नाटय़-चित्रपट-मालिका अशा सर्वच क्षेत्रांत लीलया संचार करणारे लेखक अशोक पाटोळे यांच्या अकल्पित जाण्याने ‘एक जन्म पुरला नाही’ या त्यांच्या आत्मकथनाचा १५ मे रोजी आयोजिण्यात आलेला प्रकाशन समारंभ होऊ शकला नाही. डिंपल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होत असलेल्या त्यांच्या या आत्मकथनातील एक प्रकरण..
माझं आयुष्य बदलून टाकणाऱ्या ज्या काही गोष्टी घडल्या त्यातली एक अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे ‘आई रिटायर होतेय’ हे नाटक माझ्याकडून लिहून झालं व त्यात भक्ती बर्वे-इनामदार यांनी काम केलं. या नाटकाचा इतिहास मोठा ऐकण्यासारखा आहे.
एका कोजागरी पौर्णिमेला आम्ही काही मित्र गणेश तवटे यांच्या घरी कोजागरी साजरी करण्यासाठी गेलो होतो. तवटेंच्या इमारतीच्या टेरेसवर आम्ही गप्पाटप्पा करण्यात, पत्ते झोडण्यात आणि गाणी म्हणण्यात गुंग असताना गणेशची आई मात्र पहाटे दोनपर्यंत आमच्यासाठी कधी भजी आणून दे, तर कधी मसाला दूध आणून दे करत होती. त्यावेळी माझ्या डोक्यात ‘आई रिटायर होतेय’ या नाटकाचं कथानक शिजायला लागलं. माझ्या मनात विचार आला : बाबा जर रिटायर होऊ शकतात, तर आई का नाही? गृहिणींच्या नशिबी आयुष्याच्या अंतापर्यंत रांधा, वाढा, उष्टी काढा का बरं असावं? बरं, हे सगळं ती लग्नापूर्वीपासून करत असते. सुरुवात होते- मुलगी ही दुसऱ्याच्या घरी जाणार, तिला घरकाम, स्वयंपाक वगरे जमलंच पाहिजे अशा विचाराने. मग लग्नानंतर हे सगळं पत्नी म्हणून तुझं कर्तव्य आहे, असं नवऱ्याकडून सुनावलं जातं. पुढे lr27मुलंबाळं मोठी झाल्यावर त्यांची सरबराई करण्यात तिचं आयुष्य जातं. सुना आल्या, नातवंडं आली की आजी म्हणून तिच्या कर्तव्यांचा पाढा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तिच्या पुढय़ात वाचला जातो. उलट, बाप मात्र तोपर्यंत सेवानिवृत्त होऊन गावभर उंडारत फिरत असतो. हा स्त्रीजातीवरचा अन्याय आहे. समजा, एखादी स्त्री या अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उठली तर? समजा, तिने गृहकृत्यांतून निवृत्त व्हायचं ठरवलं तर?
या विचारमंथनातून एक अशी आई जन्माला आली- जिला वाटायला लागतं की या घरातली आपली गरज आता संपलेली आहे. आता आपण निवृत्त व्हायला हवं. आणि ती खरोखरच आपल्या मुलांना, सुनांना आणि नवऱ्याला नोटीस देते की, एक महिन्याने मी रिटायर होणार आहे. या नोटीसनंतर जो गदारोळ उठतो तो नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येतो- ‘आई रिटायर होतेय’ या नावाने.
नाटक मुळात तीन अंकी होतं. पण ते इतकी र्वष रखडलं, की तोवर तीन अंकी नाटकाचा जमानाच इतिहासजमा झाला. दोन अंकी नाटकं रंगभूमीवर येऊ लागली. माझी स्वत:चीच स्पध्रेतली सगळी नाटकं आणि ‘तांदूळ निवडता निवडता’ हे व्यावसायिक रंगमंचावर आलेलं नाटक दोन अंकीच होतं. म्हणून मग मी ‘आई रिटायर’मधला फाफटपसारा काढून ते दोन अंकी केलं. नाटक तर तयार झालं; पण ते करणार कोण? मी स्वतहून कधी कुठल्या निर्मात्याला फोन करून सांगितलं नव्हतं की, माझ्याकडे एक नाटक आहे. वाचणार का? पण एक दिवस सारंग भेटले कुठेतरी. ‘काय चाललंय?’ मी म्हटलं की, एक नाटक नुकतंच लिहून पूर्ण केलंय. म्हणाले, ते वाचू या. दुसऱ्या दिवशी सारंगांच्या घरी नाटकाचं वाचन झालं. लालन सारंगही वाचनाला होत्या. नाटक वाचून झाल्यावर मी मोठय़ा आशेने दोघांकडे पाहिलं. कमलाकर सारंग लालनताईंकडे बघत होते. लालनताई म्हणाल्या की, ‘मला यात नावीन्यपूर्ण असं काही वाटलं नाही. घराघरात हेच घडत असतं. यात नाटय़ कुठे आहे?’ मी निरुत्तर होऊन कमलाकर सारंगांकडे पाहू लागलो. ते म्हणाले, ‘लालनलाच आवडलं नाही तर मी कसं करणार?’ मी निराश होऊन तिथून निघालो. त्यानंतर काही महिन्यांनी उदय धुरत यांचा मला फोन आला- ‘नाटक वाचू या का?’ त्यांना ‘आई रिटायर’संब
ंधी कुठून माहीत झालं आठवत नाही. पण काही दिवसांनी उदयच्या घरी वाचन झालं. पांडुरंग धुरत, प्रमोद धुरत, उदय वगरे मंडळी वाचनाला होती. सगळ्यांना नाटक आवडलं. उदयने तर लगेच मला थोडे पसे देऊन साइनही केलं. आणि नाटक विजयाबाईंकडे द्यायचं ठरलं. दिग्दर्शन आणि आईच्या मध्यवर्ती भूमिकेसाठी! काही दिवसांनी फोन केल्यावर बाईंनी म्हटलं की, नाटकावर बसावं लागेल. सध्या मी जर्मनीला जाण्याच्या गडबडीत आहे. त्यानंतर उदयने नाटकातील मध्यवर्ती भूमिकेसाठी पर्याय शोधायला सुरुवात केली. कुणीतरी भक्तीचं नाव सुचवलं. पण उदयने ते फेटाळून लावलं. आईच्या भूमिकेत भक्ती खूप लहान वाटेल असं त्याचं मत पडलं. झालं! परत नाटक रखडलं. मध्ये एक-दोन र्वष गेली. माझी नोकरी आणि चित्रपटलेखन चालूच होतं. एवढय़ात एका निर्मात्यासाठी सचिन पिळगावकरांनी एक चित्रपट दिग्दíशत करायचं ठरवलं. मला पटकथा-संवाद लिहिण्याची ऑफर दिली. त्या चित्रपटाची कथा माझ्या ‘आई रिटायर होतेय’ या नाटकाशी मिळतीजुळती होती. म्हणजे त्यातही एक आई मुलांना वैतागून घर सोडून जाते. पण तिला तिची एक जुनी मत्रीण भेटते आणि तिला परत पाठवते- तिच्यातला आत्मविश्वास जागृत करून! मग ती घरी येऊन आपल्या सुनांना आणि मुलांना चांगला धडा शिकवते.. असं ते कथानक होतं. मी तो चित्रपट लिहीत असताना ‘आई रिटायर होतेय’ नाटकातले प्रसंग व संवाद वापरले. नाहीतरी नाटक रंगभूमीवर येण्याची शक्यता नव्हतीच. मग त्यातले काही प्रसंग आपल्याच चित्रपटात वापरले तर बिघडलं कुठे? असा विचार करून मी आत्मविश्वासाने संवाद खुलवले. पण माझं मन काही त्या चित्रपटाच्या लेखनात रमत नव्हतं. म्हणून एक दिवस मी सचिनना सांगितलं की, मला हे पिक्चर लिहिताना कम्फर्टेबल वाटत नाहीए. ते म्हणाले की, ठीक आहे. आम्ही दुसऱ्या कुणाकडून तरी लिहून घेतो. अशा पद्धतीने त्या चित्रपटाशी माझा संबंध संपला. मधे एक वर्षं गेलं. मी ‘आत्मविश्वास’बद्दल साफ विसरून गेलो होतो. दरम्यान, एक दिवस दिलीप कोल्हटकर मला भेटला. दिलीपशी माझी आंतर बँक स्पध्रेपासूनची ओळख होती. राज्य नाटय़स्पध्रेत, आंतर बँक एकांकिका स्पध्रेत दिलीपने बरीच पारितोषिकं पटकावलेली होती. माझे आणि माझे शाळासोबती मधुकर गोलामडेंचे ते कॉमन मित्र होते. दिलीप बँक ऑफ बरोडातून नाटकं बसवत असे. मधूसुद्धा त्याच बँकेत होता. त्यानेच माझी दिलीपशी ओळख करून दिली. अत्यंत तल्लख विनोदबुद्धी, दिग्दर्शनात नवनवीन प्रयोग करण्याची धमक, प्रकाशयोजनेत हातखंडा असे कितीतरी गुण दिलीपमध्ये होते. त्याला जेव्हा कळलं की माझ्याकडे एक नाटक पडून आहे, तेव्हा त्याने वाचन ठरवलं. दादर येथील डी. एल. वैद्य रोडवर ‘अमिता’ नावाचं हॉटेल आहे, तिथे एक दिवस संध्याकाळी आम्ही भेटायचं ठरलं. हॉटेलचे मालक बबनराव हे दिलीपचे दोस्त होते. त्यांनी नाटय़वाचनासाठी आम्हाला एक रूम दिली.नाटकाचं वाचन सुरू झालं. दिलीप एकटाच होता वाचनाला. अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. नाटक वाचून संपलं तेव्हा दिलीप इतका भारावून गेला होता की ओक्साबोक्शी रडायलाच लागला. मला वाटलं, तो माझी थट्टा करतोय. पण त्याचं ते रडणं खरं होतं. दिलीप इतका भावनाप्रधान असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. त्याला खरोखरच नाटक खूप आवडलेलं होतं. त्याने लगेच फोन करून भक्तीची अपॉइंटमेंट घेतली.
