18 November 2019

News Flash

गोंयचो झुजारी

स्वातंत्र्यसैनिकाच्या आठवणींना उजाळा देत आहेत स्वातंत्र्यसनिक आणि ज्येष्ठ कोकणी लेखक नागेश करमली!

गोवामुक्ती लढय़ामधील झुंजार नेते मोहन रानडे यांचे नुकतेच निधन झाले. पोर्तुगालच्या तुरुंगात १४ वर्षे खितपत पडलेल्या या स्वातंत्र्यसैनिकाच्या आठवणींना उजाळा देत आहेत स्वातंत्र्यसनिक आणि ज्येष्ठ कोकणी लेखक नागेश करमली!

बेती किनाऱ्यावर फेरी लागली आणि त्यातून उतरण्यासाठी माणसांची लगबग सुरू झाली. कोणी ऑफिस संपवून घरी निघालं होतं, तर कुणी ‘नुस्ते’ (मासे) विकून. संध्याकाळची वेळ. १९५४ सालातली ही गोष्ट. पणजीत तेव्हा वर्दळ तशी कमी असायची. त्यात बेती अगदीच खेडगाव. पण पणजीच्या किनाऱ्यावर असल्याने नजरेच्या टप्प्यात आणि महत्त्वाच्या यादीत. तर फेरीतून माणसं उतरणार तितक्यात एक बरे कपडे घातलेला तरुण फेरीच्या तोंडावर आला. हातातली बंदूक फेरीवर रोखली आणि ‘कुणीही फेरीबाहेर पडू नका’ अशी त्याने दटावणी केली. लोकांना काही कळत नव्हतं. बरं, बंदूक रोखलेला कोणी पोर्तुगीज सनिकही वाटत नव्हता. त्याच्या एकंदरीत वागण्या-बोलण्यावरून तो ‘आपला’च दिसत होता. तरी त्याने आपल्यावर बंदूक का रोखली, हे कळत नव्हतं. सगळेजण श्वास रोखून थांबले.

पाच- दहा- पंधरा मिनिटे सगळंच गोठलं. तेवढय़ात रस्त्यापलीकडे बंदुकीचा बार ऐकू आला. फेरीजवळच्या तरुणाने तो बार ऐकताक्षणी रस्त्याच्या दिशेने धूम ठोकली. फेरीतले सारे थंडगार पडले. कोणाला काहीच कळलं नाही. भेदरलेल्या अवस्थेत हळूहळू सगळे किनाऱ्यावर उतरू लागले आणि इकडे बेती पोलीस स्टेशनच्या रस्त्याला अचानक पाय फुटले. मोहन रानडे आणि चमूने आपली कामगिरी फत्ते केली होती. गेल्या वेळी- म्हणजे १ जानेवारी १९५५ रोजी बाणस्तरी पुलावरील पोलीस चौकी उडवण्याचं त्यांचं स्वप्न चौकीवर अपेक्षेपेक्षा जास्त पोलीस असल्याने अर्धवट राहिलं होतं. त्यामुळे ऐनवेळी ‘बिडी पेटवायला माचिस आहे का?’ असलं काहीतरी थातुरमातुर विचारून त्यावेळी बाणस्तरीवरून निघून यावं लागलं होतं. सगळी माहिती काढून बाणस्तरीवरचा नेम कसा चुकला यावर त्यांनी मधल्या काळात चिंतन केलं असावं. कारण मोहन रानडे हा अभ्यासू आणि धाडसी तरुण होता. आम्हा दोघांमध्ये अवघ्या तीन वर्षांचेच अंतर. त्याचं खरं नाव- मनोहर आपटे. मूळचा महाराष्ट्रातील सांगलीचा. गोव्याच्या स्वातंत्र्यलढय़ात सहभागी होण्यासाठी म्हणून तो शिक्षक आणि ‘मोहन रानडे’ बनून गोव्यात आला. तो सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणारा, तर आम्ही सनदशीर मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढणारे. मोहन रानडे जेव्हा गोव्यात दाखल झाला त्या काळात मी काही स्वातंत्र्यसनिकांसोबत पोर्तुगीज सरकारविरोधी कारवाईत सक्रिय सहभाग घेतल्याच्या आरोपाखाली आग्वादच्या तुरुंगात होतो. पण आम्हाला राज्यात घडणाऱ्या सगळ्या घडामोडींची बित्तंबातमी मिळत होती. रानडे नावाचा तरुण गोव्यात येऊन स्वातंत्र्यलढय़ासाठी काम करतोय हे तुरुंगातच समजलं.

..तर मोहन रानडे इकडे आल्यावर सावयवेऱ्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला खरा; पण ते फक्त सरकारला दाखवण्याकरता. पणजीपासून सावयवेरे तसं दूर. त्यामुळे सरकारचंही फारसं लक्ष नसे. शारदाताई सावईकरांच्या वडिलांकडे तो राहायला होता आणि ‘आझाद गोमंतक दल’ या सशस्त्र क्रांती दलामध्ये सक्रिय झाला. प्रभाकर सिनारी, विश्वनाथ लवंदे, प्रभाकर वैद्य, कान्होबा नाईक, बाळा मापारी, यशवंत सुका आगरवाडेकर, रामदास चाफाडकर, बाळकृष्ण भोसले, मनोहर पेडणेकर, अनंत अभिषेकी यांच्यासोबत तो काम करू लागला आणि बाणस्तरी पोलीस चौकी, गुलेली कस्टम आऊट पोस्ट, कळंगुट पोलीस चौकी, अस्नोडा पोलीस आऊट पोस्ट, रेवण पोलीस आऊट पोस्ट, अल्दोना पोलीस आऊट पोस्ट, शिरगांव खाण परिसर या ठिकाणी १९५५ मध्ये झालेल्या सशस्त्र हल्ल्यांत मोहन रानडेचा सक्रिय सहभाग होता. प्रत्येक हल्ल्यात त्यांना कमी-अधिक यश मिळाल्याने सरकारच्या रडारवर ही मंडळी आली. परंतु प्रत्यक्ष हाती कोणी लागत नव्हतं आणि पुरावाही मिळत नव्हता.

अशातच बेती पोलीस स्टेशनवर हल्ला करण्याचं त्यांनी ठरवलं. बेतीवर हल्ला म्हणजे पणजीवर हल्ला करण्यासारखंच होतं. अगोदर काहीजण जाऊन पोलीस स्टेशन आणि परिसराची पाहणी करून आले. कोणत्या वेळी वर्दळ तुलनेने कमी असते याचा अभ्यास झाला. हल्ल्यानंतर पळून जाण्याचे मार्ग काय असू शकतात याचा अदमास घेतला. प्रत्येकाकडे जबाबदारीचं वाटप झालं. बेती फेरी कोण अडवणार, रस्त्यावर टेहळणी कोण करणार, चौकीत कोण जाणार आणि प्रत्यक्ष हल्ला कोण करणार, याचं नियोजन झालं. आम्हाला तुरुंगात खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहन रानडेवर प्रत्यक्ष हल्ला करण्याची जबाबदारी होती. त्यासाठी मोहन पणजीतून न येता म्हापसामाग्रे बेतीला आला. सूटबूट घालून आणि हातात व्हायोलिनची पेटी घेऊन तो पोलीस स्टेशनमध्ये शिरला. त्याला बघून कोणालाच संशय आला नाही. तिकडे एकजण बेती फेरीजवळ गेला. त्याने नुकतीच आलेली फेरी अडवली. इकडे मोहन चौकीत गेला. व्हायोलिनची पेटी उघडून त्यात ठेवलेली बंदूक काढली आणि पोलिसांवर हल्ला केला. दुसऱ्याने तिथला शस्त्रसाठा ताब्यात घेतला आणि सगळ्यांनी धूम ठोकली. बेती चौकीवर हल्ला झाल्याची बातमी क्षणार्धात षट्कर्णी झाली. आम्ही तिथून जवळच आग्वाद किल्ल्यातील तुरुंगात असल्याने बातमी लगेचच कळली. पणजीतली पोलीस कुमक बेतीच्या दिशेने वळली. बेती चौकीतले पोलीस मारेकऱ्यांच्या मागे पळू लागले. इकडे मोहन रानडे पणजीच्या दिशेने न जाता कळंगुटच्या दिशेने पळाला. पण या धावपळीत त्याच्या हातातल्या बंदुकीचा पुन्हा बार झाला आणि गोळी त्याच्याच पोटाला लागली. तो पडला. सहकारी त्याच्याजवळ आले आणि त्याला घेऊन पळू लागले. पण ‘आपण सगळेच पकडले जाऊ, तेव्हा तुम्ही पळा. मी बघतो माझं काय ते!’ असं म्हणून मोहन तिथेच थांबला. तेवढय़ात पोलीस तिथं पोहोचलेच. इतके दिवस सरकारच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी झालेला मोहन अशा रीतीने हल्ला यशस्वी झाल्यानंतर विचित्र पद्धतीने पोलिसांच्या हाती सापडला. तो दिवस होता- २५ ऑक्टोबर १९५५.

त्याची जखम बरीच खोल होती. अटक केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. जखम भरल्यानंतर त्याची तुरुंगात रवानगी केली गेली. २९ डिसेंबर १९५६ रोजी पोर्तुगीज कोर्टाने त्याला २६ वर्षांचा तुरुंगवास सुनावला. त्यावेळी गोव्यातील तिन्ही तुरुंगात मिळून सुमारे १६०० क्रांतिकारी शिक्षा भोगत होते. त्यातही अति सक्रिय, सशस्त्र तसेच सनदशीर मार्गाने लढणाऱ्या क्रांतिकारकांना सरकार पोर्तुगाल किंवा अंगोलच्या जंगलातील तुरुंगात पाठवीत असे. मोहन रानडेचा पूर्वेतिहास बघता त्याला २३ ऑगस्ट १९६० रोजी पोर्तुगालला हलवण्यात आले. तत्पूर्वी डॉ. टी. बी. कुन्हा, पुरुषोत्तम काकोडकर, लक्ष्मीकांत भेंब्रे, राम हेगडे, जुएन, दत्तात्रय देशपांडे हे क्रांतिकारी पोर्तुगालच्या तुरुंगात होते. मोहन रानडेला जेव्हा पाठवले त्यावेळेला फक्त लक्ष्मीकांत भेंब्रे पोर्तुगालमध्ये होते. बाकीचे शिक्षा संपवून परतले होते. मोहनपाठोपाठ तिलो मास्केरान्स यालाही पोर्तुगालच्या कैदेत पाठवण्यात आले.

पुढे १९ डिसेंबर १९६१ रोजी भारत सरकारच्या कारवाईमुळे गोवा स्वतंत्र होऊन भारतीय प्रजासत्ताकात सामील झाला. गोव्याच्या तुरुंगात असलेल्या भारतीय क्रांतिकारकांना मुक्त करण्यात आले. पोर्तुगीजांनी इथला गाशा गुंडाळला. सर्वत्र उत्साह व आनंदाचे वातावरण होते. पण या सगळ्यात मोहन रानडे आणि तिलो मास्केरान्स हे स्वातंत्र्यसनिक पोर्तुगालच्या तुरुंगातच राहिले. त्यांची सुटका झाली नव्हती हे राज्य आणि केंद्र सरकारच्या गावीही नव्हतं.

पुढे गोवा स्वतंत्र होऊन सहा वर्षे होत आली. मधल्या काळात १६ जानेवारी १९६७ रोजी झालेल्या ‘ओपिनियन पोल’नुसार, गोवा महाराष्ट्रात विलीन न होता स्वतंत्र राज्य राहील यावर शिक्कामोर्तब झाले. विलीनकरणाच्या बाजूने असणाऱ्या भाऊसाहेब बांदोडकरांना गोंयकारांनी राज्याचे मुख्यमंत्री केले. परंतु गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे दोघे अजूनही दूरदेशी तुरुंगात खितपत होते. दरम्यान, सुधीर फडके आणि त्यांच्या मित्रमंडळींनी ‘मोहन रानडे विमोचन समिती’ स्थापन करून राज्य आणि केंद्र सरकारवर दबाब आणायला सुरुवात केली. गोवा स्वतंत्र झाल्यानंतरही दोन स्वातंत्र्यसनिक पोर्तुगालच्या तुरुंगात शिक्षा भोगताहेत, ही बातमी देशभर झाली. याच काळात तमिळनाडूचे मुख्यमंत्री अण्णादुराई यांची व्हॅटिकनच्या पोपसोबत भेट ठरली होती. या भेटीदरम्यान अण्णादुराई पोपना रानडे व मास्केरान्स यांच्या सुटकेबद्दल बोलले. लवकरच चक्रे फिरली आणि २५ जानेवारी १९६९ रोजी मोहन रानडेने स्वतंत्र गोव्याच्या भूमीवर पाऊल ठेवले.

मोहन रानडेच्या स्वागतासाठी राज्य सरकारने जाहीर कार्यक्रमाची तयारी केली. मी तेव्हा पणजी आकाशवाणीवर नोकरीला होतो. पण राज्य सरकारने आकाशवाणीकडून त्या दिवसाकरिता मला सरकारी कामासाठी मागून घेतले. आझाद मदानावर जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माझ्याकडे या स्वागत समारंभाच्या निवेदनाची आणि संयोजनाची जबाबदारी होती. खेडय़ापाडय़ांतून लोक पणजीला आले होते. फार हृद्य कार्यक्रम झाला. त्यानंतर काही महिन्यांनी मास्केरान्सलाही पोर्तुगाल सरकारने मुक्त केले. त्याचेही तितकेच जंगी स्वागत करण्यात आले. त्या कार्यक्रमातही संयोजनाची जबाबदारी सरकारच्या वतीने मला देण्यात आली होती.

मोहन काही वर्षे गोव्यात राहिला. त्याने वकिलीचे शिक्षण घेऊन वकिली करण्याचा प्रयत्न केला. लग्न केले. उद्योग-व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात फारसे यश लाभले नाही. मधल्या काळात त्याचे ‘सतीचे वाण’ हे आत्मचरित्र ‘गोमंतक’चे तेव्हाचे संपादक माधव गडकरी यांच्या पुढाकाराने प्रकाशित झाले. तो शिक्षक असल्याने त्याने नेवरे परिसरात शिक्षण संस्था काढली. काही शाळा सुरूकेल्या. एक शाळा अजूनही सुरू आहे. पुढे १९८३-८४ च्या सुमारास तो पुण्यात वास्तव्याला गेला, तो तिकडचाच झाला. गोवामुक्तीचे त्याचे आणि माझे मार्ग भिन्न होते. आम्ही शांततामय मार्गाने, नि:शस्त्र लढय़ावर भर दिला, तर मोहन रानडेच्या गटाने सशस्त्र क्रांतीवर. असे असले तरी गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी त्याने जे योगदान दिले ते महत्त्वाचे आहे. तो गोंयचो झुजारीच. ताका मजी आर्गा.

शब्दांकन : किशोर अर्जुन

First Published on June 30, 2019 12:08 am

Web Title: mohan ranade nagesh karmali
Just Now!
X