प्रा. नीला कोर्डे – lokrang@expressindia.com

‘आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे’.. ग. दि. माडगूळकरांच्या ‘गीत रामायणा’तील या काव्यपंक्तीची यथार्थता आपल्याला अनुभवायला मिळते ती वर्षां ऋतूतच! भूमीकन्या सीता आणि आकाशस्थ सूर्याच्या वंशातील श्रीराम यांच्या विवाहाचे वर्णन करणारी ही काव्यपंक्ती! वर्षां ऋतूत खरोखरच भूमीचे आणि आकाशाचे मेघांद्वारे मीलन होते. एरवी सूर्यकिरणांनी भूमीला भेटणारे, तिला तप्त करणारे आकाश वर्षां ऋतूत मात्र मेघांतून होणाऱ्या जलवर्षांवाने तिला तृप्त करते.

How Sudha Murthy cope with menopause
“एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
lokmanas
लोकमानस: मौनामागचे रहस्य..

या वर्षां ऋतूचे आदिकवी वाल्मिकींनी रामायणात केलेले वर्णन खरोखरीच अप्रतिम आहे. या वर्णनाकडे येण्यापूर्वी रामायणाविषयी एक वेगळी गोष्ट सांगावीशी वाटते. वाल्मिकींचे रामायण म्हणजे आपल्या कृषीप्रधान भारतीय संस्कृतीशी संबंधित असलेले मिथक आहे असे काही विद्वानांचे मत आहे. या मतप्रवाहानुसार, रामायण ही ‘इंद्र-वृत्र’ संघर्षांची रूपककथा आहे. यातील राम म्हणजे देवांचा राजा इंद्र. इंद्राचा वृत्र नावाचा शत्रू म्हणजे जल रोखून धरणारा मेघ असून, इंद्र वज्राने वृत्राचा नाश करतो आणि रोखून धरलेल्या जलाला मुक्त करतो. रामायणातील रामाचा शत्रू रावण म्हणजे अवर्षण होय आणि ‘सीता’ म्हणजे नांगरलेली जमीन. राम सीतेला रावणापासून मुक्त करतो, म्हणजेच इंद्र नांगरलेल्या जमिनीला अवर्षणापासून मुक्त करतो. रामायणातील सीतेला ‘कांचनमृगा’चे आकर्षण वाटते. नांगरलेल्या जमिनीलाही ओढ असते ती मृगाच्या पावसाची! रामाने सीतेला अशोकवनातून सोडवून आणले याचा अर्थ असाही लावला जातो की, अरण्यांची तोड करून त्या जमिनीत शेती करण्यास सुरुवात झाली. कृषिसंस्कृतीशी संबंधित असलेल्या या मिथकामुळे रामायणात कृषिसंस्कृतीचा केंद्रबिंदू असणाऱ्या वर्षां ऋ तूला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.

रामायणातील किष्किन्धाकाण्डाच्या अठ्ठाविसाव्या सर्गात वर्षां ऋ तूचे वर्णन आले आहे. राम-सीतेच्या मीलनाचे प्रतीक असणाऱ्या वर्षां ऋतूला येथे मात्र सीताविरहाची करुण पाश्र्वभूमी आहे. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर राम लक्ष्मणासह किष्किन्धेला- म्हणजे वाली आणि सुग्रीव यांच्या राज्यात येतो. (किष्किन्धा म्हणजे म्हैसूर आणि हैदराबाद यांच्या मधील प्रदेश) राम तिथे आलेला असतानाच वर्षां ऋतू सुरू होतो. तेव्हा राम आणि लक्ष्मण किष्कन्धेजवळील माल्यवान पर्वताचा आश्रय घेतात. या पर्वताच्या परिसरातील वर्षां ऋतूचे रामाच्या मुखातून वाल्मिकींनी केलेले वर्णन म्हणजे एक देखणे निसर्गचित्रच आहे.

नभ मेघाच्छादित झालेले पाहून‘समयोऽद्यजलागम:।’ असे सहजोद्गार रामाच्या मुखातून निघतात आणि बरसणाऱ्या जलधारांबरोबरच वर्षांवर्णन करीत त्याची वाणीही बरसू लागते. मेघाच्छादित द्यौ: (स्त्रीलिंगी) म्हणजे आकाश पाहून त्याला वाटते की, ही जणू आसन्नाप्रसवा स्त्रीच आहे आणि तिने समुद्ररसाचा गर्भ धारण केला आहे. मेघांचे एकावर एक थर पाहून सूर्यवंशी रामाला वाटते की, या मेघांच्या पायऱ्यांवरून सूर्यापर्यंत जावे आणि त्याला वर्षां ऋ तूत फुलणाऱ्या अर्जुन (अर्जुनसादडा) आणि कुटज (कुडा) यांच्या फुलांच्या माला अर्पण कराव्यात. या मेघांवर मावळत्या सूर्याचा लाल रंग पसरल्यामुळे आकाश जणू रक्तचंदनाचा लेप लावलेल्या कामी पुरुषाप्रमाणे भासते. चमकणाऱ्या विजेमुळे आणि ढगांच्या गडगडाटामुळे कुणीतरी आकाशावर आसूड ओढत आहे आणि ते कण्हत आहे अशीही चमत्कारिक कल्पना येथे आली आहे. परंतु त्याचबरोबर पर्वतांवर मात्र एक सुंदर कल्पना वाल्मिकी ऋ षींनी केली आहे. ते म्हणतात-

