22 September 2020

News Flash

आप यूँ फासलों से गुजरते रहे..

आपल्या मनातली खळबळ स्वरांत नेमकेपणे प्रतििबबित करणारे संगीतकार मला खूप जवळचे वाटतात. त्यांना रागाची चौकट, गाण्याचा ठरावीक साचा अडकवू शकत नाही.

| February 23, 2014 01:12 am

आपल्या मनातली खळबळ स्वरांत नेमकेपणे प्रतििबबित करणारे संगीतकार मला खूप जवळचे वाटतात. त्यांना रागाची चौकट, गाण्याचा ठरावीक साचा अडकवू शकत नाही. त्यांची बांधीलकी असते ती शब्दांशी, त्यातून उमटणाऱ्या अर्थगर्भाशी, काही उघड, काही सूचक अशा अर्थाच्या सूक्ष्म छटांशी..
आपल्यापासून ‘फासलों से गुजरते रहे’ असं वाटायला लावणारं, खूप वेगळ्याच पातळीवरचं संगीत देणारा संगीतकार.. खय्याम! खय्यामचं वेगळेपण खूप गोष्टींत जाणवतं.. सोलोवाक्ससारखं वाद्य निवडणं असो, शबाना आझमी, कब्बन मिर्झासारखे आवाज गाण्यांसाठी निवडणं असो, आशाबाईंना ‘उमराव जान’साठी (त्यांच्या मनाविरुद्ध) खालच्या पट्टीत गायला लावणं असो..
मुहम्मद खय्याम जहूर हाश्मी या १८ फेब्रुवारी १९२७ ला जन्मलेल्या श्रेष्ठ कलाकारानं सुरुवातीला मुहम्मद चिश्तीसाहब या संगीतकाराकडे उमेदवारी करत काही काळ ‘शर्माजी’ या टोपणनावानंही संगीत दिलं. त्यानंतर ‘खय्याम’ या नावानं संगीत दिलेल्या ‘फूटपाथ’ (१९५३) मधल्या ‘शामे गम की कसम’ या गाण्याने जाणकारांना त्यांनी आपली दखल घ्यायला भाग पाडलं. शब्दांत मूर्तिमंत विरह.. उदास संध्याकाळ.. तलतचा रेशमी मखमली आवाज, शांत, संयत वाद्यमेळ यांनी जादू घडवली. आजही हे गाणं काळजावर हळुवार मोरपीस फिरवतं. या गाण्यात कुठेही तालवाद्य नाही. सगळा रिदम हा गिटार, डबल बास, सोलोवॉक्स (पहिल्यांदाच केलेला वापर) यावर बेतलेला आहे.
‘पहाडी’ आणि ‘यमन’वर विशेष प्रेम असलं तरी इतरही अनेक राग खूप वेगळी रूपं घेऊन खय्यामच्या गाण्यांत डोकावतात. गौड सारंग (जिन्दगी जब भी तेरी), भूप (इन आँखो की मस्ती में), बिहाग (दिल चीज क्या है)..
खय्यामच्या संगीतात वेगळेपणा दाखवणाऱ्या, काही खूप जवळचे स्वर घेतलेल्या, गळ्यातली फिरत आजमावणाऱ्या खूप जागा आहेत. रेगरेसा, गपमग अशा स्वरूपाचे ते खटके असतात. ‘बहारों मेरा जीवन भी..’ यातली ‘जीवन’वरची जागा पाहा, किंवा ‘है कली कली के लबपर’मधली ‘हुस्न का’ या शब्दावरची ती बारीक करामत.. घायाळ करणारा नाजूक वार..
आपण जसं बोलतो त्यातले चढउतार, सुस्कारे, खुदकन् हसणं हे खय्यामच्या गाण्यात खूप नसíगकपणे येतात. ‘आप यूँ फासलोंसे..’ (शंकर हुसन) ऐकलंत तर जाणवेल की हुंकार, गुणगुणणं अशा वेळी येतं, की त्यानंतरची ‘गुनगुनाती रही मेरी तनहाईयाँ’ ही ओळ एकान्ताचं गुंजन दाखवते. ‘आप यूँ’ हे शब्द हलक्याशा हास्यात गुंफणं.. ‘आपकी नर्म जानों पे सो जाएंगे..’ हे ऋंीि ४३ करणं.. बारीक होत गेलेला आवाज पुन्हा पुढच्या ओळीत ‘मुद्दतों रात नींदे चुराती रही’मध्ये मूळ व्हॉल्यूमवर येणं.. जाँ निसार अख्तर, खय्याम आणि साक्षात िलता..
