News Flash

मराठी.. राष्ट्रीय संवेदन-भाषा!

मराठी माणूस आणि त्याची मऱ्हाटी भाषा यांचे अनेक उल्लेख, खाणाखुणा आणि पुरावे पाचव्या-सहाव्या शतकांपासूनच सापडतात. मराठी ही प्राचीन भाषा आहे.

| March 1, 2015 02:00 am

मराठी माणूस आणि त्याची मऱ्हाटी भाषा यांचे अनेक उल्लेख, खाणाखुणा आणि पुरावे पाचव्या-सहाव्या शतकांपासूनच सापडतात. मराठी ही प्राचीन भाषा आहे. केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे, तर विदर्भ-मराठवाडय़ासह संपूर्ण भारत हे फार पूर्वीपासून मराठी भाषेने आपले कार्यक्षेत्र मानलेले आहे. विघटनापेक्षा संघटनाकडे तिचा कल आहे. चंद्रभागेच्या तीरावर श्रीविठ्ठलाच्या साक्षीने तेलुगु-तमिळ- कन्नड- मराठी अशा संगमात मिसळून जाणे तिला आवडते. मराठी ही केवळ महाराष्ट्रीय भाषा नाही, तर ती अखिल भारताचीच राष्ट्रीय संवेदनेची भाषा आहे. म्हणूनच तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होणे अनिवार्य ठरते.
एखाद्या भारतीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा दिला जातो, तर ती किमान पंधराशे ते दोन हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे, हे सिद्ध झाल्यावरच! हे सिद्ध करण्याची गमके कोणती? तर- त्या भाषेतील प्राचीन लिखित संहिता उपलब्ध असायला हवी. मराठी ही प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली भाषा असूनही चक्रधर-ज्ञानेश्वरांच्या काळाच्या अगोदरच्या- म्हणजे बाराव्या-तेराव्या शतकाच्या आधीच्या काळातील मराठीतील लिखित संहिता उपलब्ध नाही, ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट होय. परंतु अत्यंत प्राचीन काळापासून मराठी भाषेत लिखित संहिता नक्कीच अस्तित्वात असणार, असे अनुमान काढण्यास खूप वाव आहे.
पहिली गोष्ट म्हणजे मराठी माणूस आणि त्याची मऱ्हाटी भाषा यांचे अनेक उल्लेख, खाणाखुणा आणि पुरावे पाचव्या-सहाव्या शतकांपासूनच सापडतात. प्राकृतातील ‘मानसोल्लास’ हा ग्रंथ याचे चांगले उदाहरण होय. अनेक शिलालेख, मंदिरादी स्थापत्यरचनांची दानपत्रे, राजेरजवाडय़ांनी दिलेली सन्मानपत्रे यामध्ये मराठीची पूर्वरूपे आहेतच; शिवाय भाषातज्ज्ञांचा विश्वास बसू नये असे एक भाग्य भारतातील फक्त मराठी या भाषेस लाभलेले आहे. ते भाग्य म्हणजे एका फार मोठय़ा कालखंडभर मराठी ही संपूर्ण भारताची संपर्क-भाषा होती. याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताच्या धर्मजीवनात चारधाम यात्रा अगदी प्राचीन काळापासून प्रचलित आहे. जगद्गुरू श्रीशंकराचार्यानी या चारी ठिकाणी धर्मपीठे स्थापन केली. तेथील देवदेवतांची पूजाअर्चा व्यवस्थित केली जावी म्हणून एक प्रशासन थाटून दिले. आपण जर नीट चौकशी केली तर आपल्याला असे आढळून येईल की, श्रीशंकराचार्यानी या चारच्या चारही पीठांवर मुख्य पुजारी म्हणून महाराष्ट्रातील कोल्हापूरकडच्या देशस्थ ब्राह्मणांची योजना केली होती. कारण बद्रिनाथ-बद्रिकेदार, द्वारका, पुरी आणि रामेश्वर या हिंदुस्थानच्या दक्षिणोत्तर आणि पूर्व-पश्चिम टोकांना असणाऱ्या या प्राचीनतम पवित्र स्थानी संपूर्ण हिंदुस्थानमधील विविध प्रांतांतील विविध भाषा बोलणारे भाविक लोक येणार! त्यांना कोणती भाषा समजू शकेल? तर राष्ट्रभर संपर्क-भाषा म्हणून प्रचलित असलेले मराठी भाषेचे ‘प्राकृत’ हे नाव धारण करून असलेले तिचे पूर्वरूपच.
