डॉ. संजय ओक

डॉ. संजय ओक .. प्रख्यात सर्जन. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख. आयुष्य व्रतस्थतेनं रुग्णसेवेत व्यतीत करत असतानाच अचानकपणे उद्भवलेल्या सर्वसंहारी करोनाकाळाचे आव्हान पेलण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. या काळातील अनुभवांचं  मनमोकळं साप्ताहिक सदर..

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात

काही वर्षांच्या अंतरायानंतर पुन्हा ‘लोकरंग’च्या माध्यमातून आपल्याला भेटतो आहे. गेले वर्ष आले काय अन् सरले काय! २०१९ च्या डिसेंबरला रात्री फटाक्यांच्या आतषबाजीत काही वटवाघुळांचे चीत्कार आपल्यापर्यंत पोहोचले नाहीत; पण म्हणून त्यांचे अस्तित्व आपल्याला नाकारता आले नाही.  २०२० या वर्षांत ‘माझा भारत कसा असेल?’ याची चित्रे आपण शतक संवत्सर उलटताना २००० साली रंगवली होती. पण भारतच काय, अख्खं जगच तेव्हा मास्क लावून, इतरांपासून हातभर अंतर राखण्यासाठी जीवाचा आटापिटा करेल, हे कोणाला वाटले होते?

२०२० ने खूप काही बदलले, बदलायला भाग पाडले.. आणि ते स्वीकारायला अपरिहार्य अवस्थेत आयुष्याला आणून ठेवले. जिवंत राहण्यासाठीची धडपड माणसाने अश्मयुगात केली होती; ती पुन्हा विषाणुयुगात करण्याची वेळ आली. जगण्याचे परिमाण आणि परिणाम बदलले. प्रयोजने बदलली. प्रास्ताविके बदलली. आणि प्रस्तावही बदलले. यावर्षीच्या लेखमालेची सुरुवात माझ्यासाठी साधीसुधी नाही. हा माझा वाचकांशी केलेला संवाद आहे. ही हृदयाची हाक आहे. अंतर्मुखलेली वेदना आहे. भोगवटय़ाचे दु:ख आहे. अज्ञाताशी देत असलेल्या अपूर्ण लढय़ाचे शल्य आहे. अनेक हरवलेल्या क्षणांची वेदना आहे. गमावलेल्या मित्र आणि स्वकीयांची आठवण आहे. वैद्यकाच्या उघडय़ा पडलेल्या मर्यादा आहेत. गेल्या वर्षांत एकेका नव्या पुनर्उद्देशीय (Repurposed) औषधाचा उदोउदो करावा आणि चार महिन्यांत ते कुचकामी असल्याचा शास्त्रीय निर्वाळा मिळावा, हे अनेकदा झाले. त्या फसलेल्या प्रयोगांची निराशा आहे.  काही फुकाचे दावे आहेत, तर काही आपमतलबीपणाचे कावे आहेत. काही व्यावसायिक साटेलोटे आहेत. आणि काही जनसेवा करताना प्राणांची आहुती देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे Super Sacrifice… अर्थात सर्वोच्च बलिदानाच्या कहाण्या आहेत. २०२० हे माझ्या मते तळ्यातमळ्यात आणि सापशिडीचे वर्ष ठरले आहे.  २०२० म्हणजे अनुभवांची शिदोरी. २०२० म्हणजे आपली आपल्याला आणि आपल्यांची आपल्याला ओळख करून देणारे वर्ष. खूप काही गमावले तरी पुढच्या वाटचालीत खरी साथ देणाऱ्यांची ओळख म्हणजे २०२०!

वैद्यकीय व्यवसाय आमूलाग्र बदलला आहे. Infectious diseases अर्थात सांसर्गिक रोगांचीच यापुढे चलती असणार आहे. शल्यशास्त्राला मागच्या बाकावर बसावे लागते आहे. फायदा तर लांबच राहिला, खर्चाची तोंडमिळवणी दमविणारी आहे. प्रशासन अति-तणावाचे झाले आहे आणि कौशल्य मागे पडून ती एक thankless कृती झाली आहे. लोकांना रुग्णालयांची कधी नव्हती इतकी भीती वाटू लागली आहे.

२०२० सरताना ‘करोनावर पुढच्या वर्षी लस येईल’ या आशेवर आपण नव्या वर्षांत पाऊल टाकतो आहोत. खूप प्रश्न अनुत्तरित आहेत, पण तरीही प्रकाशाचे कवाड किलकिले होते आहे, हेही नसे थोडके! २०२१ म्हणजे पुन्हा सूर्योदय.  २०२०च्या अनुभवांची शिदोरी घेऊन पुढची आशावादी वाटचाल! ‘हरवेन मी, खुळवेन मी शिशिरा, तरी बहरेन मी!’ असेच म्हणायची ही आजची वेळ.

२०२० च्या या करोना ड्रॅगनने मला वैयक्तिक खूप बदलविले आहे. डॉक्टर, प्रशासक, टास्क फोर्सचा अध्यक्ष आणि एक अत्यवस्थ रुग्ण या टप्प्यांतून गेल्यावर करोनाने मला आयुष्याचा आरसा दाखविला आहे, आणि यापुढे नेमक्या प्रयोजनांची निवड करण्याची संधी दिली आहे.  मी उर्वरित आयुष्यासाठी शल्यशास्त्र, लेखन आणि टास्क फोर्सची निवड केली आहे. आणि सोळा वर्षे केलेले प्रशासन हे जणू सोळा सोमवारचे व्रत होते असे मानून त्याचे उद्यापन करता झालो आहे.

..मी एक आशावादी आरोग्यसेवक आहे.  ड्रॅगनचा विळखा आहे, पण यमुनेच्या डोहातला कालिया आम्हाला नवीन नाही. आणि तटावरच्या कदम्बावरून सूर मारून त्याच्या उभारलेल्या फण्यावर थयाथया नाचून त्याचे मर्दन करणारा यादवकुलोत्पन्न कृष्णही आमचाच आहे.

भारतातील आरोग्य व्यवस्थेने अंधाराचे जाळे फिटून, आकाश मोकळे करून कालियामर्दन करणाऱ्या कृष्णाचा अवतार घ्यावा, हीच इच्छा!

मी माझी महाभारतीय ‘संजया’ची निवेदकाची भूमिका निभावेन.

wsanjayoak1959@gmail.com