गाण्यात ‘शांतता’ असते का? खय्यामच्या गाण्यात असते. पूर्ण शांतता. एकही वाद्य नाही, आवाज नाही.. अशी विलक्षण शांतता. गूढ, तरीही खूप काही सांगणारी. एखाद्या सम्राज्ञीची घालमेल सांगणारी, उलटसुलट विचार करून थकल्यावर येणारी शांतता.. ‘कैसी उलझन है.. क्यूँ ये उलझन है’ या प्रश्नांनंतरची ती दिङ्मूढ अवस्था. ‘ऐ दिले नादाँ..’ (रझिया सुलतान)मध्ये येते अशी नि:शब्द अवस्था.
‘ये जमीं चूप है, आसमाँ चूप है
फिर ये धडकन सी चारसू क्या है..’
खरोखरच नि:शब्द झालेली जमीन, अवकाश.. मग तरीही ही ‘धडकन’ कुठली? या विलक्षण शांततेबद्दल खय्यामना विचारलं तेव्हा- ‘‘ये ‘कमाल’ मेरा नहीं, कमाल अमरोही का है,’’ असं प्रांजळपणे सांगून ते मोकळे झाले. चित्रपट प्रदíशत होण्याआधीच या गाण्याची खूप चर्चा झाली. अमिताभला हे गाणं अध्र्या रात्री ऐकायची लहर आल्यावर जया रात्री घरी येऊन हे गाणं टेप करून कशी घेऊन गेली, हा किस्सा खय्यामच्याच तोंडून ऐकावा. मग ऐकायला मिळतं की, ‘रझिया’चं म्युझिक बनवताना त्या भागाचं भौगोलिक स्थान, तिथलं स्थानिक संगीत, खाणंपिणं, ते ‘कहवाखाने’ यांचा अभ्यास करण्यासाठी त्या मार्गावरून खय्यामनी स्वत: प्रवास कसा केला.. उद, रबाब यांसारखी वाद्यं कशी वापरली..
खय्यामच्या गाण्यात स्वरावर असा ‘ठहराव’ असतो, की ज्यामुळे शब्द तुटत नाहीत. ‘शामे गम की कसम’मध्ये स्वर कसे सुंदर, सलग लावलेत पाहा. आणि पहिली ओळ ज्या स्वरावर संपते, त्याच स्वरावर पुढची ओळ सुरू होते. ‘ये मुलाकात इक बहाना’, ‘चीनो अरब हमारा’ अशी खूप उदाहरणं आहेत. ‘जिन्दगी जब भी तेरी बज्म में लाती है हमे, ये जमीं चाँद से बेहतर नजर आती है हमे’ म्हणताना ‘बेहतर’ म्हणण्याआधी किंचित थबकणं, किंवा ‘बहारों मेरा जीवन’ म्हणताना ‘बहारों’नंतरचा तो किंचित विराम ‘बहारों’ना घातलेली साद अर्थपूर्ण करतो.
‘गुलाब जिस्म का यूँही नहीं खिला होगा
हवा ने पहले तुझे (पॉज) फिर मुझे छुआ होगा..’  
(अंजुमन)                                                 
‘और कुछ देर ठहर’ (आखरी खत)मध्ये ते ‘ठहरणं’ अशाच एका सूक्ष्म विरामामुळे शक्य झालंय.
खय्यामशी बोलताना जाणवतं, की विलक्षण ‘खुद्दार’ असं हे रसायन आहे. उत्कृष्ट शायरी असेल तरच गीत हातात घ्यायचं, कुणाचीही नक्कल करायची नाही, मग चित्रपट सोडून द्यावा लागला तरी बेहत्तर! (उदा. बरसात की रात) मिश्कील बारीक डोळे, तर्जनी उंचावत बोलण्याची ती पद्धत.. ‘मं म्युझिक डायरेक्टर नहीं, ‘कंपोजर’ हूँ. मृदुलाजी, मंने हमेशा अपनी खुद की शर्तोपर काम किया. अॅरेंजर कोई भी हो, ‘लास्ट वर्ड’ मेराही रहता है. साज मैं ही चुनता हूँ.’
म्हणूनच अनेक वैशिष्टय़पूर्ण वाद्यांनी त्यांच्या गाण्यांत महत्त्वाचं स्थान पटकावलं. पियानो- जीत ही लेंगे बाजी (शोला और शबनम), तुम अपना रंजोगम (शगुन), ठहरिए होश में.. (मुहब्बत इसको कहते हैं), अॅकॉíडअन- रूत जवाँ जवाँ (आखरी खत), हार्मोनिका- ये मुलाकात इक बहाना है (खानदान), मेंडोलिन- है कली कली के (लालारूख), सारंगी- ठहरिए होश में, संतूर- ऐ दिले नादाँ (रजिया सुलतान), न जाने क्या हुआ (दर्द), सोलोवॉक्स- शामे गम की कसम (फूटपाथ).
काही काही म्युझिक पीस गाण्याच्या शब्दांशी ‘संवाद’ करतात. ‘बडी वफा से निभायी तुमने’मध्ये ‘बडी वफा से’नंतर व्हायोलिनचा सुंदर पीस केवळ ‘अविभाज्य’ आहे. गाणं गुणगुणताना त्या पीससकटच ते म्हणावं लागतं. जणू ‘बडी वफा से’ या शब्दांना व्हायोलिन कुठेतरी प्रतिसाद देतंय. ‘न जाने क्या हुआ’ (दर्द) या गाण्यात असंच संतूरचं गोड लडिवाळ मोरपीस येतं. ‘न जाने क्या हुआ, जो तूने छू लिया’ असं ती म्हणताना संतूर जणू तिच्या गालावरच्या बटांना हलकेच फुंकरीने उडवतंय की काय असं वाटून जातं. सामान्यत: गाण्याची ओळ वाद्यावर ‘फॉलो’ केली जाते; पण ‘ए दिले नादाँ’मध्ये संतूरवर वाजवलेल्या जागा नंतर गाण्यात घेतल्या जातात; ज्यामुळे वेगळा माहोल निर्माण होतो.
सुंदर चाल बनण्यासाठी वेडय़ावाकडय़ा कसरती खय्यामना कधीच कराव्या लागल्या नाहीत. पाहा ना- कमीत कमी स्वर घेऊन त्यांचे मुखडे सजले. ‘चीनो अरब हमारा’ (नी नी नी सा सा रे सा), ‘करोगे याद तो’, ‘जीत ही लेंगे बाजी’ दोन किंवा तीन स्वरांतच ही करामत आहे. शब्दांनुसार आरोही-अवरोही दिशा त्या गाण्यात दाखवणं हीसुद्धा अशीच एक खासियत. ‘कहिए तो आसमाँ को जमींपर उतार लाये’ (दिल चीज क्या है) म्हणताना स्वरावली वरून खाली झेपावते. ‘ये दिल कुछ ऐसे आप के कदमों में झुक गया’ (आंखों में हमने आप के) म्हणताना हळुवारपणे स्वर खाली झुकतात. खय्यामच्या गाण्यात एक ‘चन’ आहे. त्यामुळे गाण्याचा ्रल्ल३१४िू३्रल्ल स्र््रीूी सुद्धा विस्तृत आढळतो. बासरी, सितारचा विस्तृत असा ्रल्ल३१स्र््रीूी ‘बहारों’मध्ये आहेच; पण ‘जीत ही लेंगे’चा पीसही ऐकून पाहा.
ऐंशीच्या दशकात ‘परस्तीश’, ‘मुकम्मल’ अशा शब्दांनी प्रचंड कुतूहल जागृत झाल्यामुळे काही गाण्यांनी माझं लक्ष वेधलं. अधिक शोध घेतल्यावर ही भारदस्त गाणी खय्यामची आहेत हे उमजलं. ‘दिखाई दिए यूँ ये बेखुद किया’.. (बाजार) लताबाईंच्या आवाजाचा पोत खूप झगझगीत लागलाय या गाण्यात. मीर तकी मीरची प्राचीन गझल अशी खानदानी अदब घेऊन समोर आली. या जगात परिपूर्ण असं काहीच नाही, हे सत्य भूपेन्द्रचा आवाज आणि चाल यामुळे पटतं- ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता..’
खय्यामच्या गझला या एक सुंदर गीत बनूनसुद्धा येतात, पण त्यातला अभिजात गोडवा कायम ठेवूनच. उदा. ‘ये मुलाकात इक बहाना है..’ गझल कमी, गाणं जास्त वाटतं.
लता, आशा, रफी, मुकेश, तलत मेहमूद, जगजीत कौर (जी पुढे त्यांची पत्नी झाली आणि ‘तुम अपना रंजोगम मुझे दे दो’ या तिच्या गाण्यासारखीच जन्मभर तिने त्यांना समíपत साथ दिली.), पामेला चोप्रा यांसारख्या आवाजांचा उत्तम वापर करत खय्यामची गाणी नटली. ‘मं पल दो पल का शायर’, ‘कभी कभी मेरे दिल में’साठी जसा मुकेशच हवा, तसंच ‘ठहरिए होश में आऊँ’मधला मुग्ध हुंकार देण्यासाठी, ‘मुझको इकरारे मुहब्बत से हया आती है’ असं लाजून सांगणाऱ्या नंदाला आवाज देण्यासाठी निष्पाप आवाजाची सुमन कल्याणपूरच असू शकते. ‘उमराव जान’चा तवायफचा आवाज, रेखाच्या आवाजाचा पोत दाखवण्यासाठी आशाबाईच, तर गुलामाचं गाणं हे तसंच खडबडीत, ू१४ीि आवाजात हवं म्हणून कब्बन मिर्झा हा ‘गायक’ नसलेला कलाकार हवा. ‘आयी जंजीर की झनकार’ (रजिया सुलतान).
खय्यामच्या काही अविस्मरणीय गाण्यांची ही छोटीशी झलक..
‘कहीं एक मासूम नाजूक सी लडकी’ (शंकर हुसन) रफीनं हे गाण गायलं नाही, तर ‘सांगितलंय’! आपल्याशी कुजबुज करत हे गाणं आपल्याशी ‘बोलतं’. यातला रफीचा ‘कसमसा कसमसा कर’ हा शब्द, उच्चार केवळ भन्नाट. गाणं पडद्यावर पाहायची गरजच वाटू नये. ‘जाने क्या ढूंढती रहती है ये आँखें मुझ में’ (शोला और शबनम) या गाण्यात कैफी आजमीच्या काळीज चिरणाऱ्या शब्दांना दाद द्यावी, की रफीच्या ‘राख’ या शब्दाच्या विझलेल्या उच्चारांना, की खय्यामच्या ‘चढत’ गेलेल्या चालीला! ‘जो बिक गया वो खरीदार नहीं हो सकता’ म्हणताना चाल, शब्द, आवाज या सगळ्याचा गाठलेला परमोच्च िबदू.
‘तू मेरे साथ रहेगा मुन्ने’ (त्रिशूल) आठवा. आईवरच्या अन्यायाने पेटून उठलेला अमिताभ. आई-मुलाचं तथाकथित गोड गोड गाणं नाही हे. ‘मेरी बरबादी के जामीन अगर आबाद रहे, मं तुझे दूध ना बख्शूंगी तुझे याद रहे..’ आईच्या मृत्यूनंतर तिची ही घणाघाती हाक त्याला सतत आठवण करून देतेय. हे प्रेमळ, वात्सल्यपूर्ण गाणं नाही, तर एक ‘तिखट’ कविता आहे. खय्यामनी इतकी वेगळी ट्रीटमेंट दिलीय या गाण्याला. हे गाणं पुन्हा धृवपदावर येत नाही, ते ू’्रें७ ला जाऊनच संपतं. लताबाईंचा तीव्र, तिखट आवाज आणि खय्यामची जाळत जाणारी चाल. सगळंच अफाट.
‘वो सुबह कभी तो आएगी’ (फिर सुबह होगी) ‘नज्म’ प्रकारात मोडणारं गाणं. भोवतालच्या निराशाजनक वातावरणात ‘कधीतरी उजाडेल’ हा भाबडा आशावाद जागवणारी भावना. एक विलक्षण ऋ’६ घेऊन येणारी चाल. आशाबाईंचं गुणगुणणं अतिशय नसíगक, अभिनिवेश नसलेलं.
तसंच ‘चीनो अरब हमारा, िहदोस्ता हमारा, रहने को घर नहीं है, सारा जहाँ हमारा’ किंवा ‘आँसमा पे है खुदा, और जमीं पे हम, आजकल वो इस तरफ देखता है कम’ हा साहिरचा कडवा उपरोध खय्यामच्या चालीत अधिकच तीव्र होत नाही का? ‘आदमी है अनगिनत, देवता है कम.’ साहिर आणि खय्याम या कॉम्बिनेशनची अजून खूप गाणी यायला हवी होती.
‘फिर छिडी रात, बात फूलों की’ (बाजार) म्हणजे तर जाई-जुईच्या प्रमाथी गंधाने मोहरलेला चंद्रप्रकाश आणि एक अत्यंत परिपक्व शृंगार..
कमाल अमरोही आणि खय्याम या दोन प्रतिभावंतांचं एक अप्रतिम स्वरशिल्प म्हणजे कैफ भोपालीचं ‘अपने आप रातों में चिलमनें सरकती है’ (शंकर हुसन- लता).. चित्रपटाची नायिका झोपेत चालणारी. गूढ वागणारी. या गाण्याला ‘स्पेशल ट्रीटमेंट’च हवी होती. नेहमीसारखं गाणं नको होतं कमालजींना. या गाण्याचा गमतीशीर किस्सा ‘इष्काचा जहरी प्याला’ (अनिता पाध्ये) या पुस्तकात वाचायला मिळाला. एका संगीतकाराने वापरलेल्या भरगच्च ऑर्केस्ट्रेशनमुळे कमालजींनी हे गाणं कसं नाकारलं (‘माझी नायिका झोपेतून खडबडून जागी होईल!’) आणि मग खय्यामच्या हातात पडल्यावर ते किती उंचीवर पोचलं. ‘चिलमनें सरकती है’ म्हणताना ‘सरकती’ या शब्दावरची जागा खरोखरच सरकल्याचा भास व्हावा अशी आहे. गूढ भाव, रात्रीच्या धुक्याचा पडदा, तो अपरात्रीचा सन्नाटा, काळजावर दंविबदूंची पखरण (जैसे दिल के परदों पर गिर रही हो शबनम सी), ‘पाँव जाने किस जानिब बे उठाए उठते हैं..’ ते दिशाहीन भरकटणं.. सगळं सगळं लताबाईंच्या तशाच तरल, धूसर आवाजात ऐकणं.. ‘कमाल’ आहे.
खय्यामचं गरफिल्मी संगीत हासुद्धा एक स्वतंत्र विषय आहे. मुकेश, तलत, सी. एच. आत्मा, सुमन कल्याणपूर, रफी या कलाकारांकडून गाऊन घेतलेल्या उत्तम गरफिल्मी गझल, भक्तिगीतं (तेरे भरोसे नंदलाल- रफी) विसरून कसं चालेल?
‘माना तेरी नजर में’ (आहिस्ता आहिस्ता), ‘तूही सागर है तूही किनारा’ (सुलक्षणा पंडित- संकल्प), ‘मेरे घर आयी एक नन्ही परी’ (लता- कभी कभी), ‘पर्बतों के पेडोंपर’ (शगुन), ‘चाँदनी रात में इक बार’ (दिले नादॉं), ‘सिमटी हुई ये घडियाँ..’ (चंबल की कसम) अशी कितीतरी अप्रतिम गाणी देणारे खय्याम.
‘स्वरयोग’चे प्रदीप देसाई आणि मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांच्या घरी मला चक्क िहदू देवदेवता, भृगुसंहिता दिवाणखान्यात विराजमान झाल्याचं पाहायला मिळालं. संगीत हा एकच धर्म मानणारं एक कणखर, ताठ व्यक्तिमत्त्व त्यांच्यात अनुभवायला मिळालं. मनाच्या अती तरल अवस्थेला पोहोचलेला कलाकारच त्याचं प्रतििबब गाण्यात दाखवू शकतो. ‘कभी कभी’, ‘शंकर हुसेन’, ‘बाजार’, ‘आखरी खत’, ‘थोडीसी बेवफाई’, ‘उमराव जान’, ‘रझिया सुलतान’ ही मला ताजमहालचीच अनेक रूपं वाटतात. अन् खय्यामच्या चाली म्हणजे किनखापी राजेशाही चित्रसोपानावर राजा रविवर्माच्या रेशमी, खानदानी कुंचल्यातून उतरलेली स्वरचित्रंच. अभिजात आणि भरजरी.                        

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2014 1:12 am

Web Title: mohammed zahur khayyam
Next Stories
1 कभी खुद पे, कभी हालात पे रोना आया!
Just Now!
X