मेघकृष्णाजिनधरा धारायज्ञोपवीतिन:।

मारुतपूरितगुहा: प्राधीता: इव पर्वता:॥

किष्किन्धाकाण्ड- सर्ग २८, श्लोक क्र. १०

अर्थ- कृष्णमेघांचे कृष्णाजिन (काळवीटाचे कातडे) धारण केलेले, जलधारांचे जानवे घातलेले आणि गुहांमधील वाऱ्याच्या आवाजाने वेदपठण करणारे हे पर्वत ‘प्राधीता:’ म्हणजे अध्ययन सुरू केलेल्या शिष्यांप्रमाणे भासतात.

वर्षां ऋ तूत फुलणाऱ्या फुलांचे वैविध्यपूर्ण वर्णनही येथे आले आहे. फुललेल्या कुटज आणि अर्जुन यांच्याबरोबरच माल्यवान पर्वताला सुगंधित करणारा केतकही (केवडा) आहे. तर पर्वतावरून वाहणाऱ्या नद्यांमधील नवजल सर्ज (असाणा) आणि कदंब यांच्या पुष्पांनी मिश्रित झाले आहे. वर्षां ऋ तूत नभ मेघाच्छादित असल्यामुळे सायंकाल झाल्याचे जाणवते ते मिटलेल्या कमळांमुळे आणि फुललेल्या मालतीमुळे.. म्हणजे जाईमुळे!

फुलांबरोबरच फळांचेही वर्णन आले आहे. पिकलेली आम्रफले वाऱ्यामुळे खाली पडत आहेत. जम्बफलांवर म्हणजे जांभळांवर तर कवीने विविध उत्प्रेक्षा केल्या आहेत. ही जांभळे जणू काळेशार भुंगे तर नव्हेत! पण पुन्हा कवीला वाटते की, हे जणू वणव्यात जळलेल्या झाडांचे विझलेले निखारेच आहेत.

वृक्षलतांबरोबरच येथे पशुपक्षीही आहेतच. वर्षां ऋ तूच्या आगमनाने प्रफुल्लित झालेले ‘विवर्णच्छदना:’ (फिकट पंख असलेले) तृषार्त चातक पक्षी ‘सुरेन्द्रदत्त’ (इंद्राने दिलेले) जल प्राशन करतात आणि मयूर आनंदाने नृत्य करतात. येथे आणखी एक खास उल्लेख आलेला आहे तो मेघापर्यंत उडत जाणाऱ्या बलाकेचा म्हणजे बगळीचा! बलाका मेघगर्जनाने गर्भवती होते असा एक सुंदर संकेत संस्कृत साहित्यात आहे. आकाशात उडणारी बलाकपंक्ती कवीला वाऱ्याने हलणारी ‘वरपौण्डरीकी’ म्हणजे सुंदर पांढऱ्या कमळांची माळच वाटते. या कल्पनेचा प्रभाव बालकवींच्या ‘श्रावणमास’ या कवितेतील ‘बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळची ते’ या काव्यपंक्तीवर पडलेला दिसून येतो.

पशूंच्या वर्णनात सकाम वृष (बैल) आहेत आणि केतकीपुष्पांच्या गंधाने प्रहर्षित झालेले मदोन्मत्त हत्तीही आहेत. वर्षां ऋतूत पशुपक्ष्यांबरोबरच दिसणारे ‘बालइन्द्रगोप’ म्हणजे लाल रंगाचे किडेही (कुंकवाचे किडे) कवीच्या नजरेतून सुटलेले नाहीत. हिरव्या गवतावर उठून दिसणाऱ्या इन्द्रगोपांवर त्याने भूमीने पांघरलेल्या लाल बुंदके असलेल्या शालीची उत्प्रेक्षा केली आहे.

