ज्येष्ठ कथालेखिका आशा बगे यांची ‘चक्रवर्ती’ ही कादंबरी आज (२९ जून रोजी) श्रीवामनराज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होत आहे. त्याविषयीचे लेखिकेचे मनोगत..
या पूर्वी माझी पुस्तकं, विशेषत: कादंबरी प्रसिद्ध होताना त्याबद्दल तत्पूर्वी किंवा त्यानंतर काही बोलावं, लिहावं असं मला कधी वाटलं नाही. जे लिहावंसं वाटलं ते लिहून झालं, एका मोठय़ा प्रवाहाला कितीतरी छोटे-मोठे ओघळ, ओढे येऊन मिळत गेले. आता ते कसं, काय, कुठल्या वाटेनं, असं सांगण्याचा लेखक म्हणून मला अधिकार नसावा. लेखन प्रसिद्ध झालं की लेखकाची हद्द संपते असंच मला वाटतं. पण आज मात्र ‘चक्रवर्ती’बद्दल काही बोलावंसं वाटतं. माझा तो कुठून दुरातून झालेला प्रवास पुन्हा मागे वळून पाहावा असं वाटतं खरं !
मी यापूर्वी असं चरित्रात्मक कादंबरीलेखन केलेलं नाही. मग अशा लेखनाला आवश्यक असा अभ्यास करून ते सगळं ललित अंगाने मांडावं असं मला का वाटलं? त्याचं साधं-सोपं उत्तर म्हणजे माझे गुरू शिरीषदादा यांच्या इच्छेनं मी या लेखनाकडे वळले. पण ‘चक्रवर्ती’चं लेखन करताना मला सारखं जाणवत होतं की मामांच्या चरित्राच्या अंगाने मी आज जे मांडू बघत होते ते पुष्कळ पूर्वीपासूनच माझ्या आत मला धडका देत होतं. आणि त्याला ‘चक्रवर्ती’च्या संदर्भाने त्याचा म्हणून एक निश्चित स्वर मिळाला. काय होतं ते! तर साऱ्या कोलाहलात अंतर्यामी एक आर्त मला जाणवत होती, जिला लेखनातून निदान स्पर्श तरी करून पाहायचा होता. ती आर्त होती ती भोवळ आणणाऱ्या विलक्षण गतिमान चक्राचं, एका स्थिर िबदूशी येऊन पोचणं आणि त्याचा अन्वय कळून घेणं. हे निमिषापुरतंही असेल; पण ते मला हवं होतं.
१९८८ साली लिहिलेल्या माझ्या ‘भूमिका’ या लघुकादंबरीतला तरुण मुलगा सोहन, तो भवतालच्या कोलाहलात स्वतच्या हृदयातलं गाणं शोधण्याचा प्रयत्न करतो- ‘तुमुल कोलाहल कलह मे, मं हृदय के गीत गाउँ’ अशीच त्याची आर्त आहे.
‘सेतू’ कादंबरीतला ब्रिजमोहन, त्याचा मुलगा उदित दोघांचंही जगणं त्यांना त्याच िबदूकडे खेचत नेतं. त्यात ते दोघं कोलमडून पडतात. पण त्यांचा प्रवास माझ्यातल्या लेखकाला निर्थक वाटत नाही. आणि आता ‘चक्रवर्ती’तही एका वेगळ्या अंगाने त्या स्थिरतेचाच वेध आहे. परंपरेचा आणि संप्रदायाचा नवतेच्या अंगाने आलेला प्रवाही ताजा अर्थ मामांच्या चिंतनात मला जाणवला आणि माझ्या या शोधाला ‘चक्रवर्ती’त एक वेगळा पस मिळाला. सगळ्या अस्थिर धुराळ्यातही काहीतरी स्थिर असतं.. तशी स्थिरता आल्याशिवाय सृजन, निर्मिती होत नसेल, असंच मला मामांचं जगणं समजून घेताना जाणवलं.
मामांच्या मृत्यूच्या वाटेवरचं एक मुक्त चिंतन कादंबरीत आलंय. ते सांगतात की त्यांना जोडायचीत ती माणसं. माणसांचे समूह. वेगवेगळ्या जातिधर्माचे समूह. वेगवेगळ्या प्रदेशातून वाहत येणाऱ्या नद्या एकमेकींच्या कुणीतरी असतातच, तशीच ही माणसंही असतील. जे बरोबर येतील त्यांचा तर प्रश्नच नसेल. पण जे मागे राहतील हट्टानं, विरोधानं किंवा आळसानं, त्यांच्यात आणि बरोबर येणाऱ्यातही काहीतरी मूलभूत साम्य असेलच. सगळ्या विरोधातही असेलच ते! काही स्थिर असं. जसा की एखादा मूल्यभाव. त्यानंतर कदाचित माणसाचं स्वतपासून तुटलेलं भयकारी एकटेपण, दुभंगलेपण कमी होऊ शकतं. माणसात एक कलंदरपण असतं. त्यात तो स्वतला उधळून देतो. निशेष होऊ पाहतो. त्यानंच खरं तर माणूस घडतो. निर्मिती करतो आणि स्वतला समूहाशी जोडत जातो. पण कधी तो स्वतला फार जपू लागतो. साशंक, संभ्रमित होतो. मग निर्मितीच थांबते. उरते ती केवळ कारागिरी. कुसर. या कालात काहीही रुजत नाही. काहीतरी महत्त्वाचं हरवूनच जातं.. या दोन टोकातच कुठेतरी तो स्थिरिबदू असेल तर मामांच्या या चिंतनातून मी त्याला स्पर्श करून पाहिला. अखेर स्थिरता ही काही अगदी मुठीतच मावून जाणारी नाही. पण जगण्याच्या बेफाम भन्नाट गतीचेही टोक, कुंभाराच्या चक्रासारखे एका स्थिरतेकडे येतच नसेल तर त्या गतीलाही काय अर्थ आहे! ‘चक्रवर्ती’ लिहिताना ही सारी गुंतागुंत माझ्यातला आवेग घेऊन होती. आणि ती व्यामिश्रता पेलत माझ्यासमोर उभे होते ते मामा.
