lr07 ज्याची गणना नैसर्गिक ऊर्मी म्हणून केली जाते, त्यात नृत्याचा वरचा क्रमांक लागेल. नृत्याची विशेष आवड असल्याने असेल कदाचित; पण अरब देशांबद्दल एक टिपिकल प्रतिमा मनात घेऊन तिथे जाताना वाटत होते की तिथली संस्कृती  ‘मोजूनमापून’ अशा प्रकारची आहे. तिथे नृत्य, संगीत यांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल? मनोरंजन वा एकूणच रंजनप्रकार ही मानवी मनाची ऊर्मी या संस्कृतीत कशी असेल? अशा अनेक प्रश्नांचा विचार करत असतानाच अरबी कल्चर फेस्टिव्हलच्या निमित्ताने या प्रश्नांचा उलगडा झाला. संगीत, नृत्य, कला आणि साहित्य हे कुठल्याही संस्कृतीचे महत्त्वाचे घटक असतात. कलेतून एखाद्या समाजाचे प्रतिबिंब दिसते. त्या समाजाचा इतिहास, त्यांचा संघर्ष, एवढेच नाही तर त्यांची भविष्याची स्वप्नेही त्यातून प्रतीत होतात. लोककला ही सामूहिक अभिव्यक्ती असल्याने त्या समाजात मिळूनमिसळून गेल्याशिवाय तिचा खरा आस्वाद घेता येत नाही. त्यामुळे दुबईमध्ये स्थानिक कला, नृत्य व संगीत उमजायला मला थोडा वेळ लागला.
दुबईने सर्व देशांच्या कलाकारांना व्यासपीठ दिले आहे. मग ते बॉलीवूडचे चित्रपट असोत वा देशोदेशीचे वेगवेगळ्या शैलींचे गायक आणि कलावंत- सर्वाना दुबईने रसिक श्रोता/ प्रेक्षक उपलब्ध करून दिला आहे. परंतु हे करत असताना  त्यांच्या तरुण पिढीने आपले लोकसंगीत आणि लोकनृत्यही जपले आहे. आजही इथे ईद, राष्ट्रीय दिन, लग्न समारंभात आवर्जून पारंपरिक नृत्य सादर केले जाते. या नृत्याची परंपरा खूप जुनी आहे. वाळवंटातील खडतर जीवनात लढाया, संघर्ष यांना सामोरे जाताना कधीतरी याच कलेने त्यांना थोडेसे मनोरंजनाचे क्षण दिले असतील, तर कधी ही कला त्यांच्या संघर्षांची भाषा बनली असेल. त्यांचे योला, अय्यला आणि हरबियाह असे विविध नृत्यप्रकार पाहायला मिळतात. हे सगळे नृत्यप्रकार तत्कालीन युद्धाच्या गोष्टी किंवा युद्धानंतरचा विजय व्यक्त करणारे असले तरी या प्रत्येक नृत्याची म्हणून एक वेगळी खासीयत आहे.
lr06युद्धासाठी अरेबिक शब्द ‘हरब’पासून ‘हरबियाह’ हा शब्द रूढ झालेला दिसतो. या नृत्यप्रकारात अरब पुरुष हातात एक काठी घेऊन एका तालावर नृत्य करतात. ही काठी तलवारीची प्रतीक असते. युद्धाचे वातावरण निर्माण केले जाते. ढोल, ताशे आणि जल्लोष करून नृत्याची सुरुवात होते. नृत्यात भाग घेणारे पुरुष दोन ओळींत उभे राहतात. प्रत्येक गटाचा एक मुखिया असतो- जो त्यांचे मनोबल वाढवत, त्यांना प्रोत्साहन देत नेतृत्व करत असतो. गाणी आणि त्यावरच्या ठेक्यात हल्ले- प्रतिहल्ले होत असतात. शेवटच्या भागात विजय साजरा करण्याची गाणी व नृत्य केले जाते.
पुरुषांच्या नृत्याचा बाज हा लढाई, युद्धकौशल्य आणि त्यातून मिळणारा विजय प्रतिबिंबित करणारा असतो. तर स्त्रियांच्या नृत्यातून लकबदार, नाजूक नजाकतींनी डोळ्यांचे पारणे फिटतात. पुरुषांच्या नृत्यात जी सहजता आणि मोकळेपणा दिसून येतो, तसाच मोकळेपणा स्त्रियांच्या नृत्यातही दिसून येतो. ‘मोकळेपणा’ या शब्दाचा प्रयोग जाणीवपूर्वक केला आहे, कारण समता आणि समानता या दोन्ही गोष्टींना अरबांच्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यातील समानता अनेक ठिकाणी प्रतिबिंबित होते. त्यापैकी नृत्य हा एक आविष्कार. स्त्रियांना अरब संस्कृतीत मानाचे स्थान आहे. इथल्या स्त्रियांना स्वतंत्र अभिव्यक्ती आहे, हे केवळ संकल्पनेच्या नव्हे, तर जाणिवेच्या पातळीवरही अरबांना मान्य आहे. स्त्रियांच्या नृत्याला ‘नाशत्’ असे म्हणतात. नाशत्चा अर्थ चैतन्य, आनंद. हे नृत्य कलात्मक, असामान्य असे आहे. यात स्त्रिया सुरेख पोशाख घालून समूहनृत्य करतात. संगीताच्या ठेक्यावर हात-पायच नाही, तर त्यांचे लांबसडक, मोकळे केसही विलक्षण नृत्य करताना दिसतात. लांब केस हे इथल्या स्त्रियांच्या सौंदर्याचे खास वैशिष्टय़. त्याला संगीत आणि लयीची अशी काही किनार लाभते, की बघणारा थक्क होऊन जातो. पारंपरिक नृत्यांगना खास कलाकुसर केलेला लांब पोशाख.. ‘तोब-अल-नशाल’ आपल्या सोबत समारंभाला घेऊन येतात. तो फक्त नृत्याच्या वेळी पारंपरिक पोशाखावर घातला जातो. हे नृत्य करताना किमान चार स्त्रिया असाव्यात असा नियम आहे. कदाचित हे सुरक्षिततेच्या दृष्टीने असावे. तसेही बहुतांशी स्त्रिया आणि पुरुष वेगवेगळ्या समूहांत नृत्य करतात.
