आध्यात्मिक आनंद होण्याआधी आध्यात्मिक दु:ख होणे आवश्यक असते. म्हणजे अनाकलनीय अशा विश्वाचा उलगडा होत नसल्याचे दु:ख होणे आवश्यक असते. तीन प्रश्न विचारले असता हे दु:ख होते.. ‘मी कोण आहे?’, ‘मी काय करतो आहे?’ आणि ‘माझ्या अवतीभोवती हे काय चालले आहे?’ या प्रश्नांना उत्तर नसते आणि त्यामुळे दु:ख होते. ते न व्हावे म्हणून शोध घेण्यासाठी सावधान व्हावे लागते. ते येणेप्रमाणे..
अंतरंगाची आणि बहिरंगाची एकाच वेळी अलिप्त, सतत आणि संपूर्ण जाणीव असणे, हा आध्यात्मिक आनंद असतो. अंतरंग म्हणजे आपले अंत:करण. त्याचे सोयीसाठी चार भाग कल्पिलेले असतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे चार भाग कल्पिले जातात. ही कल्पना आहे; सत्य नाही, हे समजणे आवश्यक आहे. मन हे साधकबाधक अशी माहिती देते. बुद्धी त्यावर निर्णय घेते. चित्त ते लक्षात ठेवते. आणि अहंकार ‘हे मी केले’ असे समजतो. पण आपल्याला हे सारे असे कळत नाही. पण या अर्थानं काही शब्दप्रयोग आपण करतो, त्यावरून थोडाफार याचा अंदाज बांधता येतो. ‘बुद्धी भ्रष्ट झाली आहे..’, ‘चित्त थाऱ्यावर नाही..’, ‘मनावरचा ताबा सुटला आहे,’ इ. शब्दप्रयोगांवरून आपण त्या- त्या व्यक्तीविषयी काही अंदाज बांधतो.
बहिरंग म्हणजे आपल्या शरीराबाहेर जे जे आहे ते सारे ब्रह्मांड. या ब्रह्मांडातील यच्चयावत गोष्टींचा अंतरंगावर परिणाम होत असतो, तर अंतरंगात घडणाऱ्या गोष्टी ब्रह्मांडात बदल घडवीत असतात. म्हणजे कुणा हॅरी ट्रमनच्या अंतरंगात येते की, जपानवर अ‍ॅटमबॉम्ब टाकू.. तो टाकला जातो. बहिरंगात होत्याचे नव्हते होते. बहिरंगाचे तापमान खाली जाते.. शरीर कुडकुडू लागते.. गरम जागा शोधू लागते.. कपडे शोधू लागते. कुठे सूर्यावर सौरवादळे होतात, माणसे विचित्र वागू लागतात.. हे अंतरंग आणि बहिरंग एकमेकांत इतके गुंतले आहेत, की ते एकच आहेत याची जाणीव झाली की साक्षात्कार!!
विश्वातली सर्वात अनाकलनीय गोष्ट कोणती, तर ते थोडेफार आकलनीय आहे, असे आइनस्टाईन म्हणतो. या वैश्विक ऊर्जेचा अंदाज घेणे म्हणजे अध्यात्म! त्याचा ‘परमेश्वर’ या संकल्पनेशी दूरान्वयानेही संबंध नाही. हा अंदाज सतत घ्यायचा असतो. म्हणजे आपण स्वप्न, जागृती, सुषुप्ती अशा अवस्थांमधून आयुष्यभर जात असतो. एवढेच कशाला, असे मानायलादेखील जागा आहे की, आयुष्यच काय.. अनेक आयुष्येदेखील आपण जात असतो. जी व्यक्ती या सर्व अवस्था जागरूकपणे अनुभवू शकते- ती व्यक्ती तुर्यावस्थेत असते. हीच ती चौथी अवस्था! या अवस्थेप्रत पोहोचण्यासाठी प्रयत्न लागतात म्हटले तर ते चूक होईल. आणि नाही लागत म्हटले तर ते बरोबर असणार नाही.
एकाच वेळी अंतरंगात काय चालले आहे आणि बहिरंगात काय चालले आहे याची जाणीव असली पाहिजे. अनेक लोक डोळे मिटून समाधीअवस्थेत गेल्याची स्वत:ची फसवणूक करीत असतात. समाधी- अवस्थेचा डोळे मिटण्याशी संबंध नाही; झोपेचा मात्र जरूर आहे. अंतरंगाचे आणि बहिरंगाचे अशा प्रकारचे अनुसंधान हे २४ x ७ असे असते. समाधीअवस्थेचे ढोंग कुणी करीत असेल तर त्याला ते सुखेनैव करू द्यावे. आपल्या हातून असे होत नाही ना, एवढेच बघावे. हे अनुसंधान जितके उत्तम; तितक्या कोणत्याही सिद्धी आपल्याशा होतात. आणि मग पाकसिद्धीपासून चित्रकला, शिल्पकला, शल्यक्रिया, क्रीडा अशा अनेक विषयांत माणसे सिद्ध आणि प्रसिद्ध होतात.
अंतरंगात येणारे विचार, संवेदना आणि भावना याकडे अलिप्तपणे पाहणे अत्यावश्यक असते. कारण सामान्यपणे या सर्व गोष्टी माणसाला ‘येत’ असतात. त्यावर सुरुवातीला आपले अजिबात नियंत्रण नसते. अशावेळी मनात ‘वाईट’ विचार येतात म्हणून खंत वाटते. ते फक्त ‘विचार’ आहेत. ‘वाईट’ हे आपण त्यांना लावलेले लेबल आहे, हे सतत जाणिवेत ठेवणे योग्य असते. समजा- दु:ख होईल असे विचार ‘येत’ असतील तर त्या विचारांच्या बरोबर विरुद्ध असे विचार उत्पन्न करून दोन्ही विचार नाहीसे कसे होतात, ते पाहावे.
अंतरंगाची आणि बहिरंगाची संपूर्णपणे जाणीव होणे हे आपल्याला दिलेले एखादे मैत्रीपूर्ण आव्हान आहे असे समजून त्याचा पाठपुरावा करीत राहणे, हे आपल्या आयुष्याचे प्रयोजन असते. हाच सच्चिदानंद असतो. तो कलेकलेने वाढतच राहतो. त्यासाठी प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो.. वैयक्तिक असतो. त्यात कुणी कुणाचे अनुकरण करणे हे तद्दन मूर्खपणाचे असते.
भाबडय़ा, भोळसट लोकांना पुंगी वाजवणाऱ्या गारुडय़ासारखे आध्यात्मिक प्रवचन देऊन गुंगविणारे काय करीत असतात, देव जाणे! पण तो त्यांचा मार्ग असतो. आपण तिथे जायचे की नाही हे आपण ठरवायचे असते. पण देवधर्म, आरत्या, पूजा, स्तोत्रपठण यांत कितपत अध्यात्म आहे किंवा असते, हे ज्याने त्याने तपासून घ्यावे. जिवाला त्रासदायक होणारे मार्ग सामान्यपणे चुकीचे असतात, एवढे लक्षात असू द्यावे. जगातील कोणताही मार्ग त्याज्य नाही. आपल्याला तो अनुरूप आहे की नाही, हे समजावून घेणे फायद्याचे असते.
आध्यात्मिक आनंदासाठी एक नवा पैसाही खर्च करायला लागत नाही. किंबहुना, पैसे खर्च करून आध्यात्मिक आनंद होणे दुरापास्त असते. त्यासाठी आश्रमात, हिमालयात वगैरे जाऊन राहायला लागत नाही. कोणत्याही प्रकारे विशिष्ट कपडे घालायला लागत नाहीत. विशिष्ट अन्न खायला लागत नाही. विशिष्ट धर्म पाळायला लागत नाही. सुरुवातीला एखादा मार्गदर्शक लागतो; पण आपल्यात आध्यात्मिक आनंदाची ओढ उत्पन्न झाली की मार्गदर्शक तिथेच असतो.
एकदा एका मनुष्याला अशी ओढ उत्पन्न झाली. त्याबरोबर त्याने गावातील एका सुजाण नागरिकाला विचारले की, ‘माझा गुरू कोण आणि कुठे असेल?’ तर तो म्हणाला की, ‘तुझा गुरू हिरवे पागोटे घालून वडाच्या झाडाखाली बसला असेल.’ त्याबरोबर तो माणूस उठला आणि गावोगाव आपल्या गुरूच्या शोधात भटकू लागला. अनेक महिने झाल्यावर थकला-भागलेला असा तो गावाकडे परत आला. येताना गावाबाहेरच्या वडाच्या झाडाखाली एक माणूस हिरवे पागोटे घालून बसलेला त्याला दिसला. त्याच्या डोळ्यांत अश्रूंनी गर्दी केली. धावतच तो तिथे गेला. पाहतो तर ज्या माणसाने त्याला ते सांगितले होते, तोच माणूस हिरवे पागोटे घालून बसला होता. ‘मला तुम्ही त्याच वेळेस का नाही सांगितलेत, की मीच तुझा गुरू आहे म्हणून?’ असे विचारता उत्तर मिळाले, ‘तू मला विचारलेस तेव्हा मी वडाच्या झाडाखाली हिरवे पागोटे घालूनच बसलो होतो. पण तुझे लक्ष नव्हते. तुझी वाट बघत मी रोज इथे बसून राहत होतो.’ हे असे असते. आणि जवळजवळ प्रत्येकाच्याच आयुष्यात हे होत असते. पण आपले त्याकडे लक्षच नसते.

medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय