शनिवारी संध्याकाळी मल्हारकडे त्याची मावस-मामे भावंडे राहायला आली होती. मल्हारची आई काही महत्त्वाच्या कामासाठी दोन तास बाहेर जायला निघाली तेव्हा तिने चार दिवसांसाठी पाहुणी आलेल्या मावशीला विचारले, ‘‘मावशी, जाऊ ना मी? या वानरसेनेचा फारच त्रास झाला तर लगेच फोन कर.’’
‘‘तू अगदी काळजी करू नकोस. तू येईपर्यंत आरामात िखड लढवीन.’’ आजी हसत उत्तरली.
‘‘मल्हार, आजीला त्रास देऊ नका हं. तिच्याकडे गोष्टींचा खजिना आहे. पोटभर गोष्टी ऐका.’’ आई सूचना देऊन गेली.
‘‘आजी, या पुस्तकातल्या स्टोरीज् वाचून दाखवतेस?’’ चार्वीने मोठेसे मराठी पुस्तक पुढे केले. सर्वजण तिच्याभोवती जमले. आजीने क्षणभर पुस्तकाकडे पाहिले आणि सुस्कारा सोडत म्हणाली, ‘‘अरे देवा, वाचते कसली? सगळेच मुसळ केरात!’’
 ‘‘इथे कुठे केर आहे आजी? आम्हाला उसळ माहितेय, पण मुसळ म्हणजे काय?’’ चार्वीने शंका विचारली.
‘‘अगं, मला म्हणायचंय पुस्तकं असून वाचणार कशी? सकाळी चष्म्याची काडी तुटली नं? आता येताना आई लावून आणील. पण काही हरकत नाही. तुमची दुधाची तहान ताकावर भागवते.’’ आजी हसत म्हणाली.
‘‘आजी, आता गोष्ट सांगताना मध्येच दूध-ताक नको. नुसते दूध तर मी कधीच पियालो नाही. आणि ताकही आवडत नाही,’’ मल्हार म्हणाला.
आजीची हसताना पुरेवाट झाली. ‘‘हसायला काय झालं?’’ मल्हारने गोंधळून विचारलं.
‘‘अरे, दुधाची तहान ताकावर हा मराठीतला वाक्प्रचार आहे. एखाद्या गोष्टीला पर्याय देताना वापरतात. पुस्तकातल्या नाही, पण मला माहीत असलेल्या गोष्टी सांगीन असे म्हणायचे होते मला,’’ आजी म्हणाली.
‘‘तुम्ही मोठे काय बोलता ते कळतच नाही. मगाशी आई जाताना बोलली, ‘‘पोटभर गोष्टी ऐका. पोटभर जेवतात की ऐकतात?’’ मल्हार पुटपुटला.
‘‘आजी, तू आत्याला िखड लढते बोलली, इथे घरात कुठाय िखड?’’ मधुराने विचारले.
‘‘हो, आम्ही मे महिन्यात कोंकणला चाललेलो तेव्हा बाजी प्रभू सरदारने मुघलबरोबर फाइट केलेली जागा पाहिली, ती म्हणजे..’’
‘‘पावनिखड’’  जयचे वाक्य मल्हारने पूर्ण केले.
पुन्हा आजीला हसू आवरेना. ‘‘अरे काय रे बाळांनो, कोंकण काय, बोललेलो, पियालो काय? आई म्हणाली नाही तर आई बोलली? काय हे? तुमची मातृभाषा मराठी नं? इंग्रजी माध्यमातून शिकता, पण मराठी व्यवस्थित बोला की.’’
‘‘आजी जाऊ दे ना. आम्हाला काय म्हणायचंय ते तुला कळलं की बस्स! शुद्ध-अशुद्ध एवढा हट्ट का?’’ मधुराचा प्रश्न.
‘‘छान प्रश्न विचारलास! एकमेकांशी संवाद साधण्यासाठीच, तुमच्या भाषेत म्हणायचं झालं तर ‘कम्युनिकेट’ करण्यासाठी भाषेची गरज आहे म्हणतेस, तर प्राणी-पक्ष्यांचे भाषेवाचून कुठे अडतेय? आपले पूर्वज, आदिमानवसुद्धा खाणाखुणांनी बोलत की. मला सांग, याच न्यायाने आपले पोट भरण्यासाठी अन्न जरुरी आहे. मग आपण डाळ, तांदूळ, भाजीपाला कच्च्या स्वरूपात न खाता शिजवून, तळून रुचकर बनवून का खातो? फक्त अंग झाकण्यासाठी कापडय़ाचा उपयोग आहे तर नुसते कापड न गुंडाळता तरतऱ्हेच्या स्टाइलचे कपडे का शिवतो? माणूस प्रगत होत गेला तशी प्रत्येक प्रदेशागणिक त्याची भाषा विकसित झाली. त्या बरोबर त्या- त्या भाषेचे व्याकरण आले. त्या-त्या संस्कृतीचे संदर्भ घेऊन मगाशी वापरले तसे वाक्प्रचार, म्हणी आल्या. भाषा समृद्ध होत गेली. पुढच्या टप्प्यावर माणूस लेखनकला शिकला. निरनिराळ्या भाषेत उत्तम साहित्य म्हणजे कथा, कादंबरी, कविता लिहिल्या गेल्या. जगात अंदाजे ७००० भाषा आहेत. त्यातली कुठलीच भाषा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. फक्त ती बोलताना शक्य तितकी स्पष्ट, बिनचूक, शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करा. मला सांगा, स्टमकला सटमक म्हटले तर हसाल की नाही? मग कोकणला कोंकण का म्हणायचे? तुम्ही जास्तीत जास्त भाषा शिका, पण आपल्या मराठीला.. मातृभाषेला विसरू नका. तिचा अभिमान बाळगा. भारतीय भाषेत उत्तम लेखन केलेल्या लेखकांना ज्ञानपीठ पारितोषिक देऊन गौरविले जाते. तो पुरस्कार मिळालेले आपले मराठी भाषेतले थोर साहित्यिक कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण ‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा करतो. त्यानिमित्ताने आपण सर्व जण काही निश्चय करू या का?’’
आजीने विचारल्याबरोबर ‘‘हो..’’ असं सर्वजण एकसुरात म्हणाले. ‘‘चला तर म्हणू या.. यापुढे आम्ही शक्य तिथे मराठी भाषा बोलू आणि हो.. जास्तीत जास्त बिनचूक बोलू.’’