पारंपरिक लोकनृत्याखेरीज आसपासच्या प्रदेशातून आलेल्या नृत्यकलाही इथे बघायला मिळतात. या नृत्यकलेतली वैशिष्टय़पूर्ण गोष्ट म्हणजे  अरबांनी जसा आपला सांस्कृतिक बाज जपला आहे, तसेच आजूबाजूच्या देशांतील नृत्यकलांच्या काही गोष्टीही आत्मसात करून आपल्या नृत्यशैलीत त्या मिसळून नृत्याचा नवा बाज त्यांनी विकसित केला आहे. किंबहुना नवा नृत्याविष्कारच विकसित केला आहे. इजिप्तमधून आलेला मादक, तितकाच कौशल्यपूर्ण बेल्ली डान्स सर्वाना माहीत असेल. तसेच टर्कीमधून इथे प्रचलित झालेला तनोरा डान्सही आवर्जून पाहण्यासारखा आहे. सूफी संतांसारखा स्वत:भोवती गिरक्या घेत तनोरा नर्तक कलेतून रंजनाबरोबरच आध्यात्मिक अनुभव देऊन जातो. डेझर्ट सफारीमध्ये अशा प्रकारच्या लोकप्रिय नृत्यांचे प्रदर्शन आवर्जून असते.
नृत्य म्हटले की संगीत आणि काव्य आलेच. इथल्या कविता आणि गाण्यांमध्ये देवाची स्तुती, प्रेम, कुराणामधील संदर्भ, तर कधी वाळवंटातील संघर्षांच्या गोष्टी आढळतात. मोठा समुद्रकिनारा लाभल्याने तेलाचा शोध लागण्यापूर्वी इथल्या स्थानिक लोकांची रोजगाराची साधने होती- मासेमारी आणि पर्ल डाइविंग. दोन्हीसाठी त्यांना समुद्रात बराच काळ काढावा लागे. त्यांच्या लोकसंगीतात अशा आशयाची गाणीही आढळतात. आपल्या कोळीगीतांप्रमाणे समुद्राबद्दलचे प्रेम, आदर, घरी वाट पाहणारे कुटुंबीय, त्यांची आठवण याचा उल्लेख लोकगीतांमध्ये पाहायला मिळतो. खडतर जीवन आणि श्रमाचे काम असल्याने एक ताल असलेली साधी-सोपी गाणी ऐकायला मिळतात; जी कामे करता करता सहज म्हणता येऊ  शकतात.
अरब संस्कृतीत संगीत हा विषय थोडा विवादास्पद असला कधी सामान्य माणूस भावना व्यक्त करताना, तर कधी सूफी संत परमात्म्याच्या जवळ जाताना संगीताचा आधार घेताना दिसतात. विविध वाद्यांचा वापरही इस्लामपूर्व काळापासून दिसतो. गिटार हे पाश्चात्त्य देशांत खास आवडणारे वाद्य अरेबिक प्राचीन वाद्य कितारापासून प्रेरित आहे. याशिवाय अरेबिक संगीतात बासरी, डफ, कनून नावाची इजिप्शियन वीणा, संतूर अशी अनेक वाद्य्ो प्रचलित आहेत. पण अरेबिक संगीताला खरा अरेबिक बाझ देणारे वाद्य म्हणजे उद! उद हे एक तारवाद्य आहे. प्राचीन उद चार-पाच तारी, तर आधुनिक वाद्य ११ तारी असते. कलिंगडासारख्या दिसणाऱ्या मोठय़ा फुगीर बेसमुळे यातून येणारा आवाज दुमदुमणारा वाटतो; जो क्षणात वाळवंटाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करतो.
प्रारंभी रूक्ष वाटलेल्या अरब संस्कृतीत कलेचे एकाहून एक उत्तम नमुने पाहून पुन्हा एकदा विश्वास बसला, की कला ही केवळ एक अभिव्यक्ती नसून, ती मनुष्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळे करते. त्यांच्यातील भावना आणि माणुसकी जागी ठेवते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात कला आपण कुठेतरी बाजूला सारतोय. त्याला थोडा ब्रेक द्यायला हवा आणि एखादी कविता, एखादे गाणे गुणगुणायला हवे. त्याच्या तालावर मग पाय आपसूकच थिरकायला लागतील.
शिल्पा मोहिते-कुलकर्णी (दुबई) shilpa@w3mark.com