News Flash

हास्य आणि भाष्य : अर्थाचा अनर्थ

वास्तविक अर्थसंकल्प हा अतिशय गुप्त असतो.

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत कुलकर्णी

prashantcartoonist@gmail.com

फेब्रुवारी-मार्च महिना हा खरं तर विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या वातावरणाचा महिना. तसेच देशाची आर्थिक परीक्षा पाहणाऱ्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या वातावरणाचासुद्धा हा महिना म्हणावा लागेल. ‘नेमेचि येतो..’प्रमाणे अर्थसंकल्पही दरवर्षी येतो. तो आपल्याला टाळता येत नाही; आणि त्यावरची व्यंगचित्रंही! अर्थसंकल्पाच्या सुमारास वर्तमानपत्रांतून नेहमी वाचायला मिळणारे शब्द किंवा शब्दप्रयोग म्हणजे.. अर्थसंकल्पावर अखेरचा हात फिरवताना अर्थमंत्री, कररचना, देशाची आर्थिक स्थिती, जनतेच्या अपेक्षा, रुपया-डॉलर, आयात -निर्यात, शेअर बाजार, गरिबीरेषा, रुपया असा आला आणि असा गेला, सिगारेट महाग होणार, महागाई आटोक्यात येणार, आयकर मर्यादा, चलनवलन, मध्यमवर्गाची क्रयशक्ती, खतांवरची सबसिडी.. इत्यादी, इत्यादी. याविषयीच्या बातम्या, चौकटी, लेख, आलेख याबरोबरच टिपिकल म्हणावीत अशी व्यंगचित्रंही येत असतात.

अर्थमंत्री जेव्हा त्यावर अखेरचा हात फिरवत असतात त्याच वेळी विरोधी पक्षनेतेही त्या अर्थसंकल्पावर कठोर टीका करणाऱ्या त्यांच्या भाषणावर अखेरचा हात फिरवत आहेत- असे दोन्ही फोटो एकाच दिवशी का येऊ नयेत, असा प्रश्न मला नेहमी पडतो! (लोकशाहीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक यांना समान न्याय नको का?)

एका अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय आणि गरीब यांच्यातील सीमारेषा दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची बातमी आली होती. त्यावर एका व्यंगचित्रात- ‘म्हणजे आता मध्यमवर्गीय लवकरच गरीब होणार तर!’ असा एक मध्यमवर्गीय माणूस आपल्या बायकोला म्हणतोय अशी कॉमेंट होती!

‘अर्थसंकल्पाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?’ असा प्रश्न एक टीव्ही चॅनलची वार्ताहर रस्त्यावरच्या गरीबाला विचारते. त्यावर तो म्हणतो, ‘अर्थातच गरीबांचं जगणं सुस करणारा अर्थसंकल्प असावा!’ इतकंच नव्हे तर- ‘१९६३ पासून मी हीच प्रतिक्रिया देतोय..’ असंही तो या व्यंगचित्रात म्हणतोय!

अर्थसंकल्पानंतरच्या एका चर्चासत्रात एक कामगार नेता तावातावाने भाषण करताना एका व्यंगचित्रात दाखवला आहे. तो म्हणतो, ‘हा अर्थसंकल्प कामगार, भूमिहीन आणि गरीब यांच्या विरोधातच असणार. कारण उद्योगपतींनी या अर्थसंकल्पाबद्दल समाधान व्यक्त केलंय!’

अर्थसंकल्पामध्ये काही विशिष्ट उद्योगांना जास्त सवलती मिळाल्या, असे आरोप काही वेळेला होतात. अशा वेळी एका व्यंगचित्रात एक उद्योगपती भाषण करताना म्हणतोय की, ‘आमच्या उद्योगसमूहाला कोणत्याही विशेष सवलती मिळालेल्या नाहीत. आम्हालासुद्धा इतरांप्रमाणे भ्रष्टाचार करूनच उद्योग वाढवावा लागला.’

‘सर्व घटकांना समान न्याय देणारा आमचा अर्थसंकल्प आहे,’ असं मंत्र्यांनी म्हटल्यावर, त्यावर काढलेल्या व्यंगचित्रात एक मंत्री- ‘शेतकरी, उद्योजक, कामगार, व्यापारी वगरेंसाठी आम्ही काहीही न करून सर्वाना समान न्याय दिलाय..’ असा अजब खुलासा करताहेत. तर एका व्यंगचित्रात बजेटमध्ये रेल्वेची भाडेवाढ झाली नसल्याने निराश झालेले विरोधक दाखवले आहेत.

तुटीचा अर्थसंकल्प सादर करणं ही बहुतेक सर्वच देशांमध्ये अतिशय सामान्य गोष्ट आहे. एका अमेरिकन व्यंगचित्रात अर्थसंकल्पावरती काम करणारी काही तज्ज्ञ मंडळी म्हणतात, ‘बरं झालं, आपण सरकारमध्ये आहोत म्हणून एवढा तुटीचा अर्थसंकल्प सादर करू शकतो. स्वत:चा बिझनेस असता तर केव्हाच bankrupt झालो असतो.’

दुसऱ्या एका व्यंगचित्रात डोनाल्ड ट्रम्प बँकेकडे ‘मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी कर्ज द्या..’ असं म्हणतात आणि ‘मेक्सिको याचे हप्ते भरेल..’ असंही वर सूचित करताहेत.

एका व्यंगचित्रात अमेरिकेचा अंकल सॅम हा (अक्षरश: बर्गर आणि कोक पिऊन) इतका अवाढव्य आणि ढेरपोटय़ा झालेला दाखवलाय, की ज्यावर उभा आहे तो खालचा वजनकाटाही त्याला दिसत नाहीये. हा वजनकाटा म्हणजे अर्थातच तुटीचे अंदाजपत्रक! आणि त्याला अध्यक्ष बराक ओबामा म्हणतात.. ‘चला, आता आणखी जेवायची वेळ झाली!’ म्हणजे काय, तर आणखी कर कमी करून आणखी सवलती देऊ!

रिपब्लिकन असो वा डेमोक्रॅटिक (हत्ती आणि गाढव ही त्यांची चिन्हे आहेत.); कुठलंही सरकार आलं तरी त्याला सामान्य लोकांवर करवाढ (किंवा करदात्यांची पाकीटमारी) केल्याशिवाय गत्यंतर नसते. मग तो भारत असो वा अमेरिका! यावरचं हे खास व्यंगचित्र! व्यंगचित्रासाठी पुलित्झर पुरस्कार मिळणं ही फार म्हणजे फारच मोठी गोष्ट आहे. या व्यंगचित्राचे निर्माते व्यंगचित्रकार मायकेल रामिरेझ यांना दोनदा हा पुरस्कार  मिळालाय.

बजेटच्या दिवशी शेअर बाजार जोरात वर-खाली होत असतो. अमेरिकेत शेअर बाजार सेन्सेक्सला ‘डाऊ जोन्स’ म्हणतात. हाही बऱ्याच वेळेला कोसळत वगैरे असतो. त्यावेळची व्यंगचित्रं पाहण्यासारखी असतात. अध्यक्ष ट्रम्प यांचा लाल रंगाचा टाय खूप प्रसिद्ध आहे. एका कार्टूनमध्ये हा टाय शेअर बाजारातील इंडेक्सप्रमाणे खाली कोसळताना दाखवला आहे.

ऑस्ट्रियामधील व्यंगचित्रकार मरिअन कामेन्स्की हा खूप प्रभावी व्यंगचित्रं काढतो. सोबतच्या व्यंगचित्रात कोसळणारा इंडेक्स सावरण्यासाठी सुरू असलेली धावपळ त्याने मोठय़ा मजेशीरपणे रेखाटली आहे.

अर्थशास्त्रज्ञांमध्येही अनेक प्रकार असतात अशी कल्पना करून एक मालिका दिवाळी अंकासाठी रंगवली होती. त्यातला एक प्रेमळ अर्थशास्त्रज्ञ प्रेयसीला घेऊन सरोवरामध्ये शिडाच्या नावेतून विहार करताना पौर्णिमेच्या चंद्राकडे पाहून (चंद्राऐवजी तिथे प्रत्यक्ष एक रुपयाचं नाणं दाखवलं होतं.) ‘तोच रुपया नभात’ असं त्याचं स्वत:चं प्रेमगीत म्हणतोय. किंवा आशावादी अर्थशास्त्रज्ञ चित्र काढताना मावळत्या सूर्याला (रुपयाचे चित्र) पाहून उगवत्या सूर्याचं लोभसवाणं चित्र रंगवतोय असं दाखवलं. तर निराशावादी अर्थशास्त्रज्ञ रुपयारूपी तंबोरा घेऊन (रड)गाणं आळवताना दाखवला होता.

डॉलर आणि रुपया यांची चर्चा तर रोजच बिझनेस चॅनलवर होत असते. अमेरिकेचा गर्भश्रीमंत डॉलर आणि भारतातील कष्टकरी रुपया यांच्यातील रोजचे व्यवहार पाहताना (अर्थात आंतरराष्ट्रीय विनिमय बाजारात असं काही होत नसतं याची कल्पना आहे.) निमशहरी भागातील आठवडी बाजारात भाजी विकणाऱ्या गरीब शेतकरी महिलेकडून गर्भश्रीमंत बायकाही दोन रुपयांसाठी घासाघीस करताना बघितल्या होत्या, त्यातूनच हे व्यंगचित्र साकारलं.

आर्थिक विषय हा अतिशय किचकट, क्लिष्ट आणि तरीही सर्वाच्या गरजेचा. सदैव लागणारा. म्हणूनच त्यावरची ही थोडी गमतीशीर चित्रं.. अर्थाचा अनर्थ करणारी! कारण गरिबीरेषा वर जाईल वा खाली.. स्मितरेषा कायम असावी, हीच अपेक्षा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 4:24 am

Web Title: meaninglessness of meaning lokrang hasya ani bhashya article abn 97
Next Stories
1 विश्वाचे अंगण : बलवानों को दे दे ग्यान..
2 आशियाई देशीवाद
3 कथेच्या प्रवासाची गोष्ट
Just Now!
X