आणि ही परंपरा अजूनही सुरूच आहे. केरळमधील कालडी हे श्रीशंकराचार्याचे जन्मगाव. तेथे वेदपाठशाळा आहे. त्या पाठशाळेचे कुलगुरू श्री. कमलाकर नावाचे गृहस्थ मूळचे कोल्हापूरकडचे. ते देशस्थ ब्राह्मणच होते. राजे शहाजी बंगलोरला स्थायिक होण्यासाठी फार मोठा लवाजमा घेऊन गेले होते. त्यात महाराष्ट्रातील ७८ ब्राह्मण घराणी होती. मला येथे इतकेच सांगायचे आहे, की मराठीजनांचा संपूर्ण भारतभर संचार हा फार पूर्वीपासूनच राहिलेला आहे. श्रीज्ञानदेव आणि श्रीनामदेव उत्तरेकडे तीर्थयात्रेला संतमेळा.. सर्व जाती-जमातींचे संत घेऊन गेले. त्यांचे तिकडील प्रांतात चलनवलन कसे झाले? संभाषण कसे झाले? श्रीनामदेव महाराज तर पुन्हा एकदा पंजाबात गेले. त्यांच्या अभंगरचना तिकडील लोकांना कशा समजल्या? कशा भावल्या? पंजाबात तर एका ‘मुसलमान’ राजाला श्रीनामदेव महाराजांची समाधी बांधावीशी वाटली. ती घुमान येथे आहे. (तिथेच जवळ यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे.)
एकनाथांचा ‘भागवत’ ग्रंथ काशीतील सर्वभाषिक विद्वानांना आणि पंडितांना प्रचंड आवडला आणि त्यांनी त्याची पालखीतून मिरवणूक काढली. प्रश्न असा आहे की, नाना भाषा बोलणाऱ्या या लोकांना ‘मराठी’ ग्रंथ कळला कसा? त्याचा श्रेष्ठ दर्जा कळला कसा? याचे उत्तर अर्थातच ‘प्राकृत’ नाव धारण करून असणारे मराठी भाषेचे पूर्वरूप हे भारतभर मध्ययुगात संपर्क-भाषा म्हणून वावरत होते, हेच आहे.
तात्पर्य हे, की मराठी माणसाचे मध्ययुगामध्ये भारतभर सर्वत्र चलनवलन होत राहिले आहे. कारण तो बोलत होता ती प्राकृत ऊर्फ मराठी भाषा भारतातील सर्व प्रांतांतल्या सर्व प्रकारच्या भाषा बोलणाऱ्यांना समजत होती. कारण मराठी ही संपूर्ण भारताची एकेकाळी जणू संपर्क-भाषाच होती.
