नुकत्याच दिवंगत झालेल्या लेखिका पद्मजा फाटक ‘मजेत’यांच्या आठवणींना उजाळा देणारा त्यांच्या सुनेचा लेख..
आईंना अंथरुणाला खिळून दोन आठवडे झाले होते. त्यांचं ‘गर्भश्रीमंतीचं झाड’ पुन्हा एकदा वाचताना मी केवढी हसत असते हे त्यांना सांगत होते. ते पुनर्मुद्रित करताना त्यात चित्रांची भर घालायची जबाबदारी मला दिली होती. पस्तीस वर्षांनंतरही हे पुस्तक नव्या पिढीला आपलंसं वाटेल का, याबद्दल त्यांना कुतूहल वाटत होतं. माझा हात हातात घेऊन नातवंडांच्या नव्या गमतीजमतींना दाद देत त्या म्हणाल्या, ‘बघ गं काय झालंय माझं! डॉक्टर हॅज गिव्हन अप. आय हॅव गिव्हन अप.’ अंग दुखत होतं. डोळे उघडवत नव्हते. बोलण्याची शक्ती नव्हती. धाप लागत होती तरी थोडा वेळ उठून बसल्या. दोन घोट संत्र्याचा रस प्यायल्या. lr05पुन्हा मदतीने आडव्या झाल्या. आयुष्यावर अमाप प्रेम केल्यानंतर आता झुंजार लढवय्याप्रमाणे मृत्यूचाही त्या स्वीकार करत होत्या की काय? गेल्या अनेक आजारपणांतून आश्चर्यकारकरीत्या त्या जशा बाहेर आल्या तशाच यावेळीही येतील असं वाटून गेलं. त्या दोन दिवसांत भेटायला आलेल्या आप्तांना म्हणत होत्या, ‘ज्योत मालवण्याआधी मोठी होते नं, तसं झालंय!’ आणि खरंच आठ दिवसांनी ज्योत मालवली.
अथश्री, पाषाणमध्ये गेली नऊ वर्षे त्यांनी खूप मित्र केले. पटवर्धन आजोबा १०-१२ वर्षांनी मोठे आणि ओककाका लहान; पण त्यांचा स्नेह इतका, की त्यांनी खूप प्रेम व मदतही केली. आई गेल्यावर खूप शेजारी भेटायला आले. प्रत्येकजण अश्रू पुसत आपापल्या आठवणी सांगत होते. एक आजी म्हणाल्या, ‘ती एवढी मोठी लेखिका आणि मी साधी बाई. पण माझ्याशीही मत्री केली हो तिने.’ दुसऱ्या एक आजी रोज सकाळी ठरलेल्या वेळी नेमाने येत आणि त्यांचा हात हातात घेऊन गप्पा मारत. त्या त्यांच्या डोक्यावरून, तोंडावरून हात फिरवून म्हणाल्या, ‘पद्मजा, नीट जा गं बाई.’ नातेवाईक, चाहते.. कोणालाच एवढय़ा उमद्या मनाची लेखिका, मत्रीण आता आपल्यात नसल्याच्या वेदना सहन होत नव्हत्या.
विजय तेंडुलकर, दिलीप प्रभावळकर, विद्या बाळ, मंगला नारळीकर अशा विद्वान मित्रांपासून ते सामान्य शेजाऱ्यांपर्यंत सर्वाशी त्यांची मत्री होत असे. तीव्र बुद्धिमत्ता आणि त्याला विनोदाची झालर असणारी माणसं जेवढी कल्पक, तेवढीच हळवीही असतात. आपली दु:खं गिळून दुसऱ्यांना केवळ आनंदच द्यायचा, अशी जणू त्यांनी शपथ घेतलेली होती. ८० च्या दशकात ‘सुंदर माझं घर’ या दूरदर्शनवरच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेण्याचा त्यांना नाद लागला तो कायमचा. समोरचा माणूस समजून घेण्यासाठी कोणते प्रश्न विचारायचे, याची त्यांना निसर्गत:च जाण होती. स्वत:कडे त्यांनी आयुष्यभर मीडिया पर्सन आणि लेखिका याच दृष्टीने पाहिलं. अगदी लहान वयापासूनच त्यांना लेखिका व्हायचं होतं. तो किस्सा त्या अनेक वेळा सांगायच्या.
लेखनातही त्या प्रत्येक वेळी नव्या दृष्टीने नवीन प्रयोगांची साथ निवडत. ‘हसरी किडनी’मध्ये त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते. किडनी निकामी होण्यासारख्या दुर्धर आजारातून स्वत:ला सावरून २२ वर्षे त्या स्वत:बरोबर इतरांचंही आयुष्य खुलवत राहिल्या. स्वत:च्या वेदनांकडे कानाडोळा करून जणू सृजनाने झपाटल्यासारखं आयुष्य जगल्या. सगळे विचारत, ‘कशी आहेस?’ तेव्हा ‘मजेत’ हे उत्तर देता देता स्वत:चं नावच त्यांनी ‘मजेत’ असं घेतलं. त्यांना वेगळी, खास विनोदी वाक्यं, विचार, वस्तू जमवायचाही नाद होता. दुकानात गेल्यावर त्यांची रसिक नजर न चुकता वैशिष्टय़पूर्ण वस्तूंकडे जात असे. नातवंडांसाठी, मुलांसाठी, सून, जावयांसाठी अगदी आठवणीने कोणाला काय आवडेल आणि प्रसंगी शोभेल, याचा विचार करून हौसेने खूप काय काय आणायच्या. स्वत:साठीसुद्धा त्या अनेक आवडीच्या वस्तू आणत. घरात सहज नजरेस येतील अशा ठिकाणी कित्येक मनोरंजक वस्तू, लिहिलेली वाक्यं, कागद ठेवलेले असत. या छोटय़ा छोटय़ा वस्तू जणू त्यांना दिशा दाखवत.. मार्गदर्शकासारख्या. शोभा भागवत- म्हणजे माझ्या आईने त्यांना काय काय करायला आवडतं, असं एकदा विचारलं तर शंभराहून जास्त गोष्टींची यादी त्यांनी केली होती. आई-बाबांना छोटय़ा तारा आणि मणी ओवून छोटीशी रत्नांची झाडं करायचा छंद होता. अशी अनेक झाडं कायम त्यांच्या घरी ठेवलेली असत. आता ‘रत्नांची झाडं’ याच नावाने त्यांचा एक ललित लेखसंग्रह लवकरच प्रकाशित होतो आहे.
त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि व्यावसायिक आयुष्यात अंतर नव्हतंच. ती एकमेकांना पूरक होती आणि कायम एकमेकांना सत्त्व पुरवत राहिली. ‘बाराला दहा कमी’ हे पुस्तक लिहिण्यासाठी त्या जपानला जाऊन, त्यांच्या घरी राहून, मुलाखती घेऊन आल्या. तेव्हा हे ललित पद्धतीने लिहिलेलं गंभीर आणि वैचारिक पुस्तक तयार झालं. प्रत्येक विषयाबद्दल कुतूहल वाटल्यापासून त्याच्या खोलात शिरून समजून घेण्याची त्यांना आवडत होती. ‘बापलेकी’ हे संपादित पुस्तक म्हणजे मूलभूत, पण दुर्लक्षित राहिलेलं वडील-मुलीचं नातं उलगडून दाखवणाऱ्या लेखांचा संग्रह. या पुस्तकाचं संपादन करताना त्यांना तोच विषय सगळीकडे दिसे. गप्पागप्पांमध्ये त्या मलाही बरेच प्रश्न विचारत. आमचं सासू-सुनेचं नातं अगदी मत्रिणीसारखं होतं. मीही मोकळेपणाने खूप गोष्टी त्यांना सांगू-विचारू शकायचे. माझ्या ‘आकृती’ या पहिल्या पुस्तकाचं त्यांना एवढं कौतुक होतं, की त्यांनी ते आवर्जून अनेकांना भेट दिलं. नातेसंबंध, त्यांतली गुंतागुंत, आयुष्यातले विविध निर्णय, व्यावसायिक अडचणी आणि अगदी चूल-मूल अशा अनेक विषयांवर आमच्या गप्पा होत. त्यांच्या हाताला अगदी उत्तम चव होती आणि त्यांना स्वैंपाकाचीही आवड होती.
‘गर्भश्रीमंतीचं झाड’, ‘आवजो’ या पुस्तकांच्या बाबतीत त्यांचं त्यावेळचं आयुष्य, त्यातला त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, सृजनाची आवड, माणसं समजून घेण्याची इच्छा आणि आत्मशोध याचा परिणाम वाचकांवर होतो. ‘शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक’ हे पुस्तक वाचून आजही शिक्षण क्षेत्रातील  अनेक ज्येष्ठ माणसं त्याचं कौतुक करतात. स्वत:च्या मुलांना वाढवताना आयुष्याला आलेला बहर त्यांच्या ‘चिमुकली चांदणी’, ‘िहद विजय सोसायटीचे पगडी आजोबा’ अशा लहानांसाठी लिहिलेल्या पुस्तकांतून आणि अनेक ललित लेखांतून दिसतो.
त्यांची आई बडोद्यातील पहिल्यावहिल्या ‘वìकग वुमेन’पकी एक होती. ती कामाला कशी स्कूटरवरून जात असे, हे त्या कायम अभिमानाने सांगत. त्यांची आजीदेखील शिकलेली होती. त्यामुळे त्या स्वत: ही शिकलेली तिसरी पिढी. आधीच्या पिढय़ांकडून मिळालेला आधुनिकतेचा वारसा त्यांनी पुढच्या दोन पिढय़ांनाही दिला आहे. अस्सल पुरोगामित्वाचे अंश आणि विनोदाची चुणूक जेव्हा त्यांच्या मुलांमध्ये आणि नातवंडांमध्ये मला जाणवते तेव्हा गंमत वाटते. श्रेयसशी माझं लग्न होण्यात आईंच्या लेखनाने मी भारावून जाण्याचा मोठा हात आहे.
कायमच तर्कबुद्धीला पटेल ते करण्याची आई-बाबा दोघांनाही सवय असल्यामुळे मृत्युपश्चात देहदानाची आईंची इच्छा होती. पण कावीळ होऊन गेली असल्याने देहदान आणि नेत्रदान या त्यांच्या दोन्ही इच्छा अपूर्ण राहिल्या. त्यांच्या जाण्यानं कळवळून जाऊन ‘बाराला दहा कमी’ या पुस्तकाचे त्यांचे सहलेखक आणि अतिशय जवळचे कुटुंबमित्र माधव नेरुरकर म्हणाले, ‘आयुष्यात एवढा रस असणारं आणि तो शब्दबद्ध करण्याचं विशेष कसब असणारं ‘मजेत’सारखं दुसरं माणूस मी पाहिलं नाही. खूप त्रासाचं आजारपण सहन करण्यातून मजेतची सुटका झाली म्हणून बरं झालं, असं म्हणवतही नाहीये.’
आपला अंत जवळ आलाय असं आईंना अनेक वर्षे वाटत असे, हे आम्हाला त्यांनी लिहून ठेवलेल्या काही चिठ्ठय़ांवरून समजलं. नऊ वर्षांपूर्वी बाबा वारल्यानंतर खचून जाऊन त्यांनी ‘मीही तुमच्याजवळ लवकरच येतेय’ याअर्थी काही पुस्तकांवर लिहिलंय. शेवटचे काही महिने दृष्टी अधू झाल्याने त्यांना वाचता येत नसे आणि हात थरथरत असल्यामुळे लिहिता येत नसे याचं त्यांना सर्वात जास्त दु:ख व्हायचं. गेल्या दोन महिन्यांत घरातलं सामान त्यांनी आवरून काढून टाकलं. पलंगाला खिळल्यापासून त्या स्वत:च्या उशाशी एक जुन्या लुगडय़ाची घडी ठेवत. त्या गेल्यावर कळलं, की ते लुगडं त्यांच्या आईचं होतं..    

 

swati mahadik
स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला बढतीचे बळ !
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप