प्रवीण दशरथ बांदेकर – samwadpravin@gmail.com

कवी आणि कादंबरीकार प्रवीण दशरथ बांदेकर हे मराठी साहित्यातलं एक आघाडीचं नाव. या पाक्षिक सदरात ते व्यक्त होणार आहेत.. भोवतालच्या व्यामिश्र घटना-घडामोडींबद्दल!

UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
How do you make sure there is no worm in a cauliflower
फक्त काही सेंकद फुलकोबी गॅसवर ठेवा, झटक्यात बाहेर येईल अळी किंवा किडे; पाहा भन्नाट Kitchen Jugaad
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय

का कोण जाणे, पण हल्ली माझं काहीतरी बिघडलं आहे असं सारखं वाटत असतं. म्हणजे होतंय काय, अपरात्री कधीतरी, काहीतरी असंबद्ध स्वप्न वगैरे पडून जाग येते. कसले तरी भलभलते वास येऊ लागतात. कधी करपलेल्या भाकरीचा, कधी कोऱ्या पुस्तकांचा, तर कधी चुलीत भाजलेल्या काजूबियांचा वा सुकटांचा. कधी कधी कसले कसले आवाजही कानी येऊ लागतात. गुरांच्या गळ्यातील घंटांचा, घराची आडवी तुळई पोखरणाऱ्या भुंग्याचा किंवा झावळांच्या खोपटावर दणकून कोसळणाऱ्या पावसाच्या सरींचा. एकेकदा तर असंही दिसतं की, माझ्या सगळ्या देहाचं विघटन झालंय नि एकेक सुटा सुटा अवयव मुंग्या ओढून नेतायत. हे नक्की काय चाललंय, कळत नाही. अस्वस्थता मात्र वाढत जाते.

लॉकडाऊन सुरू होण्याआधी होळीच्या निमित्तानं गावी गेलो होतो. तिथंही अचानक जाग आली नि भाकरी थापल्याचे अनेक आवाज कानांवर येतायत हे जाणवलं. आधी वाटलेलं तसं हे नेहमीसारखे भास नाहीयेत, तर खरोखरच जवळपास कुठेतरी कुणीतरी भाकऱ्या बडवतायत, हेही लक्षात आलं. त्यासरशी लगबगीनं उठून बाहेर अंगणात आलो. आमच्या घराजवळून नदी वाहते. तिकडूनच आवाज येतायत हे कळलं. अजून उजाडलंही नव्हतं, तरी एवढय़ा पहाटे कुणाची लगबग सुरू झाली असावी हे कळायला मग फार वेळ लागला नाही. अनेक वर्षांपासून रेंगाळलेलं नदीवरच्या पुलाचं काम सुरू झालेलं. त्यासाठी आलेल्या मजुरांची कुटुंबं पालं ठोकून नदीकाठीच मुक्काम करून होती. त्यांत बहुतांश विजापूर वगैरे कानडी मुलखातल्या गावांतली गरीब माणसं. भल्या पहाटे उठून दिवसभराच्या न्याहारी, जेवण इत्यादीसाठी लागणाऱ्या भाकऱ्या त्या कुटुंबांतल्या बायका बनवत असत. त्यांचेच हे आवाज. हे आवाज नेहमीसारखे स्वप्नातले आभासी नाहीयेत, प्रत्यक्षातले आहेत, हे जाणवून विलक्षण आनंद झाला. नकळतच मी नदीच्या जवळ जाऊन तंद्री लागल्यासारखा ते आवाज कानांत साठवून घेऊ लागलो. पुढे कितीतरी दिवस कायमच पहाटे आणि तिन्हीसांजेबरोबर हे आवाज आणि सोबत चुलीत भाजल्या जाणाऱ्या भाकऱ्यांचे खरपूस वास मला सोबत करत होते.

दरम्यान, अचानक एका संध्याकाळी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर झाला. हळूहळू सगळंच बंद होत गेलं. सगळेच मेटाकुटीला आले. अनेकांची हातावर पोटं. एकेक दिवस वाढत होता, तसतशी त्यांची तगमगही वाढत होती. तशात काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेलं ते पुलाचं कामही बंद पडलं. लॉकडाऊन कधी संपेल आणि काम पुन्हा कधी सुरू होईल याविषयी कुणीच काही सांगू शकत नव्हतं. मग टीव्हीवर दाखवत होते तशी ही मजूर कुटुंबंही पायी चालत आपल्या दूर मुलखातल्या गावी निघाली. जाताना वाटेत पुरतील अशा शक्य होत्या तितक्या भाकऱ्या त्यांनी सोबत बांधून घेतल्या होत्या. मनात आलं, आता हाच शेवटचा आवाज. हाच शेवटचा वास. सामानसुमानाने भरलेली भलीमोठी बोचकी डोक्यावर घेऊन ती माणसं गाव सोडून जात असताना उदासवाणं वाटत राहिलं होतं. काहीतरी करून त्यांची सोय करायला हवी होती, लॉकडाऊन संपेपर्यंत त्यांची इथंच राहायची व्यवस्था करायला हवी होती, असं वाटत राहिलेलं. मला हवं असलेलं काहीतरी त्यांच्यापाशी होतं, तेच आता ती घेऊन चाललीयत.. असं काहीसं मनात येऊन अस्वस्थ वाटत होतं.

पण सगळ्यांनाच काही हे असं वाटत नव्हतं. निमित्त काहीही असो- अगदी थोडय़ा दिवसांसाठीसुद्धा पोटापाण्यासाठी म्हणून बाहेरून गावात येऊन राहिलेली ही माणसं अनेकांना ‘भायली’- उपरीच वाटत असायची मनातून. त्यांच्या असंख्य तथाकथित असंस्कृत आणि रानटी गोष्टी खटकत राहायच्या. त्यांच्या गावंढळ वागण्याचा त्रास व्हायचा. त्यांचं हे हातावर थप- थप आवाज करीत भाकऱ्या थापटणंही काहींना खटकायचं. खरं तर आपणही अशा कैक रूढी- परंपरांना घट्ट चिकटून आहोत याचा आम्हाला कसा काय सोयीस्कर विसर पडायचा, मला आश्चर्य वाटे. पण माणसं संधी शोधतच असतात- आपल्यापेक्षा वेगळं आचरण, वेगळी संस्कृती असलेल्या अशा बाहेरच्यांना अडचणीत आणण्याची. आणि मग सरकारी काम आहे, कॉन्ट्रॅक्टरची माणसं आहेत, म्हणून एरव्ही त्यांच्यासमोर दबून असलेले लोक संधी मिळताच त्यांना हाकलून द्यायला सज्ज होतात. जसं काय, त्या बिचाऱ्यांमुळेच महामारी पसरली होती.. त्यांना गावातून हुसकावलं की आम्ही सुरक्षित जगू शकत होतो. आपल्याला उगाचच वाटत असतं- आता इतके दिवस झालेत म्हणजे आपण मिसळून गेलो आहोत त्यांच्याशी. पण तसं नसतं ते, हे कळतं अशा वेळी. काहीही निमित्त पुरतं आम्हाला कुरापत काढून आमचा कंडू शमवायला. म्हणजे अमक्या तमक्याच्या अंगावरून ओवाळून टाकलेली भाकर कुत्र्याने खाल्ली तरी चालतं आम्हाला; पण तीच भाकर लक्ष ठेवून पळवून खाताना दिसला त्या मजूर कुटुंबांपैकी कुणी एक भुकेला पोरगा, तर आम्ही त्याला कुत्र्यासारखा बडवला होता. दुसरा एक पोरगा नदीवर कपडे धुणाऱ्या आमच्या पोरींकडे बघून मुद्दामहून खाकरला म्हणे, तर संशयावरून आम्ही त्याचं अख्खं झोपडं आतल्या चिरगुटांसह पेटवून दिलं. होळीसाठी केलेल्या पोळ्या नदीलाही देतो आम्ही.. तशी प्रथा आहे म्हणून. पण या कुटुंबातल्या मुलांनाही त्यातली एखादी द्यावी असं नाही वाटत आमच्या रूढीपूजक मनाला. मुलखात परतताना अवचित डोळा लागून रेल्वेखाली चिरडलेले मजूर आणि त्यांच्या रुळांवर विखुरलेल्या भाकऱ्या टीव्हीवर पाहताना आम्ही हळहळतो; पण मरणाला मिठी मारलेली ती पोरं आपल्या गावातल्या या पोरांपेक्षा वेगळी नव्हती, हे कसं कळत नसतं आम्हाला, कोण जाणे!