मी हे अतिशयोक्तीने लिहीत वा बोलत नाही. याचे एक उदाहरण मुद्दाम देतो. संत श्रीएकनाथ महाराज प्राकृतात- म्हणजे मराठीत ग्रंथरचना करीत, हे त्यांचा संस्कृतप्रेमी मुलगा हरिपंत यास मान्य नसे. तो मराठीचा तिरस्कार करी. ‘संस्कृत ही देववाणी आहे, तर मराठी ही काय चोराचिलटांची भाषा आहे का?,’  हा श्रीएकनाथांचा सवाल प्रामुख्याने त्याला उद्देशून केलेला आहे. याच एकनाथ महाराजांनी सर्व भारताचे धर्मपीठ असणाऱ्या काशीक्षेत्री आपल्या ‘भागवत’ ग्रंथाची (आणि आजही लोकप्रिय असणाऱ्या ‘रुक्मिणीस्वयंवरा’चीही!) रचना केली. एकनाथांचा ‘भागवत’ ग्रंथ काशीतील सर्वभाषिक विद्वानांना आणि पंडितांना प्रचंड आवडला आणि त्यांनी त्याची पालखीतून मिरवणूक काढली. प्रश्न असा आहे की, नाना भाषा बोलणाऱ्या या लोकांना ‘मराठी’ ग्रंथ कळला कसा? त्याचा श्रेष्ठ दर्जा कळला कसा? याचे उत्तर अर्थातच ‘प्राकृत’ नाव धारण करून असणारे मराठी भाषेचे पूर्वरूप हे भारतभर मध्ययुगात संपर्क-भाषा म्हणून वावरत होते, हेच आहे.
धर्माचे दाखले सोडून व्यावहारिक गोष्टींकडे येऊ या. शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून बुद्धिमान मराठी माणसांचे राजस्थानमधील राजेरजवाडे आणि संस्थानिकांकडे चलनवलन होते. राजे, संस्थानिक, सरदार-दरकदार यांचे बहुसंख्य कारभारी मराठी होते. त्यांची दप्तरेही मोडी भाषेत होती. पुणे विद्यापीठामध्ये श्री. अभंग नावाच्या इतिहासाच्या एका प्राध्यापकाने ‘राजस्थानातील मोडी दप्तरे’ यावर संशोधन करून पीएच. डी. पदवी मिळविलेली आहे.
मराठी पोथ्या संपूर्ण भारतभर मिळतात. याचे अक्षरबद्ध उदाहरण म्हणजे ‘मद्रासची हस्तलिखिते’, ‘त्रिवेंद्रमची हस्तलिखिते’, ‘हैदराबादची हस्तलिखिते’, ‘कर्नाटकातील मराठी हस्तलिखिते’ इत्यादी कॅटलॉग राज्य मराठी विकास संस्थेने केलेले आहेत. अशा मराठी हस्तलिखितांचे संग्रहच्या संग्रह उत्तर हिंदुस्थानात अनेक ठिकाणी अद्यापिही सुरक्षित आहेत. यासंबंधीची माहिती ‘बिब्लिऑग्राफिकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियन मॅन्युस्क्रिप्ट्स कॅटलॉग’ (संपादक : सुभाष बिस्वास, इस्टर्न बुक लिंकर्स प्रकाशन, दिल्ली, १९९८) या ग्रंथात मिळू शकते. याशिवाय ज्यांचे कॅटलॉग झालेलेच नाहीत असे कितीतरी मराठी हस्तलिखित संग्रह उत्तर हिंदुस्थानातील मठ आणि मंदिरांमध्ये तसेच राजे, संस्थानिक व सरदार यांच्या घराण्यांत अजूनही पडून आहेत.
मराठी भाषा ही केवळ ब्राह्मणांची नाही, ती ब्राह्मणेतरांचीदेखील आहे. ती केवळ चिपळूणकर-टिळक- आगरकरांची नाही; ती फुले- भालेकर- जेधे- जवळकरांचीही आहे, हे मुद्दाम सांगायला नको. हा मुद्दा केवळ अलीकडचा आहे असेही नव्हे. प्राचीन काळापासून हेच वास्तव आहे. एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे एक हस्तलिखित आहे. ते कराची येथे लिहिलेले आहे. लिपीकार आहेत कृष्णाजी सदाशिव सावरगावकर. हे मूळचे ओतूरचे. ते जातीने मांग आहेत. हस्तलिखित ‘पांडवप्रताप’चे आहे. अक्षर श्रीरामदास स्वामींनी वर्णन केल्याप्रमाणे ‘सरळ, सुंदर, वाटोळे, नेटके’ आहे.
