‘रिपोर्ताज’ या प्रकारातलं लेखन मराठीत आता चांगलंच स्थिरावलं आहे. त्याला वाचकांचा प्रतिसादही चांगला असतो. एका ग्रंथालयाच्या कार्यकारिणीवर काम करताना, कुतूहलापोटी केलेल्या पाहणीत, चरित्र-आत्मचरित्राच्या खालोखाल सर्व वयोगटांतल्या वाचकांची मागणी असणारा हा लेखनप्रकार असल्याचं आढळलं.
‘मेळघाटावरील मोहर : डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे’ हे मृणालिनी चितळे लिखित पुस्तकही याच प्रकारचं आहे. कोल्हे दाम्पत्याविषयी आणि मेळघाटात त्यांनी उभ्या केलेल्या कामाविषयी अधूनमधून कुठे ना कुठे बातम्या-लेख वाचनात येत असतात, पण या पुस्तकातून त्यांच्या कामाची साद्यंत माहिती- तीही अतिशय वाचनीय स्वरूपात समजते.
मेळघाटातील बैरागड या गावात कोल्हे दाम्पत्याला भेटायला जाणंही किती यातायातीचं आहे, याची कल्पना लेखिकेच्या प्रास्ताविकातून येते. सातपुडय़ाच्या अतिदुर्गम भागात वसलेलं हे गाव जेमतेम दोन हजार वस्तीचं. पुणे-नागपूर, नागपूर-धारणी, धारणी-बैरागड असा प्रवास. पावसाळ्यात धारणीच्या पुढे रस्ते बंद . ४० कि.मी. अंतर पायी चालत बैरागड गाठावं लागतं. या भागाकडे शासनाचं दुर्लक्ष. रस्ते नाहीत. वीज नाही. मग शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे आवश्यक सुविधांविषयी तर बोलायलाच नको. अशा ठिकाणी कोल्हे दाम्पत्यानं केलेलं काम समाजासमोर यावं, या आंतरिक तळमळीतून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.
कोल्हे पती-पत्नीशी संपर्क साधण्यातल्या अडचणी, सध्याच्या ई-क्रांतीच्या जमान्यात दोन-तीन महिने कुणाशी संपर्क होऊ शकत नाही म्हणून आलेली अस्वस्थता, त्यामुळे मुंगीच्या गतीनं पुढं सरकणारं काम.. ही अडथळ्यांची शर्यत लेखिकेनं जिद्दीनं आणि चिकाटीनं पार केली. त्याचं दृश्य फळ म्हणजे हे पुस्तक!
मेळघाट म्हटलं, की कुपोषणाचा प्रश्न- एवढंच समीकरण शहरी (तेही, थोडय़ाच जागरूक) वाचकांना ज्ञात असतं, पण मेळघाटातल्या माणसांच्या जगण्याचे इतरही अनेक आयाम समजून घेत, तिथले शक्य तितके प्रश्न धसास लावण्याची जी धडपड कोल्हे दाम्पत्य करीत आहे, त्याची तपशीलवार ओळख लेखिकेनं या पुस्तकाद्वारे करून दिली आहे. एखाद्या ठिकाणाला आपली कर्मभूमी मानून तिथे रुजायचं म्हणजे काय, हे या पुस्तकातील त्यांचा जीवनपट वाचताना समजत जातं. जिथे आपण राहतो, तिथले लोक, त्यांचे रोजचे जगण्याचे प्रश्न, त्यासंबंधीची आस्था- हे सारं आपल्याही जगण्याचा भाग झाले तर ते रुजणं. कोल्हे दाम्पत्याचं मेळघाटात रुजून जाणं या पुस्तकातून उलगडतं आणि त्यांच्या कामामागच्या प्रेरणा, त्यांच्या निष्ठा, त्यांचा प्रामाणिकपणा, करडी म्हणावी अशी त्यांची तत्त्वनिष्ठा यांचा प्रत्यय पुस्तकातल्या अनेक हकिकतींमधून येतो.
घरातून कोणताही पाठिंबा आणि आधार नसताना अशा प्रकारच्या सामाजिक कामांची कोणतीच पूर्वपरंपरा नसताना आणि जन्मापासून हृदयाचा गंभीर आजार असताना केवळ आत्मशक्तीच्या बळावर एखादी व्यक्ती केवढं काम उभारू शकते, याचं उदाहरण म्हणजे हा मेळघाटावरचा मोहर!
कोल्हे पती-पत्नीच्या जगण्याची रीत लेखिकेनं समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केल्यामुळे या पुस्तकातून त्यांचं जगणं आपल्यालाही समजून घेता येतं. ‘कामाचा लेखाजोखा’ असं त्याचं स्वरूप रूक्ष आणि एकांगी राहत नाही.
डॉ. रवींद्र कोल्हे यांनी १९८४ मध्ये मेळघाटात पहिलं पाऊल कसं टाकलं आणि ते कसं स्थिरावू लागलं याची कथा-कादंबरीत शोभावी अशी रोचक हकिकत सुरुवातीला येते आणि फ्लॅशबॅक पद्धतीनं हळूहळू त्यांचं बालपण, त्यांचा हृदयविकार, एम.बी.बी.एस.पर्यंतचं शिक्षण याविषयीचं कथन येतं. विनोबांची ‘गीताई’, डेव्हिड व्हर्नर यांचं ‘व्हेअर देअर इज नो डॉक्टर’ इत्यादी पुस्तकांचा प्रभाव, डॉ. केतकर, डॉ. दलाल इत्यादींच्या संस्कारांचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. डॉक्टरांच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग असलेल्या व्यक्ती आणि घटना यांचा नेमका पण संक्षिप्त परिचयही आहे. डॉ. दिलीप गहाणकरी, डॉ. अविनाश सावजी, डॉ. प्रेमचंद पंडित या जिवलग मित्रांच्या मदतीनं पूरग्रस्तांसाठी केलेलं मदतकार्य आणि त्यातून जाणवलेला ‘दिवसभर पुरामुळे ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे अशांसाठी काम आणि रात्री त्या कामाचं सेलिब्रेशन’ यातला बेचैन करणारा विरोध, ३७ समाजसेवी संस्थांना भेटी देऊन संस्थात्मक कामाची करून घेतलेली ओळख आणि (म्हणूनच की काय, पण) ‘आपण कोणतीही संस्था उभारायची नाही’ हा केलेला निर्धार, ‘आपण कुणाशीच लढायला निघालेलो नाही’ ही स्वत:च्या मनाला पटवलेली खात्री, अशा अनेक लहान-मोठय़ा, पण अतिशय प्रस्तुत तपशिलामुळे डॉक्टर कोल्हे यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख होत जाते.
समाजकार्य करीत असताना आपण कौटुंबिक जबाबदाऱ्या झटकून टाकतोय या भावनेनं निर्माण होणारा ताण, त्यावर मात करणारी, गांधीजींचे विचार प्रत्यक्षात उतरवण्याची ओढ, खरीखुरी रुग्णसेवा करण्याची दुर्दम्य इच्छा, ज्या गावात डॉक्टर नाही अशा ठिकाणी काम करण्याचा झालेला निश्चय आणि त्यातून मेळघाटातील बैरागडची केलेली निवड, हा डॉक्टरांचा मानसिक प्रवास लेखिकेनं समरसून शब्दांकित केला आहे.
‘ब्रह्मचर्य ही आपली वाट नाही’ याची कल्पना डॉक्टरांना होती, पण गळणाऱ्या छपराखाली, दुर्गम प्रदेशात कोण राहायला तयार होणार, या वस्तुस्थितीचा स्वीकार करण्याची मनाची तयारी असताना डॉ. स्मितासारखी खरीखुरी सहधर्मचारिणी त्यांना लाभली. त्यांच्या विवाहाची हकिकत मुळातूनच वाचावी इतकी विलक्षण आहे. मुलांचे जन्म, त्यांचं साप- विंचू- बेडूक- सरडे यांच्या संगतीतलं बालपण, त्यांचे आजार, शिक्षण हे सगळं इतर अनेकींप्रमाणे स्मिताताईंनी केलंच; पण आपलं कायद्याचं ज्ञान, वैद्यकीय ज्ञान यांच्या आधारे तिथल्या समाजजीवनाशी त्या कशा समरस होत गेल्या, तिथल्या स्त्रियांच्या प्रश्नात कशा गुंतत गेल्या, अगदी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून ती जिंकून दाखवण्यापर्यंत स्वतंत्रपणे त्यांचंही काम कसं विस्तारत गेलं, याचा प्रत्यय पुस्तकातून येतो.
रुग्णसेवेबरोबरच या पती-पत्नींच्या कामाचा परीघ लोकांच्या गरजेनुसार हळूहळू वाढत गेला. कधी शिक्षणातून, कधी उत्सव-सभेमधून, तर कधी कायद्याचा धाक दाखवून लोकशिक्षणात हे दाम्पत्य सातत्याने कार्यरत आहे. स्वस्त धान्य दुकान चालवणं, धर्मातराच्या प्रश्नात लक्ष घालणं, शेतीचे प्रयोग करणं, दूध आणि भाजी विक्री करणं असे नाना उद्योग राबवत आहे. संस्था न उभारता (आणि कुणाच्याही आर्थिक मदतीची, परदेशी फंडिंगची वा देणग्यांची अपेक्षा न बाळगता) किती काम करता येतं, याचा वस्तुपाठच त्यांच्या जगण्यातून मिळतो. हे सगळं कसं घडलं ते जाणून घेण्यासाठी ‘मेळघाटावरील मोहर’ वाचायलाच हवं.
अशा प्रकारच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोन, चौफेर संदर्भ व त्यांची अचूकता यांचीच मातब्बरी अधिक असते, पण तटस्थ्य आणि तादात्म्य यांचा समतोल सांभाळता आला तर लेखनाची वाचनीयता वाढते, प्रत्ययक्षमता उंचावते. मृणालिनी चितळे यांनी हा समतोल साधला आहे. भारावून न जाता, आपला वस्तुनिष्ठ दृष्टिकोन सांभाळूनही वण्र्यविषयाशी त्या तादात्म्य पावू शकल्या आहेत. ‘कधी कधी तिथली अख्खी टेकडी काजव्यांनी लखलखत असायची. त्यांच्या साक्षीनं तिघांच्या डोळ्यांत उद्याची स्वप्नं चमकत राहायची.’ (पृ. ४०) किंवा ‘आकाशगंगा आपल्या पुण्यात वाहत असल्यासारखं वाटायचं. हात वर केला की चांदण्यांची फुलं तोडता येतील इतकी ती हाताशी असायची.’ (पृ. ७८) यांसारख्या वर्णनातून ते जाणवतं किंवा ‘कधीही बरा न होऊ शकणारा हृदयविकार, काही तरी शाश्वत गोष्टींचा शोध घ्यायला प्रेरणा देणारा ठरला असावा’ अशांसारखी काही अन्वयार्थ शोधणारी लेखिकेची विधानं त्याची साक्ष देतात.
सर्वधर्मसमभाव, अहिंसा, सेवाधर्म हे केवळ शब्द नाहीत; तो जीवनमार्ग आहे आणि आजही काही जण तो अनुसरतात, हे या पुस्तकामुळे समजतं! या प्रकारच्या पुस्तकामधून दोन प्रकारची उद्दिष्टं साधली जातात. एक म्हणजे कुठे ना कुठे, जगण्याच्या प्रवाहात प्रकाशाची बेटं निर्माण होत असतात, त्या प्रकाशाची तिरीप इतरेजनांपर्यंत पोहोचते आणि ती तिरीप कळत नकळत कुणाकुणाच्या मनात प्रेरणांची ठिणगी जागी करते. मेळघाटावरचा हा मोहर आणखीही कुठे कुठे बहरो, ही सदिच्छा!
‘मेळघाटावरील मोहर : डॉ. रवींद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे’ – मृणालिनी चितळे, राजहंस प्रकाशन, पुणे, पृष्ठे – ३००, मूल्य – ३०० रुपये.     

Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी