‘घाशीराम कोतवाल’ या नाटकामुळे मराठी संगीत रंगभूमीवर जसं नवं स्थित्यंतर झालं, तसंच त्याची निर्मिती करणाऱ्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) या प्रायोगिक नाटय़संस्थेमध्येही झालं. ‘पीडीए’तल्या ‘घाशीराम’शी संबंधित आम्हा तरुण तुर्कानी डॉ. जब्बार पटेल यांच्या नेतृत्वाखाली २७ मार्च १९७३ रोजी जागतिक रंगभूमीदिनाचे औचित्य साधून ‘थिएटर अ‍ॅकॅडमी’ या नव्या नाटय़संस्थेची स्थापना केली. नेसत्या वस्त्रांनिशी ‘पीडीए’तून बाहेर पडलेल्या आम्हा रंगकर्मीना लगेचच ‘घाशीराम’चे प्रयोग सुरू करणं शक्यच नव्हतं. तेव्हा नव्या प्रायोगिक एकांकिकांचे प्रयोग करण्याचं ठरवलं. दोन एकांकिकेचा मिळून असा नाटय़ानुभव आम्ही सादर करू लागलो, शिवाय दरवर्षी नेमानं येणाऱ्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धा.. वेगवेगळ्या महाविद्यालयांतून आमच्यातले रंगकर्मी एकांकिका सादर करत. माझा या सगळ्यातला सहभाग म्हणजे बॅक स्टेज सांभाळणं, पाश्र्वसंगीताकरिता सुयोग्य संगीतखंड वेगवेगळ्या चित्रपटांतील गाण्यांतून अगर सिम्फनीमधून उचलून प्रत्यक्ष प्रयोगाकरिता ध्वनिफीत तयार करणं.. प्रसंगी सायकलवरून टेपरेकॉर्डर किंवा स्पॉटलाईट आणि डिमरची बरणी प्रयोगस्थळी वाहून नेणं.. हे सगळं १९७४पर्यंत चालत राहिलं. १९७४च्या सुरुवातीला थिएटर अकादमीतर्फे ‘घाशीराम’चे प्रयोग पुन्हा नव्या जोमानं सुरू झाले.
..पण ‘घाशीराम’खेरीज मला स्वत:ची अशी ओळख पटवायला संधीच मिळत नव्हती. मंगेश लॉजमध्ये कॉट बेसिसवर राहून बँकेतली नोकरी सांभाळून हे बॅक स्टेज करणं, टेपरेकॉर्डर किंवा स्पॉटलाईट आणि डिमरची बरणी प्रयोगस्थळी वाहून नेणं, असं करताना कधीकधी निराशेनं मन भरून जाई.. एवढंच करायला मी पुण्याला आलोय का? मग संगीतक्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याच्या त्या स्वप्नाचं काय? सुहास तांबेच्या ‘डियर पिनाक’ या एकांकिकेत मोहन गोखले एक वाक्य फार आवेगानं म्हणायचा, ‘मी असल्यानं काही बनत नव्हतं. नसल्यानं काही बिघडत नव्हतं’. मला अगदी हेच वाटत होतं. बोलण्यात हजरजबाबीपणा, व्यक्तिमत्त्वात छाप पाडणारी जादू- या सगळ्याचा माझ्यात अभाव.. त्यामुळे अनेकदा चेष्टेचा विषय व्हायचो. या सगळ्यात मानसिक बळ देणारी एकच शक्ती होती ती म्हणजे संगीत. जगण्याची नवी उभारी देणारे लताबाईंचे, कुमार गंधर्वाचे अमृत स्वर!
.. आणि अखेरीस ती वेळ आली.
१९७४ सालच्या सप्टेंबराची सुरुवात असावी. सतीश आळेकरनं महाराष्ट्र नाटय़स्पर्धेकरिता त्यानंच लिहिलेल्या ‘महानिर्वाण’ या नव्या नाटकाच्या तालमी नुकत्याच सुरू केल्या होत्या. ‘घाशीराम’मध्ये पारिपाश्र्वक म्हणून अभिनयासह गायनाची बाजूही समर्थपणे पेलणारा चंद्रकांत काळे यात भाऊरावांची मध्यवर्ती भूमिका साकारणार होता. या नाटकात मुख्य पात्राची अभिव्यक्ती संगीतमय कीर्तनी शैलीतून मांडावयाची सतीशची संकल्पना भन्नाट होती. दिग्दर्शनाबरोबरच अभिनेता म्हणूनही सतीशचा सहभाग होता.
या नाटकाचं संगीत अर्थातच ‘घाशीराम’चे संगीतकार भास्कर चंदावरकर करणार, हे गृहीतच होतं. पण चिं. त्र्यं. खानोलकर लिखित आणि विजयाबाई मेहता दिग्दर्शित ‘अजब न्याय वर्तुळाचा’ या नाटकाच्या युरोप दौऱ्यावर ‘अजब’चेही संगीतकार असलेले चंदावरकर जाताहेत, या बातमीनं सतीशसमोर नाटकाकरिता नवा संगीतकार शोधण्याची वेळ आली. त्याविषयी चर्चा करताना मी सतीशला म्हणालो, ‘तू मला का संधी देत नाहीस? मला ही नवी जबाबदारी पेलायला आवडेल.’ तेव्हा सतीश काहीच बोलला नाही. त्या रात्री तालीम संपताना सतीशनं मला स्क्रिप्ट दिलं आणि त्यातला एक अभंग दुसऱ्या दिवशीच्या तालमीला स्वरबद्ध करून आणायला सांगितलं.
दुसऱ्या दिवशी बँकेतलं सकाळच्या सत्रातलं कामकाज आटोपून दुपारी पेरू गेटजवळच्या न्यू पूना बोर्डिग हाऊस समोरच्या रस्त्यावर भर दुपारच्या रणरणत्या उन्हात जेवणाच्या नंबराची वाट पाहताना डोक्यात त्या अभंगाचे शब्द घुमत होते.
‘म्हणा आता.. का विलंब.. पांडुरंग.. पांडुरंग’
सप्टेंबरातल्या त्या रणरणत्या दुपारी माझ्या गुरू डॉ. शकुंतला पळसोकर यांनी शिकवलेल्या पहिल्या रागाचे- सारंगाचे सूर घेऊन अभंगाचे शब्द ओठी आले. नोटेशन लिहायला जवळ कागद, पेन काही नव्हतं. मनातल्या मनात ती सुरावट गुणगुणत राहिलो. मग रूमवर जाऊन घाईघाईनं नोटेशन लिहिलं आणि निवांत झालो.
नोकरीच्या संध्याकाळच्या सत्रानंतर रात्री तालमीला गेलो. नटांच्या बैठय़ावाचनाच्याच तालमी सुरू होत्या. चहाचा मध्यंतर झाला तशी सतीशनं चाल ऐकवण्याविषयी सुचवलं. तसाही तालमीतला पेटीवाला मीच होतो. सर्वजण माझ्याभोवती उत्सुकतेनं जमा झाले. हार्मोनियमच्या साथीनं मी चाल ऐकवायला सुरुवात केली.
‘‘म्हणा आता का विलंब.. पांडुरंग.. पांडुरंग’’
पूर्वार्धात वरच्या सुरातून खालच्या सुरांकडे झेपावणारी सुरावट, ‘पांडुरंग.. पांडुरंग’ हे नामसंकीर्तन करताना सारंगातल्या दोन्ही निषादांभोवती रुंजी घालत पंचमावर स्थिरावते. ‘पांडुरंग.. पांडुरंग’ची सुरावट सतीशला फार आवडली.
‘पण म्हणा आता का विलंब..’ ही सुरुवात त्याला जचत नव्हती. कारण अवरोहातून खाली येणाऱ्या त्या सुरावटीतून त्याला अपेक्षित नाटय़पूर्ण फेक मिळत नव्हती, असं माझ्या लक्षात आलं आणि मग खालून वर चढत जात ‘म्हणा आता का विलंब’ या अक्षराची नाटय़पूर्ण फेक करणारी सुरावट, असा बदल करून मी ती ओळ पुन्हा गाऊन दाखवली. त्यापाठोपाठ अभंगाचे चढत जाणारे दोन्ही अंतरे ऐकवले. सतीशच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि माझ्यातल्या संगीतकाराच्या गुणवत्तेबद्दल त्याला वाटलेला विश्वास.. भोवतालच्या माझ्या सर्व रंगकर्मी सुहृदांच्या नजरेतलं कौतुक..
त्या रात्रीनंतर पुढल्या दोन महिन्यांतून अधिकचे दिवस केवळ मंतरलेले होते. चंद्रकांत काळेची गायनातली सर्व बलस्थानं मला ज्ञात होती आणि त्यांचा नेमका वापर करत मी त्याच्याकरिता अभंग, साकी, ओव्या अशी गाणी, गाणुली स्वरबद्ध केली. चाळकऱ्यांच्या समूहगीतामध्ये ‘उदे गं रमे उदे’ (गोंधळ), ‘उठा चला’ (प्रभातफेरी गीत), ‘बांधा रे बांधा’ (अधिवासी गीत) आणि परगावी गेलेल्या नानाची वाट पाहताना चाळकऱ्यांनी लावलेल्या भजनांच्या भेंडय़ा रंगवायला पारंपरिक आरत्या, गजर, अभंग या चालींना ‘रामैय्या वास्तावैय्या’ या लोकप्रिय फिल्मी गाण्याची फोडणी दिली. ‘रमैय्या’चा खास पंच डॉ. जब्बार पटेलांनी सुचवलेला. तसेच चंद्रकांत काळेकरिता- ‘तेचि जाणावे सज्जन’ (आसावरी), ‘नेत्री जळी वाहो सदा’ (गोरख कल्याण), ‘जाळा ऽ जाळाऽऽ लवकर न्या हो’ (भैरव) अशा हरिदासी परंपरेतल्या शास्त्रीय रागसंगीतावर आधारित चाली मी बांधल्या. शेवटच्या कुठल्यातरी तालमीला डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. नाटकाच्या शेवटी उत्कर्षबिंदूला- अखेरीस जुन्या स्मशानात चितेवर चढल्यावर भाऊराव- त्यानंच सुरू केलेल्या आख्यान महानिर्वाणाच्या उत्तररंगाच्या शेवटच्या स्वगतात- ‘आवा चालली पंढरपुरा’ हा अभंग गाऊ लागतो. हा अभंग मी बिलासखानी तोडीचा आधार घेत संगीतबद्ध केला होता.
‘आता कैसी यात्रे जाऊ। काय जाऊ तेथे पाहू। मुले लेकुरे घरदार। हेचि माझे पंढरपूर..’
या ओळी गाताना चंद्रकांत काळ्यांच्या डोळ्यांत दाटलेले पाणी. पण थेंबही ओघळू न देण्याचा संयम.. त्याचा अवघा देहच गाणं होऊन जायचा.. अजूनही होतो!
प्रत्येक प्रयोगात (स्मशानातल्या चितेच्या) लालपिवळ्या ज्वालांच्या प्रकाशात हाती चिपळ्या वाजवत स्वत: गाणं होणाऱ्या नटश्रेष्ठ चंद्रकांत काळ्यांच्या दर्शनानंच नव्हेतर आत्ता लिहितानाही नुसत्या स्मरणानं माझ्या अंगावर काटा आलाय आणि डोळ्यांत पाणी..
संपूर्ण तालीम बघितल्यावर ‘आवा चालली पंढरपुरा’बद्दल मला डॉक्टर लागूंनी खास दाद दिली. म्हणाले, ‘आनंद, तू शेवटचं गाणं फार म्हणजे फारच सुंदर केलंस.’
‘महानिर्वाण’ हे मला कल्पनातीत अद्भुत वाटतं. वयाच्या बाविसाव्या वर्षी सतीशनं ते लिहिलं. चंद्रकांत काळेनं तेविसाव्या वर्षी साठीच्या आसपास असणाऱ्या म्हाताऱ्याची व्यक्तिरेखा जिवंत केली आणि त्याच्याच वयाचा संगीतकार म्हणून माझं प्रथम रंगभूमीवर पदार्पण झालं.
 १९७१ साली ‘संगीताच्या क्षेत्रात काहीतरी करायचंय, ही दुर्दम्य इच्छा घेऊन अकोल्याहून आलेला मी- महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेच्या पुणे केंद्रात २२ नोव्हेंबर १९७४ रोजी भरत नाटय़ मंदिर येथे सादर होणाऱ्या ‘महानिर्वाण’ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची भरत नाटय़मंदिराबाहेरच्या फलकावरली जाहिरात झळकली, तेव्हा संगीत आनंद मोडक हे श्रेयनामावलीत असावं असा आग्रह धरणाऱ्या माझ्या थिएटर अकादमीच्या मित्रांच्या प्रेमानं मी जसा हललो, तसाच त्या पहिल्यावहिल्या प्रयोगाला उपस्थित राहिलेल्या माझे गुरू संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्या कौतुकानं आणि माझ्यासह अवघ्या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वानं पु. ल. देशपांडे यांनी मला मिठीत घेऊन दिलेल्या आशीर्वादामुळेसुद्धा. माझ्या दिवंगत बाबांच्या आणि दूर अकोल्यात असल्यानं उपस्थित राहू न शकणाऱ्या आईच्या स्मरणानं माझा कंठ दाटून आला. गडद तपकिरी रंगाच्या फलकावर पिवळ्या रंगातल्या श्रेयनामावलीद्वारा माझी नवी ओळख करून दिली जात होती..