एक दिवस संध्याकाळी मग आम्ही मॉडेल हाऊसमधील (लॅमिंग्टन रोड) भक्तीच्या घरी गेलो. भक्तीने फार काही प्रतिक्रिया नोंदवली नाही. विचार करून सांगते म्हणाली. मी तिला म्हटलं की, थांब, मी हे नाटक परत लिहितो. तू आत्ताच काही निर्णय घेऊ नकोस. मला या नाटकाच्या बाबतीत तुझ्याकडून नकार नकोय. म्हणून ते मी रीराइट करून पुन्हा एकदा तुझ्याकडे वाचतो.
बरोबर एक महिन्याने आम्ही पुन्हा भक्ती बर्वे-इनामदारच्या घरी जमलो. शफी इनामदार त्यावेळी घरी नव्ह
ते. शफी एक अत्यंत व्यस्त अभिनेता व गुजराती रंगभूमीवरील मान्यवर दिग्दर्शक होते. त्यांना यायला उशीर होणार होता. त्यांनी भक्तीला फोन करून सांगितलं की, तुम्ही सुरू करा. मी आलोच. मी नाटक वाचायला सुरुवात केली. गेल्या महिन्याभरात मी माझं सगळं कसब पणाला लावून नाटक नव्याने लिहून काढलं होतं. त्यामुळे भक्ती इंटरेस्ट घेऊन ऐकत होती. नाटकाचा पहिला अंक संपला आणि शफी इनामदार आले. आम्हाला म्हणाले की, मला पहिल्या अंकाची फक्त वन लाइन सांगा. (म्हणजे आतापर्यंत काय काय घडलं ते सांगा.) मग आम्ही पुढला अंक वाचायला सुरुवात केली. नाटक वाचून संपल्यावर शफी म्हणाले, ‘बहोत अच्छा लिखा है. भक्ती, ये नाटक तुम करोगी. ये बुढ्ढी कभी बुढ्ढी नहीं होनेवाली.’ आणि माझ्याकडे वळून म्हणाले, ‘‘तुझं आहे तुजपाशी’ के बाद अगर कोई नाटक मुझे पसंद आया होगा तो वो ये नाटक है. अशोक पाटोले अब आप पच्चीस सालतक कोई नाटक नहीं लिखेंगे.’ इतकं भरभरून कौतुक केलं शफीजींनी नाटकाचं! त्यांच्या त्या कौतुकाने आम्ही तिघंही खूश झालो. मग शफीजींनी आम्हाला जेवायला न्यायचं ठरवलं. माझ्या फियाटमधून रात्रभर आम्ही मुंबईत भटकत होतो. सबंध वेळ शफीजी नाटकावरच बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो.
बरोबर दोन महिन्यांनी नाटक रंगभूमीवर आलं. निर्माते तीन-चार जण होते. मुख्य निर्माते होते शिवाजी मंदिरचे व्यवस्थापक व पदाधिकारी मनोहर नरे आणि परमानंद पेडणेकर. कलाकार होते- भक्ती बर्वे-इनामदार, बाळ कर्वे, आनंद अभ्यंकर, नंदू गाडगीळ, स्निग्धा गाडगीळ, पद्मश्री कदम, इ. नाटकाचा पहिला प्रयोग झाला १७ ऑगस्ट १९८९ ला शिवाजी मंदिर येथे दुपारी ४.३०वा. पण एक घोटाळा झाला. नाटक सुरू होऊन अर्धा तास उलटला आणि वीजप्रवाह खंडित झाला. पाचएक मिनिटांनी परत दिवे लागले. नाटक सुरू झालं. पुन्हा काही वेळाने वीज गेली. ती दहा मिनिटांनी आली. लोक बसून होते. परत एकदा असंच झालं. नाटक सुरू झालं आणि वीज गेली. आम्ही सगळे हताश झालो. पण प्रेक्षक बसून होते. कुणीतरी बातमी आणली की, माहीमला काहीतरी बिघाड झाल्यामुळे सबंध विभागच काळोखात आहे. मग मात्र आम्ही नाटक बंद करायचं ठरवलं. दिलीप पडद्याच्या पुढे जाऊन प्रेक्षकांना म्हणाला की, ‘क्षमा करा. माहीमजवळ वीजपुरवठा करणारं संयंत्र बिघडल्यामुळे आणखी किती वेळ वीज खंडित राहणार आहे ते सांगता येत नाही. म्हणून आम्ही नाइलाजाने नाटक थांबवत आहोत. तिकिटाचे पसे परत मिळतील.’ निम्मेअध्रे लोक हे ऐकल्यावर उठून गेले. पण तेवढय़ात वीज आली. दरवाजापर्यंत गेलेल्या लोकांनी मागे वळून बघितलं. दिलीप अद्याप स्टेजवरच पडद्याच्या पुढे उभा होता. मागे वळून बघणाऱ्या प्रेक्षकांना उद्देशून तो म्हणाला, ‘काय करायचं? येणार परत?’ दुसऱ्याच क्षणी बाहेर गेलेले लोक परत आपल्या जागेवर येऊन बसले. नाटक पुन्हा सुरू झालं ते परत न थांबण्यासाठी.
‘आई रिटायर होतेय’ सुरू होण्यापूर्वी एक गंमत झाली. नाटकाच्या जाहिराती बघून सचिन पिळगावकरांनी मला फोन केला. मला वाटलं, मला बेस्ट लक म्हणण्यासाठी फोन केला असेल. पण त्यांनी फोन वेगळ्याच कारणासाठी केला होता. म्हणाले, ‘अहो, तुमचं नाटक एवढय़ात ओपन करू नका. आपलं पिक्चर लागतंय. ‘आत्मविश्वास’ लागतोय येत्या आठवडय़ापासून.’ मी म्हटलं, ‘नाटकामुळे आपल्या चित्रपटाला काय बाधा येणार आहे?’ ‘अहो, तुम्हाला कळत कसं नाही? थीम्स मिळत्याजुळत्या आहेत. ‘आत्मविश्वास’च्या बुकिंगवर परिणाम होण्याची शक्यता आहे.’ मी म्हटलं की, ‘साहेब, हे कसं शक्य आहे? तुमचे दिवसाला तीन-तीन शोज् असतील. माझ्या नाटकाचे आठवडय़ाला जेमतेम तीन प्रयोग होतील.’ पण सचिनजींना ते काही पटलं नाही. त्यांनी म्हटलं, ‘तुम्हाला चित्रपट निर्मात्यांच्या व्यथा नाही कळणार.’ आणि त्यांनी फोन ठेवून दिला. मला खूप वाईट वाटलं. एक चित्रपट निर्माता एका नवीन नाटकाम
ुळे इतका कासावीस होऊ शकतो? कदाचित त्यांचं बरोबरही असेल. पण नाटकाचे प्रयोग मी काही मुद्दाम त्याचवेळी लावायला सांगितले नव्हते. चित्रपट आणि नाटक एकाच वेळी रिलीज होणं हा निव्वळ एक विचित्र योगायोग होता. आमच्या नाटय़निर्मात्यांना तर ‘आत्मविश्वास’संबंधी काहीच माहिती नव्हतं. मी स्वत:ही ‘आत्मविश्वास’वर काम केल्याचं साफ विसरून गेलो होतो. त्यामुळे आम्ही मुद्दाम ‘आई रिटायर होतेय’ रंगमंचावर आणलं हा सचिनजींचा गरसमज कसा दूर करावा, हे मला कळलंच नाही. पण सचिनजी- माझे स्क्रीन प्लेमधले गुरू- माझ्यावर तेव्हा इतके रागावले, की त्यानंतर त्यांनी मला चित्रपट लिहिण्याची परत कधीच ऑफर दिली नाही.
