नुकताच दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे ‘साहसी खेळ’ हा शब्द अचानक प्रकाशझोतात आला आहे. आजवर दुर्लक्षित साहसी खेळांना पर्यटनाचे वलय लाभल्याने ते हळूहळू लोकप्रिय होत असले तरी साहसी खेळ म्हणजे नेमके काय, ते आहेत तरी कोणते, आपल्याकडे ते कितपत रुजलेत, आदींचा ऊहापोह करणारा लेख..
१९९८ च्या मे महिन्यात महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट शिखरावर यशस्वी आरोहण केले. भारताची ती पहिली यशस्वी नागरी एव्हरेस्ट मोहीम ठरली. शासकीय सत्कार समारंभात तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सुरेंद्र चव्हाण यांना एव्हरेस्ट सर केल्याबद्दल आणि मला या मोहिमेच्या नेतृत्वासाठी शासनाचा मानाचा शिवछत्रपती पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार आम्हाला विशेष पुरस्कार गटात देण्यात आला होता. गिर्यारोहण हा स्पर्धात्मक खेळ नसल्याने त्याकरता हा पुरस्कार देणे योग्य नाही, तसेच गिर्यारोहण खेळ नसून छंद असल्याची मत-मतांतरे तेव्हा व्यक्त झाली होती. तर काही जाणकारांनी मराठी विश्वकोश, शब्दकोश, जुने संदर्भ देऊन हा साहसी खेळच असल्याचे नमूद केले होते.
हे आता सांगण्याचं कारण इतकंच, की देशात आणि राज्यात १९५५ पासून गिर्यारोहणात शेकडो गिर्यारोहक सक्रीय असूनही शासनाच्या लेखी या खेळाची नोंद ‘साहसी खेळ’ म्हणून तोपर्यंत झाली नव्हती. आणि पुढेही ती होण्यास आणखी एक तप जावे लागले. २०११ ते २०२० या दशकासाठीचे राज्याचे क्रीडा धोरण आखण्याकरिता भीष्मराज बाम यांच्या अध्यक्षतेखाली २०१० मध्ये एक समिती नेमण्यात आली होती. त्यात अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने साहसी खेळ व गिर्यारोहणाबाबतची माहिती सादर केली. त्यानुसार २०११ मध्ये प्रथमच साहसी खेळांची अधिकृत नोंद करत क्रीडा धोरण जाहीर केले गेले. जमीन, आकाश आणि पाण्यातील विविध साहसी खेळांचा त्यात समावेश करण्यात आला.
जगात या साहसी खेळाची सुरुवात १९ व्या शतकाच्या मध्यापासून झाली. गिर्यारोहण या साहसी खेळाच्या जन्मापासूनच- म्हणजेच १८५४ पासून या खेळाची काही मूलभूत तत्त्वेही निश्चित होत गेली. हा खेळ खेळताना आपला प्रतिस्पर्धी हा निसर्ग असतो; पण त्याच्याशी आपली स्पर्धा नसते. खुल्या निसर्गात धोके असतात. त्यामुळे या खेळात साहस आहे. पण ते वेडे साहस नाही; तर हे धोके ओळखून त्यानुसार मोजूनमापून घेतलेल्या जोखमीचा (calculated risk) त्यात अंतर्भाव असतो. साहसी खेळांचे हे व्यवच्छेदक लक्षण आहे. धोका व साहस एकमेकांच्या हातात हात घालूनच तेथे नांदत असतात.
साहसी खेळांत शारीरिक व मानसिक क्षमतेची अत्युच्च पातळी गाठली जाते. खेळ व साहसी खेळ या दोन्हींत तत्त्व सारखेच असते. खेळात मानवाची मानवाशी स्पर्धा होऊन त्यात हार-जीत हे साध्य असते. तर साहसी खेळांत मानवाचा प्रतिस्पर्धी निसर्ग असतो. आणि साध्य असते- निसर्गनिर्मित आव्हानांचा सामना करत ध्येय गाठणे! दोन्हींत मानवी क्षमतेचा कस लागतो. पहिल्यात फक्त खेळ असतो, तर दुसऱ्यात साहस असते म्हणून ते साहसी खेळ. निसर्गनिर्मित ध्येय गाठताना त्यावर विजय मिळवण्याची वृत्ती येथे नसते. उलट, गरज पडलीच तर निसर्गाचा मान राखत माघार घेण्याची खिलाडू वृत्ती त्यात असते. परंतु पुन्हा ते ध्येय आपण साध्य करूच, ही विजिगीषु वृत्तीदेखील असते.
