मनोहर पारनेरकर

samdhun12@gmail.com

खाँसाहेबांच्या गझल गायकीतील एका विलक्षण पलूचा उल्लेख मी मेहदी हसन  यांच्यावरच्या गेल्या लेखात केला होता. तो पलू म्हणजे त्यांच्या गझल गायकीत उत्तम उर्दू काव्य आणि रागदारीवर आधारलेलं संगीत यांचा असलेला सुंदर मिलाफ. या लेखात या पलूचं उदाहरणासहित जरा विस्तारानं विवेचन करणार आहे. प्रथम त्यांच्या लोकप्रिय उर्दू गझलांमध्ये असलेल्या काव्यगुणांबद्दल.. खाँसाहेबांना उर्दू काव्याची उपजतच उत्तम जाण होती. आणि ज्याची विद्वत्ता किंवा साहित्यिक जाणिवेबद्दल फारसं बोललं जात नसे अशा माणसाबद्दल तर हे फारच उल्लेखनीय आहे. ज्या गझला त्यांनी गायल्या किंवा ज्यांना त्यांनी चाली लावल्या त्यांची निवड करण्यामागे त्यांच्याकडे असलेली साहित्याची उपजत जाणच कारणीभूत होती. एखाद्या गझलची निवड करताना त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे- कवितेची गेयता आणि तिचं भावनात्मक आकर्षण या होत. संबंधित कवीची प्रतिष्ठा किंवा त्याची विचारधारा या त्यामानाने त्यांच्यासाठी काहीशा दुय्यम महत्त्वाच्या गोष्टी असत.

ज्या शायरांच्या गझलांना त्यांनी चाली लावल्या, त्यांचा आवाका बघूनच थक्क व्हायला होतं. इक्बाल ते गालिब, फैझ ते फराज.. शिवाय अनेक प्रसिद्ध आणि फारशा प्रसिद्ध नसलेल्या शायरांच्या गझलाही त्यांनी गायल्या आहेत किंवा त्यांना चाली लावल्या आहेत. उर्दू कवितेचा इतिहास ज्यांना थोडाबहुत माहीत असेल त्यांना त्यांच्या या विलक्षण निवडीचा आवाका थक्क करतो. मिर्झा गालिब हे बरेचसे नास्तिक, बंडखोर आणि कुठल्याही नीतिनियमांच्या चौकटीच्या दृष्टीने जवळजवळ स्वैराचारीच होते. तर संपूर्ण आंग्लविद्याविभूषित इक्बाल हे पुरोगामी असले तरी अत्यंत धार्मिक होते. त्यांचं पहिलं नाव जरी अल्लामा होतं तरी ते वृत्तीने उलेमा होते. फैझ आणि अहमद फराज हे दोघे आधुनिक कवी असले तरी त्या दोघांची काव्यप्रकृती वेगवेगळी होती. फराज हे मुस्लीम धर्माच्या नजरेतून जरासे उदारमतवादी होते, तर त्यांचे समकालीन, खूपच जास्त प्रशंसा प्राप्त झालेले फैझ हे निश्चितपणे सुफी व मार्क्‍सवादी होते.

एकंदरीत उर्दू काव्यात आणि विशेषत: खाँसाहेबांनी ज्या गझला सादर केल्या त्यात सारांशरूपाने पुढील भावना व्यक्त झालेल्या दिसतात : आदर्श प्रेम, सफल प्रेम, असफल प्रेम, प्रतिसाद न मिळालेलं प्रेम.. अशी प्रेमभावनेची अनेक रूपं, दु:ख, वेदना, परात्मभाव, स्मरणरंजन. याशिवाय त्यांच्या गझलांमध्ये बहरात आलेला निसर्गदेखील आढळून येतो. नंतरच्या काळात इक्बाल आणि फैझ या विशिष्ट विचारधारेशी बांधिलकी असलेल्या शायरांच्या गझलांचा समावेश त्यांनी केला. त्यामुळे पुढे त्यांच्या गझलांच्या वर्णपटात धर्म, राजकारण, सामाजिक न्याय, इत्यादी विषयांचादेखील समावेश झाला.

खाँसाहेबांनी ज्या पारंपरिक आणि आधुनिक शायरांची निवड केली, त्यामधून त्यांची काव्याबद्दलची उच्च अभिरुचीच दिसून येते. पुढे शायराचे नाव, कंसात त्याचे जन्म/मृत्यू वर्ष आणि खाँसाहेबांनी गायलेल्या त्यांच्या किमान एका गझलेच्या मतल्याची पहिली ओळ देत आहे. १) मीर तकी मीर (१७२३-१८१०)- ‘पत्ता पत्ता बूटा बूटा’, २) मिर्झा गालिब (१७९७-१८६९)- ‘दायम पडा हुवा तेरे दर पर’, ३) बहादूरशहा जफर (१७७५-१८६२)- ‘बात करनी मुझे मुश्किल’, ४) दाग देहेलवी (१८३१-१९०५)- ‘उज्र आने भी है’! आणि आता काही आधुनिक शायर- १) इक्बाल (१८७७-१९३८)- ‘परेशान हो के मेरी खाक’, २) फैझ अहमद फैझ (१९११-१९८४)- ‘तुम आये हो तो शबे इन्तजार गुजरी है’, ३) अहमद फराज (१९३१-२००८)- ‘रंजिश ही सही ’,

४) कातिल शिफाई (१९१९-२००१)- ‘जिंदगी में तो सभी प्यार किया करते है’!

उर्दू काव्याच्या प्राबल्यानंतर आता त्यांच्या गझलांतील भारतीय शास्त्रीय संगीताच्या श्रीमंतीबद्दल..

खाँसाहेबांच्या अनेक गझला या रागदारी संगीतावर आधारलेल्या आहेत. खाँसाहेब  १९४७ साली भारत सोडून पाकिस्तानात स्थलांतरित झाले तेव्हा ते प्रशिक्षित संगीतकार झाले होते. त्यांना संगीताची तालीम वडील उस्ताद अझीम खान, मोठे बंधू पंडित गुलाम कादीर आणि काका उस्ताद इस्माईल खान यांच्याकडून मिळाली होती. हे तिघेही धृपद शैलीतील गायक होते. पण त्यांना वारशात मिळालेली शास्त्रीय संगीताची परंपरा किंवा त्यांच्या दोन गुरूंकडून त्यांना भारतात मिळालेली शास्त्रीय संगीताची तालीम यांपैकी कुठलीही गोष्ट त्यांची असाधारण गायकी आणि रचनाकाराची प्रतिभा यांचं पूर्ण स्पष्टीकरण देऊ शकत नाही. शास्त्रीय संगीताची तालीम एखाद्या कलाकाराला नक्की मदत करते आणि ती फायदेशीरदेखील असते. पण या गोष्टी नैसर्गिक प्रतिभेला कधीच पर्याय असू शकत नाहीत. खाँसाहेबांकडे अफाट नैसर्गिक प्रतिभा होती. ते गझल संगीतातले शास्त्रीय संगीत प्रशिक्षित आणि मौलिक रचनाकार होते. त्यांच्या ज्या गझलांनी श्रोते मंत्रमुग्ध होतात, त्यापैकी अनेक गझलांना त्यांनी स्वत: चाली लावलेल्या नाहीत, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल. काही प्रसिद्ध आणि काही अप्रसिद्ध, तसेच स्थानिक लोकप्रियता असलेल्या रचनाकारांनी त्यांच्या बहुतेक गझलांना चाली लावलेल्या आहेत. या रचनाकारांमध्ये त्यांचे ज्येष्ठ बंधू पंडित गुलाम कादीर (‘मोहोब्बत करनेवाले कम न होंगे’ आणि ‘आये कुछ अब्र कुछ शराब आये’), त्यांचे मामा उस्ताद निहाल अब्दुल्ला (‘ताजा हवा बहार की’), एक बांगलादेशी संगीतकार रॉबिन घोष- जे नंतर पाकिस्तानी नागरिक झाले (त्यांची सर्वात लोकप्रिय गझल- ‘प्यार भरे दो शर्मिले नन’)- यांचा समावेश होतो. म्हणजे त्यांच्या गझलांच्या भांडारापैकी फारच थोडय़ा गझलांना त्यांनी स्वत: चाली लावल्या आहेत. अर्थात कलात्मक श्रेष्ठता संख्येवर अवलंबून नसते याच्याशी तुम्ही सहमत व्हाल.

गझल संगीताच्या क्षेत्रातील एक रचनाकार म्हणून खाँसाहेबांचं स्थान काय, याबद्दल असं म्हणता येईल की, ते नेहमीच त्यांच्या रचनांच्या कलात्मक अस्सलतेसाठी आणि अभिजाततेसाठी ओळखले जातील. खाली नमूद केलेल्या काही विलक्षण पलूंपैकी निदान एक किंवा त्याहून जास्त पलू त्यांच्या अनेक रचनांमध्ये दिसून येतात :

१) कर्नाटकी रागांचा उत्तम उपयोग. त्याची तीन उदाहरणं- अ) राग किरवानि (‘शोला था जल बुझा हूं हवाएं मुझे न दो’), ब) राग चारुकेशी (‘जब उस जुल्फ की बात चली’), क) राग जनसंमोहिनी (‘चिराग ए तूर जलाओ बडा अंधेरा है’).

२) एकाच रचनेमध्ये एकापेक्षा जास्त रागांचा वापर : अ) ‘फूल ही फूल खिल उठे’ या गझलेमध्ये राग बहार आणि राग केदार यांचा वापर आहे. (आणि निदान आणखी एक राग आहे, जो मी ओळखू शकलेलो नाही.), ब) ‘आये कुछ अब्र कुछ शराब आये’ या गझलेत गौड सारंग या रागाचं दुसऱ्या एका रागाबरोबर मिश्रण केलेलं आहे- जो मला ओळखता आलेला नाही.

३) खाँसाहेबांच्या दोन गझलांच्या रचनांवरून एक नवीन राग आणि कर्नाटकी संगीतातील एक ‘तिल्लाना’ निर्माण झाला आहे. उदाहरणार्थ : अ) उस्ताद विलायत खाँसाहेबांचे सर्वात ज्येष्ठ शिष्य आणि भारतातले एक अग्रगण्य सतारवादक पंडित अरिवद पारीख ‘तुम आये हो के शब ए इंतजार गुजरी है’ ही त्यांची गझल ऐकून तिच्या सुरावटीने इतके प्रभावित झाले, की त्यावरून त्यांनी ‘गुंजीकंस’ या नव्या रागाची निर्मिती केली. हा राग त्यांनी रेडिओ आणि मफलीतून अनेकदा वाजवला आहे. ब) कर्नाटकी संगीत गायिका आणि रचनाकार बॉम्बे जयश्री यांनी सांगितलं की, त्यांचे गुरू लालगुडी जयरामन हे ‘अब के हम बिछडे’ ही गझल ऐकून प्रेरित झाले आणि त्यांनी तिच्यावर आधारित एका ‘तिल्लाना’ची निर्मिती केली.

खाँसाहेबांनी त्यांच्या रचनांमध्ये जी नावीन्यपूर्णता आणली त्याला या तुटपुंज्या उदाहरणांनी न्याय मिळणार नाही याची मला कल्पना आहे. आपल्या रचनांमध्ये काही रागांचा ते असा काही वापर करायचे, की भल्या भल्या तज्ज्ञांनादेखील त्याचं उगमस्थान कधी कधी  सापडत नसे आणि  संशोधक आणि परिसंवादी तज्ज्ञ यांना नेहमीच वादासाठी मुद्दे सापडत. खाँसाहेब आपल्या स्वभावानुसार कधी कधी याबाबतीत काहीच खुलासा करत नसत. राग ओळखण्याच्या या खेळात मजा घेणाऱ्या विद्वानांच्या आनंदात ते खोडा घालत नसत. हा मुद्दा जरा स्पष्ट करतो : ‘एक खलिश को हासील-ए-उम्र-ए-रवा रेहने दिया’ या त्यांच्या गझलेतील सौंदर्य आणि मौलिकता विरळाच आहे. जेव्हा पहिल्यांदा ही गझल मी ऐकली तेव्हा माझ्यासारख्या संगीताचं व्याकरण न कळणाऱ्या माणसालासुद्धा ही चाल पंडित सी. आर. व्यास यांनी निर्मिलेल्या ‘धनकोनी कल्याण’ या रागावर आधारलेली असावी असं वाटलं होतं. पण ही चाल खाँसाहेबांना स्वतंत्रपणे सुचली की कुठल्याशा ज्ञात किंवा अज्ञात स्रोतामधून सुचली, हे त्यांनी कधी स्पष्ट केलं असेल तर मला माहिती नाही.

(उत्तरार्ध)

(टीप : विशिष्ट गझलेच्या रागांची नावं जी मी दिली आहेत त्यांच्याबद्दल तज्ज्ञ मंडळींत एकवाक्यता असेलच असं नाही.)

शब्दांकन : आनंद थत्ते