25 September 2020

News Flash

या मातीतील सूर : ‘पिंजरा’ = लावणी!

मराठी संगीतामध्ये लावणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तर पेशवाईमध्ये उगम पावलेली ही लावणी मराठी मातीत घट्ट मूळ धरून रुजली आणि तिने मराठी रसिकजनांच्या मनाचा ताबा घेतला.

‘The Blue Angel’ या मूळ जर्मन चित्रपटावर ‘पिंजरा’ आधारित आहे.

नरेंद्र भिडे – narendra@narendrabhide.com

मराठी संगीतामध्ये लावणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तर पेशवाईमध्ये उगम पावलेली ही लावणी मराठी मातीत घट्ट मूळ धरून रुजली आणि तिने मराठी रसिकजनांच्या मनाचा ताबा घेतला. अर्थातच मराठी नाटक आणि मराठी चित्रपट या दोन्हींत लावणी शिरकाव करणार हे उघडच होतं. आणि त्याप्रमाणे १९५० च्या सुमारास मराठी चित्रपटांमध्ये लावणी दिसू लागली. लावणीचा जो मूळ चेहरा होता त्यात चित्रपटाच्या कथेनुसार आणि गरजेनुसार बदल होत गेले आणि ‘सिनेमातील लावणी’ असा लावणीचा एक वेगळा प्रकारच रूढ होत गेला. मूळ लावणीच्या प्रकारांमध्ये ढोबळमानाने बैठकीची लावणी आणि फडावरची लावणी असे दोन मुख्य प्रकार मानता येतील. त्यातही छक्कड, बालेघाटी लावणी, पंढरपुरी लावणी, चौकाची लावणी, इ. उपप्रकार त्यांच्या त्यांच्या बारकाव्यांसह आणि गुणधर्मासह पारंपरिक लावणीच्या मंचावर शिल्लक होते; पण त्याच लावणीचं सिनेमात रूपांतर होताना तिला एक वेगळा ग्लॅमरस चेहरा प्राप्त झाला. त्याकरता वेगळीवेगळी वाद्ये आणि म्युझिकल अ‍ॅरेंजमेंट्सचा समावेश होत गेला आणि मूळ लावणीच्या बाजापेक्षा एक निराळं रूप घेऊन ही लावणी उभी राहिली. सिनेसंगीताच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक संगीतकारांनी, गायक-गायिकांनी आणि गीतकारांनी लावणीला लोकाभिमुख केलं आणि पुढील अनेक र्वष या लावणीने मराठी चित्रपटांमध्ये बस्तान बसवलं. या सर्व चित्रपटांमध्ये मानाचं स्थान मिळवलेला चित्रपट म्हणजे व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’!

‘पिंजरा’चे संगीतकार राम कदम हे एक उत्तम क्लॅरिनेट वादक होते. पहिले काही दिवस ते निरनिराळ्या संगीतकारांकडे सहाय्यक म्हणून काम बघत होते. वसंत पवार, सुधीर फडके यांच्यासारख्या थोर संगीतकारांचा सहवास त्यांना लाभला. राम कदम यांची कारकीर्द बघितली तर त्यांनी बऱ्याच प्रकारच्या गाण्यांना संगीत दिलं आहे असं लक्षात येतं. दादा कोंडके यांच्या ‘सोंगाडय़ा’ चित्रपटात ‘माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी’सारखी गाणीही त्यांनी केली आणि लोकसंगीतावर आपली हुकूमत आहे हे सिद्ध केलं. ‘भोळीभाबडी’ आणि ‘देवकीनंदन गोपाळा’सारख्या चित्रपटांत उत्तम प्रासादिक असे अभंग त्यांनी दिले. ‘सत्यम् शिवम् सुंदरा’सारखं शास्त्रीय रागसंगीतावर आधारित गाणंही त्यांनी दिलं आणि  ‘अ आ आई’सारखं बालगीतही रामभाऊंच्या नावावर आहे.

पण खऱ्या अर्थाने राम कदम यांचं नाव घेतलं की डोळ्यासमोर येते ती लावणीच! लावणीवर आधारित ‘अमर भूपाळी’, ‘रामजोशी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये लावणीचा भरपूर वापर केला गेला होता. परंतु त्या लावण्या अभिजात ढंगाच्या होत्या आणि समाजातल्या सर्व थरांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने थोडय़ाशा अवघड होत्या असं म्हणता येईल. याच प्रवासात पुढे वसंत पवार यांनी अप्रतिम लावण्या रचल्या आणि त्या लोकांपुढे आणल्या. ‘सांगत्ये ऐका!’ हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. विश्वनाथ मोरे, वसंत देसाई, वसंतराव मोहिते, सुधीर फडके, श्रीनिवास खळे यांसारख्या संगीतकारांनीसुद्धा लावणी हा प्रकार हाताळला. मात्र, या सर्वाना मागे टाकून खऱ्या अर्थाने लावणी अत्यंत लोकप्रिय करण्याचे श्रेय ‘पिंजरा’ या चित्रपटाला द्यावे लागेल. यातील प्रत्येक गाणं हे त्याच्या वैशिष्टय़ांनी सजलेलं आहे आणि या प्रत्येक गाण्यावर खूप भरभरून लिहिता येईल.

या चित्रपटाची कथा साधी आहे. एका गावामध्ये एक मास्तर असतात. आणि या मास्तरांमुळेच ते गाव आदर्श गाव म्हणून नावारूपाला आलेलं असतं. या गावामध्ये एक तमाशाचा फड येतो आणि त्या फडामधील प्रमुख नर्तकीचा अहंकार आणि मास्तरांचं पावित्र्य यांच्यातील संघर्षांची ही कहाणी आहे. ‘The Blue Angel’ या मूळ जर्मन चित्रपटावर ‘पिंजरा’ आधारित आहे. परंतु या चित्रपटात मराठी लावणीचा वापर करून एक उत्तम व्यावसायिक चित्रपट होऊ शकतो हे शांतारामबापूंच्या पारखी नजरेनं हेरलं आणि ‘पिंजरा’ने इतिहास घडवला. या चित्रपटात लावण्यांचा अक्षरश: खजिना आहे! ‘मला लागली कुणाची उचकी’  किंवा ‘छबीदार छबी’सारख्या नृत्यप्रधान लावण्या आहेतच; परंतु ‘तुम्हावर केली मी मर्जी बहाल’सारखं शृंगारिक, मादक गाणंसुद्धा आहे. ‘दे रे कान्हा चोळी लुगडी’सारखी आध्यात्मिक लावणीही आहे आणि शेवटाकडे ‘कशी नशिबाने थट्टा आज मांडली’ हे बाबूजींच्या आवाजातील अत्यंत करुण गाणंही यात आहे.

पण या सगळ्या गाण्यांमध्ये एक अतिशय वेगळं गाणं रामभाऊंनी दिलं- जे गाणं मराठी संगीतप्रेमी कधीच विसरणार नाहीत. रामभाऊंच्या सहकाऱ्यांमध्ये एक विष्णू वाघमारे नावाचा झीलकरी होता. त्याच्याकडून ‘गं साजणी..’ हे गाणं गाऊन घेऊन रामभाऊंनी सिक्सर मारली आहे. अनेक मराठी वाद्यवृंदांतून या गाण्याचं सादरीकरण मी अनेक वेळा ऐकलेलं आहे. परंतु खेदाने असं म्हणावंसं वाटतं की, या गाण्यातला गोडवा हा कुणालाच नीट उमगलेला नाही. लोक हे गाणं उगाचच उंच पट्टीमध्ये गाऊन त्या गाण्यातला खरा रस बाहेरच येऊ देत नाहीत असं मला नेहमी वाटतं. हे गाणं बघताना निळूभाऊंच्या चेहऱ्याकडे जरी नुसतं बघितलं तरीसुद्धा आपल्याला कळू शकतं की हे गाणं कशा पद्धतीने गायला हवं. नटाच्या चेहऱ्यावरचं हास्य हे गायकाच्या गाण्यात आणि वृत्तीतही असणं किती महत्त्वाचं असतं, ते हे गाणं ऐकल्यानंतर प्रकर्षांने जाणवतं. मराठीतील सर्वोत्तम गाण्यांमध्ये या गाण्याचा नंबर निदान मी तरी खूप वर लावीन, हे निश्चित!

रामभाऊंबरोबरच या सर्व गाण्यांना जर खरंच कुणी खूप उंचीवर नेऊन ठेवलं असेल, तर त्याकरता उषा मंगेशकर यांचं नाव घ्यायला लागेल! रामभाऊंनी गाणी रचताना उषाजींना डोळ्यासमोर ठेवूनच रचना केल्याचं दरवेळेस जाणवतं. उषाजींच्या आवाजातला खमकेपणा आणि ठसठशीतपणा इतका प्रभावी आहे की त्यांच्याशिवाय या गाण्यांचा विचारच होऊ शकत नाही! या चित्रपटातील माझं अजून एक आवडतं गाणं म्हणजे ‘इष्काची इंगळी डसली..’ या गाण्याची सुरुवात जरी बैठकीच्या लावणीप्रमाणे होत असली तरी ध्रुवपद संपता संपता ते अचानक फडावरच्या लावणीचं रूप घेतं आणि जादूच होते. यमन रागाचा इतका सुंदर वापर लावणीमध्ये केलेला खूप क्वचित आढळतो. असंच अजून एक भन्नाट गाणं म्हणजे ‘दिसला गं बाई दिसला..’ हे गाणं सुरू होतं तेव्हा एक ढोल वाजतो आणि धनगरी गीताशी साधम्र्य साधणारी चाल आपल्याला ऐकू येते. आणि मग अचानक तो ढोल बंद होतो आणि ‘दिसला गं बाई दिसला’ या ओळीवर ढोलकीचा एक ‘पैसे वसूल’ ठेका सुरू होतो. केवळ अजब! स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं ‘दे रे कान्हा चोळी लुगडी’ हे गाणंसुद्धा या चित्रपटात आहे. परंतु वर उल्लेख केलेल्या सर्व गाण्यांमध्ये हेच गाणं मला तुलनेनं थोडंसं अस्थानी वाटतं. कदाचित लताजींचा अभिजाततेकडे जाणारा दैवी आवाज चंद्रकलेच्या भूमिकेला पुरेसा न्याय देत नाही की काय असं वाटून जातं. अर्थात हे माझं मत.

रामभाऊंच्या ‘पिंजरा’ चित्रपटातील संगीत मुख्यत्वे चार अतिशय बुलंद पायांवर उभे आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे उषाजी या आहेतच; परंतु गीतकार जगदीश खेबुडकर यांचे शब्द या सगळ्या वातावरणाला इतके पोषक आहेत, की संगीतकार आणि गीतकार यांचं इतकं सुरेल अद्वैत फार क्वचित ऐकायला मिळतं. त्यातली थट्टा, शृंगार, मादकता, कारुण्य आणि निरागसतासुद्धा खेबुडकर यांच्या शब्दांनी इतकी अप्रतिम तोलून धरली आहे की त्याला दुसरं त्या तोडीचं उदाहरणच नाही. ‘सार वरपती, रसा भुरकती, घरात पोळी अन् भायेर नळी’सारख्या ओळी वाचून बघा.. अद्वितीय!

आणखीन दोन अत्यंत महत्त्वाच्या शिलेदारांचं नाव घेतल्याशिवाय ‘पिंजरा’च्या संगीताचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. त्यातील पहिलं नाव म्हणजे आदरणीय संगीत संयोजक इनॉक डॅनियल्स! डॅनियल्स हे मुळात ओ. पी. नय्यर, सलील चौधरी, खय्याम इत्यादी हिंदी संगीतकारांकडे खूप र्वष काम केलेले आणि आणि मुळात पाश्चात्त्य शास्त्रीय संगीताचे भक्कम अधिष्ठान असलेले अत्यंत विद्वान आणि प्रयोगशील असे संगीत संयोजक! परंतु त्यांची आणि रामभाऊंची गट्टी जमली आणि अनेक उत्तम गाणी या दोघांनी एकत्र निर्माण केली. त्यांच्यावरचे हिंदी संगीताचे संस्कार कुठेही या मराठमोळ्या गाण्यांवर लादले गेले आहेत असं अजिबात जाणवत नाही. परंतु तरीही थोडेसे स्वातंत्र्य घेऊन आणि आपल्या अनुभवाचा वापर करून डॅनियल्स या गाण्यांना विलक्षण सजवतात. बासरी, तंतुवाद्य, क्लॅरिनेट  यांसारख्या वाद्यांचा आणि कोरसमधील झीलचा उठावदार वापर हे या गाण्यांचं एक मोठं वैशिष्टय़ आहे.

अजून एक नाव घेणं क्रमप्राप्त आहे. रामभाऊ आणि डॅनियल्स यांना सगळ्यात मोलाची साथ लाभली आहे ती पंडितराव विधाते यांच्या ढोलकीची. आज इतक्या वर्षांनंतर ऐकतानासुद्धा ढोलकीवरचा दाया-बायाचा समतोल हा अचंबित करणारा आहे! असं वाटतं की, पंडितराव नसते तर या गाण्यांचा परिणाम निदान पन्नास टक्क्यांवर तरी आला असता. ‘दिसला गं बाई दिसला’मध्ये वाजणाऱ्या ढोलकीच्या ढंगदार ठेक्याला आजसुद्धा सर्व तालवादक ‘पंडितराव ठेका’ या नावाने ओळखतात आणि त्यांना मानवंदना देतात! आपल्या एखाद्या कलाकृतीला असा बहुमान मिळणं यासारखं दुसरं भाग्य नाही.

‘पिंजरा’ या चित्रपटापासून मराठी रंगीत चित्रपटांचं युग सुरू झालं आणि त्या अर्थाने एक नवीन वाट मराठी चित्रपटसृष्टीने धरली. मात्र, खऱ्या अर्थी या वाटेवर कुणी अप्रतिम नक्षीकाम असलेली रंगीत रांगोळी काढली असेल तर ती ‘पिंजरा’ चित्रपटातील लावण्यांनी! पुढील अनेक र्वष एखाद्या परप्रांतीय माणसाकरता मराठी लावणी म्हणजे ‘पिंजरा’असं समीकरण तयार झालं आणि तेच या संगीताचं खूप मोठं यश आहे.

हे समीकरण थोडंफार बदलण्याचं श्रेय नंतरच्या काळात दोन चित्रपटांना जातं. आनंद मोडक यांचा ‘एक होता विदूषक’ आणि अजय-अतुल यांचा ‘नटरंग’! परंतु त्याविषयी परत केव्हातरी..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2020 12:21 am

Web Title: marathi music culture lavni marathi movie pinjra ya matitil sur dd70
Next Stories
1 निकड.. अर्थचक्राच्या पुनश्च आरंभाची!
2 सर्वंकष सुधारणांचे पर्व
3 हास्य आणि भाष्य : ते आले आणि ते गेलेसुद्धा!
Just Now!
X