मकरंद देशपांडे

गेली साडेचारशे वर्षे कोणीतरी-कुठेतरी या भूतलावर त्याला स्पर्श करत असतो, साद घालत असतो, मिठी मारत असतो, त्याला उशी म्हणून वापरत असतो, त्याला पांघरूण बनवून त्याच्या प्रतिभेची ऊब घेत असतो. त्याला देवघरात बसवून पूजा करत असतो. त्याची चोवीस तास पारायणं करत असतो, तो आहे विल्यम शेक्सपिअर!

अगदी एखाद्या रंगकर्मीनं ठरवलं की मी कधीच शेक्सपिअरचं नाटक करणार नाही, कारण मला फक्त माझ्याच मनातली, माझीच नाटकं करायची आहेत, तरीही जर त्याची कारकीर्द लांबली तर शेक्सपिअर त्याला शिवल्यावाचून राहणार नाही. कारण जसा शिष्य हा गुरूला निवडत नसतो, गुरू हा शिष्य ठरवतो, तसाच शेक्सपिअरला आपण थांबवू किंवा आणू शकत नाही. त्याचं येणं-जाणं तोच ठरवतो, म्हणून की काय, तो आणखी हजार वर्षे राहणार!

शेक्सपिअर खरं तर आता कंटाळवाणा झालाय असंही आपण म्हणू शकतो. कारण एकेका रंगकर्मीनं निदान चार ते पाच किंग लिअर, हॅम्लेट, मॅकबेथ, ऑथेल्लो मंचित झालेली पाहिलेली असतील किंवा त्यात कामही केलेलं असेल. अगदी राज्यस्तरीय नाटय़स्पर्धा ते हौशी रंगभूमी ते व्यावसायिक नाटक.. काही नशीबवान रंगकर्मीनी परदेशात  जाऊन नजरेत मावणार नाही अशी त्यांची भव्यदिव्य निर्मिती पाहिली असेल. शेक्सपिअर हा माझ्या मते सृष्टीतला सर्वात मोठा प्लेबॉय आहे. त्याच्या एवढा चार्मिंग आणि बोल्ड लेखक (भावना) भूतलावर झाला नाही असं नाही, पण तो अत्यंत सहज आणि प्रतिष्ठेनं सगळ्यांपर्यंत पोहचला. बघणाऱ्यालाही प्रतिष्ठा मिळते. नाटकाचं तिकीट काढताना, उगाच शेक्सपिअरन इतिहासात जमा झाल्यासारखा प्रेक्षक आनंदित होतो. शेक्सपिअर ही एक गुहा आहे- जी साता समुद्राखालून, पर्वतांमधून साऱ्या पृथ्वीभर पसरली आहे. रंगमंच हा जर धर्म असेल, तर त्यात बरेच शेक्सपिअरन समाजाचे आहेत. ‘To be or not to be!’, ‘you too Brutus!’,‘I wasted time, and now doth time waste me!’ अशी धर्मगुरू शेक्सपिअरची अनेक उपदेशपर सुवर्णवाक्य आहेत- ज्यात जीवनाच्या विरोधाभासाचं दर्शन नाही, तर अस्तित्वातल्या आत्म्याला भिडणारं ज्ञान आहे.

शेक्सपिअर आवडायला त्याचं सादरीकरण चांगलं हवं. कारण शेक्सपिरिअन नाटकाच्या कथानकातील गुंतागुंत, संवादातील प्रतीकांची भव्यता, नाजूकता, प्रेक्षकांपर्यंत समर्थपणे पोहचवायला सादरीकरण उपयोगी पडतं. प्रेक्षकांच्या मनाला भारावून टाकणारा अनुभव दिल्याशिवाय शेक्सपिअर जिवंत होत नाही. कितीतरी अशी सादरीकरणं पाहिली आहेत, ज्यामुळे शेक्सपिअर थडग्यात नक्कीच गारठला असेल. पण काही सुंदर ताकदीचे प्रयोगही पाहिले आहेत. संजय मोनेचा ऑथेल्लो, विवेक लागूचा लॅगो (’ lago), रेणुका शहाणेची डेस्डिमोना, सलीम घोषचा शायलॉक, हबीब तन्वीर यांनी केलेला छत्तीसगडी मिडसमर नाईट्स ड्रीम, फूट्सबर्न कंपनीचा रोमिओ-ज्युलिएट शेक्सपिअरला विसावून गेले असतील.

