डॉ. संजय ओक
या बाप्पा, विराजमान होऊन आज तुम्हाला तीन दिवस झाले. येण्यापूर्वी तुम्हीही ‘आरटीपीसीआर’ केली होतीत असे ऐकतो. तुमची टेस्ट करावयाची म्हणजे स्व्ॉबची काडी केवढी मोठी लागली असेल! तुमच्यापैकी काही जण एक्झिक्युटिव्हच्या त्वरेने स्वगृही परतही गेले. ‘वर्किंग बाय क्लॉक’ हा नियम देवाधिदेवही पाळतात हे स्पष्ट झाले. आणि तुमच्या घरी- कैलासावर अतिथंड वातावरणात करोना नसल्यामुळे तुम्हाला ‘हाऌ’ अर्थात ‘घरून काम’ हा फंडा फारसा माहीत नसेल. बाकी काय, गेल्या वर्षीही आम्ही तुमचे स्वागत लाऊडस्पीकर लावून, बेभान नाचून, मिरवणुका काढून करू शकलो नव्हतो. मजबुरीच आहे आमची सध्या. जे काही शूरवीर शासकीय निर्देश पायदळी तुडवून नाचले, भिजले, मास्क भिरकावते झाले, त्यांना करोना पावला. दुर्दैवाने त्याचा प्रसाद इतरांनाही मिळाला. प्रसादच तो.. वाटप हे होणारच; मागण्याची गरजच नाही. काहींना तुम्ही डायरेक्ट कैलासावर बोलावून घेतलेत; बाकीच्यांनी आमच्या रुग्णालयात पाहुणचार घेतला. तेव्हा याही वर्षी सण गोड मानून घ्या. ‘लाट येणार.. कितवी? ते गौण..’ असे म्हणालो तर राजकीय धुरंधर म्हणतात, ‘लाटा यायला करोना हा काय समुद्र आहे?’ आमचे तर मग बोलणेच खुंटते.

तुमच्या आगमनाचे दहा दिवस आम्हाला दिवाळीइतकेच कौतुकाचे. एक तर तुमचे रूप! इतका गोड दुसरा देव नाही. तुमच्या वडिलांची तशी आम्हाला धास्ती वाटते. इंद्र वगैरे मंडळी बॉलीवूडमधल्या नायकासारखी. तुम्ही मात्र घरचे. हक्काने मागणे आणि हट्टाने घेणे- सारे काही तुमच्यापाशी. कपडे, मुकुट, जिरेटोप, टोपी जे काही आम्हाला हवे ते आम्ही तुम्हाला घालतो. खरे तर आमची स्वप्ने, आमच्या इच्छा तुमच्यातून पूर्ण करून घेतो. तुम्ही ते गोड मानून घेता. भक्त आणि भगवान यांचे याहून एकीकरण ते काय दिसणार? तुमच्याकडे मागताना आम्हाला लाज, संकोच, भय यातले काहीच वाटत नाही. तुम्ही देणार आणि आम्ही घेणार. पण ही भिक्षा नाही, देणगी नाही, वरदान नाही. एवढेच काय, तर साधे दानही नाही. मुलाने बाबांकडून शाळेत कॅडबरी आणि कॉलेजात गेल्यावर स्कूटरची किल्ली मागावी तितकी सहजता आपल्या नात्यात आहे. तुम्ही ‘दाते’, आम्ही ‘घेते’ आहोत. म्हणूनच काही गोष्टी आज आम्ही मागतो आहोत. तेवढे देण्याची कृपा करावी महाराजा!

दिवस मास्क घालण्याचे आहेत. दिवस लस घेण्याचे आहेत. दिवस अंगावर दुखणी न काढण्याचे आहेत. दिवस स्वत:च औषधे साखर-खोबऱ्याचा प्रसाद खाल्ल्यासारखे न घेण्याचे आहेत याची शिकवण द्या बाप्पा. मास्क हा नाक आणि तोंडावर हवा. हनुवटीवर फक्त दाढी शोभते, मास्क नाही, हे सांगा बाप्पा. दुसऱ्याचा विचार करायला शिकवा देवा. जाणते-अजाणतेपणी इतरांचा अपमान, उपमर्द होणार नाही असे वागा, हे सांगा राया. शाळा उघडायच्या, चिमणी पाखरं आत घ्यायची तर घरटं नीट शाकारायला हवं. स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचे स्तोत्र पाठकरायला सांगा ईश्वरा. पर्यावरण जपले नाही तर पर्जन्यराजा कोपतो किंवा कोसळतो. दोन्हीही आम्हाला परवडण्यासारखे नाही. जंगले तोडली की बिबटे चहापानाला कॉलनीत येणारच. हिरवळ महत्त्वाची. सिमेंट, ई-कचरा, प्लास्टिकचा घनकचरा किती प्रमाणात निर्माण करायचा? काहींची तर समुद्रावरही वक्रदृष्टी. त्याचे परिणाम आम्ही साहिले आहेत. आम्ही पर्यावरणावर पंचतारांकित परिषद करतो आणि मर्सिडिजची काच खाली करून प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या बाहेर फेकतो. त्या क्षणाला आम्ही बाटली नाही, तर आमची सदसद्विवेकबुद्धीच बाहेर फेकत असतो. आम्ही सांगून थकलो. आता तुम्हीच काय ते बघा परमेशा!

राजकीय आणि गटातटांत फार पडू नका देवा. दमाल तुम्ही. पण शाब्दिक कलगीतुरे आणि हारतुरे यांपेक्षा जनतेला खूप काही हवे आहे हे त्यांना समजवा देवा. करमणूक करणारे क्षेत्र वेगळे, लोक वेगळे. प्रत्येकाने आपापला व्यवसाय सांभाळावा, नाही का देवा! यश रिचवायला आणि अपयश पचवायला शिकवा देवा. उगीचच आत्महत्या हा क्षणिक कठीणतेवर कायमस्वरूपी त्रासदायक इलाज नको, हे सांगा देवा. आपण योजलेल्या मार्गापेक्षा आयुष्यात वेगळा मार्ग निवडावा लागला तर ती तुमची इच्छा होती असे समजून घेण्याची प्रगल्भता द्या देवा.

..आणि हो, आज ठएएळ ची परीक्षा आहे. सुयश चिंता.. पण वैद्यकीय क्षेत्रापलीकडेही आयुष्यात करण्यासारखे खूप काही असते, हे त्या १७-१८ वर्षांच्या कोवळ्या जीवांना समजवा देवा. तुमचाच एक चाळीस वर्षे वैद्यकीय क्षेत्रात लोणच्याप्रमाणे मुरलेला भक्त सांगतो आहे देवा..

‘आयुष्यात गाळलेल्या

जागा भरणे आणि योग्य

ते पर्याय निवडणे यापेक्षा

खूप काही असते आणि

आयुष्याच्या पेपरात चुकाही

खूप शिकवून जातात.

तेथे निगेटिव्ह मार्किंग नसते..’

sanjayoak1959@gmail.com