25 May 2020

News Flash

‘ढोलताशे’

‘ढोलताशे’ हे मी लिहिलेल्या नाटकांपैकी सर्वाधिक गाजलेले नाटक. लिहून झाल्यावर हे नाटक काही दिग्दर्शकांना दाखवले होते; पण त्यांना ते क्लिक झाले नव्हते.

| February 22, 2015 04:21 am

‘ढोलताशे’ हे मी लिहिलेल्या नाटकांपैकी सर्वाधिक गाजलेले नाटक. लिहून झाल्यावर हे नाटक काही दिग्दर्शकांना दाखवले होते; पण त्यांना ते क्लिक झाले नव्हते. विजय केंकरे यांना मात्र हे नाटक वाचताक्षणी आवडले आणि ते दिग्दर्शित करायचे त्यांनी ठरवले. त्यांच्याबरोबर काही चर्चा झाल्या. त्यांनी सुचवल्यावरून दोन अधिक पात्रे नाटकात मी लिहून दिली. ‘आविष्कार’ नाटय़संस्थेने निर्मितीची जबाबदारी घेतली आणि टीम कामाला लागली. चेतन दातार नाटकाचे सूत्रधार आणि अरुण काकडे यांचे नेतृत्व अशी जोमदार योजना ठरली.
अजित भुरे प्रमुख भूमिका करणार, हे ठरले. त्यांचा आवाज आणि उत्तम संवादफेक ही पुढे या नाटकाची खास वैशिष्टय़े ठरली. सर्वच कलाकार तगडे होते. अदिती देशपांडे, विद्याधर जोशी, रेखा बडे, हेमू अधिकारी, प्रेमा साखरदांडे, धनंजय गोरे, काकडेकाका आणि स्वत: विजय केंकरे! नाटकाचे यश हे ठरलेलेच होते; फक्त ते घडणे बाकी होते. आणि ते घडलेच! या नाटकाचा पहिला प्रयोग  ११ सप्टेंबर १९९९ रोजी झाला. पुढे ‘आविष्कार’ने त्याचे ८७ प्रयोग केले. (महाराष्ट्रात ‘इप्टा’सह इतरही काही संस्थांनी नंतर त्याचे आणखीही प्रयोग सादर केले. अमेरिकेतही एका संस्थेने हे नाटक केले.) हे नाटक खरे तर प्रायोगिक रंगभूमीवर आलेले असूनही ‘आविष्कार’ने मोठय़ा धूमधडाक्यात एखाद्या व्यावसायिक नाटकासारखे त्याचे प्रयोग केले. (आता अजित भुरे पुन्हा हे नाटक रंगभूमीवर आणताहेत.) सर्वच समीक्षकांनी नाटक वाखाणले. विशेष म्हणजे या नाटकाला जयंतराव साळगांवकर आणि नरेंद्र दाभोलकर या दोघांचेही सहकार्य लाभले. ५० व्या प्रयोगाला बाबासाहेब पुरंदरे आणि सचिन पिळगावकर आले होते. ‘‘मी अनेक वर्षे सवयीने गणेशोत्सवात सहभागी होत आलो आहे; पण या नाटकाने मला विचारात पाडले,’’ अशा अर्थाचे बाबासाहेब बोलले. एका प्रयोगाला राज ठाकरे आले होते. नाटकातले काही भाग सोपे केले तर शिवसेनेच्या शाखांसाठी या नाटकाचे प्रयोग करू, अशी त्यांनी ऑफर दिली. मराठी नाटय़-चित्रपटसृष्टीतल्या बहुसंख्य लेखक, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ यांनी हे नाटक आवर्जून पाहिले. मराठी प्रायोगिक नाटकांमधल्या निवडक नाटकांपैकी एक असे या नाटकाचे स्थान निर्माण झाले. ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’सह अनेक पुरस्कार नाटकाला मिळाले. लोकवाङ्मयगृह व ‘आविष्कार’ने त्याचे पुस्तकही काढले. पुढे मुंबई विद्यापीठाने हे नाटक मराठी एम. ए.ला अभ्यासाला लावले.
मूलत: सगळेजण नास्तिकच असतात. आस्तिक-नास्तिक हा भेद अत्यंत उथळ आणि निर्थक असतो. सगळे आपापल्या मानसिक प्रोग्रामिंगमधूनच जगत असतात. प्रत्येकाचा मनाचा वापर एकसारखाच असतो. सुखदु:खे, क्रिया-प्रतिक्रिया सारख्याच असतात. ‘देव’ ही संकल्पना वैचारिक स्तरावर स्वीकारणे किंवा न स्वीकारणे, एवढाच फक्त फरक असतो. वेगवेगळी विचारसरणी असणाऱ्या माणसांसारखाच तो एक वैचारिक पृष्ठस्तरीय फरक असतो. हिंसकपणा, अलगतावाद, अस्मितावाद, सुखवाद हे सारे सारखेच असते. सर्वाची मने विदीर्णच असतात. ताणतणावग्रस्त असतात. या पाश्र्वभूमीवर धर्म म्हणजे काय, हे पाहायला हवे, ही हे नाटक लिहिण्यामागची प्रेरणा होती. या नाटकात एक संवाद आहे- ‘माणूस दु:खी होण्याची पद्धत जर जगभर एकच आहे, तर त्यातून बाहेर पडण्याची शक्यता म्हणजे धर्म एकच असला पाहिजे. अनेक धर्म कसे असतील? आणि धर्मात गर्दीचं काय काम? स्वत:ला एकटं पाडण्याचं काम प्रत्येकानं स्वत: केलेलं आहे, तसंच तो एकटेपणा टाकणंही प्रत्येकाला स्वत:ला करावं लागेल. गर्दी, प्रदर्शन, उन्मत्तपणा यांचा धर्माशी काहीही संबंध नाही.’ धर्म म्हणजे काय, याबाबतची स्पष्टता येण्याची प्रक्रिया सुरू व्हायला हवी, हा या नाटकाचा एक हेतू होता. माझे स्वत:चे, मला स्वत:ला पडलेले जगण्यातले प्रश्न समजून घेण्यासाठी निरनिराळे वाचन होत होते. त्यात अर्थात संतवाङ्मयही होते. यासंदर्भात तुकारामांनी थोडक्यात सांगितलेला धर्म हा सर्वव्यापी आणि अखिल मानवजातीला प्रस्तुत आहे, हे मला दिसत होते. त्यांच्या सांगण्याप्रमाणे धर्म म्हणजे ‘एकविध मन’- एकात्म मन! फुटीर, विदीर्ण नसलेले मन म्हणजे धर्म. पूर्ण मानवजातीला प्रस्तुत असा हा धर्माचा अर्थ आहे. वाढत्या ताणतणावांच्या आणि असंख्य संघर्षांच्या आजच्या जगात तर हा अर्थ म्हणजे अंतिम शब्द वाटतो. जे. कृष्णमूर्तीही एकात्म मनाबद्दल- integrity of mind- याबद्दल अनेकदा बोललेले आहेत. या नाटकात एके ठिकाणी असा संवाद आहे- ‘स्वत:च्या मनाची विदीर्णता टाकणं आणि एकविध एकात्म होणं म्हणजेच धर्म.’  हे संतांनी वारंवार स्पष्ट केलेलं आहे. याचा अर्थच असा की, आपण स्वत: बदलायची तयारी असल्याशिवाय आणि तशी तीव्र निकड वाटल्याशिवाय धर्माशी आपला संबंधच येऊ  शकत नाही!’
धर्माला आलेले सामूहिकतेचे, टोळीबाजीचे, सैन्यबाजीचे, हपापलेपणाचे उन्मादी स्वरूप यात टार्गेट करायचे होते. त्यामुळे मग गणपती उत्सव समोर आला. मी बरीच वर्षे पुण्यात असल्यानेही असेल; इथला महाकाय अपवादात्मक उत्सव हाच नाटकाचा कच्चा माल असणार, हे निश्चित झाले. नाटकाचा नायक नक्कीच याबाबतीत प्रश्न निर्माण करणारा असणार होता. कुठे असेल तो? रंगमंचावर हे जग कसे येईल? याचा विचार करता करता लक्ष्मी रोडवरचे वाडे, घरे समोर आली. अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी ती कशी खचाखच भरलेली असतात, ते लक्षात आले आणि मला नायक सापडला! तो म्हणेल, ‘या गोष्टी खोटय़ा आहेत. इथून माझ्या घरातून त्यांना बंदी असेल. हे बंद राहील. इथून मिरवणूक पाहता येणार नाही.’  घर त्याचे असले तरी नातेवाईक, मित्र यांचा फोर्स असणार.. तिथून मिरवणूक पाहण्यासाठी. पण तो ‘नाही’ म्हणेल. त्यातही एक समझोता आहे- एकआड एक वर्ष त्याच्या म्हणण्याप्रमाणे चालेल. ही तडजोड त्याने मान्य केलेली आहे. पण संघर्षबिंदू हाच असेल. आता हा संघर्ष टोकावर कसा येईल? तर- एक व्याधीग्रस्त व्यक्ती असेल, जिला तिथूनच पाहणे भाग आहे. ती व्यक्ती निव्वळ यासाठीच परगावाहून आलेली! त्यामुळे सांधेदुखीने बेजार असलेली काकू आली. मग बाकीचे चित्र त्यामानाने सोपे होते. माणसे काही एकाच प्रश्नात जगत नसतात. प्रत्येकाचे प्रश्न, अग्रक्रम वेगवेगळे असतात. हे सगळे इतर पात्रांच्या मदतीने उभे होत गेले. आता एक महत्त्वाचा प्रश्न होता- नायक गॅलरीच्या दाराला लावलेल्या कुलपाची किल्ली न देण्याइतके ताणू शकेल का? याबाबतीत तो सरळ म्हणून टाकतो की, ‘हे इथपर्यंत आणलेलेच आहे, तर पाहू ताणून जास्तीत जास्त. पाहू काय होतेय ते. हे नाटक आहे आणि आपण ही एक शक्यता अजमावून पाहतोय-’ असे!
धर्माबाबतच्या मूलभूत प्रश्नांबरोबरच धर्माचे उत्सवी, उन्मादी स्वरूप हाही या नाटकाचा एक महत्त्वाचा फोकस होता. हा उत्सवीपणा, सारखे खूप काही साजरे करण्याची गरज वाटणे, हा झपाटय़ाने पसरत जाणारा रोग असल्याचे दिसत होते. लोक म्हणतात की, या प्रसंगाच्या निमित्ताने लोक एकत्र येतात, काहींना संघटनकौशल्याचे शिक्षण मिळते, उद्योगधंदे वाढतात, वगैरे. मला हे दिसत होते की, प्रत्येक उत्सव- किंवा काहीही साजरे करणे, हे एक अस्मिता, उन्माद, अलगता आणि हिंसकपणा तयार करतेच करते. ती एक तात्पुरती नशा असते. तेवढा काळ इतर विवंचनांतून तथाकथित मुक्ती देणारी. पण त्या बदल्यात मानवी जगण्याचा प्रचंड मूल्यनाश वसूल करणारी! माणसाला अधिक मद्दड, अधिक हिंसक करणारी. त्यामुळे याबाबतीत कोणतीही समर्थने खोटीच दिसत होती. सर्व काही ‘साजरे’ करण्याच्या वेडाबद्दल यातला नायक अक्षय एके ठिकाणी खूप पोटतिडिकीने बोलतो.
