प्रशांत कुलकर्णी

prashantcartoonist@gmail.com

जगभरातले अफलातून व्यंगचित्रकार, त्यांच्या कलाकृती, त्यांनी निर्माण केलेलं हास्य, त्यांनी केलेलं राजकीय, सामाजिक किंवा जीवनविषयक भाष्य आणि त्यासंदर्भातील काही अद्भुत, मजेशीर गोष्टी कथन करणारं सदर..

मॅटला फिल्म कॅमेरामन व्हायचं होतं. चित्रकलेचा विद्यार्थी म्हणून त्याने शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर ‘बीबीसी’बरोबर एका फिल्मशी संबंधित काम केलं. पण यातून काहीच आर्थिक लाभ होईना म्हणून काहीही न करण्याची चन त्याने थोडे दिवस करून पाहिली. पण नंतर मात्र काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्याने कार्टून्स काढायला सुरुवात केली. ती असंख्य मासिकांना तो पाठवत राहिला, पण कोणीच ती छापायला तयार नव्हतं. शेवटी कंटाळून तेही प्रोफेशन सोडायच्या विचारात तो होता. तेवढय़ात ‘न्यू स्टेट्समन’ नावाच्या एका नियतकालिकात त्याचं एक चित्र छापून आलं. त्याचा एवढा आनंद मॅटला झाला, की तो पळत पळत बुक स्टॉलवर गेला आणि त्या नियतकालिकाच्या सर्व प्रतींमध्ये त्याचं कार्टून आलंय का, याची खात्री करून घेऊ लागला!

आणि मग मॅटला या कलेमध्ये रुची वाटू लागली. त्या काळात ‘दि डेली टेलिग्राफ’मध्ये आगंतुक चित्रं, व्यंगचित्रं, मजकूर यांच्यासाठी खास जागा राखून ठेवलेली असे. ऑफिसच्या बाहेर एका बॉक्समध्ये दुपारी तीनपर्यंत जो मजकूर टाकला जायचा त्यातील काहींचा विचार या त्रोटक जागेत व्हायचा. मॅट जवळपास रोज तीन कार्टून्स त्या बॉक्समध्ये टाकत असे. साधारण सहा आठवडय़ांनंतर त्याचं पहिलं कार्टून छापलं गेलं आणि त्यानंतर बरीच कार्टून्स तिथे येत राहिली. पण मॅटचं स्वप्न होतं की, वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर स्वत:चं पॉकेट कार्टून यावं. आणि ती संधी त्याला एका फारच गमतीशीर प्रसंगातून मिळाली.

‘टेलिग्राफ’ने एकदा वर्तमानपत्राची तारीख एका दिवसाने चुकवली. २४ फेब्रुवारी ८८ ऐवजी २५ फेब्रुवारी ८८ अशी छापली गेली आणि एकच गोंधळ उडाला. हजारो वाचकांनी गमतीशीर तक्रारी केल्या. शेवटी संपादकांना पहिल्या पानावर माफी मागावी लागली. ते सगळं प्रकरण थोडं शांत करण्यासाठी संपादकांना काही व्यंगचित्रांची आवश्यकता भासली. तिथेच घुटमळत असलेल्या मॅटकडे अचानक त्यांचं लक्ष गेलं. आणि मॅटचं व्यंगचित्र प्रसिद्ध झालं. पुढे यथावकाश सहा महिन्यांत ‘टेलिग्राफ’चा फ्रंट पेज कार्टूनिस्ट म्हणून मॅट रुजू झाला.

सर्वसाधारणपणे जगभरातल्या रोज व्यंगचित्रं काढणाऱ्या व्यंगचित्रकारांचा दिनक्रम, रोजची प्रेशर्स जशी असतात तसंच त्यांचंही आहे. रोज सहा कल्पना काढायच्या आणि त्यातली एक फायनल करायची आणि उरलेल्या कचरापेटीत टाकायच्या. काही वेळेस एखादं व्यंगचित्र फायनल झाल्यावर रात्री वेगळीच घडामोड घडते आणि पुन्हा पहिलं चित्र मागे घेऊन दुसरं नवीन काढावं लागतं. हा सगळा धावपळीचा मामला आता मॅट यांच्या चांगलाच अंगवळणी पडला आहे.

मॅट यथावकाश प्रस्थापित झाले असले तरी त्यांचा विनोद अजूनही ताजा आहे. अनेक मंत्री, नेते वगैरे त्यांची मूळ चित्रं विकत घेतात. पण एकदा इंग्लंडच्या गुप्तचर संस्थेकडून त्यांना खास बोलावून घेतल्यानंतर ते थोडेसे दचकले होते. ‘‘ही चित्रं कोणाची आहेत?,’’ असं त्या प्रमुखांनी त्यांना दरडावून विचारलं. अजिबात विलंब न लावता मॅट यांनी कबुलीजबाब दिला.. ‘‘हो, ही मीच काढली आहेत.’’ त्यानंतर अतिशय थंडपणे त्या प्रमुखांनी- ‘‘मग आम्हाला थोडी ख्रिसमस कार्ड्स बनवून द्या..’’ असं त्यांना सांगितलं. आणि त्यानंतर त्यांचं ‘थँक्यू’ असं दोन ओळींचं पत्रही त्यांना मिळालं.

‘‘मी सहा-सात निवडणुका पाहिल्या आहेत. तीन पोप, एक राणी, अधांतरी पार्लमेंट, अमेरिकेचा काळा अध्यक्ष आणि ब्रेग्झिट हे सारं मी अनुभवलं आहे..’’ असं मॅट गमतीनं सांगतात. मॅट यांना काहीजण दैनंदिन पॉकेट कार्टून काढण्यामधले डॉन ब्रॅडमन समजतात. आणि ते बऱ्याच अंशी खरं आहे. रोजच्या रोज इतकं टोकदार भाष्य करणं सोपं नाही. म्हणूनच गेल्या ३० वर्षांत अनेक संस्थांकडून मॅट यांना किमान १५ वेळेला ‘बेस्ट कार्टूनिस्ट ऑफ द ईयर’ हा पुरस्कार मिळाला आहे. हे असामान्य आहे!! (म्हणजे इंग्लंडमध्ये अशा प्रकारे अनेक संस्था व्यंगचित्रकारांच्या कामाची दखल घेऊन त्यांना दरवर्षी पुरस्कृत करतात, हे असामान्य आहे असं मला म्हणायचं आहे !!)

वास्तविक मॅट यांच्या चित्रांची शैली ही फारशी आकर्षक नाही. नवशिक्या चित्रकारासारखं त्यांचं चित्र वाटतं. पण गेल्या ३० वर्षांत तीच त्यांची चित्रशैली बनली आहे. साधं रेखाटन, किंचित करडय़ा रंगाच्या छटा, पात्रांची कमी संख्या हेच त्यांचं चित्र! पात्रांचे हावभाव, देहबोली, कपडे, आजूबाजूचं वातावरण इत्यादी बाबींना ते फारसं महत्त्व देत नाहीत. त्यांचा सगळा भर हा भाष्यावर. म्हणजे ते जास्तीत जास्त टोकदार, भेदक आणि त्याचबरोबर हास्यस्फोटक कसं करता येईल याकडे असतो. त्यांचं ‘मॅट ऑन ब्रेग्झिट’ हे पुस्तक अलीकडेच आलं आहे. (प्रकाशक : ओरीयोन) इंग्लंड आणि ब्रेग्झिट या दोन विषयांवर यात अंदाजे दीडशे व्यंगचित्रं आहेत. यातून मॅट कळतो.

उदाहरण द्यायचं तर मतदारांची द्विधा मन:स्थिती दाखवताना पेटीत टाकलेलं मत परत घेण्याचा प्रयत्न करणारा मतदार यात दिसतो. ब्रेग्झिटच्या घटना रोज इतक्या वेगात बदलत होत्या.. गुंतागुंतीच्या व अतक्र्य अशा होत्या! याचा संदर्भ देताना त्यांच्या चित्रातील विद्यापीठात राज्यशास्त्र शिकणारी विद्यार्थिनी म्हणते, ‘‘गुरुवारी सकाळी आठ ते शुक्रवारी लंच टाइम हा कालखंड मी माझ्या अभ्यासाचा विषय म्हणून निवडला आहे.’’ रशियाचा, ब्रिटनच्या निवडणुकीमध्ये वाढता हस्तक्षेप होतोय अशी एक शक्यता वर्तवली जात होती. त्यावर मॅटच्या चित्रातील एक ब्रिटिश नागरिक दुसऱ्याला म्हणतो, ‘‘ब्रिटनचे ब्रेग्झिटबद्दलचे काय प्लान्स आहेत, ते आता कदाचित पुतिन हेच सांगू शकतील.’’ ब्रिटनच्या ब्रेग्झिट पॉलिसीवर युरोपियन युनियनचं काय मत असू शकतं, यावर त्यांनी सोबतचं टेलिफोनचं व्यंगचित्र काढलंय. इतक्या छोटय़ा चित्रात, मोजक्या शब्दांत, इतका प्रचंड विषय सांगणं हे व्यंगचित्रकाराची प्रतिभा दाखवतं!