मुंबईचा षण्मुखानंद हॉल खुर्ची-खुर्चीगणिक फुलला होता. प्रेक्षकांमधून हास्याचे फवारे उडत होते. ‘नाटय़द्वयी’चा प्रयोग चालू होता- ‘एक तमाशा अच्छा खासा.’ पण खऱ्या उत्साहाचे आणखीन एक कारण होते. फिल्म फेअरचा १९७१ सालचा पारितोषिक वितरण समारंभ सुरू होता. आणि प्रमुख पाहुणे होते अटलबिहारी बाजपेयी.
दिल्लीला नुकताच आमच्या नव्या उपक्रमाचा श्रीगणेशा झाला होता आणि प्रेक्षक व पत्रकार दोघांनीही त्याचे छान स्वागत केले होते. खुद्द दिल्लीत लागोपाठ नऊ-दहा प्रयोग झाले होते आणि बाहेरगावची बोलावणी येऊ लागली. फिल्म फेअरच्या आमंत्रणाने आम्ही साहजिकच खूप सुखावलो. या खास प्रयोगात आम्ही फिल्मी दुनियेला खूप कोपरखळ्या मारल्या आणि उपस्थित सिताऱ्यांची झकास खिल्ली उडवली. या टवाळीचे खिलाडूपणाने स्वागत झाले. याखेरीज आणीबाणी, संततीनिरोधक जबरी शस्त्रक्रिया, वृत्तपत्रांची मुस्कटदाबी असे जे मुबलक ‘खाद्य’ हाताशी होते, त्याचा प्रयोगात आम्ही बिनधास्त वापर केला.
‘तमाशा’ या मराठी लोकनाटय़ाचे मला फार पूर्वीपासून आकर्षण वाटत आले आहे. पण त्याच्या आवाक्याची खरी जाणीव झाली ती पॅरिसमध्ये. छोटय़ा, जुजबी मंचावर बहरणारी असंख्य प्रायोगिक नाटके मी पाहिली, तेव्हा त्यांचे हरप्रकारचे नवे ‘लटके’ पाहून मी मनात म्हटलं, ‘अरे, हे तर आमच्या तमाशानं केव्हाच केलेलं आहे!’
इम्प्रेशनिस्ट, एक्स्प्रेशनिस्ट, अ‍ॅव्हां गार्ड (काळापुढचे) हे सगळे अभिनिवेश आपल्या लोकनाटकांत वापरले गेले आहेत. फक्त कुणी त्यांना लेबलं लावली नाहीत, आव आणला नाही, की त्याचं पेटंट जाहीर केलं नाही. एखाद्या बालकाच्या निरागसतेनं तमाशा आपल्या आपल्यातच दंग राहिला. गोल गिरक्या मारीत स्टेजला फेरी मारली, की गेले ‘अमुकपुरी’हून ‘तमुकपुरी’ला! सेवक हातात उभा खराटा (‘आप’चे चिन्ह) धरून उभा राहिला, की खुशाल तो वटवृक्ष समजून वाटसरूने त्याच्या सावलीला विसावावे. पत्र्याच्या गंजक्या फोल्डिंग खुर्चीला बिनदिक्कत रत्नजडित सिंहासन मानावे. प्रेक्षकांनी प्रथमपासून आपल्या ‘अविश्वासाला आवर’ घालून (suspension of disbelief) तमाशाला हरप्रकारे सहकार्य केले आहे. या गुणी लोकनाटय़ाचं मागणं थोडं आणि देणं अमाप आहे. त्याला फिरता रंगमंच नको, उंची नेपथ्य नको, की दिपवणारी प्रकाशयोजना नको. चार-पाच हजरजबाबी नट, दोघी-तिघी कुशल नृत्यांगना, एक-दोन कसबी ढोलकीबहाद्दर मिळाले, की राहिला फड उभा! कथानक सहसा गुंतागुंतीचे नसते. भले आणि बुरे यांचे स्पष्ट विभाजन केलेले असते. मनोविश्लेषणाला वगैरे वाव नसतो. मला तमाशा हे निखळ नाटय़ वाटते. ढ४१ी ळँीं३१ी. पण हा सुंदर नाटय़ाविष्कार महाराष्ट्राच्या सीमारेषा ओलांडून फारसा कुठे गेला नाही. रुजण्याची गोष्टच सोडा. मला या गोष्टीचे नेहमीच वैषम्य वाटत आलेलं आहे.
हिंदीभाषिकांसाठी निवडक मराठी नाटकांचा रतीब क्रमश: देण्याच्या आमच्या मोहिमेत एक्का-दुक्का नाटक करण्याऐवजी एका अवघ्या नाटय़प्रकाराचीच.. तमाशाची ओळख करून दिली तर..? पण हा मराठी नाटय़प्रकार इतरेजनांना रुचेल का? पचेल का? महाराष्ट्राच्या मातीमधून त्याला उखडून दुसरीकडे त्याचे रोपण केले तर ते मूळ धरील का? कुणास ठाऊक. पण केल्याने होत आहे रे.. तेव्हा (प्रयोग) करून पाह्य़ला काय हरकत आहे?
आमचे मनोगत प्रयोगाच्या सुरुवातीलाच कृष्ण- सुदामा स्पष्ट करतात.
कृष्ण : महाराष्ट्र देश का तमाशा, हम मराठी मेंच करेंगे.. समझे?.. लेकिन मराठी हम जरा हिंदी में बोलेंगे, ताकि दिल्ली की पब्लिक समझ जाये.. कैसा?
पेंद्या : अंगअश्शी!
विचार पक्का झाल्यावर आम्ही गाजलेल्या काही लोकनाटय़ांकडे वळलो. ‘गाढवाचे लग्न’ आणि वसंत सबनीसांचे सदाबहार ‘विच्छा माझी पुरी करा’! पण त्यांचे अगणित प्रयोग झालेले होते. दिल्लीतदेखील. तेव्हा आपल्या नव्या प्रकल्पासाठी नवे ताजे नाटक बसवावे असे ठरले. पण अखेरीस कोरा विषय न घेता माझ्या एका बालनाटकाचा (‘भटक्याचे भविष्य’) आधार घेऊन मी तमाशा लिहिला. भाषांतराच्या भानगडीत न पडता तो मी सरळ हिंदीमध्येच लिहीत गेले. त्या बालनाटकाचे रूपडे अगदी लोकनाटय़ाला साजेल असेच होते. भोळसट राजा, चतुर राणी, लबाड प्रधान, फसवा ज्योतिषी अशी सरळसोट पात्रं होती कथेमध्ये. गुंतागुंत, कपट- कारस्थान, दुष्टांचा बीमोड असा सगळा मसाला होता. दुर्दैवाने प्रयोग बसवण्याच्या आधी तालमीच्या धांदलीत तमाशाला चांगले नाव शोधण्याचे राहूनच गेले. ‘पाहू..पाहू’ म्हणेपर्यंत जाहिराती छापण्याची वेळ येऊन ठेपली. मग सुचेल ते थातुरमातुर नाव देऊन आम्ही मोकळे झालो.. ‘अच्छा खासा’- म्हणजे ठीक ठीक. बऱ्यापैकी. उत्तम नव्हे. तर ‘एक तमाशा अच्छा खासा’ हे काय नाव झाले? पुढे कुणी या मथळ्यावरून मला छेडले की मी म्हणत असे- ‘मुद्दामच असे नाव ठेवले.. दृष्ट लागू नये म्हणून.’ आपल्याच लेकरांना नाही का काही आई-बाप दगडू, धोंडू अशी नावं ठेवत.’ प्रत्येक कलाकृती आपलं असं एक नाव घेऊनच जन्माला येते असा माझा समज आहे. किंबहुना, त्या कलाकृतीच्या यशापयशात त्या मथळ्याचा खूप सहभाग असतो. माझ्या ‘नामाभिकरणां’बद्दल मला काहीसा अभिमान वाटतो. ‘स्पर्श’, ‘चष्मेबद्दूर’, ‘कथा’, ‘दिशा’, ‘पपीहा’, ‘अंगूठाछाप’ हे माझे चित्रपट किंवा ‘नांदा सौख्यभरे’, ‘सख्खे शेजारी’, ‘माझा खेळ मांडू दे’ ही नाटकं वेगळ्या नावांनी मी कल्पूच शकत नाही. बापडय़ा तमाशाचं तेवढं हुकलं. असो.
त्याकाळी (१९७१) आपल्या देशात प्रासंगिक किश्शांची रेलचेल होती. साहजिकच अशा सुवर्णसंधीचा मी पुरेपूर लाभ उठवला. तमाशाच्या प्रचलित पद्धतीनुसार आमच्या प्रत्येक प्रयोगात नित्य-नवे तत्कालीन उल्लेख प्रसंगानुरूप उमटत असत. काही थोडे प्रसंग आठवतात ते असे-
राजा व प्रधान जंगलामधून जात आहेत. अचानक दाढीमिशांचे जंगल वाढवलेला एक उघडावागडा इसम एका झाडामागून येतो आणि राजापुढे लोटांगण घालतो.
इसम : रहम करो सरकार, रहम. मैं दो साल से इस जंगल में छुपा हूं. शादी के मंडप से मैं भाग निकला. फॅमिली प्लॅनिंगवाले अफसर मुझे लेने आये थे.. मेरे सत्तर साल के बाप को भी उन्होने नहीं छोडा.
हा प्रवेश संजय गांधीच्या खात्यावर जमा झाला. गवळणींच्या प्रवेशात कृष्ण त्यांना अडवून नावे विचारतो.
एक : रंगी.
दुसरी : गंगी.
तिसरी : क्यांडी (कँडी)
तेव्हा एका मिनिस्टरचे ‘कँडी प्रकरण’ गाजत होते. त्याच्या वशिल्याने एका होतकरू सिनेतारकेला फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यांची म्हणे दाट ओळख होती.
आणखी एक प्रसंग..
राजा व प्रधान हेलिकॉप्टरने जात आहेत. खाली डोकावून राजा म्हणतो-
: प्रधानजी, नीचे कोई शहर मालूम होता है.
प्रधान : जी हुजूर. यह दिल्ली है. बडाही खतरनाक शहर है.
राजा : क्यों? वहॉं शेर बब्बर हैं क्या?
प्रधान : शेर बब्बर तो नहीं हुजूर. लेकिन वहॉं एक डरावनी बिल्ली है- जिसने सारे चूहों के नाक में दम करके रखा है.
आज हे दाखले कालबाह्य़ झाले आहेत; पण त्या काळात ते प्रचंड दाद मिळवून जात. सद्य:स्थितीवर अशा प्रकारे गमतीगमतीत भाष्य करता येते, हा प्रकार दिल्लीवाल्यांना अगदी नवा आणि रोचक होता. त्यामुळे वारंवार ते आपला अचंबा व्यक्त करीत.
‘एक तमाशा..’ला लाभलेला कोहिनूर म्हणजे प्रा. गोविंद देशपांडे. गोविंद आणि माणिक (कालिंदी) हे आमचे लाजपतनगरमधले शेजारी आणि घनिष्ट दोस्त. (माझ्या दूरदर्शनच्या ‘सय’मध्ये मी माणिकच्या बस व अ‍ॅम्ब्युलन्स इ. चालवण्याच्या विक्रमांबद्दल सविस्तर लिहिले आहेच.) गोविंद हा J.N.U. मध्ये प्राध्यापक होता. चीनचे (आणि आपलेही!) राजकारण हा त्याचा विषय. त्याबद्दल त्याचा गाढा व्यासंग होता. अतिशय हुशार, विद्वान आणि बहुश्रुत अशा गोविंदला मिश्कील विनोदाचा झकास चोरकप्पा होता. तमाशात राजाचे काम करायला तो आनंदाने तयार झाला. एवढेच नाही, तर त्याने ती भूमिका गाजवली. (याच भोळसट राजाने पुढे ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ हे सुघड नाटक लिहून मराठी नाटय़वाङ्मयात मोलाची भर घातली.) टेलिव्हिजनची वहिदा रेहमान आणि दिल्लीची स्वप्नसुंदरी मधू राजा ही त्याची राणी. नऊवारी जरतारी साडीत ती फार सुंदर दिसे. चन्नी बेदी हा गुणी नट भंपक ज्योतिषाच्या कामासाठी निवडला. तो खरा (तमाशात) एक N.S.D. पास, बेकार नट असतो. राजवैद्याची भूमिका निभावली नरेंद्र डेंगळे (पिंटो) याने. पिंटो खरं तर घरचाच. चिल्ड्रन्स थिएटरमध्ये ‘पत्तेनगरीत’ तो बदाम नहिल्या होता. तर असा हा आमचा फड.
तालमी करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं, की आपली संगीताची बाजू लंगडी आहे. आम्हा ‘द्वयीं’च्यात गायन-वादन या प्रांतात अरुणचे पारडे निश्चितच जड होते. ‘तू गाणी लिहून दे..’ तो मला म्हणाला, ‘चालींचं मी बघतो.’ मग मी भराभर गाणी लिहिली. गण, गवळण, दोन लावण्या आणि शेवटची ‘भरतवाक्य भैरवी’!
दिल्लीमध्ये तमाशाच्या लावणीसाठी जाणकार संगीतसाथ मिळणं अवघड होतं. पण खूप खटपट करून अरुणने काही जाणकार मंडळी मिळवली. (दुर्दैवाने त्यांची नावे आणि इतर तपशील याबाबत मी आज कोरी आहे.) पण तमाशा संगीत या प्रांतामधला प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे आम्ही वेळ निभावून नेली, एवढंच म्हणता येईल.
संगीताचे आम्ही जसे तसे जमवले. नृत्याचे काय? खूप शोध केल्यावर, गावाला वळसा घातल्यावर असं लक्षात आलं की, कळसा जवळच आहे. इंदू जैन ही हिंदी भाषेची जानीमानी कवयित्री- टीव्हीमुळे माझ्या चांगल्या परिचयाची होती. किंबहुना, आमची जवळीक होती. (पुढे माझ्या ‘स्पर्श’ सिनेमाची गाणी तिने लिहिली.) अतिशय सुविद्य आणि सुसंस्कृत असे हे जैन घराणे होते. चंपक ही इंदूची धाकटी बहीण शास्त्रशुद्ध नृत्य शिकत होती. ती आमच्या तमाशात उत्साहाने दाखल झाली आणि ‘लावणी नृत्य’ शिकायचा तिने विडाच उचलला. एका महिन्यात ती अशी तयार झाली, की हनुमान थिएटरच्या बोर्डावरच तिचं बालपण गेलं की काय, असा कुणालाही संभ्रम पडावा.
परे हट नटखट, जाने दे रे पनघट
देरी हो गई है, सखियां आगे निकल गई है-
ही प्रारंभीची गवळण, किंवा नंतर राजमहालातली मादक लावणी-
तेरा कबूतर, सम्भाल साजना, मेरे महल में आया
आधी रातको, मुझको जगाकर, गुटरगूं गुटरगूं मचाया
चंपक अशी काही ठसक्यात अदा करीत असे, की प्रेक्षकांमधल्या बायकांनीसुद्धा शिट्टय़ा वाजवाव्यात. चंपक होती नाजूकशी, एवढीशी; पण तिखट! अगदी लवंगी मिरची कोल्हापूरची. माणिक देशपांडे आणि मधू तिला साथ करीत.
दिल्लीकरांनी ‘एक तमाशा’ला जोरदार मान्यता दिल्याची बातमी पसरली. आम्हाला बाहेरगावची बोलावणी येऊ लागली. आमचा नटवर्ग तसा ‘हौशी’ असल्यामुळे म्हणाल तेव्हा आपला इतर व्यवसाय वा जबाबदारी सोडून सहजी दिल्लीच्या बाहेर पडू शकत नव्हता.
गोविंदचे JNU मध्ये प्राध्यापन, चन्नीची पार्ट- टाइम नोकरी, मधूची टीव्हीची बांधीलकी अशा अडचणी होत्या. तरी पण आम्ही बरेच दौरे केले. कोलकाता, लखनौ, हरिद्वार वगैरे ठिकाणी आमचे छान स्वागत झाले. मुंबईचे प्रयोग विशेष गाजले. फिल्मफेअर सोहळय़ाखेरीज Tata Institute of Fundamental Research ने आपल्या वार्षिक कार्यक्रमासाठी आमचा खेळ मुद्दाम मागवून घेतला. आमचे कोडकौतुक केले. या आमंत्रणाने आम्हाला साहजिकच आभाळ ठेंगणे वाटले. या खास प्रसंगाची एक मजेदार आठवण आहे. थिएटरचा हॉल मुंबईच्या WHO’S WHO नी गच्च भरला होता. शिक्षण क्षेत्रातले मान्यवर, सरकारी श्रेष्ठी आणि नावाजलेले शास्त्रज्ञ यांची कार्यक्रमाला गर्दी लोटली होती.
गवळणीचा प्रवेश चालू झाला. गवळणी डोईवर हंडे घेऊन ठुमकत मुरडत मथुरा बाजाराला निघाल्या. कृष्ण आणि पेंद्या एका बाजूने आले आणि एका कोपऱ्यात लपून उभे राहिले.
कृष्ण : पेंद्या, हम इन हसीनों को रोकेंगे.
पेंद्या : इन्हे रोककर क्या करेंगे भला?
कृष्ण : अरे, जरा दही, दूध और माखन ले लेंगे. हा झाला नेहमीचा संवाद. या खेपेला थोडा बदल केला.
कृष्ण : पेंद्या, हम इन हसीनाओं को रोकेंगे.
पेंद्या : इन्हे रोककर क्या करेंगे भला?
कृष्ण : अरे, जरा ‘फंडामेंटल रिसर्च’ करेंगे!
आमचा हिंदी तमाशा हा मला माझ्या कारकीर्दीतला महत्त्वाचा टप्पा वाटतो.. अभिमान वाटावा असा. अगदी अलीकडे ‘सय’साठीच शोधाशोध करीत असताना कात्रणांची एक जुनी जंत्री हाती लागली. तिच्यात दिल्ली आणि मुंबईला झालेल्या प्रयोगांची सविस्तर परीक्षणे मिळाली. त्यामुळेच खरं तर हा आमचा सगळा उपद्व्याप काळाच्या चौकटीत बसवता आला. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे अपक्ष भूमिकेतून त्याचे झालेले मूल्यमापन पुन्हा वाचता आले. त्या परीक्षणांमधले काही उतारे खाली उद्धृत करीत आहे.
‘१९७१ च्या फेब्रुवारी सव्वीसला दिल्लीकरांना एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला.. तमाशा हिंदीमधून अवतरला. सईचा तमाशा झकासपैकी हिंदीत बोलला, गायला आणि अस्सल मराठी तमाशा राहिला.. अशक्त गण-गौळणीवर तिनं उत्कृष्ट वगाचा ताजमहाल बांधून काढला. परिणामी, वगानं सर्वाचं मन आकृष्ट करून घेतलं. आणि तमाशाचा परिचय असलेल्या समजूतदार प्रेक्षकांनी नाचगाण्याकडे डोळेझाक केली..
.. हा प्रयोग पाहताना लोकनाटय़ या प्रकाराची आणखी एक बाजू लक्षात आली. आपण ‘लोककला’ हा शब्दप्रयोग वापरतो तेव्हा आपल्या मनात फक्त खेडेगाव आणि ग्रामीण जनता असते. औद्योगिकीकरणानंतर खेडी नष्ट होतील आणि मग लोककलांचे काय, ही भीती जाणकारांना सतावत असते. लोकनाटय़ शहरी समुदायाचंही उत्तम रंजन करू शकते. सईच्या तमाशाचा प्रेक्षक समुदाय एका विशिष्ट वर्गातला होता. सरकारी ऑफिस इ. वरचे विनोद त्यांना बेहद्द पसंत पडले आणि त्यांनी तशी दादही दिली.. तेव्हा वाटलं की, लोककला या लोकांच्या असतात. हे लोक खेडेगावातलेच हवेत अशी त्यांची मागणी नसते. यशस्वी प्रयोग सादर केल्याबद्दल ‘नाटय़द्वयी’चे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. – वसुधा माने (महाराष्ट्र टाइम्स)
वसुधा मानेंच्या अभिप्रायावरून हे स्पष्ट झाले, की ‘एक तमाशा अच्छा खासा’ने केवळ भाषा उल्लंघिली- एवढेच नव्हे, तर स्थलांतरही केले. खेडय़ातल्या मातीला सोडून ते शहराच्या डांबरी रस्त्यावर आले.
थिएटरमध्ये निम्मे मराठी आणि निम्मे दिल्लीवाले (एखाद् दुसरा सरदारजीदेखील!) हजर होते. सगळय़ांच्या चेहऱ्यावर औत्सुक्य होते. तमासगिरांनी अस्सल मऱ्हाटी मुजरा ठोकला. गण सुरू झाला आणि लक्षात आले की, वाद्ये कमी आहेत. गाणारेही एकटे अरुण जोगळेकर. बाकीचे क्षीण आवाजात साथ करीत होते. अशा कमकुवत गाण्यावरही विघ्नहर्ता प्रसन्न झाला असावा. कारण यानंतर प्रयोग जो चढू लागला, तो चढतच गेला. मिनिटा-मिनिटाला हशे होत होते. राजा आणि प्रधान एका योग्याच्या तलाशीत हेलिकॉप्टरने हिमालयात जायला निघतात. या प्रवासात लेखिकेने राजकारण, स्थानिक घडामोडी, सरकारी कुलंगडी, लाल फीत, विख्यात/ कुविख्यात धेंडे- सर्वाना व्यवस्थित कोपरखळय़ा मारून घेतल्या आहेत.
राजा : परधानजी, हमारी गैरमोजूदगी में किसीने बगावत की तो?
प्रधान : बगावत कौन करेगा महाराज? मैं तो आप के साथ ही हूं.
अखेर जेव्हा प्रधानजींची लबाडी उघडकीला येते तेव्हा राजा त्याला मृत्युदंड ठोठावतो. मग थोडा दयाशील होऊन त्याला त्याचा मृत्यू कसा व्हावा, याचा निर्णय घेण्याची सवलत देतो. हत्तीच्या पायाखाली की सुळावर, की फासावर, की कडेलोट, इ. यावर चतुर प्रधान म्हणतो, ‘‘मैं बुढापे से मरना पसंत करूंगा, सरकार.’’
हिमालयातल्या जंगलात झाडाला ‘दो या तीन-बस्स’ हे पोस्टर लावलेले आढळतात. अशा कितीतरी जागा सांगता येतील.
अरुण आणि सईने तमाशा अत्यंत परिश्रमपूर्वक बसवला होता. मोकळा अभिनय आणि नाटय़ानुभवाने कमावलेले कसब यांचा सुंदर मिलाप पाह्यला मिळाला. अरुण आणि गोविंदने पोट धरून हसवले. दोन्ही मुली मराठी नसूनही त्यांनी मराठी ठसका छान टिपला. चंपक फार सुरेख नाचली. या तमाशाने फार मोठा फड जिंकला. संगीताची साथ असती तर दुधात साखर पडली असती.
– चंद्रप्रभा जोगळेकर- लोकसत्ता.
हे झाले दिल्लीचे अभिप्राय. मुंबईला आम्ही भाभा, षण्मुखानंद आणि तेजपालमध्ये प्रयोग केले. मधूला रजा न मिळाल्यामुळे राणीचे काम मी केले. मुंबईकरांनी उचंबळून आम्हाला दाद दिली. त्रुटींकडे कानाडोळा केला आणि नावीन्याचं स्वागत केलं. काही अभिप्राय :
वेळेच्या दृष्टीने पाहिले तर मराठी तमाशा पाहणाऱ्यांना हा हिंदी तमाशा अपुरा वाटेल. तीन तासांचा खेळ पाहणारा प्रेक्षक हिंदी तमाशा दीड तासातच आटोपला म्हणून मनात चुटपुटेल यात शंकाच नाही. त्यांच्या मते, हे मराठी तमाशाचे हिंदी ट्रेलर झाले. हे ट्रेलरदेखील हिंदी जाणणाऱ्यांना संपूर्ण तमाशाची चटक लावायला समर्थ झाले आहे. आणि म्हणूनच ते सादर करणाऱ्या संस्थेचं उद्दिष्ट सफल झाले आहे. कितीतरी विनोद जागोजाग पेरले आहेत. प्रचलित घडामोडींतील विनोदस्थळे अचूक हेरण्यात लेखिका शंभर टक्के यशस्वी झाली आहे.. हा तमाशा मराठी नसूनही ‘मराठी’ भावला, आणि हिंदी असूनही ‘मराठी’ जाणवला, ही या प्रयोगाची सर्वात महत्त्वाची जमेची बाजू.
– कमलाकर नाडकर्णी
कमलाकर नाडकर्णीची शाबासकी- भले ‘ट्रेलर’ म्हणून का होईना, मिळाल्यावर आणखी काय पाहिजे? ‘धर्मयुग’च्या ‘यज्ञ’च्या परीक्षणामधल्या काही उक्ती..
‘राजनीतिक और सामाजिक गतिविधियोंपर की चोट प्रशंसायोग्य है. ‘इनकम टैक्स जगजीवन राम से मांगो’ यह ग्वालन का कहना माइने रखता है. ‘टूथपेस्टसे लेकर प्रधानमंत्री तक- आजकल प्रचार के बिना कुछ नहीं बिकता..’ आदि खूब चुटकियां पात्रोंद्वारा ली है.. क्या हिंदी भाषियों से यह आशा की जा सकती है, कि वे भी आगे बढम्कर कुछ करेंगे?’

The wit flies like fireworks and is aimed at current newsworthy features, such on the tax evading jagjivan Ram… The laughter is endless… it was a debt repaid by artists who have moved from Maharashtra and settled down in Hindi speaking Delhi. – Economic Times

Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
nagpur, couple, Kidnapped, Young Engineer girl, Inspired by Web Series, police arrested, accused, marathi news,
वेबसिरीज बघून आखला अपहरणाचा कट; तरुणीचे अपहरण, प्रेमीयुगुल…
Mental Stress These 2 pranayama routines control anxiety best
Mental Stress: मानसिक ताण कसा कमी करावा? रोज करा ‘हे’ दोन प्रभावी प्राणायाम अन् व्हा स्ट्रेस फ्री

शशिकांत नार्वेकर लिहितात-
‘झणझणीतपणा हा तमाशाचा कणा लेखनात आढळतो. निवडणुका, गरिबी हटाव, नसबंदी, सुप्रीम कोर्ट, नक्षलवादी, पूर्व बंगालमधील यादवी, इ. गोष्टींवर उपहासगर्भ विनोदाच्या फैरी झाडल्या आहेत. शेवटी शेवटी ‘या तमाशाचा संदेश काय?’ असे कलावंत एकमेकांना विचारतात. ‘राष्ट्रीय एकात्मता,’ ‘हिंदू-मुस्लिम भाई भाई’,‘कम संतान, सुखी इन्सान’ अशी असंबद्ध उत्तरे येतात. मग वैतागून जोगळेकर विचारतात, ‘पण तमाशाला संदेशाची गरजच काय?’ मग ध्यानात येते, की संदेश असल्याखेरीज सरकारी ग्रांट मिळणार नाही. मग ‘सत्यमेव जयते’ हा संदेश असल्याचे सांगून सगळे शेवटची भैरवी गातात..
बहु नाही, बहु नाही मांगते प्रभु..
बहु नाही, बहु नाही, मांगते..