05 August 2020

News Flash

चिंतनशील ललितलेख

कवी दासू वैद्य यांच्या ‘मेळा’ या ललित लेखसंग्रहात आत्मपर भावना, घटना, प्रसंग, स्मरणे, माणसे यांची लालित्यपूर्ण उपस्थिती आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

एकनाथ पगार

कवी दासू वैद्य यांच्या ‘मेळा’ या ललित लेखसंग्रहात आत्मपर भावना, घटना, प्रसंग, स्मरणे, माणसे यांची लालित्यपूर्ण उपस्थिती आहे. बाह्य घटना-प्रसंग-व्यक्ती-अनुभव किंवा आत्मरतीच्या मानसिक घटना-चिंतनाने असा सारा एकमेळ साधला आहे. ललित लेखांच्या केंद्रस्थानी निवेदक ‘मी’ असतो. हा ‘मी’ बाह्य़ घटित असो वा मानसिक घटित असो.. या घटितांकडे लेखक पाहतो ‘मी’च्या नजरेने! अनुभवतो, मांडतो आणि एकप्रकारे ‘मी’चा आविष्कार करीत असतो. सहृदय, संवेदनशील माणूस, जबाबदार नागरिक , विद्या-कलांचा निर्माता आणि आस्वादक म्हणून सभोवतालाला स्वत:मधे सामावून घेत घेत ‘तो’ सांगतो आहे गोष्टी, घटना, आठवणी, माणसे, स्थिती आणि परिस्थिती!

‘स्वत:ची आदळआपट आणि शब्दांची मांडामांड करणारा लेखक लिहितो म्हणजे काय करतो? स्वत:ला खोदतो खोल..खोल पाठलाग करतो अव्यक्ताचा. एकेका अनुभवाला गाठतो खिंडीत. पकडू पाहतो शब्दांत.. पुन्हा पुन्हा पांढऱ्याशुभ्र कागदावर का पसरवतो शब्द? का टाकून बसतो जाळं एखाद्या अनुभवाच्या प्रतीक्षेत?.. लेखकाला, कवीलाही आपल्या आवाक्यातला प्रदेश उजागर करायचा असतो. शब्दांचे पूल बांधून पोहायचं असतं. अज्ञाताच्या प्रदेशात. घ्यायची असते मनाच्या खोलपर्यंत धाव. ही धाव थकवणारी असते. लुकलुकणारे दिवे असतात पण गाव येतच नाही. शोध कशाचाही असो, धावणं सुरूच असतं..’ (पाठलाग आणि प्राप्ती / १४५- १४६) येथील ललित लेखांची किंवा साहित्याची निर्मितीप्रक्रियाच या चिंतनात दासू वैद्य यांनी सांगितली आहे. आत्मउत्खनन – आत्मशोधन करीत करीतच निर्मिती साधण्याचा प्रयत्न येथील ललित लेखांमध्ये आहे. आपल्या जाणिवा – नेणिवांतच्या आवाक्यातला प्रदेश त्याला प्रकाशित करायचा आहे, पण हा सारा प्रदेश उजळून टाकता येत नाही, कितीतरी भाग अज्ञातच राहतो, अज्ञाताचा शोध संपता संपत नाही, लेखकाची – कलावंताची प्रतिभा पणाला लागलेली असते. आत्मनिष्ठेची, कलात्म अनुभवाची ही परीक्षा असते. असे काही भूमिकापर हे चिंतन आहे. आत्मचिंतनाचा गंभीर, पण उत्स्फूर्त ‘स्वर’ या साऱ्या लेखांमध्ये आहे.

एखादा विषय, घटना, अनुभव, व्यक्ती, संस्मरण अचानक अनियत होऊन

उत्स्फूर्त अनुभवासारखे शब्दरूप धारण करते. ठरवून विषयकेंद्री, घटनाकेंद्री काही अभिव्यक्त करू असा जबरीचा मामला येथे नाही. सुचणे, कल्पनाशील संज्ञेतून स्फुरणे असे हे ‘स्वरूप’ आहे.

एखादा शब्द, घटना किंवा अनुभव येथील निवेदकाला काव्यात्म क्षणांसारखा, साक्षात्कारासारखा चिंतनप्रारंभ मिळवून देतो. संगती, विसंगती, साम्य – विरोध अशी साहचर्याची साखळी वाढत – विकसत जाते. एकातून ‘दुसरे’ जे साम्य किंवा वैधम्र्यमूलक आहे, त्याचे अनुसरण घडून येते. मूळ घटना – अनुभव – क्षण यांच्या सभोवताली विविध संदर्भ आकर्षिले जातात. चित्रपट – नाटक – लेखक – कविता – कवी – साहित्यसंहिता, मुख्य गतकालीन – निकट गतकालीन आणि आणि वर्तमान संदर्भाची संमिश्रणांची अवस्था निर्माण होते. बालपण, शाळेतले दिवस, महाविद्यालयीन दिवस किंवा शिक्षक असण्याचा काळ यांना प्राधान्याने आठवलेले आहे, म्हणजेच या स्मरणसाखळीत गतकाळाचे संदर्भ क्षण सतत येतात आणि कालाची स्थिरताही प्रवाही होऊन जाते.

‘रंग’मध्ये रंगसंवेदनेशी निगडित माणसे, घटना, कविता आणि वर्तमान भावस्थिती यांचे परस्परातले सामावलेपण प्रकट झाले आहे. श्रीनिवासनला ‘लाल रंग’ अस्वस्थ करतो. विनायक पवारच्या कवितेतील शेतकरी घरातल्या मुलाला आईच्या हिरव्या रंगाचे लुगडे अस्वस्थ करते. त्याला वाटते, आईच्या या लुगडय़ाच्या रंगानं गायीच्या डोळ्यात चमक येईल आणि तिच्या डोळ्यातील अशी चमक भीतीदायक..कारण अन्नपाणी न मिळाल्याने दुष्काळी गायीच्या डोळ्यात हिरव्या रंगाचे आकर्षण निर्माण होणे हा  स्वप्नभंगच!  रंगसंवेदनांचे हे तपशील, निग्रो कवींच्या कवितेतले ‘काळा’  हे रंगविशेषण, तहसील कचेरीत आलेल्या शेतकऱ्याच्या टाचांचे रक्तकण – रक्तक्षण उमटणे.. असे उल्लेख या लेखात येतात. नाटय़शास्त्र, साहित्यशास्त्र, समकालीन बिघडलेले जीवनशास्त्र यांतील संकेत, परस्परांना प्रभावित करण्याची गोष्ट ‘रंग’ या लेखामधे आहे. भयग्रस्त माणूस, अभावग्रस्त कष्टकरी, दुष्काळग्रस्त गाय यांचे रंगांचे आकलन – अनुभव निरागस कारुण्याने येथे मांडलेले आहे. येथील ‘मी’ कलावंत मनाचा, नम्र – साधा – अलवार ‘माणूस’ आहे, याचे प्रत्यंतर येत राहते. रंगांची बहुअर्थकता मांडताना चिंतनशील भाष्य येते- ‘आभाळ भरून आल्यावर ढगांचा काळा रंग मला आवडतो. पण गावाकडच्या बोळीत लहान मुलांना भीती दाखवायला दबा धरून बसलेल्या अंधाराचा काळा रंग मला आवडत नाही..’ अशा भाष्यांमधून ‘मी’चे भाव हळवे, गंभीर संवेनशील अस्तित्व साकारले जाते.

सामान्यत: ‘सत्’ची सुंदर बाजू घेणारी संवेदनशीलताच या ललित लेखांमधून आविष्कृत झाली आहे. निष्पापता, स्नेहभाव, नम्रतेने परिस्थितीचा उपहास, व्यवस्थेतील अव्यवस्थेचे छेदन, हिणकसपणाची कारणमीमांसा अशा आशयसूत्रांचा वेध घेणारे ‘मी’चे व्यक्तिमत्त्व जवळपास  साऱ्याच लेखनातून आले आहे, उमटून आणि उन्मळूनही!

समकालीन जीवनातल्या अव्यवस्था, विसंगती, विरोधाभास यांना लक्ष्य करीत जीवनभाष्ये करण्याची या निवेदकाची प्रवृत्ती प्रकर्षांने लक्षात येते. विविध क्षेत्रीय हिणकसापणाबद्दलचा राग या भाष्यांमध्ये आहे, संयमाने, शालीनतेने विसंगतीवर बोट ठेवले जाते. स्व-संवादाबरोबरच पर-संवाद येथे आहे. मला दिसते आहे, जाणवते आहे / जाणवले आहे ते मला ‘सांगायचे’ आहे, त्यातील ‘सत्’ची बाजू प्रकाशमान करायची आहे – असा निवेदनाचा पवित्रा निवेदक घेतो. व्यथा-वेदनेची जागा- क्षण- घटना- आठवण बरोबर वेध घेत तो ही भाष्ये करतो. उदा.‘आधी शेतकरी म्हटलं की डोळ्यांसमोर नांगरधारी शेतकरी यायचा. आता फासासकट शेतकरी दिसतो’/ ‘माणसाला मारता येतं, विचाराला नाही मारता येत’/ ‘आमचे केस वडिलधाऱ्यांच्या धाकात वाढले आणि धाकातच कापले गेले. स्वतंत्र वळण त्यांना मिळालंच नाही’/ ‘कुणाला तरी आपल्या आज्ञेत ठेवणं माणसांना आवडतं’/ ‘अग्निशामक दलाची गाडी नेहमीच तयार असते, तसे बाईचे डोळे पुरुषाच्या तुलनेत केव्हाही भरून येऊ शकतात’/ ‘पुरुषांच्या बाबतीत रडणं हे कमीपणाचं मानलं गेलं आहे. पुरुषाने धीरोदात्त असलं पाहिजे, हा संदेश पुरुषाच्या अश्रू निर्माण करणाऱ्या ग्रंथीनेही स्वीकारलेला असावा’ अशा सौम्य उपरोधाचा सूचक वापर या लेखांमध्ये झालेला आहे.

परिचित आणि रूढ संकेतांचे – विषयांचे असांकेतिक आणि कल्पक संकल्पन हे या लेखनाचे खास वैशिष्टय़ म्हणावे लागेल. उदा. ‘कटिंग’मधला मुलांना नकोसा वाटणारा कोंडीबामामा हा न्हावी – ‘एखादा हुकूमशहा हातातल्या धारदार शस्त्रानं माणसं कापीत सुटावा तसा आविर्भाव कोंडीबामामांचा असे’ किंवा ‘श्वानपुराण’मधील पुढील उल्लेख पाहा – ‘काही कुत्री साजूक तुपात भिजवलेल्या फुलवतीसारखी नाजूक असतात. जणू तोडणीचा स्वच्छ शुभ्र कापूस घरभर तुरतुरत असतो’ किंवा ‘अरण्यरुदन’मधील जपानचे ‘क्राइंग रूम’, ही जागा आली. स्त्रियांच्या नैराश्यातून सुटण्याची आपल्याकडची जागा ‘पाणवठा’ किंवा गटागटाने विधीला जाणे.. विधीला गेल्यावर एकमेकींशी सुख-दु:खाचं बोलणं म्हणजे दु:खातील साम्य शोधण्यातील ही कल्पकता येथे महत्त्वाची आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या, सहिष्णुतेच्या जाणिवा जाग्या व्हाव्यात म्हणून लेखक, कलावंतांनी बक्षिसे परत केली. या घटनेच्या पाश्र्वभूमीवरचा ‘बक्षिशी’ हा ललित लेखही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंबंधी आगळेवेगळे भाष्य करणारा आहे. ‘किती रसिक असतं मरण। शोधत नवनव्या तऱ्हा। मांडतं आरास। सरकारही तेवढंच कदरदान। देतं लाख लाख रुपयाची बक्षिसी..। खऱ्या अर्थाने मातीत राबणारा शेतकरी इथे पुरस्कृत झालाच नाही. परत करण्यासाठी त्याच्याजवळ पुरस्कार नाहीत. म्हणून तो जगणंच परत करतोय, लटकलेल्या देहाच्या स्मृतिचिन्हासह ‘शेतकऱ्यांच्या आत्महत्या – बक्षीस – देहाचे स्मृतिचिन्ह’ हे सारे नव्याने जखमा उकरणारे आणि वेदना वाढवणारे उल्लेख आहेत. दोन बक्षिसांच्या विपरीत स्थिती परस्परांसमोर ठेवून जाणिवांना ठणका देण्याची ही लालित्यपूर्ण कल्पनाशक्ती म्हणावी लागेल. स्त्रीजीवन, बदलते नफाखोर समाजजीवन, ढासळणारे कृषीजीवन, बंधुभावाचे वैरात आणि द्वेषात होणारे रूपांतरण, हिंसा – क्रौर्याची हुकूमत – दहशतीची चंगळ या वास्तवातून आपल्या जीवनानुभवांचा अर्थशोध घेण्याची भूमिका लेखकानं पुढे आणली आहे.

येथे बालपण, बालपणातले मैत्र, शिक्षक, गाव, जत्रा, चित्रपट यांच्या संदर्भातले स्मरणरंजन आलेले आहे. पण या स्मरणांना सतत वर्तमानाचा सामना करावा लागला आहे. उदा. ‘सीमेरवचं नाटक’मधे वाघा बॉर्डरवरील कवायती आणि लहानपणी पाहिलेली रेडय़ांची टक्कर यातील साम्य आठवले आहे. वाघा बॉर्डरवरील कवायत म्हणजे ‘इव्हेंट’ बनते! या परेडला ‘वेळोवेळी सीमेवर, बॉम्बस्फोटात युद्धात सांडणाऱ्या रक्ताचा गंध आहे’ किंवा ‘खडूची भुकटी’मधील शाळेतले बालपण – गुरुजी आणि आजच्या शालेय जीवनाची दाणाफाण अवस्था! किंवा ‘झेंडे’ किवा ‘अरं.. येऊऽऽन येऊऽऽन येणार कोण?’ या लेखांमधील स्मरणे गतकाळ आणि वर्तमान यांच्यातील वैधर्म्ययुक्त सामना दर्शवितात.

वाचकाचे भावविश्व अधिक संवेदनशील व्हावे, त्याचे चिंतनशील व्यक्तिमत्त्व जागे व्हावे, अशी निवेदनशैली स्वीकारल्याने गोष्ट, किस्से, रूपककथा, उदाहरणे अवतरणे, चिंतनात्मक भाष्ये या निवेदनात – कथनात येतात. एका संवेदनशील आणि विवेकी माणसाच्या सान्निध्यात आपण वावरत आहोत, आपली समज ‘काही’ नव्याने अंकुरते आहे, हा वाचनानुभव या ‘मेळा’मधे आहे. सूचक आणि कल्पक शहाणपण वाचकाला येथे मिळते, अनुभवात ‘सुंदर’ भर पडते.

‘मेळा’- दासू वैद्य,

पॉप्युलर प्रकाशन,

पृष्ठे- १४९, मूल्य- ३५० रु.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2019 2:37 am

Web Title: mela by dasu vaidya archives of articles review abn 97
Next Stories
1 दखल : चौकटीपल्याडच्या किशोरकथा
2 कॉर्पोरेटमधील अधिकारी ते शेतकरी !
3 नाटकवाला : ‘पत्नी’
Just Now!
X