डॉ. संजय ओक

कोविडचे नवे सामाजिक नियम स्वीकारताना समाजाची बेपर्वाई वृत्ती आड येते आहे. लग्न-समारंभातील उपस्थिती आणि मार्केटमधील मास्कविरहित भाऊगर्दी या गोष्टी टास्क फोर्सच्या सदस्यांना अस्वस्थ करतात. लोकल सर्वासाठी खुली आणि शाळेतील प्रत्यक्ष उपस्थिती या सवलतींना पात्र असे वर्तन आपल्याकडून होते आहे का? या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक जबाबदार व्यक्तीने शोधायला हवे आहे.

व्यक्तिस्वातंत्र्याचा अतिरेक झाला की सामाजिक सुरक्षा धोक्यात येते. समूहामध्ये, कळपामध्ये व्यक्तीला चेहरा नसतो. असतो फक्त एक मुखवटा.. समाजात वावरण्यासाठी परिधान केलेला. एकटी असताना कदाचित व्यक्ती बेफिकिरीने वागणार नाही, पण एकदा का  ‘‘जाहॉं चार यार मिल जाए, वहीं रात हो गुलजार’’ अशी अवस्था आली की, सामाजिक वर्तणुकीचे भान सुटते. भाषा बदलते, हावभाव बदलतात आणि ‘‘मला काय त्याचे?’’ ही बेपर्वाई मूळ धरू लागते. समारंभात रूढी आणि परंपरा जपताना, मान-सन्मानांचे डोलारे सांभाळताना आपण New Normal सोईस्कररीत्या विसरतो. ‘‘फोटो काढताना मास्क कशाला?’’ असा प्रश्नही विचारला जातो. ‘‘अहो, लग्न हा आयुष्यातला एवढा महत्त्वाचा दिवस, त्याला मास्कचे गालबोट कशाला?’’ अशी भलामणही केली जाते, पण हे सर्व करताना आपण कोणत्या संकटाला आमंत्रण देत आहोत याचा आपल्याला विसर पडतो.

या सर्व पार्श्वभूमीवर माझ्या अपेक्षा केंद्रित होतात शाळकरी मुलांवर.. अगदी नर्सरीत जाणारी बालपावलेही मास्क चेहऱ्यावर नुसता लावतच नाहीत, तर घराबाहेर पडताना त्याचा आग्रह धरतात आणि इतर मोठय़ा मंडळींना त्याची लाडिक आठवण करून देतात. माझा नातू वय वर्षे दोन.. ‘‘आबू, माश्क’’ ही त्याची स्टँडर्ड ओळ. अजून क्रियापदही बोलता येत नाही, पण कर्ता आणि कर्म यांची सांगड घालून नेमका अर्थ व्यक्त करण्याचे कसब त्याने प्राप्त केले आहे.  अपेक्षा पुढच्या पिढीकडून तंत्रज्ञानाच्या उपयोगासंदर्भातही आहेत. ‘‘चिंटू कोडिंग शिकला, त्याने नवा अ‍ॅप बनविला.’’ ही टी.व्ही.वरची जाहिरात काहीशी त्रासदायक सुरात असली, तरी चिंटू आम्हा मोठय़ांपेक्षा कोडिंग चटकन् शिकेल आणि अ‍ॅप बनवेल हे मात्र त्रिवार सत्य आहे. तंत्रज्ञान आरोग्य क्षेत्रात, परस्पर संपर्कात आणि कामे करून घेण्याच्या पद्धतीत शिरत आहे. रुग्णालयांमध्ये टेली-हेल्थचा प्रारंभ झाला आहे. त्वचारोगतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक आणि इतर काही जण त्याचा

प्रभावी वापर करीत आहेत. पण म्हणून ही दूरस्थ टेली-हेल्थ सेवा फुकट असावी अशी अपेक्षा चुकीची आहे. रुग्णाचा दळणवळणाचा त्रास आणि खर्च व वेळ वाचतो आहे. वेगवेगळ्या पेमेंट-गेटवे प्रणालींचा वापर करून आपली डॉक्टरांबरोबरची अपॉइंटमेंट ठरवून आपण त्याचा फायदा घ्यायला हवा. आज परदेशस्थ रुग्ण आपल्यातील उत्तमोत्तम डॉक्टरांचा तसा सल्ला घेतही आहेत. हे तंत्रज्ञान आता आपण मनाने स्वीकारणे गरजेचे आहे आणि यासाठी माझा पुढच्या पिढीवर विश्वास आहे.

‘माश्क’ घालून कधीतरीच बिल्डिंगच्या खाली उतरणाऱ्या माझ्या नातवाच्या पिढीचे मला थोडेफार दु:खही होते आहे. करोनाने त्यांचे बालपण खुरडले आहे. खाली उतरून पकडापकडी, क्रिकेट खेळण्याचा आनंद हिरावला आहे. पार्कातल्या झोपाळ्यांवर झुलणे दुष्प्राप्य झाले आहे. आम्ही बालपणाचे ‘बोन्साय’ करतो आहोत, पण तरीही ती पिढी ‘माश्क’चा सहर्ष स्वीकार करते आहे. बालादपि सुभाषितं ग्राम्। च्या धर्तीवर ‘माश्कम् ग्राम्’ म्हणण्याची वेळ आली आहे. फक्त या साऱ्या New Normal मध्ये त्यांचे कोमल बालपण हरवू नये, एवढीच इच्छा!

गेल्या रविवारी करोनाच्या काळातच पल्स पोलिओचा दिवस आला. आमचे नातू आपल्या दोन समवयीन मामे-भावंडांसह पोलिओ बूथवर ‘माश्क’ लावून गेले. ‘बूँद जिंदगीचे’ मिळाल्यावर हाताच्या एका बोटाला शाई लावली जात होती. मामे-बहीण.. वय वर्षे दोन.. एका बोटाला शाई लावल्यावर तिने नेल पॉलिश लावून घेण्यासाठी दोन्ही हातांची दहाही बोटे पुढे केली. आणि पोलिओ बूथवर हास्यकल्लोळ उमटला.

नियम आहेतच, निरागसता जपली जाणे महत्त्वाचे!

sanjayoak1959@gmail.com