निसर्गाच्या आव्हानांना कौशल्य व तांत्रिक साधनांच्या आधारे सामोरे जात या क्रीडाप्रकाराचा आनंद घेता येतो. इतर क्रीडाप्रकारांप्रमाणे व्याख्येची शाब्दिक फूटपट्टी त्याला लावता येत नाही. साहसी खेळ केवळ प्रशिक्षणातून शिकवता येत नाहीत. प्रशिक्षणातून त्यांचे तंत्र व तांत्रिक बाबींचे ज्ञान मिळते. त्यांचे सर्वागीण ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातूनच मिळते. साहसी खेळांचा प्रसार होऊ  लागला तसे त्याचे तंत्रज्ञानही विकसित होत गेले. खेळाची मार्गदर्शक तत्त्वेही तयार झाली. प्रशिक्षण, अनुभव व तांत्रिक साधनांवर आधारित या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कालानुरूप बदलदेखील केले गेले.
साहसी खेळांची जमिनीवरील, हवाई आणि जल साहसी खेळ अशी ढोबळ विभागणी केली जाते. डोंगरावर चढाई, पर्वतारोहण, कडेकपाऱ्यांतून भटकंती ही डोंगराळ प्रदेशांत राहणाऱ्या मानवासाठी अनादिकाळापासून त्याच्या जीवनचर्येचा भाग झाली होती. परंतु हीच डोंगरचढाई नियोजनबद्ध, तांत्रिक बाबींचा वापर करून केली की त्याचे गिर्यारोहण होते. गिरीभ्रमण, प्रस्तरारोहण आणि गिर्यारोहण अशी या खेळाची चढती श्रेणी मानली जाते. गिर्यारोहणाची सुरुवात आल्प्स पर्वतराजीमध्ये १८५४ साली वेट्टरहॉर्न हे शिखर चढून आल्फ्रेड विल्स याने केली. १८५७ मध्ये इंग्लंडमध्ये अल्पाईन क्लबची स्थापना झाली. त्यानंतर या खेळाचा प्रसार जगभर होऊ  लागला. १९३२ साली ‘इंटरनेशनल माऊंटेनियरिंग अँड क्लाइंबिंग फेडरेशन’ या गिर्यारोहणातील शिखर संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली. भारतात गिर्यारोहणाची सुरुवात इंग्रजांमुळे झाली. भारतात गिर्यारोहण क्षेत्राची शिखर संघटना असलेल्या इंडियन माऊंटेनियरिंग फाऊंडेशनची स्थापना १९५७ मध्ये झाली. महाराष्ट्रात गिर्यारोहण सुरू झाले ते १९५६ मध्ये- युनिव्हर्सिटी हायकर्स क्लबच्या माध्यमातून!
गिर्यारोहणातीलच तंत्र वापरून भुयार संशोधन (केव्हिंग) हा दुसरा साहसी खेळ ८० च्या दशकात महाराष्ट्रात विकसित झाला. ‘केव्ह एक्सप्लोरर’ या संस्थेने सह्याद्रीतील गुहा व किल्ल्यांवरील भुयारांचा शोध घेऊन हा खेळ पुढे नेण्याचा चांगला प्रयत्न केला; पण हा खेळ फारसा वृद्धिंगत होऊ  शकला नाही. त्याचं कारण महाराष्ट्राच्या भौगोलिकतेत दडले आहे. भुयारांचे माहेरघर आहे- मेघालय. मेघालयात शेकडो नैसर्गिक भुयारे आहेत. आजपावेतो तेथील सुमारे १२०० भुयारांचा शोध लागलेला आहे.
आकाशात विहार करण्याचे तंत्र मानवास विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ज्ञात झाले. त्यानंतर हवाई तंत्राचा वापर करता करता त्यातूनच हवाई साहसी खेळांचा जन्म झाला. महाराष्ट्रात हवाई साहसी खेळाची सुरुवात दीपक महाजन यांनी १९८० च्या दशकात हँगग्लायडिंगच्या माध्यमातून केली. हँगग्लायडर क्लबतर्फे ते कामशेत परिसरात हँगग्लायडिंगच्या मोहिमा करत असत. त्यानंतर संजय पेंडुरकर, विजय साळवी, मेहबूब यांनी पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून हवाई साहसी खेळाला चालना दिली. जलसाहसी क्रीडाप्रकारांत रिव्हर राफ्टिंग, कयाकिंग, स्कूबा डायव्हिंग, वॉटर सर्फिग असे वेगवेगळे  खेळ येतात. राज्यात मुख्यत: कोलाड, सिंधुदुर्ग किनारी हे खेळ खेळले जातात.
गेल्या काही वर्षांत डोंगरात आणखी एक साहसी खेळ रुजत आहे, तो म्हणजे माऊंटन बायकिंग! प्रामुख्याने डोंगरातील पायवाटांवरून विशिष्ट प्रकारच्या सायकली चालवणे हे यात अंतर्भूत असते. परंतु हा खेळ अजून तरी बाल्यावस्थेतच आहे.
आपल्या देशात सर्व प्रकारच्या साहसी खेळांसाठी आवश्यक ती भौगोलिक रचना उपलब्ध आहे. निसर्गाने आपल्या देशाला भरभरून दान दिले आहे. आपल्याकडे जगातील सर्वोच्च शिखरे असलेली हिमालयाची डोंगररांग आहे. थर वाळवंट आहे. पूर्व व पश्चिमेला प्रदीर्घ सागरकिनारा आहे. मेघालयात अगणित नैसर्गिक भुयारे आहेत. हिमालयातून व इतर डोंगररांगांतून वाहणाऱ्या अनेक रौद्र नद्या आहेत. विविध प्रकारची जंगले आहेत. आणि आपल्या देशात ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त युवकही आहेत. या सर्व अनुकूलतांचा विचार करता आपला देश जगातील साहसी खेळांचे माहेरघर व्हायला हवा होता. परंतु तसे झाले नाही. याचे कारण सामाजिक व शासकीय स्तरावर साहसी खेळांबाबत असलेली अनास्था!

या अनास्थेचे पहिले कारण- प्रशिक्षण संस्था. गिर्यारोहणाच्या प्रशिक्षण संस्था आहेत. परंतु त्यांची निर्मिती ही खेळापेक्षा हिमालयातील सीमेच्या संरक्षणाची गरज म्हणून झाली. त्यामुळे या संस्थेत फक्त हिमालयातील शिखर चढाईच्या अनुषंगाने गिर्यारोहणाचे प्रशिक्षण दिले जाते. देशातील इतर डोंगररांगांतील भटकंती, सुळके-प्रस्तर भिंती आरोहणासाठीचे प्रशिक्षण केंद्र सध्या तरी उपलब्ध नाही. तीच स्थिती हवाई व जल साहसी क्रीडाप्रकारांबाबतीतही आहे. मनाली व गुलमर्ग येथील प्रशिक्षण संस्थेत राफ्टिंग, कयाकिंग या जलसाहसी क्रीडाप्रकारांचे प्राथमिक शिक्षण दिले जाते, तर पॅराग्लायडिंग या हवाई साहसी क्रीडाप्रकाराचे प्राथमिक प्रशिक्षण दिले जाते. याव्यतिरिक्त देशात शासकीय प्रशिक्षण संस्था नाही. इतरत्र जे काही प्रशिक्षण उपक्रम राबविले जातात, ते त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांनी आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे बेतलेले असतात. जलसाहसी क्रीडाप्रकारांतील स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण थायलंड, सिंगापूर अशा इतर देशांतील संस्थेत घ्यावे लागते. किंवा मग अशा संस्थांनी मान्यता दिलेले प्रशिक्षण घ्यावे लागते.
देशातील ट्रेकर्सच्या संख्येचा विचार केला तर गुजरातच्या खालोखाल महाराष्ट्राचा व त्यानंतर कर्नाटकचा क्रमांक लागतो. तसेच हिमालयातील गिर्यारोहण मोहिमांचा विचार करता पश्चिम बंगालखालोखाल महाराष्ट्र आहे. परंतु या मोहिमांच्या गुणवत्तेत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी गेल्या ६० वर्षांत अनेक हिमशिखरं सर केली आहेत, तर सह्य़ाद्रीतील बहुतेक सर्व सुळक्यांवर आरोहण केलं आहे.
आणि हे सर्व क्रीडासंस्थांच्या माध्यमातून झालेलं आहे. महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्थांची राज्य शिखर संघटना म्हणून कार्यरत असलेली अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ ही १९९२ पासून हे खेळ व त्यांच्या संस्थांच्या प्रगतीसाठी झटते आहे.
भुयार संशोधनाच्या क्षेत्रात मात्र आपण अगदीच नगण्य आहोत. आज या क्षेत्रात भारतीय कमी आणि परदेशी संशोधक तसेच मेघालयातील मोजके साहसी वीर सक्रीय आहेत. हवाई साहसी खेळांच्या संघटना वेगवेगळ्या देशांत गरजेनुसार निर्माण झाल्या. त्यांची जागतिक संघटना १९०५ मध्ये ‘फेडरेशन एरोनॉटिक इंटरनॅशनल’ (ाअक) या नावाने स्थापन झाली. भारतात ‘एरो क्लब ऑफ इंडिया’ ही देशातील हवाई साहसी खेळांची शिखर संघटना आहे. जलसाहसी क्रीडाप्रकारांपैकी रिव्हर राफ्टिंगचे नियमन ‘इंटरनॅशनल राफ्टिंग फेडरेशन’ (कफा) या १९९७ मध्ये स्थापन झालेल्या संघटनेतर्फे केले जाते, तर देशात राफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे केले जाते. बहुतांशी जलसाहसी क्रीडाप्रकारांचे नियमन मेरीटाईम बोर्ड करते. हवाई व जल या दोन्ही साहसी खेळांत सध्या तरी साहसी पर्यटनासाठी गरजेचे असणारे प्रशिक्षक हेच या क्रीडाप्रकाराला न्याय देत आहेत. केवळ हौस म्हणून या खेळांकडे वळणाऱ्यांची संख्या नगण्य आहे.
माऊंटन बायकिंगमध्ये आपण अगदीच बाल्यावस्थेत आहोत. २००६ मध्ये युथ हॉस्टेलने हा खेळ देशात रुजवला. सध्या बहुतेक मोहिमा डांबरी सडकेवरून होतात. खऱ्या माऊंटन बायकिंगच्या- म्हणजे डोंगररांगांतील कच्च्या रस्त्यांवरून, पायवाटेवरून सायकल चालविण्याच्या मोहिमा क्वचितच होताना दिसतात.
गिर्यारोहण वगळता इतर सर्व साहसी खेळ हे महाराष्ट्रात गेल्या १५-२० वर्षांतच विकसित झाले आहेत. साहसी खेळांच्या विकासात आपण आजही खूप मागे का आहोत? त्याची प्रमुख कारणे- त्यासाठी लागणारी खर्चीक साधनसामग्री, वेळ, योग्य प्रशिक्षणाचा अभाव ही आहेत. सर्व साहसी खेळांची जागतिक स्तरावर प्रमाणित केलेली साधने ही परदेशातून आयात करावी लागतात. भारतात त्यांचे उत्पादन होत नाही. परकीय चलन, आयात कर यामुळे त्यांची किंमत खूप असते. त्यामुळे ही साधनसामग्री घेणे सामान्यांना परवडत नाही. ही साधने वैयक्तिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने त्यांच्याऐवजी स्थानिक बनावटीची साधने वापरता येत नाहीत. परिणामी सामान्य लोक या साहसी खेळांकडे फारसे ओढले जात नाहीत. सैन्यदलांसाठी मोठय़ा प्रमाणावर गिर्यारोहण व इतर साहसी खेळांची साधने लागतात. त्यासाठी जर आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार डीआरडीओच्या माध्यमातून ही साधने उत्पादित करण्यात आली तर देशात ती स्वस्तात उपलब्ध होऊ शकतील व सामान्यांच्या आवाक्यात येतील. आपल्याकडे जल व हवाई साहसी क्रीडाप्रकारांच्या आयोजनासाठी अनेक प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागतात. सुरक्षेच्या दृष्टीने ते योग्यच आहे. परंतु हे क्रीडाप्रकार वाढीस लागण्यासाठी याबाबतीत उचित मार्ग काढणे आवश्यक आहे.
साहसी खेळांना अनुकूल भौगोलिक परिस्थिती आपल्याकडे आहे; परंतु त्यांना पूरक आर्थिक रसद, शासकीय पाठबळ आणि व्यवस्था मात्र उपलब्ध नाही. गेल्या दोन वर्षांपासून साहसी खेळांबाबत नियमन असावे म्हणून न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे का होईना, शासनाने काही सकारात्मक पावले उचलली आहेत, ही दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल.
या पाश्र्वभूमीवर आज साहसी खेळांत आपण नेमके कोठे आहोत, हे पाहावं लागेल. साहसी खेळ चार भिंतींच्या प्रशिक्षण शाळेत शिकवता येत नाहीत. प्रशिक्षण शाळेत त्याचे तंत्र व तांत्रिक साधनांचे ज्ञान फक्त देता येते. साहसी खेळांचे खरे प्रशिक्षण प्रत्यक्ष निसर्गाकडूनच मिळते. कारण निसर्गाची आव्हाने, त्यातली जोखीम आणि ती तोलूनमापून स्वीकारत या आव्हानांना सामोरे जाणे, हेच साहसी खेळांचे मर्म आहे. त्यामुळे साहसी खेळांत प्रत्यक्ष अनुभव अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जितका अनुभव जास्त, तितके आव्हानांचे अधिक ज्ञान मिळते. या अनुभवांतूनच आव्हाने स्वीकारण्यातल्या जोखमीचे योग्य ते पूर्वानुमान बांधण्याचे कौशल्य प्राप्त होते. त्याद्वारे स्वत:ला व इतरांनाही त्या आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जाण्याचा मार्ग दाखवता येतो. काही प्रसंगी पूर्वानुमान चुकतात. निसर्गाचे रूप अनपेक्षितपणे बदलते. धोका वाढतो. अशावेळी केवळ अनुभवी व्यक्तीच इतरांसह त्या कठीण आव्हानाला सुखरूपपणे सामोरे जाऊ  शकते.
त्यामुळे साहसी खेळांत जास्तीत जास्त लोक सहभागी व्हायला हवे असतील आणि त्यातून साहसी पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत करावयाचा असेल तर आधी ते खेळ पूर्णपणे विकसित करायला पाहिजेत. साहसी खेळांच्या संस्था निर्माण होण्यासाठी व त्यांची निकोप वाढ होण्याकरता शासकीय पाठबळ मिळण्याची आवश्यकता आहे. कारण साहसी क्रीडासंस्था हेच साहसी खेळांची वाढ व प्रसार करण्याचे योग्य माध्यम आहे. अशा संस्थांमध्ये अनुभवी व्यक्ती एकत्रितपणे काम करतात. त्यांच्याबरोबर साहसी मोहिमांत सहभागी होऊन नवख्या व्यक्तीस अनुभवाची शिदोरी जमा करता येते आणि कालांतराने त्याच संस्थेत नेतृत्व करण्याची संधीही मिळते. निसर्गाचा आदर, साहसी खेळातील जोखीम, सहभागींची सुरक्षा, त्यांच्या जबाबदारीची जाणीव, आर्थिक लाभापलीकडे जात कर्तव्यपूर्ततेची भावना, इ. संस्कार हे केवळ साहसी क्रीडासंस्थेतच होतात. हे संस्कार आणि प्रत्यक्ष अनुभव यातून तयार झालेली व्यक्ती ही नवख्या व्यक्तीची जोखीम घेऊन त्यास यशस्वीपणे साहसी खेळाची अनुभूती देऊ  शकते.
यासाठी आधी साहसी खेळ व या खेळांच्या संस्था सुदृढ व्हायला हव्या. त्यातून अपघातविरहित साहसी पर्यटन आपोआपच विकसित होईल. पण आज असे घडताना दिसत नाही. याचे कारण आपल्याकडे साहसी क्रीडासंस्था कमी आणि पर्यटन अधिक अशी परिस्थिती आहे. त्यातून होते काय, की पर्यटनाच्या माध्यमातून केवळ काही क्षणांपुरता साहसाचा अनुभव मिळतो. त्यात त्या व्यक्तीला स्वत: काहीही करावे लागत नाही. गिर्यारोहणातील व्यापारी मोहिमा, गिर्यारोहणाचे तंत्र वापरून केलेले रॅपलिंग, टँडम पॅराग्लायडिंग, टँडम स्कूबा डायव्हिंग यातून खेळाचं प्रशिक्षण कमी आणि केवळ काही क्षण साहसाचा अनुभव देण्याकडेच सध्या अधिक कल आहे. व्यवसाय म्हणून यात गैर काहीच नाही; परंतु त्यातून या साहसी खेळांचा विकास होण्याची शक्यता कमी. या अनुषंगाने जागतिक स्तरावरील साहसी खेळांकडे पाहता ते खूपच वरच्या यत्तेत आहेत. आपल्याला अजून बऱ्याच यत्ता पार करायच्या आहेत. त्याकरता क्रीडाधुरिणांनी आणि शासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे प्रयत्न झाले तरच आपण साहसी खेळांचे जागतिक शिखर गाठू शकू.
हृषिकेश यादव
(लेखक अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे कार्याध्यक्ष व युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.)

National Consumer Commission hearings,
राष्ट्रीय ग्राहक आयोगातील सर्वसुनावण्या १५ एप्रिलपासून ऑनलाईन!
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
63 year old woman duped of rs 80 lakh after threatened with ed name zws
ईडीची धमकी देत ज्येष्ठ नागरिक महिलेची ८० लाखांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- वाचा काय प्रकार आहे … 
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Updates
KKR vs RR : कोलकातामध्ये आरआर आणि केकेआर यांच्यातील सामन्यात होऊ शकतो बदल, जाणून घ्या काय आहे कारण?