(मनसे अध्यक्ष रा. रा. राज ठाकरे यांनी नुकतीच वांद्य््रााच्या एमआयजी क्लबात पक्ष- कार्यकर्त्यांची बठक घेतली. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण अजूनही आमच्या कानी घुमते आहे. ते भाषण झाले की नाही, हे आम्हांस आत्ता नेमके स्मरत नाही. पण ते नक्की असेच होते असा आमचा समज आहे..)
lok01परवा कोणीतरी म्हणालं, की बऱ्याच दिवसांत तुम्ही टीव्हीवर दिसला नाही. म्हटलं, टीव्हीवर रोज रोज दिसायला मी काय डेली सोप आहे? का नरेंद्र मोदी आहे? रोज आपलं कुठं ना कुठं भाषण सुरूच आहे. मित्रों.. (हशा) मी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळीच बोलतो. (टाळ्या) आज ती वेळ आली आहे. म्हणून मी तुम्हाला इथं बोलावलं आहे.
तर व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आणि माझ्या भगिनी आणि बंधूंनो.. मी काही फार वेळ बोलणार नाही. मला तुमच्यासमोर फक्त एकच घोषणा करायची आहे. (सभागृहावर शोककळा!) गेल्या काही दिवसांपासून मी सातत्याने एकच विचार करतो आहे. व्यंगचित्रं काढतो आहे. परवा दिल्लीत आपचा जो विजय झाला त्यावरही मी एक व्यंगचित्र काढलं होतं. ते भाजपच्या लोकांना चांगलंच झोंबलं. तुम्ही पाहिलं की नाही ते?.. आं? हां.. त्यात मी ट्विन टॉवर काढले होते. आपचं विमान त्यावर आदळतं आणि त्या टॉवरला भगदाड पडतं असं दाखवलं होतं. भाजपवाल्यांना त्याचा नाही राग आला. त्यांना राग आला तो मोदी आणि शहा यांना मी ट्विन टॉवरच्या रूपात दाखवलं ना, त्याचा. त्यांना वाटलं, मी मोदी आणि शहांनाच वर्ल्ड ट्रेड सेंटर म्हटलंय! (कोणाला काही कळलंच नाही. सभागृहात सुन्न शांतता.) अरे, ट्रेड सेंटर म्हणजे काय ते समजलं ना? ते म्हणजे.. व्यापार केंद्र.. जाऊ दे च्यायला!
तर मी काय म्हणत होतो? आपलं ते हे. हां.. मी विचार करत होतो, की आपला पराभव का झाला? ‘आप’चा नाही झाला. आपला झाला. (सर्वाच्या मुंडय़ा खाली.) मोदीलाट होती, हे मान्यच आहे. पण त्याचं एवढंच कारण नाही. तुम्हाला सांगतो, त्या जाहिराती आणि पेड न्यूजनं सगळी वाट लावली. परवा कोणीतरी सांगत होतं, की पाच की ५० हजार कोटी रुपये खर्च केला भाजपनं जाहिरातींवर. किती त्या जाहिराती! आतासुद्धा पेपरांत दुसरं काही नसतंच. या गळ्यापर्यंत जाहिराती! पेपरात भरून हल्ली ती कसली कसली पत्रकं वाटतात ना लोकं ‘सेल सेल सेल’ची.. तशी पेपरात बातम्यांची पत्रकं तरी टाकत जा चार-दोन. (हशा) नाहीतर पेपरबरोबर िभगं देत जा.. पानांत बातम्या शोधायला. (हशा आणि टाळ्या.) किती हा नतद्रष्टपणा! लोकांपर्यंत खरं काही जातच नाही त्यामुळं. आपण एवढी ब्लू िपट्र काढली. कोणापर्यंत गेली ती? (व्यासपीठावरील मंडळींकडे पाहून) तुम्ही तरी पाहिली का ती? ही जी कम्युनिकेशन गॅप पडलीय ना, ती भरून काढली पाहिजे. आपले विचार लोकांपर्यंत गेले पाहिजेत.