अशा वेळी अनेकदा कार्ल युंग (उं१’ ख४ल्लॠ) या मानसशास्त्रज्ञाचं एक वाक्य आठवत राहतं. त्यानं म्हटलंय की, ‘एव्हरी सिव्हिलाइज्ड ुमन बीइंग, व्हॉटेव्हर हिज कॉन्शियस डेव्हलपमेंट मे बी, इज स्टील आर्काइक इन द डीपर लेव्हल ऑफ हिज सायकी.’ थोडक्यात- युंगचं असं म्हणणं होतं की, माणूस कितीही सभ्य आणि सुंसस्कृत झाला, त्याचा भावनिक वगैरे विकास कितीही झाला, तरी त्याच्या नेणिवेच्या तळघरात एक आदिम प्रेरणांचं जनावर धुमसत असतं. संधी मिळाली की ते अचानक बाहेर येतं नि आपलं हिंस्र रूप दाखवतं. हे तसं पटण्यासारखंच आहे. या विधानाची प्रचीती यावी असं खूप काही आजूबाजूला घडत असतं. आजूबाजूलाच कशाला, थोडय़ाशा त्रयस्थपणे पाहिलं तर जाणवेल की, आपल्या व्यक्तिगत जगण्यातही आपल्याला तसा अनुभव येत असतो. एरव्ही अत्यंत सभ्य, सुसंस्कृतपणे व्यवहार करणारे आपण एका सकाळी इतकं काहीतरी विचित्र वागतो, अचानक आपल्या आत दडवून ठेवलेल्या धारदार नख्या नि सुळे बाहेर काढून समोरच्याला घायाळ करतो, की सगळ्यांनाच आश्चर्य वाटत राहतं. मागाहून आपणही अचंबा करत राहतो.. अरेच्चा! हे असं कसं मूर्खासारखं काहीतरी आपण करून बसलो! इतका कसा सगळा संयम, सगळे संस्कार गुंडाळून बसलो! समोरच्या आपल्याच जीवाभावाच्या माणसाला असं कसं दुखावलं आपण? का असं फटक्यात तोडून टाकलं? मग वाटतं, म्हटलंच तर- या आपल्या चमत्कारिक वागण्याची मुळं आपल्याच त्या आदिम पशूच्या लहरी प्रेरणांमध्ये रुतलेली आहेत. शोधली तर सापडतीलही ती. पण या शोधात हाती येणारं किळसवाणं वास्तव स्वीकारायची आपल्या मनाची तयारी आहे का? त्यापेक्षा त्या फंदातच पडू नये, हेच बरं!

कधी जाणवतं की, या आदिम जनावराला सुखावणारंही काही असू शकतं ना? उदाहरणार्थ, भाकरी भाजल्यासारखे काही विशिष्ट वास, भाकरी थापल्यासारखे विशिष्ट लयबद्ध आवाज, किंवा काही विशिष्ट चवी आपल्याला विलक्षण भारून टाकतात.. अस्वस्थ करतात. तेव्हा याच्याही पाठीमागे या जनावराचीच करणी नसेल कशावरून? कदाचित माझ्या बालपणातील निरनिराळ्या खेडय़ापाडय़ांतील जगण्याशी कुठेतरी जोडलेल्या या गंध नि ध्वनीच्या संवेदना असू शकतात. त्या मला माझ्या त्या भूतकाळाशी जोडून घेत असाव्यात. त्यामुळे आता कधीही कुठूनही अचानक जरी भाकरी भाजल्याचा वास आला किंवा भाकरी थापल्याचा आवाज आला, तरी माझ्या आतलं जनावर मला मनोमन सुखावणाऱ्या त्या भूतकाळात ओढून नेत असावं. जगण्याचं दिवसेंदिवस अधिकाधिक शहरीकरण होत जाताना हे वास आणि आवाज हळूहळू दुर्मीळ होऊ लागलेत, तसतशी आपल्या आतल्या अंधारातल्या त्या जनावराची बेचैनी वाढू लागली आहे, हेही लक्षात येतंच आहे.

रात्री-अपरात्री पडणाऱ्या स्वप्नांमधील त्या गंध आणि आवाजांमागे खरं तर हेच कारण नसेल ना?