प्राणांची पर्वा न करता अहोरात्र देशाच्या सीमांचं रक्षण करणारे सैनिक, हे प्रत्येक भारतीयांसाठी आदरणीयच. अशाच एका निडर सैनिकाचा जीवन प्रवास मांडणारं पुस्तक म्हणजे जनरल जे. जे. सिंग यांचं ‘माझे सैनिक माझा लढा’.
जोगिंदर जसवंत सिंग यांच्या घराण्यात लष्कराची परंपरा. भारतातील ते पहिले शीख लष्करप्रमुख. दोन पायदळ बटालियनचं नेतृत्व. कारगिल युद्धाचं नियोजन आणि अंमलबजावणी यांत सहभाग.. अशी थोडीथोडकी नव्हे तर सत्तेचाळीस वर्षांची लष्करातील कारकीर्द!
लष्करात असताना भारतीय सीमांच्या रक्षणाबरोबरच लष्कराला मानवतावादी चेहरा देण्यात आणि तो चेहरा लोकांपुढे येण्यासाठी ते विशेष प्रयत्नशील राहिले. लष्कर आणि सामान्य लोक यांच्यातील दरी कमी करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
हा जीवन प्रवास सहा भागांमध्ये विखुरला आहे. त्यात ‘घराण्याचा वारसा आणि पूर्वायुष्य’, ‘कॅडेल ते कर्नल’, ‘फ्लॅग रँक : ‘वनस्टार’कडून सी-इन-सीकडे’, ‘सर्वोच्च शिखर’, ‘राज्यपाल : अरुणाचल प्रदेश’ आणि सहावा भाग आपल्या आयुष्यावर टाकलेला ‘दृष्टिक्षेप- विचारमंथन’.
सुरुवातीला आपले पूर्वज, त्यांची लष्करातील उल्लेखनीय कामगिरी आणि त्याचा असलेला अभिमान याविषयी लेखक भरभरून सांगतात. त्यांच्या शब्दाशब्दांमध्ये आपल्या कुटुंबातील लष्करी परंपरेचा अभिमान दिसून येतो. आजोबांनी दिलेल्या लढय़ांविषयी ते भरभरून सांगतात. त्यांचं ‘मरहट्टा’ बटालियनशी असलेलं नातं आणि त्याच बटालियनचं प्रमुखपद भूषवण्याचा मिळालेला मान हे त्यांना काळाचं एक वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतं. आजोबांनी त्यांना दिलेला ‘चांगले नेते आदर कमावतात, आदर कमवावा लागतो, तो मागून मिळत नाही,’ हा संदेश त्यांनी सदैव मनाशी जपला अणि त्याच दिशेने आपल्या लष्करी आयुष्याची वाटचाल ठेवली. एक सैनिक म्हणून झालेली जडणघडण सांगताना ते म्हणतात, ‘पंजाबी’ बाणा आणि ‘शीख’ असणं हा माझा वारसा आहे आणि शीख पंथाच्या सामूहिक चेतनेनं तो मला बहाल केलेला आहे.’ लष्कराच्या बहुजिनसी, धर्मातीत आणि सर्वसमावेशक लष्करी वातावरणात सिंग लहानाचे मोठे झाले. याच संस्काराची शिदोरी  घेऊन त्यांनी पुढील आयुष्याची वाटचाल केली, हे प्रकर्षांने जाणवते. शीख धर्मातील स्त्री-पुरुष समानता, वर्गहीन आणि समन्वयवादी भूमिका हा संस्कारही त्यांच्यात रुजलेला आहे आणि त्याचीच कास धरून त्यांनी लष्करातील सेवा अभिमानास्पदपणे पूर्ण केली. यामुळेच ते लष्कराला मानवतावादी चेहरा देण्यात यशस्वी झाले असावेत.
आपल्या धारदार व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली याविषयी सांगताना, त्यांच्यातील अभ्यासू, स्वत:ला सतत घडवण्याची वृत्ती प्रकर्षांने जाणवते. लष्करी सेवेत असताना रेलिमेंटल सोल्जरिंग, अल्जिरियामधील कामगिरी आणि त्यासाठी लागणारे विशेष कौशल्य, ऑपरेशन माऊसट्रॅप, हुशारीने आखलेल्या मोहिमा, सियाचीनमधील युद्धसज्जता यांविषयी वाचताना सिंग यांच्यातील बुद्धिचातुर्य आणि कामातील अचूकता हे गुण प्रकर्षांने जाणवतात.
कारगिल युद्धाविषयी लिहिताना पाकिस्तानचा खोटारडेपणा आणि काश्मीरमध्ये आणि त्या अनुषंगाने भारताला अस्थिर करण्याचे पाकिस्तानचे मनसुबे यांवर ते प्रकाश टाकतात. कारगिलमध्ये भारताच्या भूमीत सत्याहत्तर दिवस घालवलेल्या एका पाकिस्तानी सैनिकाचा स्वानुभव त्यांनी कथन केला आहे. ते वाचून पाकिस्तानचा दुटप्पीपणा प्रकर्षांने जाणवतो. भारतीय सैनिकांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी वाचताना त्यांनी लष्कर, नौसेना आणि वायुसेना यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सहभागाला त्यांनी उजाळा दिला आहे.
हे आत्मचरित्र वाचताना सिंग यांनी काश्मीरमध्ये बजावलेली महत्त्वाची भूमिका विशेष करून लक्षात राहते. दहशतवाद्यांशी केलेला सामना तसेच भारतीय सीमांचं रक्षण करतानाच नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही महत्त्वाची भूमिका कशा प्रकारे पार पाडावी लागते आणि ते ती यशस्वीपणे पार पाडतात, हे वाचताना या दोन्ही गोष्टींमध्ये ताळमेळ साधण्याचं कौशल्य कौतुकास्पद वाटतं.
‘मुशर्रफ आणि मी’ या प्रकरणात त्यांनी आपला जन्म, स्थळ या संदर्भात मुशर्रफ यांच्याशी असलेलं साधम्र्य स्पष्ट करताना या माणसाला मनात भेटण्याची इच्छा असतानाही शेवटी एका खोटारडय़ा आणि आपल्या देशावर वक्र नजर ठेवणाऱ्या माणसाशी भेटणं नकोच, या विचारापर्यंत ते पोहोचतात.
एक लष्करप्रमुख म्हणून भूमिका बजावताना संरक्षण राजनीती आणि शेजारील राष्ट्र यांच्यात समन्वय आणि कठोर धोरण यांचा मेळ साधण्यात सिंग यशस्वी झाले. याविषयी वाचताना सिंग यांची सडेतोड विचारबुद्धी आणि त्यामागचा त्यांचा अभ्यास याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो.
या आत्मचरित्रात आपल्या कुटुंबाविषयी असलेलं त्यांचं प्रेम हळुवारपणे त्यांनी उलगडलं आहे. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी केलेलं उल्लेखनीय कामही लक्षात राहतं.
विचारमंथन या शेवटच्या प्रकरणातून त्यांच्यातील निर्भीड माणूस, अध्यात्मावर स्वत:चं मुक्तचिंतन मांडणारी व्यक्ती, हे आत्मचरित्र वाचताना त्यांच्याविषयी प्रचलित असलेल्या ‘शस्त्र आणि शब्द या दोन्हींचा मारा करणारा लष्करप्रमुख’, ‘मऊ मेणाहुनी..’, ‘भारतीय लष्कराच्या तत्त्वप्रणालीचा शिल्पकार’ या विशेषांची सत्यता पटते. शेवटी मांडलेल्या छायाचित्रांवरूनही त्यांनी बजावलेल्या वैशिष्टय़पूर्ण कामगिरीची कल्पना येते.
लष्करी परंपरा असलेल्या एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या, सरळमार्गी सैनिकाचा अत्युच्च पदापर्यंतचा जीवनप्रवास प्रेरणादायी ठरतो.
‘माझे सैनिक माझा लढा’ – जनरल जे. जे. सिंग, मराठी अनुवाद : डॉ. विजया देव, अमेय प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – ४८४, मूल्य – ५९५ रुपये.

dharmarao baba Atram, vijay Wadettiwar, lok sabha election 2024
आत्राम – वडेट्टीवार यांच्यातील वाद चिघळला
A chance for historic success for Indian chess players sport news
भारतीय बुद्धिबळपटूंना ऐतिहासिक यशाची संधी!
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
Navneet Rana nominated for Amravati Lok Sabha Constituency
नवनीत राणा हिंदुत्वाच्या राजकारणावर स्वार