तेव्हा मी ठरवलंय, की आता आपला पेपर काढायचा. (टाळ्यांचा कडकडाट. शिट्टय़ासुद्धा.) मागे मी नको म्हटलं होतं. म्हटलं, आपल्या पारकरांचं पाक्षिक आहे; तर ते चालू द्या. पण त्याचं पार्करच्या पेनसारखं झालं. तो पेन कसा मोजक्याच लोकांच्या हाती असतो. तसं त्या पारकर पाक्षिकाचं झालं. तेव्हा म्हटलं, आपल्याला पेपर काढायलाच पाहिजे. किमान त्यामुळं आपल्या उमेदवारांचे पेड न्यूजचे पसे तरी वाचतील. पेपरांना हल्ली हा एक भस्म्या रोग झालाय- पेड न्यूजचा. मी आताच बजावून ठेवतो. यापुढं बाहेर कोणत्याही पेपरला अशी पेड न्यूज द्यायची नाही. जी काय द्यायची ती आपल्या पेपरात द्यायची. (हशा आणि टाळ्या)
या पेपरचं स्वरूप काय असेल, त्याचं नाव काय असेल, असे अनेक प्रश्न आता तुमच्या मनात असतील. एक सांगतो, त्याची सगळी ब्लू िपट्र आपण तयार केलेली आहे. गेले काही दिवस तेच काम सुरू होतं. लोकांना वाटलं, राज ठाकरे इलेक्शनमधल्या पराभवानं गप्प बसला. पण मी गप्प बसणाऱ्यातला नाही. मी कार्टून काढत होतो. पेपरात माझी कार्टून असतील. (टाळ्यांचा कडकडाट) शिवाय.. थांबा.. माझ्याकडं आता ही ब्लू िपट्रच आहे. त्यातला काही भाग मी वाचूनच दाखवतो. (कार्यकर्त्यांत चुळबूळ) हां, तर या ब्लू िपट्रनुसार हे मनसनिकांसाठीचं मनदैनिक असेल. (इथं ऑफकोर्स टाळ्याच!) त्यात बातम्या असतील. काही तीन कॉलमी, दोन कॉलमी व सिंगल कॉलमी बातम्या असतील. त्यांना हेिडग असतील. प्रत्येक पानावर हेडलाइन असेल.. आणि कुठं गेलं ते पान.. हां.. इथं म्हटलंय, वृत्तपत्रात अग्रलेख आणि लेखही असतील. काही वैशिष्टय़पूर्ण सदरंही असतील. म्हणजे मनसनिकांच्या दैनंदिन उपक्रमांचं सदर- खळ्ळ्ळ खटॅक, मराठी उपक्रमशीलतेला चालना देणारं- वडापाव, उमेदवारांचं अनुभवकथन- माझी धड आणि पड, शिवाय माझा साप्ताहिक कॉलम असेल- सूतासारखं सरळ. (टाळ्या) तर अशी बरीच सदरं आहेत. त्यातल्या एकाचं नाव ठेवलंय- ‘मन की बात.’ म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माणाची बात. बात म्हणजे गोष्ट! मोदी मारतात ती नाही! (हशाच हशा)
तर या सगळ्याच्या मागे महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचाच विचार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे मनदैनिक शुद्ध मराठीत असेल. मी संपादकीय विभागाला आताच बजावून ठेवतोय. यात एक जरी इंग्रजी हेिडग दिसलं तर याद राखा! मी स्वत: येऊन त्याला काळं फाशीन! कोणाचीही गय करणार नाही! (टाळ्याच टाळ्या)
लवकरच या मनदैनिकासाठी भरती मोहीम राबवणार आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी- खासकरून कल्याणमधील कार्यकर्त्यांनी सावध राहिलं पाहिजे. या भरतीत मला एकसुद्धा परप्रांतीय उमेदवार दिसता कामा नये. अत्यंत काळजीपूर्वक, लोकांना विश्वासात घेऊन हे काम आपल्याला करायचं आहे. तेव्हा आता जे होईल ते होईल. आर या पार.. हार नाही, तर फार फार तर काय? प्रहार! या एकाच निर्धाराने आपल्याला कामाला लागायचं आहे. तेव्हा तुम्हा सर्वाना माझ्या शुभेच्छा! जय िहद, जय महाराष्ट्र! (टाळ्यांचा प्रचंड कडकडाट) lr10