28 February 2021

News Flash

रफ स्केचेस् – मोंमार्त् आणि मिसळ क्लब

१९८४ साली मी पॅरिसमध्ये होतो. पॅरिस थंडीने आणि धुक्यानं गारठलेलं. मी सकाळीच माझं स्केचिंग पॅड घेऊन बाहेर पडलो. सारं शांत होतं.

कॉबल स्टोनचा रफ, खडबडीत पृष्ठभाग ल्यायलेले देखणे, निमुळते होत गेलेले रस्ते.  नक्षीदार खांबांवरचे मिणमिणणारे  दिवे. संगमरवरी देखण्या इमारती. ओल्या थंडीत गुंडाळलेलं देखणं  शहर.

सुभाष अवचट – Subhash.awchat@gmail.com

१९८४ साली मी पॅरिसमध्ये होतो. पॅरिस थंडीने आणि धुक्यानं गारठलेलं. मी सकाळीच माझं स्केचिंग पॅड घेऊन बाहेर पडलो. सारं शांत होतं. कॉबल स्टोनचा रफ, खडबडीत पृष्ठभाग ल्यायलेले देखणे, निमुळते होत गेलेले रस्ते.  नक्षीदार खांबांवरचे मिणमिणणारे  दिवे. संगमरवरी देखण्या इमारती. ओल्या थंडीत गुंडाळलेलं देखणं  शहर.

मी एक कोपरा गाठून बसलो आणि स्केचिंग सुरू केलं. थोडय़ा वेळाने दुरून कुठूनतरी टकटक आवाज यायला लागला. सहज त्या दिशेने नजर वळली. निमुळत्या, टोकदार टाचांचे स्टिलेटो ल्यायलेली एक ललना गरम ओव्हरकोट घालून येताना दिसली. कॉबल स्ट्रीटवर तिचे ते स्टिलेटो टकटक वाजत होते. काहीशी नजरानजर झाली- न झाली, तिने पटकन खाली वाकून पायातले सँडल्स काढून हातात घेतलेले मी नजरेच्या कोपऱ्यातून निसटते पाहिले. माझ्या जवळून जाताना तिनं हलकेच ‘मॉर्निग’ म्हटलं असावं. खूप दूर गेल्यावर तिनं आपले सँडल्स  परत पायात घातले असावेत, कारण नंतर कान  देऊनही मला तिच्या त्या स्टिलेटोज्ची ती टकटक ऐकू आली नाही.. माझ्या घशात आवंढाच आला! आपल्या शहरातल्या एका आडबाजूच्या रस्त्यावर भल्या सकाळी एक चित्रकार काम करत बसला आहे, तर त्याला त्रास होऊ नये म्हणून त्या तरुण मुलीने किती सहज काळजी घेतली होती. साध्या, सामान्य माणसांच्या मनात कलेबद्दल एवढी आस्था मुरवणाऱ्या त्या सुंदर, देखण्या शहराचा मी जन्मभराचा ऋणी होऊन बसलो आहे.. याचं कारण छत्तीस वर्षांपूर्वी त्या सकाळी मला भेटलेली ती फ्रेंच तरुणी!

मी जीव काढत पॅरिसला जायचं पहिलं कारण म्हणजे मोंमार्त् हे होय. पॅरिसमधली ही सर्वात उंच टेकडी. तिचा इतिहास काही शतकांचा आहे. त्या  टेकडीवरून सारं पॅरिस दिसतं. एकेकाळी हा भाग गरीब वस्तीचा होता. त्यामुळे तिथे नाइट क्लब्ज सुरू झाले. आजही इथलं नाइट लाइफ प्रसिद्ध आहे. प्रचंड गरिबी आणि कडाक्याच्या हिवाळ्याने गारठलेल्या या शहरात अनेक चित्रकार आश्रयाला आले. मोडी, पिकासो, दाली अशा अनेक चित्रकारांनी तिथे छोटे-मोठे स्वस्तातले स्टुडिओ उघडले. ते सारे तरुण होते. त्यांच्या डोळ्यात स्वप्नं होती. आणि डोक्यात..? आजूबाजूला जे चाललं आहे त्याच्या मोडतोडीचे क्रान्तिकारी विचार! भूक, गरिबी, थंडीतही त्यांनी तेथे अलौकिक चित्रं काढली; जी जगप्रसिद्ध आहेत. हा इतिहास वाचत वाचत, त्यांची चित्रं पाहत पाहत मी लहानाचा मोठा झालो होतो. मला त्या टेकडीचं दर्शन घ्यायचं होतं. त्या वातावरणातल्या संवेदना जाणून घ्यायच्या होत्या.

मी भराभरा त्या टेकडीच्या पायऱ्या चढून वर गेलो. आणि पाहतच बसलो. एक अद्भुत नजारा होता. तिथं अनेक चित्रकार होते. बायका होत्या. पुरुष होते. तरुण होते. म्हातारे होते. काखोटीला एक छोटासा ईझल, मागे ठेवलेली रंगांची पेटी, गुंडाळलेला कॅनव्हास असं सारं घेऊन एकत्र  जमलेले. तिथं झाडं होती. त्या झाडांना टेकून या चित्रकारांनी आपली कामं ठेवलेली दिसली. मी पाहतच राहिलो. नंतर कळलं, की हे असं रोजच चालतं इथे! सकाळ झाली की शहरातले चित्रकार मोंमात्र्च्या या टेकडीवर येतात, थोडय़ा वेळाने टुरिस्ट्स आले की त्यांना आपली चित्रं विकतात, कधी त्यांची पोट्र्रेट्स काढून देतात.. असा सारा मामला. गंमत अशी की हे सगळे चित्रकार गरीब होते, पण आनंदी होते. चित्रकलेच्या धुंदीत होते. पॅरिसने मला दिलेला हा दुसरा सुंदर धक्का होता. वाटलं, काय भारी आहे ही व्यवस्था! या शहरात चित्रकारांसाठी एक जागा आहे. अख्खी टेकडी आहे. रोज सकाळी माणसं उठतात. आपापलं आवरून चित्रकलेचं सामान काखोटीला मारतात आणि या टेकडीवर येऊन झाडाखाली बसतात. चित्रं काढतात. गप्पा मारतात. जेवतात. चित्र विकलं गेलं, गेलं. नाही गेलं, तर नाही गेलं! सगळा आनंद नुसता!! किती अलौकिक हे सगळं!

 

तर मी तिथं गेलो. प्रवासी होतो. अमेरिकेतून तिथं गेलेलो. चित्रकार होतो. पण त्या टेकडीवर जमलेल्या बाकीच्यांना ते सारं माहिती असायचं काही कारण नव्हतं. मी त्या टेकडीवर मुक्तपणे फिरत होतो. व्हॅन गॉग-पिकासोला फील करत होतो. मनात म्हटलं, च्यायला, काय जागा आहे ही! असं काही मी कधी पाहिलंच नव्हतं.  टेकडीवर अनेकांना वाटलं, हा आला आणखी एक टुरिस्ट! ते होतकरू चित्रकार माझ्या मागे लागले- ‘पोत्र्रे टू डॉलर्स, पोत्र्रे टू डॉलर्स’ असं चाललं होतं. मला त्यांचं फ्रेंच कळत नव्हतं आणि त्यांना इंग्रजी धड येत नव्हतं. ‘हँडसम, हँडसम’ म्हणत माझ्यामागे एक घोळका आला. ‘पोत्र्रे टू डॉलर्स..’ हे चालूच! ते तुम्हाला समोर बसवून तुमचं चित्र काढतात. चारकोल, ऑइल पेंट, वॉटर कलर असं त्यांच्याकडे जे मीडियम असेल त्यात केलेलं पोट्र्रेट! कोणी लँडस्केप काढतात, कोणी स्टील लाइफ करतात.. असं सगळं सुंदर वातावरण होतं.

मी हातवारे करून विचारलं, ‘ओन्ली टू डॉलर्स?’ सगळे माझ्याकडे  बघायलाच लागले. कसलीही घासाघीस न करणारा हा कुठला टूरिस्ट? त्यांना वाटलं असावं, हा कोणीतरी वेडा आलाय. त्यांच्यात कुजबुज सुरू झाली. मी ‘पोत्र्रे थ्री डॉलर्स, थ्री अँड हाफ डॉलर्स..’ असं करत भाव वाढवत दहा डॉलर्सपर्यंत नेला. त्या काळात ही फार मोठी रक्कम होती.

त्या चित्रकारांत एक गरोदर स्त्री दिसली. मी तिला विचारलं, ‘मी तुला दहा डॉलर्स देतो, तू माझं पोत्र्रे करशील का?’ तिच्याबरोबर तिचा जोडीदारही होता. ती थक्क झाली. म्हणाली, ‘हो, करीन की!’

मग मी तिला म्हणालो, ‘आय अँम गोइंग टू पेंट युअर पोत्र्रे. यू गिव्ह मी टेन डॉलर्स.’

ते ऐकून सगळे मोठमोठय़ानं बडबडायला लागले. फ्रेंच माणसं हातवारे खूप करतात आणि चेहरे वेडेवाकडे करून बोलतात. ती मात्र मनापासून हसली. म्हणाली, ‘चालेल. तू माझं चित्र काढ.’

मी तिचाच कॅनव्हास घेतला, तिचाच चारकोल घेतला आणि झटकन् तिचं एक पोट्र्रेट तयार केलं. ते तिला भेट दिलं आणि त्याखाली लिहिलं, ‘नॉट फॉर सेल. वुईथ लव्ह- फ्रॉम सुभाष.’

– मग मोठा जल्लोष! एका क्षणात मी त्यांचा दोस्त होऊन गेलो होतो! ते सारे खूश झाले. मग आम्ही चर्चच्या पायऱ्यांवर एकत्र बसलो. कोणीतरी कॉफी आणून दिली. फोटो काढले. मला प्रचंड आनंद झाला. इतक्या मोठय़ा चित्रकारांनी ज्या जागेत बसून चित्रं काढली, त्या जागेत बसून चित्र काढायचं माझं स्वप्न होतं. ते  पूर्ण झालं.

मी त्या टेकडीच्या पायऱ्या उतरू लागलो. मन समाधानानं भरून आलं होतं. मनात विचार आला, आपल्या भारतात असं कुठलं ठिकाण असेल? असेल का? इतकी सारी शहरं आहेत. सकाळी उठावं. मनमोकळं हिंडावं. चित्रं काढावीत. समान आवडीच्या मित्रांबरोबर गप्पा माराव्यात. घरी परत यावं. चित्रांची खरेदी-विक्री असं काही नाही. स्टुडिओ नाही. स्टुडिओची बिलं नाहीत. मोकळ्या आकाशाखाली बसावं. चित्रं काढावीत.. बास, एवढंच!

काही महिन्यांपूर्वी मोंमात्र्चा विचात मनात घोळत असतानाच नाशिक आठवलं.

नाशिक हे माझं फार आवडतं गाव आहे. अनेक वर्षांपूर्वी मी प्रथम नाशकात शिरत होतो त्यावेळी दूरच्या दैवी आकाराच्या डोंगरांच्या रांगांतून मंद हाका ऐकू आल्याचा भास मला झाला. जो अजूनही होत असतो. मोकळा श्वास घेणारं हे शहर आहे. त्र्यंबक रस्ता, गंगापूर रस्ता, अंजनेरी, अथांग पाण्याची जलाशयं, घनदाट भरलेली झाडी हे सारं तर आहेच; पण माझा प्रेमळ मित्रपरिवार तिथं आहे. कवी, चित्रकार, शिल्पकार तर आहेतच; पण कुसुमाग्रज प्रतिष्ठान आहे. गोदावरीच्या, कुसुमाग्रज, वसंत कानेटकरांच्या प्रेमळ भेटींच्या अखंड आठवणी मनात आहेत. या शहरातल्या विनायकदादांच्या अंगणात उन्हात बसून अंगाभोवती लपेटून घ्यावी अशी थंडी आहे. अनेक सुंदर नर्सरीज्, उत्तम  आर्किटेक्चर असलेली घरं आहेत. आजही मी नाशिक सोडतो तेव्हा लहानपणी आजोबांच्या वाडय़ावरून निघताना जसा ऊर भरून यायचा तशीच हुरहुर परतीच्या प्रवासात माझ्या मनात रेंगाळत आली आहे.

एकदा असाच मी नाशिकला गेलो होतो. माझा मित्र धनंजय गोवर्धने अचानक मला हॉटेलात भेटायला आला. त्याच्याजवळच्या थैलीत पॅड, रंगांच्या पेटय़ा असं सारं होतं. मी त्याला विचारलं, ‘हे काय? कुठं चाललास?’ तो म्हणाला, ‘आम्ही लँडस्केपिंगला चाललोय.’

मी किंचाळलोच- ‘अरे, कमाल आहे.’

– मला मोंमात्र्चीच आठवण झाली.

धनंजयला विचारलं, ‘ही काय भानगड आहे?’

तो म्हणाला, ‘अरे, आमचा मिसळ क्लब नावाचा क्लब आहे.’

त्यानं मला जे काही सांगितलं ते ऐकून मला इतका आनंद झाला, की ज्याचं नाव ते! म्हटलं- वा! इथं नाशकात काहीतरी भन्नाट घडतंय!

– तर विषय असा की, गेली दहा र्वष ही नाशकातली सगळी मंडळी लँडस्केपिंगला जातात. त्यांचा आता एक मोठा ग्रुप झालाय. त्यात कोण कोण आहेत? चित्रकार आहेत, फोटोग्राफर आहेत, विद्यार्थी आहेत, व्यावसायिक आहेत. त्याची सुरुवात अगदी अचानक झाली. कुठल्यातरी एका कार्यक्रमात काही मंडळी एकत्र भेटली. गप्पा मारता मारता त्यांचं ठरलं, आपण लँडस्केपिंग करू या. चला. म्हणून मग ते गेले.

मग काय? सुरूच झालं. आता तिथं आर्टिस्ट येतात. कमर्शिअल आर्टिस्ट येतात. हौशी मंडळी येतात. सगळे एकत्र आले तेव्हा त्यांच्यातील काहींच्या लक्षात आलं की अनेकांचे हात कॉम्प्युटरच्या अतिरेकी वापरामुळे चालेनासे झालेत. कॉम्प्युटर वापरल्यामुळे आर्टिस्ट असूनही कागदावर रेष उमटताना, रंग वापरताना हात साथ देत नाहीत. मग आपली लाज जाऊ नये म्हणून काही जण त्या दिवशी मधूनच उठून निघून गेले.. तरी हा उपक्रम सुरूच राहिला. मध्येच निघून गेलेले परत तिथं गेले. मग या सर्वाचा एक ग्रुप जमला. आता तो सेट्ल झाला आहे. ही मंडळी दर रविवारी प्रत्येकी १०० रुपयांची काँट्रिब्युशन काढतात. त्यांच्यातल्याच एकाकडे देतात. तोच आजही हिशेबठिशेब ठेवतो. ते सारे एकत्र आले की एखाद्या हॉटेलात जातात आणि  मिसळ खातात. म्हणून हा त्यांचा मिसळ क्लब! मिसळ खाऊन झाली की काँट्रिब्युशन गोळा करणाराच एखादं ठिकाण ठरवतो. मग त्या ठरवलेल्या ठिकाणी सारे जातात आणि चित्रं काढत बसतात. कधी अलिबागला जातात, कधी इकडे जातात, कधी तिकडे जातात. त्यांच्याकडे गाडय़ा आहेत. त्यांतून हा प्रवास चालतो. जेवणाखाण्याचा खर्च वर्गणीतून चालतो. पण प्रत्येक वेळी प्रत्येकाने १०० रुपये हे द्यायचेच. सारे जण आपापल्या स्टाईलने चित्र काढतात. त्यांची तीन-चार प्रदर्शनं भरली आहेत. त्यांचा यू-टय़ूबवर झकास व्हिडीओ आहे, त्यावर त्यांचे विलक्षण अनुभव आलेले आहेत. हे असं गेली दहा र्वष चाललं आहे. पावसाळ्यात ही मंडळी रेनकोट घालून जातात. मोठय़ा छत्र्या उघडून चित्रं काढतात. त्यांच्या आयुष्यातले हे दोन-तीन तास मोलाचे आहेत. आनंददायी आहेत. सगळ्या जगापासून दूर जाऊन हा वेळ ते भोगतात.

मला या क्लबचा हेवा वाटायला लागला आहे. आता मी तिथं जाऊन, त्यांच्यात बसून मिसळ खाणार आहे, चित्रं काढणार आहे आणि त्यांना माझी शंभर रुपये काँट्रिब्युशनही देणार आहे. कुठल्याही मठात जाण्यापेक्षा या आनंद सोहळ्यात सामील होणं मला जास्त आवडेल. हेच खरं भावातीत ध्यान म्हणायचं. त्यासाठी मला आता पॅरिसला जायची गरज नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 1:11 am

Web Title: montmartre and missal club rough sketches dd70
Next Stories
1 मोकळे आकाश.. : पोचपावती
2 थांग वर्तनाचा! : आक्रमकता आणि वर्तनीय सूज
3 लालित्यपूर्ण कादंबरी
Just Now!
X