मी स्वत: आस्तिक-नास्तिक या भेदापलीकडे ‘धर्म म्हणजे काय?’ हे समजून घेणे ही प्रत्येकाची महत्त्वाची गरज आहे असे मानतो. मी धर्मविरोधी नाही. पण धर्माच्या नावाखाली संघटन म्हणजे धर्म मुळीच नव्हे, हे मला संतसाहित्याच्या आकलनातून जाणवले. त्यामुळे या नाटकात संतसाहित्यातले दाखलेही येतात. याचा एक अद्भुत परिणाम असा झाला, की बहुसंख्यांच्या आवडत्या गोष्टीला आव्हान देणारे हे नाटक असूनही कुणीही दुखावले गेल्याची तक्रार केली नाही किंवा त्यावरून कुणी दंगाही केला नाही.
नाटकाच्या प्रयोगात खाली रस्त्यावर चाललेल्या विसर्जन मिरवणुकीचा आभास छान जागता ठेवलेला होता. संवादांच्या मधल्या जागा विजय केंकरे यांनी अत्यंत विचारपूर्वक आणि नाटक हलते आणि हसते-खेळते आणि मजेदार, पण गंभीर राहील अशा तऱ्हेने उत्तमरीत्या भरल्या होत्या. पूर्ण टीम मिळून हे नाटक सळसळते करत असे. लेखकाच्या मनातले नाटक आणि प्रयोग यांत एका बाबतीत थोडा फरक होता. मी हे नाटक लिहिताना मुख्यत: माझ्यासमोर धर्म हा विषय होता. प्रयोगात हे नाटक त्याच्या सामाजिक अंगाकडे अधिक झुकले. या उत्सवाचा उपद्रव, प्रदूषण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या अस्मिता त्यात अधिक ठळक झाल्या. कदाचित त्यामुळेही नाटक अधिक गाजले असेल, हे मला मान्यच केले पाहिजे. पण माझा या गोष्टीला आक्षेप मुळीच नव्हता. विजय केंकरे यांना हा भाग अधिक अधोरेखित करावासा वाटला. पण नाटय़संहितेत लेखक म्हणून मी माझे डाव ठेवलेलेच असतात. ते संवादांत असतात. यातले सर्व संवाद उत्तम पोचत असल्याने मी समाधानी होतो. दिग्दर्शक व लेखकाने दिलखुलासपणे एकमेकांना आपापले डाव यशस्वी होऊ देण्याचे एक उदाहरण म्हणूनही या नाटकाकडे पाहता येईल.
नाटकाच्या रंगीत तालमींना मी उपस्थित होतो. पहिली सलग तालीम पाहून मी अत्यंत नाराज झालो होतो. मलाच ते कंटाळवाणे वाटले होते. माझ्या शेजारी दामू केंकरेकाका बसले होते. त्यांनी माझी मन:स्थिती जाणली. माझ्या पाठीवर हात ठेवून ते म्हणाले, ‘‘काळजी करू नकोस. नाटक उत्तम होणार. आत्ताच्या तालमीत फक्त पेसचा (गती) प्रॉब्लेम झाला होता. पुढची बघ तालीम!’’ आणि खरेच, पुढची तालीम पाहून मी खूशच झालो! गाण्यात तंबोरा जसा करेक्ट सुरात लागावा लागतो तशी नाटकाला ‘करेक्ट’ गती असावी लागते, हे मला नवीनच समजले. पुढे या नाटकाच्या सर्वच घटकांचे सूर उत्तम जुळून आले आणि अर्थपूर्ण प्रयोगाचा सिलसिला चालू राहिला. माझ्या नाटय़लेखनकृतीमुळे मला मिळालेले हे एक मोठे समाधान होते आणि आहे.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2015 4:21 am

Web Title: marathi palys in 1990 dholtashe
Next Stories
1 ‘ज्याचा त्याचा प्रश्न’
2 ‘किरवंत’.. एका वेदनेचं शल्य!
3 ‘चारचौघी’ने काय दिलं?
Just Now!
X