या वर्षांवर्णनात कवीची सौंदर्यग्राही दृष्टी नभापासून भूमीपर्यंत भिरभिरते आहे. हा वर्षां ऋ तू चक्षुरेंद्रियाप्रमाणेच श्रवणेंद्रियालाही आनंद देणारा आहे. भ्रमर आपल्या गुंजारवाने जणू तंतूवाद्य छेडत आहेत, तर एरवी मर्कटलीला करणारी माकडेही आपला कंठताल देत आहेत. साथीला मेघांचा मृदुंगनादही आहेच! वनात जणू संगीताचा जलसाच सुरू आहे.

या सगळ्याबरोबरच शृंगाररसाचा आविष्कार करणारी एक कामुक कल्पनाही येथे आली आहे. चहुदिशांना पडणाऱ्या पावसाच्या सरी पाहून राम म्हणतो-

सुरतामर्दविच्छिन्ना: स्वर्गस्त्रीहार मौक्तिका:।

पतन्ति चातुला दिक्षु तोयधारा: समन्तत:॥

किष्कन्धाकाण्ड, सर्ग २८, श्लोक क्र. ५१

अर्थ- सर्व दिशांना पडणाऱ्या या अतुला (अप्रतिम) जलधारा म्हणजे रतिक्रीडा करताना  स्वर्गातील स्त्रियांच्या कंठातून तुटून पडलेले मोत्यांचे हारच आहेत.

कामभावना उद्दिपित करणाऱ्या वर्षां ऋ तूत आपल्या प्रियेपासून दुरावलेल्या रामाला अशी कल्पना सुचणे अस्वाभाविक नाही.

सीतेच्या विरहाचे दु:ख तर त्याच्या अंत:करणातून सतत पाझरतेच आहे. म्हणूनच पहिल्या पावसाबरोबर तप्त जमिनीतून बाहेर पडणाऱ्या वाफा पाहून त्याला रावणाने अपहरण केल्यामुळे दु:खाने उसासे सोडणाऱ्या सीतेची आठवण होते आणि तो उद्गारतो-

‘सीतेव शोकसंतप्ता मही बाष्पं विमुच्चति’

किष्किन्धाकाण्ड, सर्ग २८, श्लोक क्र. ७

येथे ‘सीता’ या शब्दावरील श्लेषही लक्षणीय आहे. कृष्णमेघात चमकणारी विद्युत पाहूनही रामाला आठवते ती आकाशमार्गाने रावण पळवून नेत असलेली सीता!

इथे आणखी एका विशेष गोष्टीचा खास उल्लेख करावासा वाटतो. सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेला, मानवी दु:खांचा अनुभव घेणारा रामायणाचा नायक राम हा विष्णूचा अवतार आहे. वाल्मिकी ऋ षींना याची जाणीव आहे. रामाच्या मुखातील ‘निद्रा शनै: केशवमभ्युपैति।’ (किष्किन्धाकाण्ड, सर्ग २८, श्लोक क्र. २५) या पद्यपंक्तीतून ही जाणीव सूचित झाली आहे.

वर्षां ऋ तूत विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर शयन करतो. विष्णू हा ‘नारायण’ आहे. ‘नारा’ या स्त्रीलिंगी, तसेच ‘नारम्’ या नपुंसकलिंगी संस्कृत शब्दांचा अर्थ ‘जल’ असा आहे. ‘शब्दकल्पद्रुम’ या ग्रंथात या अर्थाला अनुसरून ‘नारायण’ या शब्दाची व्यत्पत्ती ‘नारा जलं अयनं स्थानं यस्य।’ अशी दिली आहे. जल ज्याचे स्थान आहे तो नारायण. या नारायणाला राम अवतारातही जलाचे आणि म्हणूनच वर्षां ऋ तूचे आकर्षण वाटणे स्वाभाविकच आहे.

प्रतिभेचे अलौकिक लेणे लाभलेल्या आदिकवी वाल्मिकी ऋ षींच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेला, निसर्गातील नभापासून भूमीपर्यंत मेघ-विद्युत, जलधारा, गिरिसरिता, पशुपक्षी, वृक्षलता यांच्या विविध विभ्रमांचा आविष्कार करणारा असा हा रामायणातील ‘जीवन’दायी वर्षां ऋ तू आहे.

‘यावत्स्थास्यन्ति गिरय:

सरितश्च महीतले।

तावद्रामायणी कथा

लोकेषु प्रचरिष्यति॥’

असे रामायणाविषयी म्हटले आहे.

जोपर्यंत महीतलावर ऋ तुचक्र फिरत राहील तोपर्यंत रामायणातील हा वर्षां ऋ तूही ‘जीवनधारां’चा वर्षांव करीत राहील.

आज पृथ्वी ‘विषाणुयुक्त’ झाली असतानाही रामाचे मूलस्वरूप असणारा पृथ्वीवरचा पालनकर्ता ‘विष्णू’ तिला नवसंजीवन देत राहील.