याच अंगाने आणखीही काही खुणावत होतं. तेही असं माझ्या लेखनप्रवासाच्या बऱ्याच आधीच्या वळणापासून. मानवी संबंध, नातेसंबंध या संदर्भात सर्वात गुंतागुंतीचे असतात ते स्त्री-पुरुष संबंध. त्याचा तळ लागत नाही. प्रत्येक असा शोध दरवेळी नवाच असतो. पण मला पुष्कळ पूर्वीपासून स्त्री-पुरुष संबंधासह इतरही नाती महत्त्वाची वाटत राहिली होती. आई-मुलगा, वडील-मुलगा, नणंद-भावजय, दोन मत्रिणी, बहिणी, आजी-नातू. स्त्री-पुरुष नात्यांइतकी गुंतागुंत यात नसेलही; पण त्यांचे एकात एक अडकलेले, मिसळलेले सूक्ष्म पदर फार मनोज्ञच वाटत होते मला. ‘चक्रवर्ती’पूर्वीच्या लेखनात कथा-कादंबरीतून याच्या खुणा जागोजागी पेरलेल्या आहेत. पण ‘चक्रवर्ती’त मामांची आई आणि मामा यांच्या नात्याचं जे विलोभनीय रूप मला सापडत गेलं, ते मलाच चकित करणारं होतं. मामांच्या आई त्यांच्या केवळ आईच नव्हत्या, त्या त्यांच्या गुरूही होत्या. आणि मामांच्या आयुष्यात येणाऱ्या महत्त्वाच्या स्त्रियांमधली त्यांची आई ही पहिली आणि महत्त्वाची स्त्री. दुसरी स्त्री त्यांची पत्नी. आणि तिसरी त्यांची शिष्या आणि उत्तराधिकारी. तिघीतही एक सूक्ष्म पण दृढ असा अनुबंध होता असंच लिहिताना वाटत गेलं.
गुरुशिष्यांच्या नात्यातली शिष्याची सर्वोच्च अवस्था म्हणजे ‘गुरूचा गर्भ बनून राहणे’. मामांच्या आयुष्यात तशी वस्तुस्थितीच होती, त्यांचा नि त्यांच्या आईचा अनेक पातळीवर जो संवाद होता, त्याला  तोड नव्हती. मला आईपणाचे हे रूप ज्ञानेश्वरांच्या मुक्ताईचेच रूप वाटत राहिले. आईपण आणि गुरूपण हे काय वयावर निर्भर असते!
‘चक्रवर्ती’तले गुरू-शिष्यांचे हे सूत्र मला नदीच्या प्रवाहासारखे कादंबरीभर सोबत करीत राहिले. ‘चक्रवर्ती’ लिहून झाली. पण त्या सूत्राशी घट्ट बांधलेला माझा हात सुटला नाही. ज्ञानेश्वरी वाचताना, समजून घेताना, समजले तर त्याचा आनंद घेताना मी त्या साऱ्या प्रवाहाशी पुन:पुन्हा जोडली जात राहिले. आणि या जोडलेपणाचीही कितीतरी रूपं मला माझ्या अवतीभवती जाणवत होती. तीच ‘चक्रवर्ती’च्या संपूर्ण लेखनभर विखुरली असतील!
सरिता पदकींची एक फार हृद्य कविता आहे. शब्द आता मागे-पुढे झाले असू शकतील.
‘तुझे विमान जेव्हा आपल्या
घरावरून जाईल
तेव्हा घरातल्या खिचडीतला
जिऱ्या-खोबऱ्याचा दरवळ
तुला येईल’
सरिताबाईंनी ही भावना मायलेकरात पाहिलीसे वाटते. पण ती वेगळ्या अर्थानं कुठल्या- कुठल्या दूरस्थ माणसामाणसांतही असावी. असेही असेलच नं! मला ‘चक्रवर्ती’भर मामांचे इतरांशी हे असे जोडलेपण हाकारत होते. आणि तेही त्या स्थिरतेचाच एक अंश असू शकेल.
शेवटी ‘चक्रवर्ती’ म्हणजे तरी काय? सम्राट. स्वामी. पण म्हणाल तर स्वच्या साऱ्या संचिताकडेही निरपेक्ष सेवाधर्मीय, सेवाधर्मीदृष्टीनं बघणारे. त्यासाठीच होती का ती छत्रचामरं? ‘चक्रवर्ती’चा हा अर्थही त्याच िबदूशी येऊन पोचत असेल कदाचित.