महाराष्ट्राला आणि नाटय़सृष्टीलाही विसर पडलेल्या मास्टर दत्तारामांची त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांत पुनर्भेट झाली नसती तर आपल्या वागणुकीवर कृतघ्नतेचा शिक्का कायमचा कोरला गेला असता. २९ सप्टेंबर १९८४ रोजी मास्टर दत्तारामांनी या जगाचा निरोप घेतला. त्याला आता २९ वर्षे उलटून गेली. याच काळात सारी प्रसिद्धीमाध्यमे, नाटय़ चित्रपटसृष्टी एवढेच नव्हे, तर सामान्य माणसाचे आयुष्यमानही आमूलाग्र बदलले. परिणामी जुन्या पिढीतील नररत्ने काळाआडच नाही तर विस्मृतीच्या कप्प्यात लुप्त होऊन गेली.
मास्टर दत्ताराम म्हणजेच गोव्याच्या एका लहानशा वळवई खेडेगावातील दत्ताराम वळवईकर. शिक्षण जेमतेम चौथीपर्यंत. सामान्य परिस्थिती म्हणजे दारिद्रय़ाचीच साथ. साधारण रूप, मध्यम उंची, थोडक्यात साऱ्याच आघाडय़ांवर जेमतेम असलेले दत्ताराम वळवईकर नाटय़ाभिनय, दिग्दर्शन आणि निर्मितीतही विश्वविक्रमापर्यंत पोहोचण्याच्या वकुबाचे मोठे होते हे आश्चर्यच नाही तर दैवी चमत्कारच आहे.
दत्तारामांची जन्मशताब्दी त्यांच्या शतश: ऋणी असलेल्या अगणित चाहत्यांनी भक्तिभावाने पूजिली, एवढेच नाही तर अनेक मान्यवरांनी आपल्या शब्दलेखनातून त्यांना आदरांजली वाहून ती व्यक्तही केली. ज्याचे संकलन, संपादन डॉ. अजय वैद्य यांनी एकत्रित करून ‘नाटय़वीर मास्टर दत्ताराम’ या पुस्तकरूपाने प्रकाशित केले.
गोव्यात अनेक गायक, वादक, नर्तक, कवी, लेखक, चित्रकार, रंगभूमी कलाकार निपजले; ज्यांनी साऱ्या देशाचे नाव जागतिक पातळीवर नेऊन ठेवले. त्यातीलच एक होते दत्ताराम वळवईकर अर्थात मास्टर दत्ताराम. नाटय़ क्षेत्रातील त्यांचे योगदान कोणाही पाश्चिमात्य नटाच्या तोडीइतकेच किंबहुना एक पायरी त्याहूनही सरस-सकस अशा उच्च दर्जाचे होते; ज्याची गिनीज बुक्समध्येच नोंद व्हावी. पण सध्याच्या अतिगतिमान मालिका-सिनेमांच्या युगात ते झाकोळले गेले आहे आणि म्हणूनच डॉ. अजय वैद्यांनी योग्य वेळी संपादित केलेल्या या ग्रंथाचे मोल केवळ व्यक्तिपरिचय एवढेच न राहता तो एक ऐतिहासिक दस्तावेज वा ठेवा या तोडीचे झाले आहे.
कोणीही मान्यवर व्यक्ती गेल्यानंतर त्यावर आठवणीवजा भारंभार लेखांचे बाड तयार केले जाते. त्या व्यक्तीविषयी आत्मीयता, ममत्व असणाऱ्यांकडून पण इतरांच्या दृष्टीने त्यांना ती त्या व्यक्तिविषयीची थोडी जास्त ओळख असते. पण ‘नाटय़वीर दत्ताराम’ हा सर्वस्वी वेगळा संदर्भग्रंथ आहे. ज्यामधून सामान्य गरीब, अशिक्षित माणूस आपल्या आचार-विचार वागणुकीने, आपल्या समर्पित नाटय़वेडाने ‘विद्यापीठ’ कसा बनतो, ही नतमस्तक होणारी अलौकिक घटना साऱ्या लेखकांच्या लेखणीतून जागोजागी झिरपली आहे.
दत्ताराम वळवईकरांनी वयाच्या केवळ दहाव्या वर्षी तोंडाला रंग लावला आणि अखंड ५५ वर्षे त्या रंगांनी वळवईकरांचे रूप बहुरंगी वैविध्यपूर्ण केले. सकाळी ते भीष्म असायचे, दुपारी ययाती तर रात्री शिवाजी किंवा संभाजीची वीरश्री त्यांच्या कायेत प्रवेश करायची. २०० नाटके मुखोद्गत असणाऱ्या त्यांच्या अफाट पाठांतराला सुपर संगणकाची संज्ञाही कमी पडेल. कारण संगणक फक्त जे साठवले आहे तेच निर्जीव शब्दाक्षर दाखवतो. पण मास्टर दत्ताराम साऱ्या भावभावना चेहऱ्यावरून आणि बाकी सारे झपाटून गेलेल्या, मंतरलेल्या शरीरबोलीतून लीलया सादर करायचे. त्यांच्या वामनदेही मूर्तीत एक आश्वासक हुंकार होता. ‘त्यांचा हात पाठीवर पडला की १२ हत्तींचे बळ अंगात यायचे, साऱ्या भयभीती-कुशंका क्षणार्धात नष्ट व्हायच्या. तो दैवी हात माझ्या खांद्यावर सतत होता. माझ्यातील नट-कलाकार धगधगता ठेवत होता’, असे कृतज्ञतेचे उद्गार ज्येष्ठ रंगकर्मी मोहनदास सुखठणकर आजही आवर्जून लिहितात.
दत्ताराम म्हणून उमेदवारी सुरू केलेले वळवईकर स्वकर्तृत्वाने रंगभूमीवरील अनभिषिक्त ‘मास्टर’ झाले. खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांना ‘नाटय़वीर’ या उपाधीने गौरविले-सन्मानिले.
या पुस्तकातील सारेच लेख मास्टर दत्तारामांची ओळख आजच्या पिढीला किती निकडीची आहे हे अधोरेखित करणारे आहेत. मास्टर दत्ताराम ही खरेच एक परंपरा आहे. अफाट यशाने जराही न बहकलेले, शिस्तीची चौकट कधीही न मोडलेले, राग-द्वेष-लोभ आणि मत्सर, भांडण, क्षुद्र हेव्यादाव्यापासून दूर असलेले मास्टर दत्ताराम एक वेगळेच, अविश्वसनीय वाटावे असे व्यक्तिमत्त्व होते.
दत्तारामांची प्रत्यक्ष आयुष्यातील दोन रूपे पदोपदी अचंब्यात टाकणारी होती. कोणत्याही प्रयोगाआधी तास-दीडतास आधी हजर असणारे, स्वत:ची वेशभूषा, चेहऱ्यावरील रंगरंगोटी स्वत:च करणारे आणि एकदा रंगभूमीवर पाय ठेवून भूमिकेत शिरले की केवळ इतिहासकालीन होऊन जाणारे मास्टर दत्ताराम पडदा पडला, रंगभूमीचा निरोप घेतला की शिवाजीचा जिरेटोप उतरवून चेहऱ्यावरील रंग धुवून इतिहासातून वर्तमानात कधी यायचे आणि बाहेर निघून जाऊन विरारच्या गर्दीच्या गाडीत कधी मिसळून जायचे हे कळायचेही नाही. एकेका दिवशी तीन तीन नाटकांचे खेळ, एकाच्या विषयाचा, रंग वेशभूषेचा दुसऱ्या-तिसऱ्याशी जराही संबंध नसलेल्यांचा प्रयोग करताना मास्टर दत्ताराम मूळ संहितेत स्वत:चा एकही शब्द न घुसडता, लेखकाचेच शब्द प्रमाण मानून प्रेक्षकांना अखंड तीन तास आपल्या अकृत्रिम अभिनयाने चिंब भिजवून टाकत.
शंभराहून अधिक नाटकातून अडीचशेपेक्षा जास्त भूमिका वठवणाऱ्या मास्टर दत्तारामांनी १५ हजाराहून जास्त प्रयोगाचा टप्पा ओलांडला होता, ही जेवढी अविश्वसनीय, अचंबित करणारी बाब वाटावी. त्यापेक्षा अजून मोठे आश्चर्य म्हणजे पहिल्या प्रयोगापासून ते सातशेवा प्रयोग असो; अभिनयातील राखलेले सातत्य, ज्याचे खुद्द कुसुमाग्रजांनाही आश्चर्य वाटले होते.
या पुस्तकात कमलाकर नाडकर्णी, भिकू पै आंगले, मोहनदास सुखठणकर, माधव वझे, रामदास कामत, कीर्ती शिलेदार, सुरेश खरे, विद्याधर गोखले, मामा पेंडसे यांसारख्या दिग्गजांनी आपल्या सरस लेखांनी मास्टर दत्ताराम अतीव आत्मीयतेने उलगडले आहेत. या ग्रंथाची अजून एक जमेची बाजू म्हणजे जुन्या जमान्यातील कृष्णधवल मुबलक छायाचित्रांचा समावेश. मजबूत बांधणीतील हा अडीचशे पानांचा दस्तावेज नाटकवेडय़ांनी जरूर संग्रही बाळगावा.
नाटय़वीर, मास्टर दत्ताराम – संपादक : डॉ. अजय वैद्य, कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार, पृष्ठे – २४४, मूल्य – ६५० रुपये.

vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
The seat sharing dispute in the Grand Alliance ends in two days
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी