.

विंचवाचं तेल म्हणजे सूर्यनारायण तेल. हे तेलच पोलीस थर्ड डिग्रीमध्ये वापरतात. आरोपीकडून गुन्हा कबूल करून घेतात. आरोपीच्या िलगावर हे तेल चोळल्याने मरणाची आग आग होऊन आरोपी गुन्हा कबूल करतो. एक प्रकारे माणसाच्या निर्मितीक्षमतेवरचाच हा घाला आहे. सरकारी व्यवस्थेखाली माणसाला संपूर्ण चिरडणं आहे. जन्मत:च एका जमातीवर गुन्हेगार असा शिक्का मारणे हे

काम ब्रिटिशांनी केले. पण ते जाऊन इतकी वष्रे झाली तरी तो शिक्का तसाच आहे.

गणेश देवी यांची प्रस्तावना, प्रशांत रूपवते यांचे मनोगत, संदेश भंडारे यांचे फोटो हे सगळं पुस्तकाच्या निर्मितीमूल्यांत भर टाकणारे आहे.

सगळीच पुस्तके मनोरंजन म्हणून वाचायची नसतात. आपल्या चौकटीबाहेरच्या जगापलीकडे किती भीषण जग आहे हे दाखवणारी काही पुस्तकं असतात. सुनीता भोसले यांची धग, धमक आणि कारुण्य या पुस्तकात जाणवतं. एक प्रकारे पारधी जातीचे सामाजिक दस्तावेजीकरण म्हणूनही ‘िवचवाचं तेल’ हे पुस्तक महत्त्वाचे ठरेल.

‘विंचवाचं तेल’- सुनीता भोसले,

सहलेखन- प्रशांत रूपवते,

रोहन प्रकाशन, पृष्ठे- २०८, मूल्य- २५० रु. ६

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2020 1:06 am

Web Title: marathi book review vinchvach tel sunita bhosle dakhal dd70
Next Stories
1 महाराष्ट्रातील प्रबोधन : एक दृष्टिक्षेप
2 हास्य आणि भाष्य : दीर्घकाळ सर्वोत्तम
3 विश्वाचे अंगण : तीन ध्रुवांचे तीन तेरा
Just Now!
X