शेक्सपिअरची नाटकं काही वेगळ्या रूपात, शैलीत सादर केलेली आहेत. मराठी नाटकाच्या इतिहासात अगदी वरच्या रांगेत सहज उभं असेल असं अभिजात नाटक- नटसम्राट. हे ‘किंग लिअरचं’ कौटुंबिक रूप. वि. वा. शिरवाडकरांनी सम्राटाचा नटसम्राट केला! मला वाटतं की, हा विश्वात झालेल्या अनेक अनुवाद किंवा बेतलेलं नाटक- ज्यात ठळक अक्षरांत नोंद झालेला मास्टरस्ट्रोक आहे. त्यांनी लिहिलेल्या संवादातले लयबद्ध, काव्यमय संवाद नटांना सम्राटपद बहाल करतात. खरं तर कळतनकळत असं म्हटलंही जातं की नट जेव्हा नटसम्राट करतो, तेव्हा तो नट असण्याच्या पूर्णत्वाला पोहोचलेला असतो.

रजत कपूर या दिग्दर्शकाने हॅम्लेट, मॅकबेथ, किंग लिअर हे क्लोन शैलीत सादर केले. रजत शेक्सपिअरच्या पात्रांच्या मूळ अस्तित्वाचं खच्चीकरण करतो. त्यांचं तो हसू करतो. हा मला थोडासा काव्यात्म दृष्टिकोन वाटतो. तो शेक्सपिअरचं बलस्थान असलेले संवादच काढून टाकतो आणि मग त्यासाठी जिबरीशसारखी बाराखडी नसलेली भाषा वापरतो.. त्यामुळे पात्र त्या भाषेत बोलतं तेव्हा आक्रोश किंवा आयुष्याचा मूर्खपणा हेच आपल्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळे हसू येतं ते नाकारलेल्या संहितेचं. पण सादरीकरण, अभिनय फारच छान. शेवटी चांगल्या माकडचेष्टा किंवा गमतीजमतीसाठी अंगी कला हवीच. शेक्सपिअर नक्कीच त्याच्याकडे एक डोळा बंद करून संशयी नजरेनं पाहत असेल. पण प्रेक्षक खूश असल्यानं तो दुसरा डोळा उघडायचं टाळत असावा!

मला नेहमी वाटायचं की, शेक्सपिअरची नाटकं आता करण्यात काय अर्थ आहे? आणि उगाच त्याचे संदर्भ अजून शोधत स्वत:ला हुशार म्हणवून घेण्यात हातात फक्त शेक्सपिअर नाव येणार, बाकी काही नाही. जवळपास पन्नास नाटकं लिहून झाल्यावर मला असं वाटलं की, आपण मराठीत नाटक लिहावं. आणि का कुणास ठाऊक हातातल्या पेनासमोर शेक्सपिअरचा म्हातारा ‘किंग लिअर’ उभा राहिला आणि जवळजवळ एकटाकी पहिला अंक लिहिला गेला. फक्त पहिल्या अंकाच्या शेवटी एक ट्विस्ट लिहिला गेला आणि मीच गांगरलो. शैलेंद्र बर्वे, जीतेंद्र जोशी, टेडी मौर्य, निवेदिता पोहनकर या माझ्या लेखनाच्या खास प्रेमात असलेल्यांना पहिला अंक ऐकवला आणि सगळ्यांना साधारण तेवढाच धक्का बसला- माझ्याएवढाच!

‘किंग लिअर’ या नाटकात मुळात एक सम्राट जेव्हा आपलं राज्य आपल्या तीनही मुलींमध्ये वाटायचं ठरवतो, तेव्हा त्यांना सांगतो की माझ्यावर किती प्रेम करता हे सांगा. गंमत अशी होते की मोठी आणि मधलीचं प्रेम ओथंबून वाहिल्यानंतर सम्राटाचं ज्या छोटय़ा मुलीवर सगळ्यात जास्त प्रेम असतं- ती नेमकी काहीच बोलत नाही. कारण तिचं म्हणणं पडतं की, जे आहे ते सांगण्याची आवश्यकता काय? झालं, सम्राट तिच्या नकाराला विद्रोह मानतो आणि तिला राज्याबाहेर काढतो. आपल्या दोन मुलींमध्ये राज्य वाटून टाकतो. आता मात्र राज्य वाटून झाल्यावर उरला-सुरला सम्राट असतो तो एक म्हातारा बाप. हळूहळू त्याच्या मुलींना त्याच्या म्हातारपणाचा आणि त्याच्या अंगवळणी असलेल्या सम्राटी अधिकाराचा त्रास होतो. त्याला त्याचा दरबारी विदूषक त्याच्या वास्तविक परिस्थितीबद्दल खरी माहिती देत असतो, पण तो काही ऐकत नाही आणि मग उशीर होतो. अपमानामुळे दरबार, महाल सोडलेला सम्राट वेडा होतो. मुली आपापसांत युद्ध करतात.

सारांश- सम्राट अजिंक्य असतो, पण बाप म्हणून हरतो.. असं काहीसं कथानक. पण माझ्या पहिल्या अंकात सम्राटाचा सम्राटपणा त्यानेच मुलींच्या स्वाधीन केलेल्या अहंकारमय प्रेमापोटी असंख्य तुकडय़ांत कापला जातो, उरतो मात्र हरलेला म्हातारा आणि त्याचा विदूषक- जो त्याला सांगतो की, तू केलेल्या घोडचुकीमुळे येणाऱ्या शतकांना हादरा बसेल. शेक्सपिअरचा म्हातारा भविष्यातही असाच चुका करत वेडा होईल. भग्न अवस्थेत आढळून येईल आणि विदूषक खरंच सम्राटाला भविष्यकाळात म्हणजे आजच्या काळात घेऊन येतो- जिथे सम्राट हा एका कॉलेजचा निवृत्त मुख्याध्यापक आणि विदूषक हा हास्य या विषयावर पीएच.डी. केलेला त्यांचाच विद्यार्थी असतो. इथे पहिला अंक संपतो.

दुसऱ्या अंकात कथानक साधारण तसंच राहतं, पण आजच्या काळातलं, नटसम्राटचा आभास देणारं, पण इथे मी मेलोड्रामाला फार्सकिल रूप दिलं. कारण मला वाटलं की, साडेचारशे वर्ष जे नाटक सतत चालू आहे त्यावर आता रडणं थांबवलं पाहिजे. वास्तविक दु:खाला पूर्णविराम देता येत नसला तरी नाटकातल्या मेलोड्रामाला निश्चितच विराम देता येईल.

निवृत्त मुख्याध्यापक मुलींनी घराबाहेर काढल्यावर हास्य या विषयावर पीएच.डी. केलेल्या आपल्या विद्यार्थ्यांला सांगतो, ‘‘माझी शोकांतिका मला फार्सकिलच हवी आहे म्हणून स्वत:ला आवर. माझ्या नशिबाला मी फोडलंय, ते तू का डस्टरनं साफ करावं?, म्हणून स्वत:ला आवर. जगता जगता wear and tear होतंच. कवी म्हणतात, आभाळही फाटतं, तर माझं साधं काळीज उसवणार नाही का? आवर स्वत:ला. माझ्या आधी माझी गोष्ट अंतिम रेषेकडे चालली आहे.

माझ्यासोबत एक तुफान रेषेकडे चाललंय. तेव्हा गोष्टीला सांग, मी तुफानावर आरूढ होऊन मोठय़ा दिमाखानं येत आहे. कुणी घर देता का घर असा आक्रोश करत वेडय़ासारखं फिरत नाही राहणार. माझ्या स्वागतासाठी जोरदार तयारी करा. काही नाटककारांना बोलवा, काही समीक्षकांना बोलवा. काही मुलां-मुलींना- ज्यांना बाप-पोर हे नातं माहिती आहे त्यांना बोलवा. ‘भास्करा काही बोलत का नाहीस? अंतिम रेषेवर फोटोग्राफर असणार. माझ्या मागे तू असल्यानं तू फोटोत येणार तेव्हा तुझा चेहरा उगाच दु:खी दिसणार आणि दु:खाला घ्यायला आता कुणी नाही. आणि कशाला घ्यावं कुणी दु:खं विकत? घ्यावं फक्त सुख, मग ते कुठलंही असो- अगदी दु:खाचं सुद्धा! दु:खं आताच्या काळात विकलं जातंय सोशल मीडिया, टीव्हीवर, घराघरांत! तेव्हा त्याला दु:खं न मानता विकलं गेलेलं आसुरी सुख म्हणता येईल.’’

नाटक लिहिताना मी पहिला अंक काव्यात्मक, लयबद्ध लिहिला. दुसऱ्या अंकात ताल ठेवला, पण बेताल वर्तमानाला हसून उडवून लावलं. विदूषक म्हणतो की, हसण्याचे प्रकार चार. एक प्रकार गालात हसण्याचा, दुसरा-दात दाखवून हसणं, तिसरा प्रकार पोट धरून हसणं आणि चौथा प्रकार गडाबडा लोळून हसण्याचा. गालात हसतो जन्म, दात दाखवून हसतं बालपण, पोट धरून हसतं तारुण्य आणि गडबडा लोळून हसतं ते म्हातारपण.

रोहित हळदीकरनं विदूषक सादर करताना आपल्या देहबोलीचा सुरेख वापर केला आणि दुसऱ्या अंकातला भास्कर तेवढाच संयमित. मोठी मुलगी सुखदा खांडकेकरनं सादर करताना पात्रातला धूर्तपणा आणि कपटी बाजू खूपच विषारीपणे रंगवली. मधली मुलगी आकांक्षा गाडेनं साकारताना त्यातली दुष्ट प्रवृत्ती उत्तम मांडली. सुखदा आणि आकांक्षाने नृत्याद्वारे त्यांची मानसिक अस्थिरता आणि निष्ठुरता फारच परिणामकारक केली. आरती मोरेनं छोटी मुलगी साकारताना प्रेम, सहनशीलता आणि नीतीमूल्यांसाठीचा त्याग भूमिकेतून दाखवताना, त्यात खूपच समजूतदारपणा आणि गोडवा दाखवला.

सम्राट मी होतो. मी पहिल्या अंकातला सम्राट करताना, तो पोशाख घातल्यावर कुठल्यातरी सम्राटाचं भूत अंगात शिरायचं आणि मुख्याध्यापकातला वेडा म्हातारा करताना डोळ्यातनं पाणी कधी यायचं कळायचं नाही आणि प्रेक्षक मात्र हसायचे.

टेडी मौर्यानं दोन्ही अंकाचं नेपथ्य दाखवताना ऐतिहासिक आणि आजचा काळ खूपच छान दाखवला. ऐतिहासिक सेट काही सेकंदात उघडून सहज वर्तमान काळात यायचा. त्याला साथ दिली अमोघ फडकेच्या दोन वेगळे काळ दाखवणाऱ्या प्रकाशयोजनांनी. शैलेंद्र बर्वेचं काळ बदलणारं गाणं, जीतेंद्र जोशीने लिहिलं. ज्यामुळे खरंच प्रेक्षक एका काळातून दुसऱ्या काळात जायचे.

जीम कॅरीच्या ‘द मास्क’ या क्लासिक हॉलीवूड पॉप्युलर चित्रपटाचे दिग्दर्शक चक रसल हे आवर्जून प्रयोगाला बसले. त्यांना एकही वाक्य कळत नसलं तरी त्यातलं नाटय़ आणि वेगळेपण एवढं भावलं की ते म्हणाले, ‘‘हे शेक्सपिअरच्या सादरीकरणाच्या इतिहासात इतिहास घडवणारं नाटक ठरेल!’’

जय शेक्सपिअर! जय म्हातारपण!

जय विदूषक ! जय शहाणपण!

mvd248@gmail.com