News Flash

मोकळे आकाश.. : रंगुनि रंगांत साऱ्या..

लाल रंग मग माझ्यासारख्या सर्जनशी रक्ताचे नाते जोडतो. त्याची लाली मला आतील प्राणवायूचे प्रमाण सुचवते.

डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

‘रंगुनि रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा

गुंतुनि गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा’

सुरेश भटांची ही कविता मला नेहमीच मोहवून टाकते. आज या कवितेची आठवण व्हायला कारणीभूत ठरला माझा रुग्णालयातला सहकारी डॉ. कासट. त्याने विविध रंगांचे वर्णन करणारा एक विलक्षण मेसेज फॉरवर्ड केला होता. मूळ लेखक अनामिक होता, पण त्याचं वैद्यकविश्वाशी काहीतरी नातं असलं पाहिजे असं मला वाटू लागलं.

आयुष्यातल्या रंगांशी आपली तोंडओळख वयाच्या दुसऱ्या वर्षांपासूनच होते. रेड, यलो, ब्लू अशी रंगीत पट्टय़ांची ओळख परेड आमच्या घरात सदोदित चालू असते. घराच्या भिंतीवर क्रेयॉन्सच्या इतक्या गिरटय़ा मारून झाल्या आहेत की भिंतीचा मूळचा रंग कोणता याचा संभ्रम पडावा.

सात रंग सात सुरांसारखे आपली आयुष्यभर साथसंगत करतात. लाल म्हणजे उन्मुक्तता. गुलाबी छटा म्हणजे प्रेम. हिरवा शांतीचा. निळा आकाशाच्या भव्यतेचा. पांढरा शरणागतीचा. भगवा तेजाचा. पण हे सारे सगळे रंगसंदर्भ वैद्यकीय परिघात बदलतात. रुग्णालयाच्या इमारतीत त्यांना वेगळे संदर्भ प्राप्त होतात.

लाल रंग मग माझ्यासारख्या सर्जनशी रक्ताचे नाते जोडतो. त्याची लाली मला आतील प्राणवायूचे प्रमाण सुचवते. जरा जरी कुठे ती कमी वाटली की मी लगेच भूलतज्ज्ञाला ‘गिव्ह १००% ऑक्सिजन’ अशी आज्ञा सोडता होतो. एखाद्या बालरुग्णाच्या पोटात असलेली कॅन्सरची गाठ काढताना त्या गाठीवर खेचल्या गेलेल्या मोठय़ा मोठय़ा वाहिन्यांमधून धावणारा तो प्रवाही लाल रंग माझ्या शल्यकौशल्याला आव्हान देतो. कोठेही न फाटता त्या वाहिन्या गाठीपासून सोडवताना तो लाल रंग वेगाने वाहतो आणि मोजे घातलेल्या माझ्या बोटांना गुदगुल्या करतो. लाल रंग माझ्यासाठी जिवंतपणाचे प्रतीक बनतो.

निळ्याची तऱ्हा मात्र अगदी उफराटी. निळा म्हणजे निस्तेजता. मंदावणारे दिवे. ‘कोड ब्ल्यू’ म्हणून आम्हाला अपरिचित असतो. ‘कोड ब्ल्यू’चा अलार्म वाजला की धावत रुग्णालयात त्या हृदय थांबलेल्या रुग्णाभोवती सगळे गोळा होतात. सैनिकी शिस्तीप्रमाणे  Cardiopulmonary resuscitation ची प्रक्रिया सुरू होते. तेव्हा रुग्णाच्या ओठांत, हातापायांच्या नखांत मला त्या निळ्याची अशुभ छाया दिसते. हातापायांवर, चेहऱ्यावर हलका राखाडी (Grey) रंग चढू लागलेला असतो आणि आयुष्य संपून प्राण निसटून चालला आहे याची वर्दी हा निळा रंग देतो. शस्त्रक्रिया करताना हा नीलांच्या प्रवाहात माझ्याशी लपंडाव खेळतो.

पांढरा तसा आम्हा डॉक्टरांच्या अ‍ॅप्रनशी साथसंगत करतो; तर ऑपरेशन थिएटरमध्ये हिरव्याची सत्ता असते. एकसुरीपणा भंग करण्यासाठी हल्ली आम्ही सर्जन डोक्यावर अ‍ॅबस्ट्रॅक्ट डिझाइनच्या टोप्या घालतो. तेवढीच हिरव्या-निळ्या पार्श्वभूमीवर थोडीशी रंग-विसंगती!

पिवळा तसा कमीच. पण काविळीच्या वॉर्डात याचीच सत्ता. त्यातही कावीळ अवरोधिक (Obstructive) असली तर या पिवळ्यावर हिरवट झाक चढते आणि रुग्णाची रवानगी सर्जरीच्या वॉर्डात होते.

रुग्णालयात या सप्तरंगांना वेगवेगळे अर्थ प्राप्त होतात. सप्तरंगांची झळाळी आणि झाक येथे नसते, तर आजारांचा झाकोळ असतो. इथे रंग आमच्याशी जीवन-मृत्यूचा छप्पापाण्याचा खेळ खेळतात. इथे रंगांपेक्षा वर बसलेला रंगारी महत्त्वाचा ठरतो. रुग्णालयाच्या कॅनव्हासवर अस्ताव्यस्त पसरणारे हे रंग माझ्यासाठी मात्र इंद्रधनुष्य रेखाटतात. करोनाच्या पडत्या प्राणवायूची चाहूल लावतात. आणि कधी गुलाबी गालांतून लेबर वॉर्डातून उमटणाऱ्या पहिल्या टय़ाँहामधून जीवनाच्या सातत्याची ग्वाही देतात.

मी रोज सकाळी पायरीला नमस्कार करून नव्या दिवसाचा नवा कॅनव्हास उघडतो. सगळ्या भावना असतात, उधळण असते. पण या सगळ्या रंगांचे थेंब उडाल्यावरही माझा रंग मात्र वेगळाच.. अस्पर्शित राहील याची खबरदारी मी घेता होतो.

सुरेश भटांच्या कवितेच्या शेवटच्या ओळी जणू माझ्यासाठीच लिहिलेल्या असतात..

‘माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी,

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 1:04 am

Web Title: mokale akash dr sanjay oak article significance of color in health care color importance in health care zws 70
Next Stories
1 अंतर्नाद : मन कुंतो मौला
2 वननीती, वनकायदा आणि पर्यावरणाचा ऱ्हास
3 पडसाद : विनाशाकडची वाटचाल अस्वस्थ करणारी!
Just Now!
X