तात्पर्य एवढेच, की मराठी भाषा, वाङ्मय, संस्कृती.. आणि मुख्य म्हणजे प्रज्ञा-प्रतिभा यांची गती दक्षिण भारतात आणि उत्तर भारतात सर्वत्र राहिलेली दिसते. याचे कारण प्राकृत ऊर्फ मराठी ही भाषा सर्वाना कळत होती. गुजरातमध्ये भरवस येथे राहणारे श्री चक्रधरस्वामी यांनी आपला पंथ स्थापन करण्यासाठी मराठी प्रदेश का निवडला? धर्मग्रंथांची फक्त मराठीतच रचना करा, असा आग्रह का धरला? आणि त्यांचा धर्म उत्तरेस पंजाबापर्यंत का व कसा पसरला? आजही पंजाबी महानुभाव मंडळी ‘मराठी आमची धर्मभाषा आहे,’ असे अभिमानाने सांगतात.
१९८१ साली आम्ही काही मराठी प्राध्यापक मंडळी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठात एका कार्यशाळेसाठी गेलो होतो. तेथे श्रीकृष्णदास महानुभाव या विद्वानाने आपल्या व्याख्यानाचा प्रारंभच मुळी ‘‘तुम्ही महाराष्ट्रातील मराठीचे प्राध्यापक. तुमचे मराठी भाषेवर प्रेम असणारच. पण मी पंजाबी महानुभाव असून, माझे मराठीवर तुमच्यापेक्षा अधिक प्रेम आहे. कारण मराठी ही माझी धर्मभाषा आहे,’’ अशी सार्थ गवरेक्ती केली होती.
संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांच्या व्याकरणाचे व्यासंगी विद्वान कै. डॉ. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर यांनी, ऋग्वेदामध्ये मराठी क्रियापदे आढळतात, हे सप्रमाण सिद्ध करणारा एक शोधलेखच लिहिला होता. याचा अर्थ ऋग्वेद-संहिता जितकी प्राचीन; तितकीच मराठी भाषाही प्राचीन असाच होतो. याचा आणखीही एक अर्थ असा होतो, की मराठी ही केवळ ‘दिण्णले- गहिले’ (म्हणजे ‘दिले-घेतले’) म्हणणाऱ्या रांगडय़ा लोकांची भाषा नाही, तर ती तत्त्वज्ञानात्मक ऊहापोह करणाऱ्या चिंतनशील समूहाचीही भाषा आहे.
आधुनिक मराठीने तर राजकारण, समाजकारण, अर्थकारण, विज्ञान इत्यादींमध्ये आपल्या कार्यकर्तृत्वाच्या आधारे सर्व दिशा व्यापून टाकलेल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर येथे मराठीचे प्राचीनपण लक्षात आणून देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मराठी प्राचीन आहे, ती भारतक्षेत्रीय संपर्कभाषा होती, आणि केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे, तर विदर्भ-मराठवाडय़ासह संपूर्ण भारत हे या मराठी भाषेने आपले कार्यक्षेत्र फार पूर्वीपासून मानलेले आहे. विघटनापेक्षा संघटनाकडे तिचा कल आहे. चंद्रभागेच्या तीरावर श्रीविठ्ठलाच्या साक्षीने तेलुगु-तमिळ- कन्नड- मराठी अशा संगमात मिसळून जाणे तिला आवडते. मराठी ही केवळ महाराष्ट्रीय भाषा नाही, ती भारताची राष्ट्रीय संवेदनेची भाषा आहे. अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आहे, यापेक्षा आनंदाची, हर्षांची, उल्हासाची आणखी कोणती गोष्ट असणार! 
डॉ. द. दि. पुंडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2015 2:00 am

Web Title: marathi national sensitive language
टॅग : Marathi
Next Stories
1 सच्चे ‘शब्दचित्र’
2 गायतोंडय़ांची कुटुंबप्रमुख
3 मी नाटकाची निवड कशी करतो?
Just Now!
X