‘आई रिटायर’चे सुरुवातीचे प्रयोग अगदीच ओकेबोके गेले. भक्तीच्या नावामुळे पुढचा प्रेक्षक यायचा. मागे सगळं रिकामं. भक्ती जाम कासावीस व्हायची. म्हणायची, ‘अरे, मागचा प्रेक्षक येईल असं काहीतरी करा.’ शफी तिला शांत करत असत- ‘भक्ती, धीर धर. नाटकात तुझ्याखेरीज नाववालं कुणी नाहीय. आणखी थोडे प्रयोग जाऊ दे, मग बघ.’ आणि खरोखरच काही प्रयोगांनंतर नाटक उसळलं. हाऊसफुल्ल जायला लागलं. महिन्याला ३० प्रयोग या गतीने प्रयोग होत होते. सगळ्या महाराष्ट्राचंच नव्हे, तर इतर राज्यांतल्या लोकांचंही नाटकाकडे लक्ष वेधलं गेलं. आम्हाला हे नाटक बंगालीत करायचंय, कानडीत करायचंय, असे फोन यायला लागले. शफीजींनी नाटकाचे गुजराती हक्क घेतले. संजय गोराडिया आणि कौस्तुभ त्रिवेदी या निर्माताद्वयीने ते गुजराती रंगमंचावर आणलं. त्यात त्या काळातली प्रख्यात अभिनेत्री पद्माबेन काम करायच्या. गुजरातीत तर ते धो-धो चाललं. अमेरिकेला जाऊन आलं. एका साऊथच्या निर्मात्याने दोन लाख रुपये देऊन माझ्याकडून चित्रपटाचे हक्क घेतले. सुधाकर बोकाडे यांनी िहदी चित्रपटासाठी हक्क घेतले. अशा प्रकारे ‘आई रिटायर होतेय’ने मला भरपूर पसे मिळवून दिले. मी फियाट विकून सेकंड हँड मारुती ८०० विकत घेतली. माझा पुण्याला एक टेरेस फ्लॅट झाला. तो अर्थात बँकेकडून हाऊसिंग लोन आणि शफी इनामदार यांनी ‘बा रिटायर थाय छे’चे अॅडव्हान्स मानधन दिले म्हणून झाला. शफीजींचे माझ्यावर असे उपकार झाले, की पुण्याच्या त्या फ्लॅटचा मला पुढे मुंबईत हक्काची मोठी जागा घेण्यासाठी उपयोग झाला. ‘आई’ने माझं सगळं भविष्यच बदलून टाकलं. ‘आई रिटायर होतेय’ चांगलं साडेसातशे प्रयोग चाललं. सातशेव्या प्रयोगाला पु. लं. आले होते. आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना एक आभारप्रदर्शक पत्र पाठवलं. त्यावर पु. लं.नी आपल्या खास शैलीत उत्तर पाठवलं. ते उत्तर असं होतं (पत्र निर्मात्याला उद्देशून होतं.)..
प्रिय परमानंद पेडणेकर,
तुमचे आणि ‘आई रिटायर होतेय’ या अत्यंत यशस्वी नाटकातील कलाकारांच्या सह्य़ांचे पत्र मिळाले. एक सुरेख नाटय़प्रयोग पाहण्याची संधी आम्हा उभयतांना दिल्याबद्दल वास्तविक मी तुम्हा सर्वाचे आभार मानायला पाहिजेत. ७०० वा प्रयोग असूनही प्रयोगातील ताजेपणा टिकवून ठेवणाऱ्या कलाकारांचं मन:पूर्वक अभिनंदन करतो. कंपवाताच्या विकाराने हात थरथरतो आणि अक्षरही असं वेडंवाकडं येतं. माझ्या या पुढल्या नाटकाची टायटल ‘आई रिटायर होतेय’च्या धर्तीवर ‘भाई रिटायर होतोय’ ही असण्याची शक्यता आहे. खराब अक्षर वाचण्याचा आणखी त्रास देत नाही. इथेच थांबतो. पुन्हा एकदा अभिनंदन.
– तुमचा भाई
पु.लं.चं हे पत्र म्हणजे ‘आई रिटायर होतेय’ या नाटकाच्या अध्यायाचा उत्कर्षबिंदू होता.

Drug trafficker Shirazi case
अमली पदार्थ तस्कर शिराझी प्रकरण : साडेपाच कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच
personality of jacob rothschild
व्यक्तिवेध : जेकब रोथशील्ड
Best Bus Monthly Pass Rate Increase Mumbai
बेस्टचा पास महागला; पासधारकांच्या खिशाला कात्री
dwarka pm modi
प्राचीन द्वारका नगरीच्या दर्शनातून पंतप्रधान मोदींचा अहिर समुदायाला संदेश